जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, January 15, 2013

बस लगे रहो...

 नवीन वर्षाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा ! नवे संकल्प, नवे बेत, येत्या वर्षात अमुक एक गोष्ट पूर्णत्वास न्यायचीच हा मनाशी केलेला  निश्चय, वगैरे वगैरेंची आखणी झाली असेल. या सगळ्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे तडीस नेता येतील का नाही हे येणारा काळ ठरवेलच. प्रत्येक येता दिवस, ’ अजून वेळ आहे बरं काचा दिलासा देईल, प्रोत्साहन देईल. सरता दिवस, ’जातोय हं का एक एक दिवस हातातून निसटून . चला आता जरा जाणीवपूर्वक, मनावर घेऊन ठरवलेल्या बेतांची पाठपुरवणी करा ’ चा इशाराही देईल. बरेचदा मी नोटीस केले आहे की आळस हा फक्त त्या एका विवक्षित क्षणाचा असतो. जर का तो क्षण आपण निकराने जिंकला तर पुढचे सगळे सहज होऊ शकते.

संकल्प कशाचाही असू शकतो. अगदी रोज सकाळी उठून नियमितपणे स्वत:च्या इतरांच्या पांघरुणांची घडी घालण्याचा, झाडांना पाणी घालण्याचा, पंधरा दिवसातून एकदा कपाट आवरण्याचा, जे कव्हर असेल तीच सीडी त्याच्या आत ठेवण्याचा, चपला झटकून रॅकवर ठेवण्याचा, इस्त्रीचे कपडे वेळेत देऊन वेळेत आणण्याचा. संपूर्ण वर्षात शक्य तितका अनावश्यक खर्च टाळण्याचा. गोड बोलण्याचा. कालच संक्रांत झालीये नं.... :) रोज आजीशी किमान पंधरा मिनिटे बोलण्याचा. नियमितपणे... म्हणजे इतक्या नियमितपणे एखादे आईचे काम करण्याचा की ती त्या कामाबाबतीत निःशंक होऊन जाईल. किंवा रात्री झोपताना चुकता दात घासून झोपण्याचा. अगदी कशाचाही असू शकतो. इथे मी रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, गुंतवळ गॅलरीतून हळूच कोणी पाहत नाहीये नं असे मांजरीसारखे डोळे मिटून खाली सोडणे, वगैरे संकल्पही असतात असे म्हणणारच नाही कारण आपण कोणीही हे वेडे प्रकार करतच नाही हे गृहीत आहे. तर, हा किंवा हे संकल्प फक्त त्या वर्षापुरते नकोतच. त्या नेमेची उगवणार्‍या सौजन्य सप्ताहांचा सुळसुळाट आणि मग वर्षभर उडणारा बोजवारा पाहतोच की आपण. संकल्प कसे कायमचेच हवेत. त्यांना लोणच्यासारखे अंगी मुरवून टाकायचे. मग काही वर्षांनी आपण इतक्या गोष्टी नियमाने करत असू की त्या कधीतरी आपण जाणीवपूर्वक अंगी बाणवल्यात याचाही विसर पडावा. सातत्य... सातत्य... सहजता... विजय. काय... खरं नं?


तर या संकल्पांची प्रत्येक व्यक्तीनुरूप वेगवेगळी संकल्पना असली तरी नव्वद टक्के मनांमध्ये शिखरावर विराजमान असतो तो व्यायामाचा संकल्प. दर वर्षी केला जाणारा... वर्षात पुन्हा पुन्हा केला जाणारा... सारखा वाकुल्या दाखवणारा... , " कर नं... आज तरी.... करशील? करशील? पाहा जमतेय का? नाही म्हणजे इतका वेळ खाण्यात घालवतेस त्यातला थोडासा.... काय? जमेल गं तुला..... करशील? आज करच.... " म्हणत येताजाता समोर उभा ठाकणारा. मस्त गरम गरम बटाटेवडा खातांना.... त्या पिवळसर तकतकणार्‍या वड्याचा खमंग वास मनात भरून घेत पहिला घास घेऊ म्हणून त्याकडे पाहता... त्यावर कमरेवर हात ठेवून वड्याची आपल्या आनंदाची शकले करू पाहणारा हाच तो संकल्प. दिवसभर मस्त चापून झाल्यावर... झोपताना न चुकता स्वत:ला गिल्ट देणारा संकल्प. नेमेची हात धुऊन पाठपुरावा करणारा संकल्प.... व्यायामाचा संकल्प.

खरं तर तुम्हाला, मला, सगळ्यांनाच या संकल्पाची महती, जाणीव वाजलेले तीन तेरा माहीतच आहेत. शिवाय प्रत्येकाचे स्वत:चे वेगवेगळे अनुभवही आहेतच गाठीशी. तेव्हा आता वेगळे वेगळे ते काय मंथन होणार आहे या पोस्टमधून... मलाही असेच वाटत होते. म्हणून आळसाची साथ देत हाताला आरामच देत होते. चहाचा कप हाती घेऊन बाहेर साचून राहिलेला थिजलेला थंड शीळा स्नो पाहत असताना एकदम आईचे शब्द आठवले. अगं एखादी गोष्ट नीट लक्षात राहायला हवी असेल, अंमलबजावणी व्हायला हवी असेल तर लिहून काढावी. लिहिले की जास्त समजते... खोलवर पोचते... अर्थ भिडतो... आणि मुख्य म्हणजे कायमचे स्मरणात राहते. शाळेत, कॉलेजात हे सूत्र पर्फेक्ट उपयोगी पडतेच म्हणा. शिवाय काही वेळा गोष्टींच्या नोंदी ठेवल्या नं की पुढे संदर्भासाठी प्रचंड उपयोग होतो. आणि एखाद्या संध्याकाळी या सगळ्या डायर्‍या घेऊन कुठलेही पान उघडून वाचताना खूप मजाही येते... नॉस्टॅलजिकही होऊन जायला होते... महागाईचा राक्षस किती फोफावलाय हे पाहून गरगरून जायला होते. काही नाजुक, हृद्याशी जवळीक करून असलेल्या क्षणांमध्ये पुन्हा एकदा जगता येते. गाडी आता भरकटलीये... हा या पोस्टचा मुद्दा नाहीये. हे नाजुकसाजुक तरल काहितरी... व्यायामाला मागे सारून कुरघोडी करून टाकण्याआधी डायरी बंद. व्यायामाला लागूयात.... म्हणजे निदान संकल्पाचा पाठपुरावा करायचे मनावर घेऊयात.


इतर संकल्पांनपेक्षा हा व्यायामाचा संकल्प कशानेही हाणून पडतो. म्हणजे काहीही फुसकट कारणेही पुरतात. आज काय आभाळ भरून आलेय... आज मन मरगळलेय. आज कामवाली बाईच नाही आली. भांडी-धुणे-केरवारे केले म्हणजे होणारच आहे की व्यायाम. नुकतेच तर खाल्लेय आता चार तास व्यायाम करता येणार नाहीच. हो नं उगाच या नादात काहीतरी भलतेच व्हायचे. आज सकाळपासून हा मेला सेल पाठ सोडत नव्हता. आता गाडी पकडू का व्यायाम करू ? या घरातली माणसे म्हणजे नं.... स्वत: म्हणून काही करणार नाहीत. सारखं अगं अगं... आई आई... आता नोकराणीसारखी पडत्या फळाची आज्ञा झेलत फिरत राहते. वर माझ्या दिसामासाने वाढणार्‍या वजनाच्या वरकरणी दिखाऊ चिंतेचे ताशेरेही ऐकते. मागोमाग येणारे फुसकन हास्याचे फवारेही ऐकू येतात बरं का मला. जरा काही खायला गेले की आडपडद्याने सोडलेल्या फुसकुल्याही आहेतच भर घालायला.

गंमत म्हणजे या संकल्पाला सारखी लाचेचीही गरज असते. आठवडाभर व्यायाम केलास नं राणी तर शनीवारी हक्काने चाट खाता येईल. शहाणी नं तू. अगं तू मनात आणलेस तर तिकोनाही एका दमात चढून जाशील बघ.... कसे छान वाटेल नं कोणाचाही आधार न घेता गड सर करायला. अश्या लाडीगोडीचीही नितांत गरज असते. अगबाई, हा ड्रेस इथे दडला होता होय... बरं झालं सापडला. आता धुऊन उद्याच घालावा म्हणून तू सकाळी काढलास पण मग खट्टू झालीस... झालीस नं? व्यायाम केलास की महिन्याभरात होईल बघ. काय खुलायचा गं तो अंगावर... अश्या मखलाशीचीही गरज असते. या संकल्पाला बरेचदा सोबतीने तडीस नेता येते. एकटीने काय तो बाई करायचा व्यायाम. कोणीतरी सोबत असले की कसे उत्साह येतो. शिवाय त्या सख्यांच्या टोमण्यांच्या दडपणानेही आपण करतोच नं. नाहीतर उगाच, ’ तू किती गं आळशी किंवा किती आरंभशूर असे ऐकून घ्यावे लागेल की काय... म्हणून नेटाने आपण करतोच करतो. हे दडपण बरेच असते की. छुपा फायदा.


थोडक्यात , काचेच्या भांड्याला कसा जरासा धक्का लागला तर तडा जाऊ शकतो तसेच या व्यायामाचे आहे. आणि हे असे तडे रोजचे दबा धरून बसलेले असतातच. एकदा का यांचा कल्ला वाढला की खळकन आवाज येतो.... व्यायामाचा चक्काचूर होऊन जातो. तो होऊ नये म्हणून या लाचेच्या, मखलाश्यांच्या, लाडीगोडीच्या, धाकधपटश्याच्या, तलवार काढण्याच्या आणि फायनली गंगायमुनांच्या क्लुप्त्या स्वत:वरच योजत राहायच्या. विजयाच्या झेंड्याला हात लावल्यावर मिळणार्‍या आनंदाचे गाजर लटकवत ठेवायचे.


आता हेच पाहा नं, " रोज सकाळी गजर वाजला की मिटल्या पापण्यांच्या आत गाढ निजलेल्या माझ्या मनाला प्रथम जाणीव होते ती उठून आन्हिके झाली की व्यायाम करायचा आहे. नको नं, आज नको बाई. उद्या नक्की. जरा झोपू दे नं सुखाने. उठल्या उठल्या, आले, गवती चहा घालून केलेल्या त्या अमृताचा निवांतपणे आस्वाद घेऊ दे की. मेलं कशाचंच सुखं म्हणून मिळत नाही. आजकाल या व्यायामाचा बागुलबुवाच झालाय. लहान मुलांना कसे आपण थोडेसे घाबरवतो ऐकत नसली की तसेच होतेय. या अश्या बागुलबुवाच्या दडपणाखाली व्यायाम करूनही काही फायदा होणार नाहीच मुळी. मन चक्क मनाशीच गेम्स खेळू लागते. प्लीज, प्लीज... एकच दिवस. उद्या दुप्पट करू. हा झगडा अर्धवट झोपेत चालतो. मग तो क्षण रोज मी निकराने मागे ढकलते. त्याने मांडून ठेवलेली आमिषे दूर सारते आणि सर्वांगसुंदर व्यायामास सुरवात करते. पुढे ४५ मिनिटे सलग लड्या उलगडत जाव्यात तसा सहज उत्साहाने व्यायाम होतो. म्युझिक बंद करून, घामेघुम होऊन कोचावर टेकण्याचा तो क्षण सार्थक झाल्याचा. पुढला सगळा दिवस उत्साहात, जोमात जाणार याची ग्वाही देणारा. खातांना टोचणी देणारा. वय लहान असो का मोठे व्यायामाचे फायदे प्रचंडच. संपूर्ण दिवसाच्या उत्साहाची बेगमी करणारा व्यायाम. शरीराला रोज तरोताजा ठेवणारा व्यायाम. बॉडी टोन करणारा, लवचीकता टिकवणारा. पुढे पुढे, बिपी, कोलस्ट्रॉल, डायबेटिस सारख्या बोलावूनही आलेल्या कायमच्या गोचिडीसारख्या चिकटून बसलेल्या पाहुण्यांना काही अंशी लगाम घालणारा व्यायाम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरशासमोर उभे राहून स्वत:ला पाहिल्यावर आपल्या चेहर्‍यावर हसू उमटवणारा, पसंतीची पावती देणारा व्यायाम.


बरेचदा आपल्या सगळ्यांना प्रकर्षाने जाणवणारी आता मनावर घेऊन काहीतरी करूयाच ची जाणीव करून देणारी गोष्ट म्हणजे, आपल्याला नवीन कपडे घ्यावेसे वाटतात. म्हणजे असे आतून वाटू लागते. एखादा छानसा ड्रेस कोणाच्या अंगावर पाहिलेला लक्षात राहून गेलेला असतो. तर कधी एखादा रंग मनात घोळत असतो. जेव्हां हे आतून वाटणे उतू जाऊ लागते तेव्हा आपण उत्साहाने बाजारात जातो. तसे येताजाता पारखी नजरेने काही दुकानात लावलेले ड्रेसेस, कापडे आपण हेरून ठेवलेली असतातच. बाजाराच्या दिशेने रिक्षा जाऊ लागली की मन त्या त्या हेरून ठेवलेल्या ड्रेसेसचा अदमास घेऊ लागते. नकळत काल्पनिक फॅशन शो सुरू होतो. एक एक ड्रेस घालून मनाच्या रॅंपवर परेड सुरू होतो. कसा दिसतोय? नको बाई. कोंबल्यासारखे वाटतेय. दुसरा ड्रेस... ह्म्म्म... हा किनई पायात ज्यांची उंची आहे नं त्यांनाच शोभून दिसेल. तिसरा ड्रेस... रंग किती गोंडस आहे नं पण माझ्यावर खुलत नाहीये. आडवे पट्टे नकोच. मन खट्टू. चौथा.... किती मऊ सुखद स्पर्श आहे कापडाचा आणि रंगही खुलतोय. पण हे काय.. त्या पुतळ्यावर किती सुंदर दिसत होता. मला तर नीट श्वासही घेता येत नाहीये. आता पुतळा कुठे आळशी आहे? त्याला खरी भूकही लागत नाही आणि कसलेही टेम्पटेशनही होत नाही. बरे आठवले, सीताफळाचे आइसक्रीम खाऊन बरेच दिवस झालेत. आज... आज... डोळे लगेच लकाकतात. दुसर्‍या क्षणी काहीतरी धडपडल्याचा आवाज येतो. अग बाई! कोण पडले... म्हणून पाहू लागते तर माझेच कुचकट मन ते. पडल्यापडल्याही कुच्छित हसतेय. दुष्ट.


शी बाई. मरू देत ते ड्रेस, छानसा स्कर्ट आणि दोन तीन ट्रेंडी टॉप्स घेऊयात. मग या रॅंपवरून उतरून दुसर्‍या रॅंपवर पुन्हा पहिल्याच उत्साहाने परेड सुरू होते. कॉलेजच्या दिवसातली स्कर्ट घातलेली स्वत:ची छबी डोळ्यासमोर तरळते. कसली तुडतुडी होते मी. त्या नादात स्कर्ट, टॉप्स उलगडू लागतात. या परेडची कथाही काही वेगळी नसतेच. विमानतळावरच्या बॅग्ज कलेक्शनच्या वेळी कसे काही वेळा दोन पट्ट्यावर बॅगा येतात आणि आपली तारांबळ उडवतात तसे वाटू लागते. मग हळूहळू ’ डिनायल ’ ची अवस्था पृष्ठावर येते. मी पण नं उगाच स्वत:ला इतके मोडीत काढतेय. मान्य आहे. वजन जरा वाढलेय. जरा...?? आतले मन माझ्या झापडं ओढून स्वत:लाच गोंजारणार्‍या बाह्य मनाला चापटी मारते. पाहा पाहा त्या शोकेषमधल्या काचेत पाहा निरखून. लावलेले सुंदर सुंदर ड्रेस दिसतात की मनाचे लाड करून झालेली तुंदिलतनू दिसतेय. बरं बरं, कळले हं का. इतकेही काही हिणवायला नकोय. मलाही काही हौस नाही आलीये इतके वजन घेऊन फिरायची. आणि दिसतेय नं तुला जरा कुठे उत्साहात निघालेय छानसा ड्रेस घेईन तर सगळ्या आनंदावर विरजण घालायचे काम तेवढे तू कुचकटपणे कर. व्यायाम टाळण्याच्यात्या क्षणी मात्र तू दडी मारून बस हं. दुष्ट दुष्ट. असू दे. मी कशीही दिसत असू दे. आज ड्रेस घेणारच असे म्हणत त्यातल्या त्यात जोरात मान झटकून समोर दिसेल त्या दुकानात घुसते.


आत  माझ्यासारखी उत्साही मने अखंड चिवचिवत कपड्यांच्या घड्यांवर घड्या उलगडत असतात. आरशासमोर उभे राहून हा ड्रेस कसा दिसतोय, तो कसा दिसतोय.... पाहता पाहता प्रत्येकीच्या शेजारी हा ढीग जमा झालेला असतो. नेमके कोण बापुडवाणे... ??? उत्साही मन, सेल्सगल्स की कपडे... हा प्रश्न मला सतावू लागतो. कपड्यांनी एकामागोमाग नाकारलेले पाहून दुखावलेले मन इरेला पेटलेले असते. बिचार्‍या सेल्सगल्सही आपले गळ्यात मारण्याचे कौशल्य पणाला लावून थकलेल्या असतात. कॉउंटवर नवीन कपडा ठेवायला जागा नसते आणि रॅकवर काहीही उरलेले नसते. हे एकंदरीत भयावह झालेले वातावरण माझी पकड घेण्याच्या आत मी या सगळ्याकडे काणाडोळा करत एका ड्रेसवर बोट ठेवते. क्षणात मला होईल नं हा अंदाज घेऊन तिला पॅक करायला सांगते. थकलेली ’ती ’ अवाक. इतर दुखावलेल्या ललना मी घेतलेल्या ड्रेसकडे पाहून कष्टी. हा मला का दिसला नाही??? पैसे देऊन दुकानातून बाहेर पडताना पुन्हा एकदा मी तितक्याच जोरात मान हालवते.... कशासाठी कोण जाणे. पण हालवते. बाकी काही नाही तरी दोन वेळा मान झटकल्यामुळे थोडासा व्यायाम तरी. तोच एक माझ्याच वयाची सखी माझ्यावर एक नजर टाकून काहीश्या ताठ्यातच ( म्हणजे मला तरी तसेच भासते नं... ) प्रफुल्लित मुद्रेने पुढे सरकते. त्या चवळीच्या शेंगेला पाहून काळजात खोलवर उठलेल्या मोठ्या कळीला दाबत मी स्वत:ला रिक्षात कोंबते.


घरी आल्यावर ड्रेस कपाटात ठेवून चहाचा कप हाती घेत आरशात पाहत मी पुन्हा नव्याने संकल्प करते. दाखवूनच देईन तुला आता. दोन महिन्यात किलो कमी करूनच हा ड्रेस घालेन. आरशातले मन मिश्किल हसत असते. घे रे तू हसून... पाहशीलच. फक्त दोन महिने. पैज आपली. मी जिंकले तर लगेच नवीन ड्रेस आणि तू जिंकलास तर हा ड्रेस कपाटातच. पुन्हा एकदा... तिसर्‍यांदा मान झटकून मी चहाच्या कपाकडे पाहत पुटपुटते... साखर पाव चमचाच घालायला हवी होती नं. मणामणाने साचलंय ते कणाकणाने जिंकायचंय. कपाटातला ड्रेस चडीचूप, आरशातले मन हाताची घडी तोंडावर बोट. कभी मै ड्रेसको देखू तो कभी आईनेको... दोनोंकी आंखोमें साफ दिख रहा हैं...., " नादान, खुदको देख और एक बार फिर खुदसे प्यार कर... तू ही नही तो कोई नही... कोई नही.. !! "


नवीन वर्ष सुरू होऊन पाहता पाहता १५ दिवस उलटलेही. संकल्पाची ऐशीतैशी अजून तरी झालेली नाही. चुकार एकदोन अपवाद वगळता सातत्याच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. हे सातत्यच मला विजयाची ललकारी ऐकवणार आहे नं... तेव्हां ... बस लगे रहो!

टीप : आपले वजन वाढलेय ही कल्पना व्यक्तीसापेक्ष असते.  म्हणजे वजन वाढलेले असतेच परंतु  कोणाला किती वाढलेले भयावह वाटेल आणि कोणाला कितीही वाढले तरी निवांत वाटेल.... तेव्हां... :) :)

22 comments:

  1. मीही स्वत:ला असं किती वेळा एखाद्या ड्रेसमधे मनातल्या मनात पहिलं आहे. आणि घातल्यावर 'वजन' कमी केले पाहिजे असे म्हणून हिरमुसले आहे. गेल्या वर्षी मात्र माझा संकल्प मी अगदी 6-7 महीने पार पाडला. त्याचं फ़ळही मिळालं. :) माला एक गोष्ट लक्षात आली आहे की एक संकल्प म्हणून व्यायाम केला टार तो नियमित नाही होत.पण ती आपल्या जीवनावश्यक गोष्टी पैकी एक आहे असं ठरवल की एकदम निराळा दृष्टिकोण मिळतो. म्हणजे जसे जेवण केले नाही, झोप झाली नाही, आंघोळ केली नाही की कसे अस्वस्थ होते? कारण तो जीवनाचा एक भाग आहे. तसेच एखादे दिवशी नाही पलायाला जाता आले टार अस्वस्थ झाले पाहिजे. मग तो संकल्प रहात नाही. :) ती सवय होउन जाते. :) ऑल दे बेस्ट.

    ReplyDelete
    Replies
    1. व्यायाम, योगासने इत्यादींचा अगदी लहानपणापासून नाद आहे मला. त्यामुळे तू म्हणतेस तसेच अस्वस्थ व्हायला होते. हल्ली दोनेक वर्षांपासून प्रकृती डामाडौल होतेय,काहितरी खुसपटं निघत राहतात. त्यामुळे कटकट झालीये... असो. त्याचे हे प्रतिबींब उमटलेय. :)

      ड्रेसेस आणि तसे वाटणे सार्वमनीक असणार बघ. :D :D धन्यू गं!

      Delete
  2. बाय द वे मी आजच तीन महिन्यात पहिल्यांदा पळायला गेले होते आणि आल्यावर जेवण म्हणून 'सलाड' खाताना पोस्ट वाचून कमेंट लिहिलेय. :) I liked this post. So much relates to me.
    -vidya.

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा. तुमच्याकडे थंडी सोसण्याइतपत दिसतेय. पुन्हा एकदा धन्सं! :)

      Delete
  3. तिकोन्याला तू वरपर्यंत चढलीस, पण मला मात्र अर्ध्यातच थांबावं लागलं होतं, तेंव्हापासून वजन कमी करायचा विचार ( होय, केवळ विचारच ) करतोय.
    बरेच दिवस पोटावर घट्ट होणाऱ्या पॅंट्स जबरदस्तीने वापरायचो, पण आता मान्य केलंय,की साईझ वाढली आहे ते... आणि मोठ्या नंबरचे कपडे घेतले विकत.
    पोस्ट एकदम झकास. स्वतःला कोरिलेट करू शकलो बघ.

    ReplyDelete
    Replies
    1. हो रे. झेंडा गाठायचाच असे मनाशी मी ठरवलेच होते. :) तू जातो आहेस नं चालायला... धीर सोडू नको. :)

      Delete
  4. navin varshachya anek resoutions paiki ha all time fev. agenda asato maza. sankalp tadis jato ki nahi ha bhag vegala :)

    Post khupach chan tai.

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉगवर स्वागत व खूप खूप आभार!

      हो नं, हे आवडते आहेच. किमान आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा होतेय, पुन्हा पुन्हा होतेय ही भावना जोवर आहे तोवर अमंलबजावणीला वाव आहे. :)

      Delete
  5. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

    असे अनेक ड्रेस माझ्या कपाटात माझी वाट बघत आहेत :( एकदाच मला एकाच वेळी व्यायाम आणि तोंडावर नियंत्रण या दोन्ही गोष्टी जमल्या होत्या आणि मी ६ महिन्यात कोणताही त्रास न होता १० किलो वजन उतरवले होते. या ६ महिन्यात मी एकदाही वजन कट्यावर उभी राहीले नव्हते, पण जसजसे सर्वजण मला या बदलाबद्दल सांगू लागले, आणि एक दिवस मी कट्यावर उभी राहून खात्री करून घेतली.....पण त्या दिवसापासून माझा खाण्यावरचा कंट्रोल हळूहळू कमी होत गेला आणि व्यायामाचा आळसही वाढू लागला.....पुढच्या वर्षात मी पुन्हा मूळ पदावर आले..... या वर्षाची सुरुवातच घरातल्या एका लग्नाने झालीय, म्हणजे पर्यायाने भरपूर गोड खाण्याने! जिम जॉइन करून झालाय.......फक्त एक दिवस जाता आलाय.....बघू आता ही पोस्ट वाचून काही बदल होतो का ते!
    All the Best to you (if its your own story)and me too(because its my story too!)

    ReplyDelete
    Replies
    1. ओह्ह्ह! असे झाले का? हे डेंजरस आहे गं. म्हणजे आनंद होऊ द्यायची सोय नाही राहीली. :( आता पुन्हा सुरवात केली आहेस नं. होईल कमी. शुभेच्छा! :)

      आभार्स!

      Delete
  6. माझीही गाडी अशीच रूळावर येते आणि हळूच रूळ सोडते . वजनाच्या वाढण्य़ा न वाढण्याचा दोष सध्या थायरॉईडवर ढकलून मोकळे झालेय मी ;) :) . पण माझी एक मैत्रीण सांगते व्यायाम हा औषधासारखा कर, म्हणजे ठरल्या वेळेला गोळ्या कश्या नियमाने घेतो आपण तसेच व्यायामाचे करायचे. हा सल्ला जरा लागू पडलाय मला सध्या :)
    मोठ्या नंबराचे कपडे घेताना जीव खालीवर होतो गं अगदी .... पोस्ट पटेश एकदम!!

    तूम्हा सगळ्यांनाही पुन्हा एकवार नव्या वर्षाच्या शुभेच्छा बयो :)

    ReplyDelete
    Replies
    1. आपला सेम पिंच सुरू आहेच गं. हे थायरॉईड भारी द्वाडच. :( तर काय मोठ्या साईजचे कपडे घेतांना जीवावर येते. कारण वजन कमी झाल्यावर त्याचे काय करायचे... :D:D. धन्यू बयो!

      Delete
  7. अरे वा !!!
    नविन वर्षाच्या अनेक रिझोल्युशन्स असतात गं..ह्यातली ही मात्र एक असतेच..ती हार्डली २किंवा ३ महिनेच पाळली जाते..
    मला तर १५ दिवस ही खुप आहेत..नित्यनविन पदार्थ बनवणारी मी असले रिझोल्युशन्स अजिबात करायचे नाहीत असे दर वर्षी ठरवते..पण ...सगळे म्हणतात म्हणुन मी पण आपली बोलुन जाते आणि नववर्षाच्या १० तारखेपर्यंत इतक्या पार्ट्या होतात की सगळं बोललेल सहजच विसरुन जाते..असो !!
    आता ही पोस्ट वाचल्यावर तरी मला लाज वाटुन मी काहितरी शिकेन गं..बरे झाले लिहिलेस हं...मस्त एकदम..नेहमी प्रमाणे !!

    ReplyDelete
    Replies
    1. उमा, अगं ही एक मोठ्ठा अडसरच आहे बघ. म्हणजे आपण हौसेने नवीन पदार्थ बनवणार आणि मग ते चाखूनही पाहायचे नाहीत म्हणजे... :D तरी हल्ली आमच्याकडच्या गटगनां पायबंद बसलाय.

      शुभेच्छा आणि आभार्स गं!:)

      Delete
  8. HNY :)

    वेळेचं गणित जमत नाही म्हणून मी व्यायामाला शेल्फवर ठेवलं आहे गेली २-३ वर्ष . म्हणजे ते गिल्टी फीलिंग नकोच. लेकाशी खेळणे हाच काय तो व्यायाम. घरभर रांगत कार रेसिंग करणे ह्यासारखा व्यायाम नाही ;)

    ReplyDelete
    Replies
    1. तृप्ती, अगं लेकाशी रांगत खेळण्यात व्यायाम होऊ दे नाहीतर नको होऊ दे. त्यातले सुखं लाखमोलाचे गं. सध्या तू व्यायामाला शेल्फवरच ठेव. :)

      Delete
  9. फार अवघड संकल्प केला नाही की तो साध्य होतो असा अनुभव :-)

    ReplyDelete
    Replies
    1. हे बरिक खरं! :) पण मला विक्रमादित्य व्हायला आवडते... :D:D सैतानाला उतरवून लावलेच पाहीजे. नाहीतर तो अजून भुतावळ मागे लावेल की. :D

      आभार्स गं!

      Delete
  10. Bhagyashree, Halli mi sankalp karto pan varshachya praranbhi navhe., karan ya babtitla maza anubhav vait ahe... mhanun mi pratyek. divashi kahi na kahi vegla tharavto... mhanje roj ekach ek gosht na karnyane bore vhayla nahi hot... aaj mi tharavlay ki condensed matter physics che nidan 4 topics tari vachayche :-)

    ReplyDelete
    Replies
    1. ही कल्पना आवडेश... पटेशही! :) विविधता उत्साह वाढवते आणि कंटाळ्याला पळवून लावते.

      धन्सं रे!

      Delete
  11. व्यायाम? म्हणजे?? ते काय असतं? आमच्या गौरवशाली घराण्यात ही प्रथा पाळली जात नाही ;)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा.. ! आता शनी-रवीला होतोच आहे म्हणा आपसुक. :)

      धन्यू!

      Delete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !