जाता जाता एक नजर इथेही........

Friday, December 30, 2011

३६५ दिवसांचं कोरं दालन...

बापरे ! चार महिने होत आले काहीच लिहिले नाही. खरंच वाटत नाही. ब्लॉग शांत... सुस्त झालाय. हे सगळे महिने फार धावपळीत गेलेत. आपण ठरवतो खूपकाही पण ते सगळेच घडते असे नाही. अनेकदा गोष्टी आपल्या हातात नसतातच. आपल्याला मात्र वाटते की आपण कमी पडलो... पण मागे वळून त्रयस्थपणे पाहत अदमास घेतला की कळतं, हे काहीसं असंच होणार होतं. मग पुन्हा नवीन रुखरुख लागते.... हे आधीच का नाही समजलं - पटलं आपल्याला ? उगाच हा सगळा वेळ मी स्वत:ला कोसलं. मन दुखवून घेतलं... वेळही व्यर्थ दवडला..... !! आता या रुखरुखीत काहीही अर्थ नाही आणि तथ्यही नाही तरीही ती लागतेच. पुन्हा पुढल्यावेळी हे असंच चक्र घडेल याबद्दल तीळमात्रही शंका नाही. काय गंमत आहे नं... अगदी क्षुल्लक गोष्टीत मन शंकेखोर होत राहतं पण या मोठ्या गोष्टीत मात्र त्याला शंभर टक्के खात्री असावी. विरोधाभासाची कमाल !

मनात खूप काही साचलंय... परंतु कुठलीही गोष्ट बळजोरीने किंवा सक्तीने केली तर ती होईल पण त्यात जीव असणार नाही. आनंद मिळणार नाहीच उलट मनाला कटकटच जास्त होण्याची शक्यता दाट..... !!! असे असले तरी वरचेवर आपण सगळेच अनेक गोष्टी सक्तीने... स्वत:ला ढकलून... ढकलून करतो. कधी हे कसे अपरिहार्य आहे हे स्वत:ला सांगून तर कधी हेच कसे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे हे पटवून. आणि असे करणे चुकीचे नाहीच. तेचतेच करत राहण्याचा जितका कंटाळा येतो तितकीच त्या रोजच्या त्याचत्याच रूटीनची गरज नितांत असते. आता हेच पाहा नं... अगदी पहिलीतले लहान मूल असो की पदवी प्राप्तीच्या उंबरठ्यावर उभे असलेला विद्यार्थी... परीक्षा संपण्याची जितकी आतुरतेने तो वाट पाहतो तितक्याच त्वरेने परीक्षा संपताच आलेल्या रिकामपणाला तो कंटाळतो. अभ्यास, सबमिशन, होमवर्क, परीक्षा... मित्र-मैत्रिणी, टीचर्स... इतकेच काय अगदी रिक्षावाल्या काकांपासून सगळ्यांची त्याला आठवण येऊ .लागते. खरे तर लवकरच पुन्हा या चक्रात आपण अडकणार आहोत याची त्याला कल्पना असते तरीही... थोडक्यात काय सतत डोक्याला खाद्य हवे. रिकामपण जगणं कमी करतं..... ! जीवनाची अडगळ होऊन जाते.... !

दोन दिवसांच्या विकांताची आपण आतुरतेने वाट पाहतो पण सगळेच दिवस विकांतासारखे समोर आले की... नकोसे होतात. माझंही तसेच काहीसे झालेय. लिहिण्याच्या प्रवाही ओघातून गेले काही दिवस काठावर ओढली गेलेय. आता पुन्हा धारेला लागताना थोडी सक्ती करावीच म्हणतेय. वर्षही संपलंच आहे. आळस झटकून कामाला लागावं... पुन्हा एकवार ३६५ दिवसांचं कोरं दालन उघडलंय... जळमटं झटकून मनाचं नवं पान असोशीने उघडावं आणि जगणं सार्थकी लावायचा प्रयत्न मनापासून करायला घ्यावा.... हो नं ? या येणार्‍या दालनाला आपण वैयक्तिक जीवनांत व समाजात कसे सामोरे जातो हे महत्वाचं. अपेक्षा, आकांक्षा असणारच पण त्यासोबत काही उपेक्षा... हिरमुसलेपण, बराचसा त्रागा-वैताग... मीच का... नेहमीच माझ्याचबाबतीत का ? का? हे सगळे प्रश्नही सोबत असणारच. त्यांनी नाउमेद न होता नवं कोरं पान लिहायला घेऊया.... ज्याला आपण दु:ख म्हणतो ते खरंच दु:ख आहे का हे ही तपासून पाहू. केलेलं कर्म आपण विसरून जाऊही पण ’ तो ’ विसरत नाही... नवं रचताना याचं भान असावं !

मला माहीत आहे आपल्यातले बरेच जण यावर्षी कुठलेही संकल्प करणार नाहीत... कशाला करायचे ... नेहमीच ते फेल होतात. मग अजूनच अपराधी वाटत राहतं. वडा खायचा तो खाल्ला जातोच पण मेलं त्यातलं सुख मात्र हिरावलं जातं. हा हा ! अगदी अगदी ! असंच होतं पण तरीही रिझोल्युशन करणं जरूरीचं आहेच. त्यामुळे किमान आपल्याला काय ’ साध्य ’ करायचे आहे हे तरी विसरायला होत नाही. निदान काही दिवस जाणीवपूर्वक त्या ’ साध्याचा ध्यास ’ घेतला जातो... नेटाने प्रयत्न केला जातो. भले तो ध्यास महिनाभर टिकू दे... त्या महिनाभरात संध्याकाळचे जेवण टिवीसमोर बसून कोणाच्याही घरात न घडणार्‍या अतर्क्य नौटंक्या पाहत करण्यापेक्षा... हसतखेळत, एकमेकांची विचारपूस करत खेळीमेळीने केलेले जेवण पुढल्या सगळ्या महिन्यांमध्ये किमान चार आठ दिवस तरी आपसूक टिवीकडे पाठ फिरवते. हेही नसे थोडके !! महिन्याला इतके किलो वजन उतरवेनच या संकल्पापेक्षा महिन्याला फक्त एक किलो वजन उतरवेन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वर्षभरात एकही किलो वजन वाढू देणार नाही हा संकल्प करून तो तडीस न्यावा... पटतंय ना... :)

जपानच्या नैसर्गिक आपत्तीने आपल्याला खूप काही शिकवले. एकमेकांच्या जीवावर सतत उठलेली माणसे पाहणार्‍या जगाला माणुसकीचे एक आगळेवेगळे दर्शन घडले. ट्युनिशियातून सुरू झालेल्या स्वातंत्र्यक्रांतीने.... एका छोट्याश्या ठिणगीने धारण केलेले उग्र रूप विजयी सांगता घेत प्रेरणा देत पुढे सरकत राहिले, अन्यायमूक्त करत गेले।

दुसर्‍या बाजूला या संपलेल्या वर्षात जरा जास्तच अलौकिक अमूल्य रत्ने आपण गमावलीत. पंडित भीमसेन जोशी, भुपेन हजारिका, जगजित सिंग, शम्मी कपूर, देव आनंद, जगदीश खेबूडकर, श्रीनिवास खळे, प्रभाकर पणशीकर, गौतम राजाध्यक्ष, करुणा देव... अर्थात निलम प्रभू, मारिओ मिरांडा, पतौडी, सत्यदेव दुबे, इंदिरा गोस्वामी, डॉ. पी. के. अय्यंगार, स्टिव्ह जॉब्ज...... ओघात जी नावे समोर आली त्यांचा उल्लेख केला आहे. अनवधानाने सुटलेल्या सगळ्यांप्रतीही तितकेच तीव्र दु:ख आहेच.... !!

खेबूडकरांच्या शब्दात सांगायचे तर, " प्राजक्ताच्या फुलासारखे जगताना दुसऱ्याच्या ओंजळीत सुगंधाचा दरवळ दिला की, मागे वळून पाहण्याची गरजच नसते.... " या सगळ्यांनी प्राजक्ताच्या फुलासारखे जगताना आपल्या ओंजळीत सुगंधाचा दरवळ दिलाय... त्यांना मागे वळून पाहण्याची गरज उरलेलीच नाही..... आपल्या सगळ्यांच्या अंत:करणात ही रत्ने अखंड जिवंत राहतीलच.

सरत्या वर्षाचा निरोप घेताना येणार्‍या नव्या उद्याचे स्वागत जोमाने, उत्साहाने, आनंदाने - दंग्याने करूया. वर्षोनवर्षे एकमेकांना देत आलेल्या शुभेच्छा पुन्हा एकदा सगळ्यांना देऊयात... त्याचबरोबर या येऊ घातलेल्या वर्षात परस्परांकरिता व स्वत:करिताही रोजच्या धबडक्यातून किंचितसा पॉज घेऊन काही सुंदर, प्रेममय, आनंदी क्षणांची जाणीवपूर्वक गुंफण करूयात.

नववर्षातील प्रत्येक क्षण मनासारखा जावो !!!

29 comments:

 1. दालन कोर आहे का नाही हे नक्की सांगता नाही येणार मला ... आपल्या आधीच्या कर्मांची, आकान्क्षांची, रागाची, वैतागाची ...आनंदाची, अपेक्षांची गर्दी असतेच तिथ. पण ते गूढ मात्र नक्की असत (त्या अर्थाने कोरच म्हणायचं!) ते गूढ आपण कस उलगडतो ते पहायचं .. व्यक्ती म्हणून, समाज म्हणून ..

  ReplyDelete
 2. भानस, खरं सांगू... खूप बरं वाटलं... म्हणजे खूप दूर गेलेला एखादा जिवलग जेव्हा बऱ्याच दिवसांनी अनपेक्षितपणे भेटतो अगदी तसा आनंद झालाय मला.

  लिहित रहा ताई.

  ReplyDelete
 3. सुंदर लिहिले आहेस गं श्री.पुन्हा तुला ब्लॉगवर बघुन खरचं खुप छान वाटले...अशीच लिहित रहा..
  नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  ReplyDelete
 4. आलीस का एकदाची इथे परत :)

  रूटिनला कितीही वैतागले, तरी दुसरं अर्थपूर्ण काही सापडेपर्यंत त्यालाच चिकटून रहायचंय असं स्वतःला समजावते आहे सद्ध्या ... त्यामुळे तू म्हणते आहेस त्या रिकामपणाच्या पोकळीची कल्पना करता येतेय मला. नव्या वर्षात नवं काही सापडेल अशी आशा ठेवायची, नाही का?

  या वर्षी रोज ब्लॉगवर लिहायचा संकल्प आहे का तुझा? मग आमची मज्जाच. आणि यंदा एक बोनस दिवस आहे ग ... ३६६ दिवसांचं दालन आहे हे. त्यामुळे आम्हाला अजून एक पोस्ट वाचायला मिळणार ;)

  ReplyDelete
 5. मस्त! खूप दिवसांनी लिहिलंस पण किती मनापासून लिहिलं आहेस. खूप चांगले लोक या वर्षी जग सोडून गेले. आपण सर्वच बर्‍याच चांगल्या वाईट अनुभवांतून गेलो. पण तीच जगरहाटी आहे गं. काळापुढे चालत नाही कुणाचं. म्हणून आशा, अपेक्षा, स्वप्न, दु:ख, निराशा ही सर्व सर्व घेऊन पुढे चलायचं. जो दिवस चांगला जाईल तो आपला. तुला आणि तुझ्या सर्व कुटुंबियांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

  ReplyDelete
 6. छान लिहिलं आहे. दालन कोरं आहे की नाही हे खरंच सांगणं अवघड आहे. बरं वाटलं खूप दिवसांनी ब्लॉग वर बघुन.

  ReplyDelete
 7. बयो नव्या वर्षाच्या तुम्हा तिघांना अनेकोनेक शुभेच्छा आम्हा सगळ्यांकडून... :)

  येणारं नवं वर्ष सुख , समृद्धी आणि समाधान घेऊन येवो!!

  तू लिहीलेला शब्द न शब्द पोचतोय बयो!!

  ReplyDelete
 8. खरंच गं येणारे ३६५ दिवस जे आपण टप्प्याटप्प्याने यशाची मापं ठरवून यशस्वी करू शकतो याबद्द्ल योग्य शब्दांत लिहिलंस....शुभेच्छा तर आहेतच पण लिहित राहा गं....."३६५ दिवसांचं कोरं दालन"...मस्त कल्पना मांडलीस.....:)

  श्रीताई वी मिस्ड यु....

  ReplyDelete
 9. येऊ घातलेल्या नव्या वर्षाचं गूढ आपण कसं उलगडतो हेच पाहायचंय... सविता यावर्षात तुझ्याबरोबर ठरवलेला बेत घडावा... :):)

  ReplyDelete
 10. श्रीराज तुझ्या प्रतिक्रियेतली आपुलकी स्पर्शून गेली बघ... धन्सं रे ! :) नव्या वर्षात गोड बातमी येऊ घातलीच आहे. उत्सुकतेने वाट पाहतेय !

  ReplyDelete
 11. उमा तुझ्या प्रोत्साहनपर प्रतिक्रिया नेहमीच माझा उत्साह वाढवतात. अनेक धन्यवाद गं ! :)

  ReplyDelete
 12. आले आले गं गौरी परत... :)

  नवीन काही आवडीचे या वर्षात नक्की सापडेलच बघ... आशा आहे तर दिशा आपसूक दिसेल !

  आयडियाची कल्पना मस्तच आहे. रोज एक पोस्ट... हम्म्म ! :)

  धन्यू !

  ReplyDelete
 13. कांचन आज शेवटचा घाव पडलाच. :( वंदना विटणकर गेल्या. :(:( काळापुढे कोणाचेच काही चालत नाहीच !

  धन्यवाद गं !

  ReplyDelete
 14. महेंद्र, मलाही खूप बरं वाटलं तुझी उमेद वाढवणारी प्रतिक्रिया पाहून. धन्सं रे !

  ReplyDelete
 15. तन्वी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना अनेक शुभेच्छा ! :)

  ReplyDelete
 16. धन्यू गं अपर्णा ! मी ही तुम्हां सगळ्यांना खूप खूप मिस केलंय... भरभरून शुभेच्छा ! :)

  ReplyDelete
 17. भाग्यश्री, खूप प्रसन्न वाटलं वाचून. सुंदर लिहीलं आहेस. भिंतीवरी कालनिर्णय असावे आणि त्याकडे नियमित बघत जावे, तसं तू वरचेवर लिहीत रहावं आणि आम्ही ते वाचावं ही इच्छा.


  गौरीच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन :)

  ReplyDelete
 18. शेवटचं वाक्य 'हे असंच घडो' असं उद्गारवून गेलं...नववर्षातील प्रत्येक क्षण मनासारखा जाओ !! तुलाही ह्याच शुभेच्छा ग ! :) :)

  ReplyDelete
 19. लिहित रहा ...
  तुम्हाला नववर्षातील प्रत्येक क्षण मनासारखा जाओ!!!

  ReplyDelete
 20. वा.. तुला पुन्हा पहिल्यासारखं प्रवाही आणि प्रभावी लिहिताना बघून मस्त वाटलं. अशीच लिहीत रहा.. आम्ही आहोत वाचायला आणि प्रतिक्रिया द्यायला (कधी कधी थोड्या उशीराने ;) )

  तुला आणि घरी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

  ReplyDelete
 21. naveen varshachya haardik shubhecchha!
  pushpa

  ReplyDelete
 22. मंदार, ब्लॉगवर स्वागत आहे. :)

  हरभर्‍याचे झाड मोडलं बरं का... :D:D

  धन्सं !

  ReplyDelete
 23. अनघा, अगं तुझी प्रतिक्रिया येईतो ही प्रक्रिया पूर्ण होईना झालेली... :) धन्सं बयो !

  ReplyDelete
 24. BB, अनेक आभार व भरभरुन शुभेच्छा !!!

  ReplyDelete
 25. आला एकदाचा हेओबावा आला. :):) कवाधरून वाट पाहत होते... धन्यू रे!

  ReplyDelete
 26. पुष्पा आपल्यालाही अनेक अनेक शुभेच्छा ! :)

  ReplyDelete
 27. या..या... स्वागतम... नव्या वर्षी जोमाने लिखाण होऊ दे.. इथे आलीस तरी... ;) मी सुद्धा पुन्हा एकदा गाडी गियर मध्ये टाकतोय काही दिवसात... :)

  तुला 'पेण'ला मिसलो... :)

  ReplyDelete
 28. येवा येवा रोहणा, घरं वाट पाहून दमलं की.:)बरं वाटलं तुला पाहून.

  मी पण फोटो पाहून पाहून पुन्हा पुन्हा हळहळून घेतलं... :D:D

  आणि आता तूही जरा टायपाला घेच ! :)

  ReplyDelete
 29. कोरं दालन आता अर्धं भरल्यावर मी पोस्ट वाचतोय.. पण तरी :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !