जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, January 11, 2011

ठण.... ठण....

आजही झोपायला साडेबारा झालेच. गेले कित्येक दिवस, महिने ठरवतेय की बाराचे ठोके, पाठीला अंथरुणाच्या स्वाधीन करून ऐकायचे. पण, ती हवीहवीशी दिवसाची सांगता होतच नाही. साडेपाचचा गजरही एकही दिवस वाजायचा विसरत नाही. निदान रविवारचा तरी अपवाद असावा. दुधाला विरजण लावता लावता रेवा दिवसाचा ताळमेळ जुळवत होती. तेवढ्यात नवऱ्याचा नित्याचा कुचकट शेरा कानावर आदळला.

" ये की आता इकडे. रात्रभर ओट्यापाशीच उभी राहणार आहेस का? "

विरजण लावून निदान पाच तासांची तरी सुटका मिळवायच्या विचाराला त्या हाकेने सुरुंग लागला. मन, शरीर आक्रसून रेवा विरजणाचा चमचा दुधात ढवळत सुटकेचा मार्ग शोधू लागली.

सात फेऱ्यात दडलेली, उघड सत्ये.... कधी हवीशी, कधी नकोशी. लग्नाच्या नव्यानवलाईत या दडलेल्या सत्याची किती ओढ असायची. दिवसभरात कितीही मनःस्ताप झाला तरी जीव आसुसलेला असायचा. कळलेच नाही कधी ही ओढ आटत गेली. का इथेही मुस्कटदाबीच... स्वतःची आणि त्याबरोबर नवऱ्याचीही. हे आणखी एक उघड सत्य. घराघरात जाणवणारे. कुठे बळजोरीचे तर कुठे कोंडमाऱ्याचे. लग्नाच्या बारातेरा वर्षांच्या फलिताचा एक ठोका. सरत्या वर्षागणिक बळकट होत गेलेला. इकडे नवरा बोलतच होता...

" काय साला जिंदगी झालीये. दिवसभर चक्रात पिसायचे. निदान एकावेळचे गरम गरम जेवण आणि ती काही वेळाची उब..... पण नाही. रोज नुसती वाटच पाहायची. एकदा नाडीचे ठोके मोजायचे, एकदा घड्याळाचे. यातला एक ठोका बंद पडेस्तोवर ही मोजामोजी संपायची नाही. उद्या उठलो की तो घड्याळाचा लंबकच तोडून टाकतो. निदान एक दिवसाची मुस्कटदाबी, तूही अनुभवच. जीव तोडून मरमर धावायचे पण मनासारखे काही हाती लागेल तर शपथ. सकाळपासून कोण ना कोण हातोडा हाणतच... "

नवरा अखंड बडबडत होता. पण आता रेवाचे लक्ष उडाले होते. म्हणजे, नवराही या ठोक्यांचे गणित रोज मांडतो तर. त्याची कारणे वेगळी असली तरी शेवट ठोक्यांवरच. तिला खुदकन हसूच आले.

हा निव्वळ योगायोग म्हणायचा की या तेरा वर्षाच्या संसाराचा ठोकताळा. आलीस का पुन्हा ठोक्यावर? तुलाच चैन पडत नाही त्यांच्याशिवाय. खरंच की. यांची लुडबूड जिकडेतिकडे आहेच.

डोक्यात अनेक ठोक्यांचे घाव होतेच. काही भरत आलेले तर काही अगदी ताजे. लिबलिबीत. नुसत्या स्पर्शाच्या चाहुलीनेही भेदरणारे, थरथरणारे. जुन्या घावांची काहीशी तटस्थता. सरावले होते बिचारे. निबर, कोडगे होऊन नव्याने आलेल्यांच्या जखमा अलिप्तपणे पाहत होते. खपलीचा कळतनकळत पापुद्रा धरलेले, नव्यांना पाहून उन्मळून आलेले. त्यांची ठसठस अधिकच वाढलेली. नवऱ्याचा स्वर पुन्हा एकदा कानावर आदळायला लागला तसे रेवाने दूध झाकले. किचनचा लाइट बंद करून ती बाथरुममध्ये घुसली.

काय म्हणत होता, लंबकच तोडून टाकतो. पण नुसताच बडबडतोय. उठून तोडला नाही. आता रेवाला बंडाची सुरसुरी आली. स्टूल आणून वर चढावे अन त्या माजोरड्या घड्याळाची मुस्कटदाबी करूनच टाकावी. हातोड्याने त्या लंबकाच्या छाताडावर एकच घाव असा घालावा की स्प्रिंग एकीकडे अन लंबक दुसरीकडे भिरकावले जावेत. सगळी मिजास एका क्षणात होत्याची नव्हती होऊन जाईल. शिल्लक उरेल ती काट्यांची पकडापकडी आणि एक भयाण पोकळी. काटे दर तासाला ठोक्यांची वाट पाहतील. आत्ता वाजेल, हा वाजला.... आत्ताही नाही. हे काय अक्रीत? काहीतरी गडबड झाली असेल. पुढचा दोनाचा ठोका नक्कीच. तोही नाही.... डोळे तारवटून त्यांची मुस्कटदाबी विजयाने पाहीन. एकदा, पुन्हा पुन्हा... मज्जा.....

त्याच तिरिमिरीत ती बाहेर येऊन स्टूल शोधू लागली. कुठे बरे ठेवले? हॉलमध्ये नाही... हां. लेकीच्या खोलीत. संध्याकाळीच तर तिचे कॅलेंडर टांगायला खिळा ठोकला होता. स्टूल उचलता उचलता तिची नजर चेहरा किंचितसा त्रासिक करून झोपलेल्या लेकीवर गेली. अरे देवा! हिच्या इवल्याश्या डोक्यातही कुठलेसे ठोके.... नाही नाही. असे होता नये. माझ्या वाट्याला आलेले ठोके तरी हिच्या वाट्याला नकोत. संध्याकाळी मी तिला ओरडले होते. काढलेले चित्र किती आनंदून दाखवायला आली होती मला. आणि मी उगाचच माझा राग... रेवाच्या डोळ्यात पाणी आले. लेकीच्या गालावरून, केसांवरून तिने हलके हात फिरवला. त्या स्पर्शाने लेकीचा चेहरा निवळला. झोपेतच रेवाचा हात छातीशी ओढून घेत लेक शांत झोपली.

अन एकाचा ठोका पडला. ठण...

लेकीला कुरवाळता कुरवाळता, रेवाला आठवले ’ ते ” अकराचे ठोके. दहावीचा रिझल्ट घ्यायला ती गेलेली. बाईंनी अभिनंदन करून गुणपत्रिका हातात ठेवली. छाती फुटून बाहेर येईल इतक्या जोरात वाजणार्‍या ठोक्यांना सोबत करणारे अकराचे ठोके. का कोणजाणे खूप ’ लकी ’ वाटून गेलेले.

सकाळी सहाला हॉलवर गेल्यापासून चाललेला गुरुजींचा अखंड घोष. चला पटपट, नवाचा ठोका चुकवून चालणार नाही. नुसती गडबड उडालेली. देवक कधी ठेवले, कधी गौरीहार पूजला आणि कधी वेदीवर उभी राहिले काही कळलेच नाही. आठवतात ते फक्त नवाचे ठोके. अंतरपाट दूर झाला. चहूबाजूने अक्षतांच्या मार्‍यात डोळ्यात आसू आणि स्वप्ने भरून, त्याला घातलेली माळ. एका नव्या जीवनाची, सुखाची सुरवात करून देणारे प्रफुल्लित ठोके.

" अगं, आत्ता सुटका होईल बरं बाळा. धीर नाही सोडायचा असा. थोडे बळ एकवटून एकच कळ दे... " आई सारखी डोक्यावरून हात फिरवत बोलत होती. पण बाळाला अजूनही सुरक्षिततेची खात्री नसावी. दिवसाचे पान उलटायची नांदी देत बाराचे ठोके वाजू लागलेले, अन जणू त्या नादाची वाट पाहत असल्यागत मुसंडी मारून बाळाने फोडलेला पहिला टाहो. आनंदाची गोणच घेऊन आलेले ते किणकिणते ठोके.....

आता डोक्यातले दुखरे ठोके निवळू लागलेले. मी, मी म्हणत, पुढे सरसावून अनेक छोटे छोटे आनंद, त्यांची जाणीव करून देऊ लागलेले. स्टूल तिथेच खाली ठेवून रेवा जाऊन घड्याळासमोर उभी राहिली. काट्यांची, निरवतेला न दुखावता अखंड टकटक चालू होती. लंबक जोरदार झोके घेत हसरा होत चाललेला. रेवा पलंगापाशी आली. हातोड्यांची मोजदाद करता करता नवर्‍याचा डोळा लागून गेलेला. नवर्‍याने लावलेला गजर, घड्याळाला एक टपली मारून तिने बंद केला. हलकेच गादीवर विसावताना, हल्लीच भव्य होत चाललेल्या त्याच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला. तिच्या चाहुलीने अर्धवट झोपेतच नवर्‍याने तिला कुशीत ओढले आणि पुन्हा घोरू लागला. झोपेची गुंगी चढू लागलेली. उद्याचा दिवस फक्त आपल्या तिघांचा. काय काय करायचे, याची स्वप्ने रचत रेवा झोपेच्या अधीन झाली. दूरवर कुठेतरी, दोनाचे ठोके वाजत होते. ठण.... ठण....

असे ठोके वाजले की आजी नेहमी म्हणायची, " मनात चाललेले खरेच होणार बरं बायो. " आजी कध्धी खोटं बोलत नसे.....

38 comments:

 1. sahich.. :)
  super like.........

  ReplyDelete
 2. क्या बात है बायो..... क्षणभर आपलीच रेवा होतेय की काय असे वाटत होते....

  तूला विचारणारच होते की पुढची पोस्ट कधी तेव्हढ्यात सरदेसाईंचे नाव ब्लॉगविश्वावर दिसले आणि ईथे आज खादाडी नसली तरी ट्रीट होती... मानले बयो तूला!!

  ReplyDelete
 3. मनाची आंदोलन अशी कधी ठोक्याच रूप धारण करतात .. उगाचच!

  ReplyDelete
 4. खुप दिवसांनी कमेंट्तेय भाग्यश्री ताई..
  हा लेख खुप आवडला...

  ReplyDelete
 5. खूप छान झालाय हा लेख भाग्यश्री! खरंच! :)

  ReplyDelete
 6. खुपच सुंदर झाला आहे लेख.
  रेवा मधे स्वत:लाच बघितले...

  ReplyDelete
 7. Jayanti,ब्लॊगवर स्वागत आहे.
  नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व आभार!

  ReplyDelete
 8. तन्वे, धन्यू गं.

  ReplyDelete
 9. aativas, अगदी अगदी. :)

  धन्यवाद.

  ReplyDelete
 10. मुग्धा, खूप आनंद झाला तुला पाहून. धन्यू आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

  ReplyDelete
 11. आभार्स गं अनघा. :)

  ReplyDelete
 12. अस्मिता, ब्लॊगवर स्वागत व आवर्जून प्रतिक्रिया दिलीस, आभार्स. :)

  ReplyDelete
 13. खूप सुंदर झालाय हा लेख.. मस्तच.. ठोक्यांशी जडलेलं आणि जोडलेलं रेवाचं नातं अगदी जाणवलं. खूप मस्त.. आणि आश्वासक शेवटही आवडला.. शेवट काय दुःखद बिखद करतेस की काय असं उगाचंच वाटत होतं :)

  ReplyDelete
 14. हेरंब,खूप खूप धन्यवाद. :)

  ReplyDelete
 15. खुप सुंदर पोस्ट...शेवट आवडला...

  ReplyDelete
 16. मस्त ताई!!! एकदम मस्त! :)

  ReplyDelete
 17. योमू धन्यू रे.

  ReplyDelete
 18. थांकू विद्याधर. वेलकम बॆक. :)

  ReplyDelete
 19. मनात चाललेले खरेच होणार बरं बायो.. :) ए.. हे एकदम खरे.. :) माझी आजी पण म्हणते..

  पण मला ना ते वाजणारे घड्याळ सकाळीच आवडते.. रात्री नाही... :D

  ReplyDelete
 20. हा हा... ऒफिस सुटायची वेळ होत आली की सगळ्यांचे कान... :D

  धन्यवाद रोहन. :)

  ReplyDelete
 21. तुझी ही कथा मला Danny Boyle-च्या चित्रपटांची आठवण करवून गेली. म्हणजे कथेचा शेवट गोड वाटला तरी रुख-रुख लावून जाणारी... मुख्य पात्राचे पुढे काय झाले याची.

  बायकोला ही कथा मी मुद्दामहून वाचायला लावणार आहे... तेव्हा तिला कळेल कि तिच्या जवळ जाताना मी तिची परवानगी का घेतो...

  ReplyDelete
 22. श्रीराज, दुसर्‍या दिवशी तिघही मस्त उनाडली असतील. :) ( उगाच पुन्हा तो साडेपाचचा गजर नको बाई... निदान गोष्टीत तरी ते स्वातंत्र्य हवेच... ) धन्यू रे.

  सहवासाचा सुंगध दोन्ही बाजूने उमलायला हवा, खरे ना...

  ReplyDelete
 23. आमाला जरा आवघडूनच गेलं बगा. कससच.

  ReplyDelete
 24. का रं? काही येळा अशी भरकट व्हतेच... :D. धन्यू रे सौरभ.

  ReplyDelete
 25. खरंय तुझं, भानस. सुंगध दोन्ही बाजूने उमलायला हवा.

  ReplyDelete
 26. मस्तच ... खूप आवडली.

  ReplyDelete
 27. अप्रतिम !!!! खरंम्हणजे शब्दच नाहित जास्त काही लिहायला..तुझ्या प्रत्येक लेखात तु खुप काही सांगुन जाते.फार सुंदर लिहीले आहेस..

  कमेंटायला उशीर झाला त्याबद्दल माफी असावी मॅडम....

  ReplyDelete
 28. काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे कॉमेंटता आलं नव्हतं. पण पोस्ट खरंच प्रातीनिधीक वाटतंय.

  ReplyDelete
 29. मंदार, प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

  ReplyDelete
 30. गौरी, तुला पोस्ट आवडल्याचे वाचून आनंद झाला. खूप खूप धन्यू गं. :)

  ReplyDelete
 31. उमा, अगं तू पण ना... :D. तुझी प्रतिक्रिया हवीच ना बायो. :) धन्यू गं.

  ReplyDelete
 32. ओह्ह! महेंद्र, कमेंट टाकताना काहितरी गडबड होतेय का रे? :(
  आभार.

  ReplyDelete
 33. मस्तच. घडयाळाचे ठोके आणि रोजच्या जीवनातले, दोघातला metaphor चांगला जमलाय.

  ReplyDelete
 34. Chandra, ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत ! अभिप्रायाला प्रतिसाद देताना उशीर झालाय... माफी ! मधे बरेच दिवस ब्लॉगवर नव्हते त्यामुळे राहून गेलं.

  आपल्याला कथा आवडली... आनंद वाटला. आभार ! नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !