जाता जाता एक नजर इथेही........

Friday, June 5, 2009

आणि मला डोहाळे लागले...

टेस्टचा रिझल्ट: पॉझिटिव्ह, वाचले आणि आपसूक हात पोटावर व आनंद डोळ्यातून ओसंडू लागला. आई होतीच बरोबर. आईला म्हटले चल गं पटकन, मला की नाही आत्ता पाणीपुरी खायचे डोहाळे लागलेत. माझे चकाकणारे डोळे पाहत आई म्हणाली, " हात वेडे, अजून डोहाळे लागायला वेळ आहे." आणि गालातल्या गालात हसत राहिली. बहुतेक मी पोटात असतानाचे तिचे दिवस तिला आठवले असतील. त्या दिवशी मी व आई मस्त उनाडलो.

माझी आई खरे तर आईपेक्षा मैत्रीणच जास्त. दिवसाचे चोवीस तास मी तिच्या कानाशी लागलेली. सगळे रिपोर्टिंग केल्याशिवाय मला चैनच पडत नसे, अजूनही पडत नाही. लग्न झाल्यावर अनेक वेळा नवरा म्हणायचा, " आईचे नाव निघाले तरी वारा प्यायलेल्या वासरासारखी धावतेस. जरा माझ्याकडेही पाहा. " " किती जळायचे माणसाने? तरी बरं कोणी मित्र-मैत्रीण नाहीत इतके जवळचे. नाहीतर तू तर अगदी कोळसाच झाला असतास. " हे संभाषण सतत चाले. तर,

होता होता मला सहा महिने पूर्ण झाले. माझे पोट बऱ्यापैकी दिसू लागलेले. महिन्यातून एकदा चेक अप असे. बाकी काहीच भानगडी नव्हत्या. ऑफिस सुरू होतेच. चौथा महिना संपताना आम्ही एक महाबळेश्वरची छोटी पण धमाल ट्रीप करून आलो होतो. अजून दोन-अडीच महिन्याने बाळ झाले की किमान दोन वर्षेतरी कुठे जाता येणार नाही हे माहीत असल्याने आम्ही दोघेही अस्वस्थ होतो.

प्रवासाचे भन्नाट वेड आहे दोघांनाही. तेही अचानक, म्हणजे सकाळी नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला गेलेलो असायचो. दुपारी नवऱ्याचा फोन, " काय करते आहेस?" आता ऑफिस मध्ये माणूस काय करणार? एक तर काम करेल नाहीतर चकाट्या पिटेल. " का रे? काय विचार आहे? " असे मी विचारायचा अवकाश, " मग जायचे का रात्रीची बस पकडून? " मी तर एका पायावर तयारच असे. जे सुटायचो ते बाहेर पडल्यावर ठरवायचे कुठे जायचे. अशा अनेक मस्त ट्रिप्स केल्या. पण आता इतके सोपे नव्हते.

मला सारखे वाटत होते की कुठेतरी लांब फिरायला जावे. नेमके त्याचवेळी ह्याच्या घनिष्ठ-डॉक्टर मित्राच्या बहिणीचे लग्न झाले. तिचा नवराही आमच्याच ग्रुप मधला. बहीण व तो दोघेही आमच्या मागे लागलेले, आमच्या बरोबर तुम्हीही चला. ते हनीमूनसाठी बेंगलोर, म्हैसूर व उटी असे जाणार होते. आयत्यावेळी उगाच घोळ नकोत म्हणून त्यांनी एकूण चार रिझर्वेशन्स केलेली होती. त्यातली तीन confirm होती व एक वेटींगवर होते. मी व नवरा एकदम tempt झालो. प्रथम डॉक्टरला जाऊन विचारून घेतले, जाऊ का नको? तो म्हणाला, जरूर जा फक्त बसने नको. घरचे जरा अस्वस्थ झाले होते पण डॉक्टरने ग्रीन सिग्नल दिल्याने त्यांना ताणता येईना.

चला जायचे ठरले. तेव्हा आत्तासारखी online tickets काढता येत नव्हती. पुन्हा हे हनीमून कपल ज्या गाडीने जाणार त्याच गाडीची तिकिटे हवी होती आणि तिही निघायला दोन दिवस राहिलेले असताना. मिळण्याची शक्यता ऑलमोस्ट झिरोच होती. घरचे खूश, परभारे नकार मिळतोय. चला बरे झाले. नवरा म्हणाला, मी जाऊन पाहतो व्हिटीला. ( तेव्हा सिएसटी हे नामकरण झालेले नव्हते. १९९६ मध्ये नाव बदलले गेले ) मिळाली तर जाऊ. नवऱ्यावर माझा २००% भरवसा आहे. ह्या प्राण्याला जगात अशक्य काही नाही. कुठल्याही परिस्थितीत तो त्याला हवे ते मिळवणारच ह्याची मला पक्की खात्री असल्याने मी चक्क बॅग भरायला घेतली.

नवरा पोचला रिझर्वेशन कॉऊंटरवर. हे तोबा गर्दी. फॉर्म भरला, राहिला उभा रांगेत. नंबर आल्यावर फॉर्मवरील गाडीचा नंबर पाहून विंडोवाली म्हणाली, " ये गाडी फूल बुक्ड है जी. दुसरा गाडी लिको. ( ह्यावरून कळले असेलच
ती कोण होती ते )"नवरा तिला म्हणाला, " नाय जी , हमको येईच मांगता. " तिने खांदे उडवले , " अमा... , तो तुमको वेटींगपे डालू क्याजी? " मग तिने स्लिप दिली, चला वेटिंग तर वेटिंग किमान तिकीट मिळाले. नवऱ्याने तिथून मला फोन करून सांगितले काय झालेय ते. पुढे म्हणाला, " तू नको काळजी करू. जायचे ना तुला, मी नेणारच. " मी मनात म्हटले, हे तर मला माहीत आहेच.

नवरा विचार करीत तिथेच उभा असताना सहजच समोर लक्ष गेले तर रेल्वे अधीक्षकाची खोली दिसली. झाले, हा घुसला आत. कोणीतरी सुरेश का राजेश पांडे होता. मध्यमवयीन, टिपीकल सरकारी ( रेल्वे कर्मचारीही शेवटी सरकारीच ना ) चाकरमाना. सकाळपासून सारखे कोणी न कोणी ह्याचे डोके खाल्ल्याने कावलेला होता. अचानक नवऱ्याला पाहून, हा कोण आगंतुक घसलाय असे भाव चेहऱ्यावर भरून त्याने नवऱ्याला विचारले, " बोलिये आपको क्या कष्ट है? " हे एकले आणि नवरा पटकन म्हणाला, " महोदय, कष्ट मुझे नही मेरी धर्मपत्नी को है . मुझे उम्मीद और विश्वास है की आपही उसका निवारण कर सकते हैं. " जन्मल्यापासून बंबई हिंदी बोलणाऱ्या माझ्या नवऱ्याला इतके उच्च हिंदी बोलून धापच लागली.
पण पांडेच्या चेहऱ्यावरचे ताठरलेले भाव थोडे मृदू झाले, म्हणजे निदान नवऱ्याला तरी भासले.

पांडे म्हणाला, बस आणि काय कष्ट आहे ते सांग. " आम्हाला दोन दिवसा नंतरच्या उद्यान एक्सप्रेसने बेंगलोरला जायचे आहे. वेटींगलिस्टवर तिकीट आहे आमचे ते तू confirmed करून दे. " पांडे म्हणे, " तुम्हाला एवढे तातडीने बेंगलोरला कशाला जायचेय? कोणी आजारी आहे का?" नवरा म्हणाला, " छे छे, कोणी आजारी वगैरे नाहीये. माझ्या बायकोला दिवस आहेत आणि तिला बेंगलोर, म्हैसूर व उटी पाहायचे डोहाळे लागलेत. " हे ऐकले मात्र, पांडे वेडाच झाला. नवऱ्याला म्हणाला, " चलो भागो यहांसे. वाइफ को बोलो अभी इतना लेट टाइम मै ऐसे घुमने का नही. आरामसे सम्हलके रहनेका. बच्चा होने के बाद मुझे पेढा खिलाना मत भूलना. " तो एकदम मुंबई स्टाईलवर आला.

नवरा थोडाच ऐकणार होता. त्याने पांडेला सांगितले, " हे बघ तिचे डोहाळे मी पुरवू शकलो नाहीतर ती जन्मभर मला ऐकवेल. आणि ते कोणामुळे तर तुझ्यामुळे. तुझ्या हातात असूनही तू मला तिची इच्छा पुरी करू देत नाहीस हे unfair आहे. मी आमच्या बाळाला पण सांगेन की पांडेअंकलने तुझ्या आईला व तुलाही रडवले. " पांडे खो खो हसायलाच लागला. नवऱ्याला म्हणाला, " तुम साला मुझे इमोशनल ब्लॅकमेल करता हैं. But i like it, तुम्हारा ऍप्रोच एकदम जबरदस्त है. तुमने जो सच है वो बोल दिया. देखो मै तुमको प्रॉमिस नही करता. पर एक काम करो, गाडी का टाइम पे सामान और भाभीजीको सम्हालके लेके आना. लिस्ट मे देखना, अगर confirmed हैं तो जाके मजा करके आना. नही तो दोनो आरामसे घरपे जाना. बोलो मंजूर है? " नवरा नाही कशाला म्हणतोय. त्याचे दहा वेळा आभार मानून निघाला.

ऑफिसमध्ये रजा टाकणे, तात्काल कामे निपटणे व निघायची तयारी ह्यात दोन दिवस पटकन गेले. पण एक नवीनच भानगड होऊन बसली. ह्या हनीमून जोडप्याच्या चार रिझर्वेशन पैकी दोन confirmed तिकिटे कॅन्सल करायला हवी होती. एक वेटिंग वर होते त्याकडे पाहायची गरज नव्हती. तीन वेगवेगळ्या लोकांनी ही तिकिटे काढलेली. प्रत्येकाला वाटले की दुसऱ्याचे तिकीट आहेच तेव्हा आपले कॅन्सल करून टाकू म्हणून चक्क तिघांनीही तिकिटे कॅन्सल करून टाकली. म्हणजे आम्ही मुळातच वेटींगवर होतो आता भरीत भर हे दोघेही लटकले. बरे आम्ही समजा नाही जाऊ शकलो तरी चालले असते पण ह्यांचा तर हनीमून. ( अर्थात हे सगळे रामायण आम्हाला नंतर कळले. )

घरातून आम्ही थोडे लवकरच निघालो. दोन लहान बॅग्ज व सूचनांची खैरात. टॅक्सी केली एकदाचे पोचलो स्टेशनवर. उद्यान लागलेली होतीच. नवरा पळतच गेला नोटीस बोर्डाकडे. मी एवढ्या गर्दीत पोटाला सांभाळत जमेल तेवढ्या घाईने पोचले तोच नवरा म्हणाला, " xxx, पांडेंनी पांडूगिरीच केली. विसरा बेंगलोर आता दोन वर्षे, चल घरी. " माझे मन सांगत होते असे होणारच नाही. नवऱ्याने हे काम साधले नाही? Impossible, मी नीट त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. " डॅंबीस मनुष्य, उगाच मला त्रास देऊ नकोस. खरे सांग, झालेय ना confirm? " तोवर नवऱ्यालाही आनंद लपविणे कठीण झाले होतेच, " अग पांडे खरेच जागला गं ' न ' दिलेल्या शब्दाला. आपल्याला त्याने चार माणसांचा कुपे दिलाय आणि दुसऱ्या दोन जागा कोणालाही दिलेल्या नाहीत. जय पांडेजी. " असे म्हणत आम्ही ट्रेनमध्ये चढलो. स्थानापन्न झालो.

तेवढ्यात टिसी आला. म्हणाला, " नमस्तेजी. पांडे साबने खास आपके लिये ये पुरा कुपे दिया है. और आपकी सुखद यात्रा की शुभकामनाएं भेजी है. कोई तकलीफ हो मुझे बताईयेगा. मै आता जाता रहूंगा. " त्याचे खूप धन्यवाद मानले तो गेला. नवरा म्हणाला, " बघ जगात अजून चांगुलपण शिल्लक आहे." पोटावर हात फिरवून बाळाला सांगितले, " तुझ्या आईची इच्छा पूर्ण केली बरं का. नाहीतर उद्या मला जाब विचारशील. आता मजा करूया." थोडावेळ होता गाडी सुटायला. हनीमूनर्स ना शोधावे म्हणून आम्ही उतरलो. थोड्या अंतरावर ही गँग दिसली.

आम्हाला पाहून सगळे चकीत झाले, कारण आम्ही त्यांना सांगितलेले नव्हतेच. म्हटले surprise करावे. पण ह्या कॅन्सलींग च्या भानगडीत त्यांनीच, आता जाता येणार नाही हे सांगून आम्हालाच सरप्राइज करून टाकले. पुन्हा मी नवऱ्याकडे पाहिले, बघ ना रे काही करता येते का? अशा नजरेने. नवऱ्याने मित्राला बरोबर घेतले व मघाशी येऊन शुभेच्छा देऊन गेलेल्या टीसीला गाठले. तो इतक्या लोकांनी घेरलेला होता की त्याच्या पर्यंत पोचणे अशक्यच होते. मग सरळ आमच्या कुपेत ह्या दोघांना बसविले. नंतर पुढे पाहू काय होईल ते. आत्ता तरी इथून निघा. सगळे टाटा, बाय बाय झाले. हुश्श्श...., निघालो.

दोनअडीच तासाने तो टीसी उगवला एकदाचा. त्याच्याकडून रिझर्वेशन रीतसर confirmed करून घेतले तेव्हा कुठे सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला. मग पुढे आमची धमाल सुरू झाली. एकदाचे गंगेत चौघांचे नाही नाही पाच जणांचे घोडे न्हाले. नवऱ्याने माझे डोहाळे पुरवले आणि पांडेजींनी दररोजच्या हाणामारीतही त्याला भावनांची किंमत आहे हे दाखवून दिले. ( कुठलीही चिरीमिरी न घेता पांडे शब्दाला जागला. )

8 comments:

  1. भन्नाट्!!!....तुमच्या पोस्टवर नजर ठेऊन असतो की कधी नविन लेख येतो आणि मी तो वाचतो.. :-)

    प्रसाद्(http://prawas.wordpress.com)

    ReplyDelete
  2. प्रसाद,अनेक धन्यवाद. असाच लोभ असू द्या. खूप छान वाटले. :)
    भाग्यश्री, थांकू ग. :)

    ReplyDelete
  3. खुपंच मस्त आहे..

    ReplyDelete
  4. भाग्यश्री,
    आता तुझा ब्लॉग ’वाचलाच पाहिजे’ या सदरांत जमा झालेला आहे. अभिनंदन. अशीच लिहिती रहा.

    ReplyDelete
  5. महेंद्र, आभार.

    अरूणदादा,तुझ्या कौतुकाने अतिशय आनंद झाला.आभार.

    ReplyDelete
  6. हाहाहा.. कसला जबर अनुभव आहे !! भन्नाटच एकदम !!

    नचिकेतना सांग मला कधीचा एक आय-पॅड हवा आहे ;)

    ReplyDelete
  7. हेरंब, निरोप पोचवलाय रे! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !