जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 15, 2010

निर्व्याज स्पर्श...

मायदेशी निघाले होते. कधी एकदा आईला मिठी मारतेय असे झालेले तर एकीकडे दिडमहिना नवऱ्याच्य़ा खाण्यापिण्याची हेळसांड होणार, अगदी एकटे राहायला लागेलची चिंताही मला लागलेली. (नवऱ्याच्या शब्दात, " उगाचच नाही त्या चिंता करत राहायची तुला सवयच झालीये. येडपट आहेस अगदी. मज्जेत जायचे सोडून.... मी तर माझा पॅरोल मस्त यंजॉय करणार आहे..." ) तो मला एअरपोर्टला सोडून गेला. सगळे सोपस्कार पार पाडून मी लाउंजमध्ये बसले होते. आजूबाजूला बरीच वर्दळ होतीच. माझ्यासारखे एकटे जाणारे जरा तुरळकच होते. हळूहळू गर्दी वाढू लागली. माणसांचे अवलोकन करता करता नवरा व लेकाबरोबर फोन चालू होतेच. मला नीट ऐकू येईना म्हणून मी उठून आमच्या गेटवरतीच पण जरा दूरवर असलेल्या थोड्या निवांत कोपऱ्याकडे सरकले. पर्स व कॅरीऑन ठेवली आणि खुर्चीवर बसता बसताच चार सीट पलीकडे बसलेल्या मुलीकडे माझे लक्ष गेले.... खिळूनच राहिले.

फोन ठेवून तिला न्याहाळू लागले. बावीस-चोविसची असावी. जीन्स. पांढराशुभ्र चिकनचा जरासा अघळपघळ कुडता, पायात एक बंदांची पातळ - नाजूकशी चप्पल व उजव्या हातात चांगले दोन इंच रुंद कडे होते. केस कुरळे - थोडेसे विस्कटलेलेच. उंच असली तरी खूपच बारीक होती. अगदी पाठ-पोट चिकटल्यासारखे वाटावे अशी. नाकीडोळी रेखीव नसली तरी चटकन नजरेत भरण्यासारखी होती. आम्ही दोघी बसलो होतो तिथे जवळपास कोणीच नव्हते. त्यातून ती गेटकडे पाठ करून बसली होती. मान खाली झुकलेली व नजर जमिनीवर खिळवून एकटक पाहत बसली होती. मधूनच तिचा चेहरा अतीव वेदनेने पिळवटून जाई. काही वेळाने तिच्या प्रयत्नाला न जुमानता अश्रू गालावर ओघळू लागले. हाताची बोटे एकमेकात घट्ट अडकवून, ओठांवर ओठ गच्च दाबून कढ जिरवायचा ती आटोकाट प्रयत्न करू पाहत होती खरी पण तिची दुबळी कुडी तिला साथ देईना. एखाद्या मोठ्या वावटळीत सापडल्यासारखी ती भिरभिरत होती.

इतके कसले जीवघेणे दु:ख तिला घेरून होते... मला फार अस्वस्थ वाटू लागले. असहायपणे तिची अवस्था मी पाहत होते. एक मन म्हणत होते, हो पुढे आणि तिचे हात हातात घे. तिला मायेच्या स्पर्शाची गरज आहे. काही बोलू नकोस का विचारू नकोस. फक्त तिला आधार दे. पण दुसरे मन थोडे कचरले. तिला आवडले नाही तर.... रागाने ती ताडकन काहीतरी बोलली म्हणजे..... त्यापेक्षा तिला मोकळे-हलके होऊन जाऊदे. निचरा झाला की बरे वाटेल. पण त्यासाठीही तिला मायेच्या-आपुलकीच्या स्पर्शाची गरज आहेच नं.... मी उठले आणि तिच्या समोरच जाऊन बसले. तोवर तिने पाय पोटाशी घेतले होते. दोन्ही हातांनी गुडघ्यांना घट्ट वेढून त्यावर हनुवटी टेकवून ती रडतच होती. पुन्हा पुन्हा हातांचा वेढा आवळत स्वत:ला आक्रसून घेत होती..... कोषात शिरत होती.

दोलायमान अवस्थेत मी हताशपणे तिच्याकडे पाहत असताना पलीकडे हालचाल होतेय असे वाटून लक्ष गेले. एक मुलगा बसला होता व तोही तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरही हेच आंदोलन स्पष्ट दिसत होते. एकदोनदा त्याने मान झटकली. काय करू.... बोलू का तिच्याशी? अचानक तो उठून उभा राहिला.... दोन पावले तिच्या दिशेने टाकली पण पुन्हा थांबला. धपकन खुर्चीत बसून कपाळ चोळू लागला.

तोच कुठुनसे एक नुकतेच पाय फुटलेले छोटेसे बाळ दुडुदुडू धावत आमच्या दिशेने आले. एकदोनदा तोल जाऊन त्याचा धुबुक्काही झाला. पण न रडता उठून उभे राहत तोंडाने ऊं... ऊं.... आवाज करत धावून लाल लाल झालेले गोबरे गाल व अपरे नाक उडवत तो डायरेक्ट तिच्याजवळ गेला. पाय पोटाशी घेतल्याने तिची पावले त्याच्या चेहऱ्याशी समांतर आलेली. नखांना लावलेले लाल चुटुक नेल पॉलिश पाहून तो हरखला- तिथेच थांबला. इवल्याइवल्या बोटांनी तिचे पाय धरून नेलपॉलिश पकडण्याची धडपड सुरू झाली. तोच त्याच्या बाळमुठीवर दोन थेंब पडले. तशी ते थेंब बोटांनी फरफटवून त्याने वर पाहिले. हिचे गाल अश्रूंनी माखलेले. त्याला काय कळले असेल कोण जाणे पण.... तिचे रडणे त्या एवढ्याश्या जीवालाही पोचले. ओठ काढून मिनिटभर तो तिच्याकडे पाहत भोकाड पसरण्याच्या पावित्र्यात उभा राहिला. दुसऱ्याच मिनिटाला लगेच त्याने तोंडाने अगम्य आवाज काढत, हसत तिच्या गालांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू केली.


इतका वेळ हमसून हमसून रडणारी ती त्याची धडपड पाहून क्षणभर रडणेच विसरली. त्याचे तिचा कुडता ओढणे थांबेचना म्हणून तिने त्याला उचलून घेताच बाळाने तिच्या गालांवर हातांचे तळवे घासले व तिच्याकडे पाहून खुदकन हसत तिला मिठी मारून तिचे केस ओढू लागला. तितक्यात त्याची आई पळत आली व तिला सॉरी सॉरी म्हणत बाळाला खोटे खोटे रागे भरत घेऊन गेली. मला जरा वाईटच वाटले. अजून दोन-पाच मिनिटे नसती आली तर...... आम्ही दोघेही जे करू पाहत होतो तेच बाळाने किती सहजपणे केले होते. त्या क्षणी नितांत गरजेचा असलेला ' निर्व्याज स्पर्श ' देऊन जणू त्याने जादूची काडीच फिरवली होती. नंतर दोनतीनवेळा बाळ पळत पळत तिच्यापाशी आला, तिला हात लावून खिदळत पुन्हा आईकडे गेला. हा खेळ काही वेळ सुरू राहिला. ती गुंगली. हसली. वातावरण निवळले. तोंड धुऊन फ्रेश होऊन आली. कदाचित आमच्या दोघांच्या स्पर्शात ती ताकद नसावी किंवा तोकडी असावी..... म्हणूनच आम्ही थबकलो, उगाच नको ते विचार करत राहिलो. ते बाळ मात्र तिच्यात आपल्या स्पर्शाने चैतन्य फुंकून पसार झाले.

35 comments:

 1. Mast zaliye post!! Kharach aplyala kadhi kadhi mayechya sparshachi garaj aste...konachatari adhar pahije asto...mag te koni hi aso!!

  ReplyDelete
 2. Va farach touchy anubhav aahe! Tumhee to shabdaat sunder utaravalaa aahe.
  shashank

  ReplyDelete
 3. लहान बाळाच्या स्पर्शात, आपल्याकडे बघुन हसण्यात पण किती जादू असते ना!
  घरी बाळावर जरा रागावले, ओरडून बोलले की त्याला पण कळते आणि असा गोड हसतो की रागवायचे पण विसरुन जाते मी.
  सोनाली

  ReplyDelete
 4. shree,hya postne mala nakalat konachi tari aathwan karun dili..tula hi mahitach ahe te naav...wo bhi isi tarah Airport par aisehee aansu bahatee rahee..par ...

  हर पल मुझे उसकी याद आती है...आज फ़िर उसकी याद में आंखे नम हुई...

  ReplyDelete
 5. श्रीताई, किती सुंदर लिहले आहेस..
  लहान मुलांच्या सहवासात मूड अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखा बदलतो.
  >ते बाळ मात्र तिच्यात आपल्या स्पर्शाने चैतन्य फुंकून पसार झाले. :))

  ReplyDelete
 6. निव्वळ अप्रतिम आहे हे दृश्य आहे ... डोळ्यासमोर उभे राहिले..
  खरच... नक्की काय असेल अशी जादू कि जी एकमेकांना करता येवू शकली नसेल..
  आणि त्या बलाने इतक्या निर्व्याजपणे, नि :संकोचपणे केली...
  म्हणूनच मुले हि देवाघरची फुले म्हणतात ते उगाच नाही...
  लहानपण देगा देवा असे पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते...
  मोठे झालो कि उगाच जबाबदा-यांचे, संस्कारांचे, नको त्या जाती पातींचे कातडे अंगावर
  पांघरले जाते... आणि मग संकोच, भिडस्तपणा अंगी येत जातो...

  ReplyDelete
 7. खूप छान लिहिले आहे. आपण मोठी माणसं काही करताना दहा वेळा विचार करतो. पण लहान मुलं ते सहज करतात. तुमचं हे वर्णन खूप आवडलं.

  ReplyDelete
 8. मोठी माणसं अनेकदा जास्त विचार करतात आणि त्यामुळे स्वत:ची उत्स्फूर्तता आणि निर्व्याजता गमावून बसतात याचं हे एक उत्तम उदाहरण!

  ReplyDelete
 9. भाग्यश्री,हो गं.शंभर शब्द बोलून जे साधणार नाही ते एक आश्वाशक-मायेचा स्पर्श चुटकीसरशी करून जातो. धन्यू गं.

  ReplyDelete
 10. शशांक, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.

  ReplyDelete
 11. ह्म्म्म... उमा,कळतेयं मला. पण जो भी होता हैं अच्छे के लिये ही होता हैं... खर ना?

  ReplyDelete
 12. सोनाली, तर काय. अगं त्यांनाही कळत असतं, ममा रागावलीये... मग अशी लाडीगोडी लावतील, पापे घेतील... आपल्यालाच बुवा कुक करून गोड हसतील... महा लबाड... अगदी गोडांबाच.:)

  ReplyDelete
 13. मीनल, पाहा नं...हेच मलाही करायचे होते... पण... इथेच नेमका मार खाल्ला... म्हणूनच तर म्हणतात नं, देवाघरची फुलं आहेत गं सारी. जिथे जातील, स्पर्श करतील ते ते सारे आनंदाने हसेल-खुलेल.

  ReplyDelete
 14. अखिल, अगदी खरेय तुमचे. जसे जसे मोठे होतो तसतसे नको इतके भिडस्त, संकोची व अतिविचारी बनू लागतो. मग अश्या छोट्याछोट्या गोष्टीतही द्विधा मन होते. आपल्या चांगल्या हेतूचा आपणच गळा घोटतो... तेही निष्कारण. :(

  ReplyDelete
 15. aativas, अगदी हेच झाले. उठलेली उर्मी काल्पनिक भीतीने घेरली गेली... मनाने कच खाल्ली.:( बाळ आले म्हणून...नाहितर ती अजून किती वेळ रडली असती कोण जाणे.

  ReplyDelete
 16. Seema, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. :)

  ReplyDelete
 17. अप्रतिम अप्रतिम.... जाम आवडला लेख.. खुपच हळुवार, निरागस !! काय प्रतिक्रिया देऊ ते कळत नाहीये.. जाउदे अजून काही बोलत नाही !!!

  ReplyDelete
 18. फार सुरेख अनुभव! लहान बाळाच्या निर्व्याज स्पर्शात, त्याच्या हास्यात आणि प्रेमाच्या हुन्कारात जी काही ताकद असते तिच्यासमोर भले भले उपाय देखील फिके पडतात. लहान मूल म्हणजे चैतन्याचे, उत्साहाचे प्रतीक.... ईश्वराचेच दुसरे रूप.... अशा सहवासात सर्व दु:खे बाजूला पडतात आणि मन आनंदाने फुलून येते! :-)

  -- arundhati

  ReplyDelete
 19. खूपच सुंदर, असे स्पर्श फक्त जवळचे असावते असं नाही,
  काही भावना फक्त मनातून पोहोचलेल्या, काही बोल दुरून ऐकलेले, काही लेख एका नजरेत झरकन वाचलेले,
  आणि काही माणस.. कधी न पाहिलेली.... हे पण एका क्षणात आपल दुःख दूर करू शकतात....
  तुला तर माहितीच आहे न श्रीताई....

  ReplyDelete
 20. फार सुरेख पोस्ट आहे!

  ReplyDelete
 21. अप्रतिम श्रीताई.. हेरंबसारखीच अवस्था..
  अतिशय सुंदर लिखाण.. एकदम डोळ्यासमोर प्रसंग घडल्यासारखे वाटले...

  ReplyDelete
 22. हेरंब, धन्यू रे. :)

  ReplyDelete
 23. अरुधंती, अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. बाळं म्हणजे, सगळी दु:खे, शीण, वेदना क्षणात दूर करण्याचे सामर्थ्य असणारी जादूच.

  ReplyDelete
 24. अमृता, मनापासून मनापर्यंत पोहोचायला इतर कशाचीच आवश्यकता नसते गं.हवे फक्त संवेदनशील मन आणि निस्वार्थ भाव.:)

  ReplyDelete
 25. आनंद...:). थॅंक्स रे.

  ReplyDelete
 26. यशोधरा, खूप दिवसांनी तुझी प्रतिक्रिया आली. अतिशय आनंद वाटला. माझ्या ब्लॉगवरील पहिली प्रतिक्रिया तुझीच.धन्सं.:)

  ReplyDelete
 27. काय बोलु?? तू सगळंच यथार्थ मांडलयस....

  ReplyDelete
 28. खूप छान वाटलं वाचून. हसू आलं...निष्पाप बाळंच हे करू शकलं असतं.. :)

  ReplyDelete
 29. धन्यवाद अपर्णा.

  ReplyDelete
 30. अगदी खरं. अभिप्रायाबद्दल धन्यवाद अनघा. :)

  ReplyDelete
 31. श्री ताई....खूप सुंदर....अप्रतिम झाली आहे पोस्ट!!!

  ReplyDelete
 32. भाग्यश्री, धन्यू ग... :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !