जाता जाता एक नजर इथेही........

Friday, October 9, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........१


गाडीने दादर स्टेशन सोडले तसे रडणाऱ्या मुलांचे रडणे एका क्षणात पळाले. पोरांनी खिडक्या गाठल्या. बहुतेक बऱ्याच मुलांना खात्री नसावी आपण ट्रीपला नक्की जाणार याची . एक महिना म्हणजे नक्की किती दिवस हे समजत नसलेल्या वयाची मुलेच जास्ती होती. मी, गोखल्यांचा गिरीश व अधिकाऱ्यांची चित्रा हे जरा मोठे म्हणजे चित्रा नववीत गिरीश आठवीत आणि मी पाचवीत. बाकीची सगळी बिगरी-ते तिसरीत मोडणारे. आम्ही तिघे सोडले तर बाकीच्यांना आपण कुठेतरी चाललोय व मज्जा येणार याव्यतिरिक्त कशातही रस नव्हता.

अगदी तुरळक नावे मी भूगोलात नुकतीच ऐकल्याने ट्रीपवरून शाळेत परत गेल्यावर मला कशी बढाई मारता येईल व सगळ्या मैत्रिणी कश्या, " तुझी काय बाबा मज्जाच झाली. आम्हाला कोणी नेत नाही, " असे म्हणतील आणि त्यावर मी अगदी आव आणून म्हणेन, " आहेच मुळी माझी मज्जा आणि आहेतच माझे आई-बाबा एकदम ग्रेट. त्यांना आवडते अशा सहलींना आम्हाला न्यायला. " आता काही गरज आहे हे बोलायची पण....., तर मी ही अशी दिवास्वप्ने पाहण्यात रममाण.

मामांनी दिलेल्या पत्रकात सहलीचा सविस्तर आढावा होताच. वाराणसी एक्सप्रेस तेव्हा दादरहून सुटत असे आता बहुदा लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटते. तर दादर - वाराणसी -काशी विश्वेश्वराचे मंदिर- अलाहाबाद-त्रिवेणी संगम-पाटणा-गया-बुद्धगया-सिलिगुडी-दार्जीलींग-सिलीगुडी-कलकत्ता-जग्गनाथपूरी- भूवनेश्वर- हैदराबाद-गोवळकोंडा आणि परत. असा ढोबळमानाने प्रवासाचा मार्ग होता. यात अनेक फाटे होतेच,
. चित्रा व गिरीश यांच्यात निघतानाच हे पत्रक पाहून गहन चर्चा झाली. " म्हणजे आपण तिर्थयात्रेला निघालोत तर. तरीच मी म्हणत होतो आमच्या मातोश्री व पिताश्री कसे तयार झाले पटकन. चित्रा आता दर पाच मिनिटांनी मंदिर आणि नमस्कार. मी तर बाहेरच बसणार बाबा. " इति गिरीश. हे वाक्य नेमके त्याच्या बाबांनाच कसे ऐकू गेले कोण जाणे. मग पुढे काय झाले ते तुम्ही ओळखलेच असेल.

आगगाडीत खूपच मजा आली. एकतर पहिलाच दिवस होता. सगळ्यांनी घरून दोन वेळा पुरेल इतके ओले जेवण आणलेले होतेच. गप्पा-पत्ते, भेंड्या यांचा जोर होता. त्यात मध्ये मध्ये मामा माहिती देत होते. हे करा आणि हे करू नका - मुलांचा प्रश्नच नव्हता पण मोठेही अगदी कान देऊन ऐकत नव्हते. बराच वेळ झाली तरी प्रवास काही संपेना तशी सगळ्या मुलांची भुणभूण सुरू झाली, " आई, कधी उतरायचे आता?
" वाराणसीला उतरेस्तोवर जर अमुक इतका जप करू असा संकल्प सोडला असता ना तर तो नक्की पुरा झाल असता इतके वेळा विचारून झाले. चोवीस तासापेक्षा जास्त वेळ लागतो हे मुलांना कसे झेपायचे.

इतक्या लांब प्रवासाने मुलेच काय पण मोठी माणसेही कंटाळलीच होती. शिवाय सगळे झोपले आणि कोणी सामान पळवले तर, या भीतीने बरेच जण जागेच होते. निघण्याआधीची धावपळ, तयारीची दगदग आणि आता हा प्रवास सगळे दमून गेलेले. अलाहाबाद जंक्शनला गाडी खूप वेळ थांबली होती बरीच मंडळी खाली उतरली, फलाटावर उगाच भटकली,. आता फक्त एकच स्टेशन की उतरायचे त्यामुळे सगळे ताजेतवाने झाले. गाडी सुटली आणि रेघेकाकूंच्या लक्षात आले की पाण्याचा फिरकीचा तांब्या रिकामा झालाय. मग काकांना, " एवढे कसेहो कळत नाही, अर्धा तास टिवल्याबावल्या करत खाली उभे होतात पण पाणी काही आणले नाही." सगळ्यांसमोर ही झापतेय म्हटल्यावर काका वैतागले. आणतो गं बाई पुढच्या स्टेशनवर.

भदोही आले. काका दारातच उभे होते. पटकन उडी टाकून नळाशी धाव घेतली. इथे गाडी अतिशय कमी वेळ थांबते. मामा ओरडत होते, अहो नका जाऊ गाडी सुटेल. पण काकूंच्या बडबडीमुळे काका भडकले होते. नळावर नंबर लागलेले. शिवाय नळ लांब होता. आणि गाडी सुटली. काका तांब्या भरत होते. गाडी काही एकदम वेग घेत नसली तरी पाणी घेतल्याशिवाय परतायचे नाही हा काकांचा निश्चय. काका पळत पळत पकडायचा प्रयत्न करत होते पण शेवटी गाडी चुकलीच. काकूंचा चेहरा अगदी केविलवाणा झाला होता. शिवाय त्यांना काकांची भीतीही वाटत असणार मनातून. आम्ही मुले मात्र खोखो हसत होतो काकांना पळताना पाहून. शेवटी तीन तासांनी कसेबसे काका धर्मशाळेत पोचले. नंतर अर्धा तास त्यांच्या खोलीत धडामधुडूम फटाके फुटत राहिले .

अरे हो या ट्रीपमध्ये हॉटेलात फारसे आम्ही राहिल्याचे मला आठवत नाही. सगळीकडे धर्मशाळेतच जागा बुक केली होती. आता धर्मशाळा म्हणजे मध्ये एक मोठा चौक आणि चारी बाजूने खोल्या. एकदम हवेशीर, भरपूर उजेड. मुलांना उनाडायला भरपूर जागा. फक्त कॉमन बाथरुम आणि टॉयलेट्स. पण कोणालाही त्याचे दुःख झाल्याचे पाहिले नाही. कदाचित तो काळच वेगळा होता. (१९७३) आगगाडीतून उतरलो आणि धर्मशाळेत येऊन टेकलो. लागलीच पुन्हा एक सभा घेतली मामांनी. काशी विश्वनाथाच्या मंदिरात काय करू नका हे सांगितले. दमल्यामुळे त्यादिवशी जेऊन सगळे गाढ झोपले. सकाळी आंघोळी करून मंदिरात जायला निघालो.


मंदिराशी आलो तोच चारीबाजूने एकदम अनेक पुजाऱ्यांनी घेरलो गेलो. " नही नही हमको काही नाही करनेका. अरे बाबा भगवानको हात जोडून नमस्कार करके परत जानेका है. तुम त्रास मत दो." हे असे अर्धवट हिंदी मराठी बोलत गायतोंडेकाका खिंड लढवत होते. पण ते पुजारी कसले ऐकायला बसलेत. ते आपले मागेच. आम्ही पोरे तर कधीच पळून आत गेलेलो. मंदिरात पाऊल टाकले तर काय घोट्यापेक्षाही जास्ती चिखल, घाण. जिकडे तिकडे गुरं फिरत होती. मोठ्या मोठ्या गायींना पाहून मी तर घाबरूनच गेले. संपूर्ण मंदिरात फक्त देवाचा गाभारा सोडला तर स्वच्छ जागाच दिसेना. मामांनी आधीच बजावलेले की मंदिर पाहा. हात जोडा. आणि लागलीच बाहेर या. पण.....

शेट्येकाकू व गायतोंडे आजींनी मामांची सूचना धुडकावून लावली आणि पुजाऱ्यांच्या भुणभुणीला बळी पडल्या. म्हणे अभिषेकच करायचा तोही तिथे बसून. मग काय तीन तास आणि रु. पन्नासची फोडणी वर शिधासामुग्री. त्यावेळी पन्नास रूपये फार जास्ती होते. त्यांना तिथेच सोडून आम्ही बाकीचे लोक गेलो आजूबाजूचे पाहायला. संध्याकाळी कळले की दोघांना चांगलाच फटका बसला होता.
दुसरे दिवशी निघालो अलाहाबादला. तिथेही धर्मशाळाच. आता अंघोळी त्रिवेणी संगमातच करू असे बरेच जण म्हणू लागले. पोरांना तर काहीच कळत नव्हते. ते सगळ्याला तयार. मामा म्हणाले , "अजिबात नाही. कोणीही तिथे अंघोळी करू नका. नुसते दोन मिनिटे पाय बुडवा आणि बाहेर या. " आमचे आई-बाबा मुळातच या सगळ्याच्या विरुद्ध आहेत त्यामुळे ते व अजून दोघातिघांनी मामांचे ऐकायचे ठरवले. निघाले सगळे.

हा संगम खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. गंगेचे पिवळसर मातकट पाणी , यमुनेचे हिरवट काळसर व सरस्वतीचे बरेचसे स्वच्छ परंतु क्वचित मधूनच दिसणारे पाणी. काठाजवळ पाणी फारसे खोल नसल्याने व त्रिवेणी संगमात स्नान केल्याने सगळी पापे धुतली जातात हा समज त्यामुळे मामांनी इतके सांगूनही खूप जण पाण्यात उतरलेच. जेठे काका-काकू, गायतोंडे आजी-मुलगा व सून, शेट्ये काका-काकू आणिकही बरेच जण. आम्ही घाटावर उभे राहून पाहत होतो. मुलांना मात्र कोणीही उतरू दिले नाही. सगळ्या मुलांची चुळबूळ चालू होती. सारखे वाटत होते की आपणही उतरावे. ते पाप-पुण्य जाऊदे-काय कळत होते त्यातले आम्हांला, पण मजा तर येईल.


तोवर हे उतरलेले लोक जरा पाण्यात जास्तीच आत गेले. छातीपर्यंत पाणी होते. आणि एकदम कोणीतरी जोरात किंचाळले. आधी काही कळलेच नाही काय झाले कारण आजूबाजूला काही छोट्या छोट्या होड्याही होत्या. शेट्येकाकुंनि डुबकी मारली आणि वर आल्या तर एक अर्धे जळलेले प्रेत तरंगत होते. ते पाहून सगळ्यांची बोबडीच वळली. काकूंना इतका जोरदार धकका बसला की त्यांची शुद्धच गेली व त्या खाली पाण्यात जाऊ लागल्या. मग जी काय पळापळ झाली की बस्स. गर्भगळीत सगळे कसेबसे पाण्याबाहेर आले. कसली अंघोळ आणि कसले काय. काकूंना त्या दिवशी सडकून ताप भरला.
थोडासा भ्रम झाल्यासारखे काही वेळ त्या ओरडत होत्या. पण मग दोन दिवसात सगळे निवळले.

मामांनी सांगितले होते पाण्यात उतरू नका पण कोणी ऐकेल तर ना? त्यादिवशी दहा-बारा अशी अर्धवट जळलेली प्रेते आम्ही पाहिली. त्याआधी कधीही मी मुळी गेलेले माणूस पाहिलेच नव्हते त्यात हे असे भयंकर दृश्य पाहिल्याचा फार फार त्रास झाला. पुढे बरेच दिवस झोपेतून घाबरून उठत असे. त्यानंतर मी पुन्हा अलाहाबादला गेले नाही पण आता हे प्रकार कधीचेच बंद झाल्याचे ऐकले आहे. संपूर्ण दहन झाल्यावर थोडीशी रक्षा फक्त संगमात सोडतात. आशा आहे असेच होत असेल.

फोटो जालावरून.
क्रमश:


4 comments:

  1. असे प्रकार तिथे अजूनही घडतात म्हणे! खरं खोटं तिथे रहाणारे आणि देवच जाणो. भाग १ व भाग २ दोन्ही सुंदर! तुमच्या ब्लॉगवर जो गोब-या गालांचा बाळकृष्ण आहे त्याचंच नाव शोमू का?

    ReplyDelete
  2. गंगेमधल्या त्या डेड बॉडिज कधी अर्धवट जळलेल्या खुपच भितीदायक असतात. मला पण खुप अनिझी व्हायचं . गंगेमधे मी कधिच आंघोळ केली नाही..

    लहानपणचा प्रवास.. मस्त विषय घेतलाय. पुढचा भाग लवकर पोस्ट करा.. उत्कंठा ताणु नये उगिच.. :)

    ReplyDelete
  3. कांचन अरे बापरे!मला वाटले की आता हे सगळे बंद झालेय. अलाहाबाद कोर्टात यावर काही केसेस पूर्वी चालू होत्या यावर बंदी घालावी यासाठी.
    हो गं,त्या बाळकृष्णाचे नावच शोमू आहे.:) प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  4. महेंद्र, आजही कधी मी एकटी असले ना की अचानक ते दृष्य डोळ्यासमोर येते रे.ती भिती अजूनही गेली नाही.आम्ही पण नाही कधी आंघोळ केली गंगेत.तिर्थही नाही घेतले.
    टाकतेय पुढचा भाग,:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !