जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 16, 2009

ओपन चॅलेंज देऊन तो गेला......


आज सकाळी सकाळी नवऱ्याने मला म्हटले तर ओपन म्हटले तर छुपा चॅलेंज दिला. झाले काय.... नेहमीप्रमाणे पोराला सकाळी सहाला फोन करून उठवले. माझे एक चांगले आहे, कितीही वेळा झोपेतून उठावे लागले तरीही क्षणात निद्रादेवी प्रसन्न. पुन्हा एक मस्त डुलकी काढली. ही अशी डुलकी म्हणजे हमखास स्वप्नांचा कहर... कमीत कमी दोन-चार हवीच. रेस लावल्यासारखी , मी पहिला मी पहिला करीत एकमेकाला ढकलत घुसत राहतात. गंमत म्हणजे ह्या गुंगीतून जागे झाले ना की जशीच्या तशी आठवतही राहतात. मग दिवसभर माझा मूड त्यांच्या तालावर नाचत राहतो.

उठून खाली किचनमध्ये आले. कॉफी केली आणि नवऱ्याला हाकारले. पहिल्या दोन-तीन हाका वरपर्यंत पोचतच नाहीत.
मग जरा उंच आवाजात.... की लागलीच, " हो आलो, ऐकू येतेय मला. अजूनतरी बहिरा नाही झालोय." चला दिवसाची सुरवात दररोजसारखी झाली म्हणत कामाला लागले. पण आजचा नूर वेगळाच होता ( हे नंतर मला कळले. ) चहा घेता घेता पटकन ब्लॉगवर एक नजर टाकावी म्हणून कॉंप्यू लावला. रोहनची नवीन खाण्याची पोस्ट दिसली मग लागलीच त्याच्या ब्लॉगवर गेले तोच नवरा डोकावला.

सकाळी सकाळी काय वाचते आहेस? स्लाईड शोचे फोटो पाहत पाहत एक मोठा सुस्कारा टाकत ( सॉलिड ड्रामा केलान आज नवऱ्याने ) , " काय लकी आहेत ना? तुला आठवते, घाटकोपरला असताना आणि ठाण्यात आल्यावरही आठवड्यातून चार वेळा मी ऑफिसला जाताना उडप्याकडे जायचो. अहाहा... काय दिवस होते साला........ 8-> ( नवरा गेला खयालोमें.......) एक उपमा-चटणी (संपूर्ण लुसलुशीत ओल्या खोबऱ्याची ) एक्स्ट्रा सांबार. ते आले की लागलीच पुढची ऑर्डर देऊन टाकायची...खंड नको पडायला तल्लीनतेत. नरम साधा डोसा, एक्स्ट्रा चटणी. तृप्त... मग ऑफिसचा विचार करायचा. " नवरा इतका रमला होता की मला त्याची तंद्री मोडायचे अगदी जीवावर आले होते पण....

" अहो साहेब, चला आता. उडप्याला टाटा करा आणि सिरीयलकडे वळा." म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी..... अगदी तसेच झाले. हे असे डिवचून सकाळी सकाळी मी पायावर मोठठा धोंडा पाडून घेतला. सिरियलचे नांव काढताच नवरा भडकला. एकतर तो खयालोमें चवीचवीने खात होता तिथून त्याला ओढून मी कॉर्नफ्लेक्स खा म्हटले.... " हो बरं का, खातो आता तेच. आलीया भोगासी.... तुम्हाला नाही जमणार कधी हे... वैताग साला. " असे बडबडत तो गेला आवरायला.

असा राग आला मला. काय समजतो काय मला, हे काय हॉटेल आहे? काल रात्री म्हणाला असता तरी मी..... अशी फणफण करत होते पण एकीकडे मलाही उडप्याची फार आठवण येऊ लागली होती. सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान उडप्याकडेही थोडे शांत, प्रसन्न वातावरण असते. देवाच्या मोठ्या फोटोला भरगच्च मोगऱ्याचा किंवा मल्लीगेंचा ( बहुतेक हेच नाव असावे त्या फुलांचे ) सुवास दरवळत असतो. तो घेत घेत टेबलवर बसलो की ताज्या ताज्या इडल्या, डोसा, उपमा..... काहीतरी करायलाच हवेय. त्यात नवरा चक्क ओपन चॅलेंज देऊन गेलाय. कॉम्प्यूला रामराम ठोकला. पटकन फ्रीज उघडला. आणि...

नेहमीच्या सवयीने शिजवलेली डाळ पटकन, आमटी/सांबार करता यावे म्हणून वेगळी ठेवलेली दिसली.
इडल्या कराव्यात ह्या विचाराने पीठ कालच केले होते. अरे वा! इतके अवघड नाहीये. स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. लागले भरभर कामाला. पस्तीस मिनिटे मिळाली. आवरून नवरा आला खाली. तोवर मी " देखा हैं पहिली बार... " हे टिपीकल उडप्याचे गाणे जरा मोठ्या आवाजात लावलेले. ते पाहून मला झटका आलाय सकाळी सकाळी असे वाटून नवरा म्हणाला, " काय आज दिवसभर तबकडी का? " एकीकडे मोठे श्वास घेत," काय गं, खयालोंमे गेले की असे सुंदर वासही येतात का? मोगरा-जाईचा तोच वास........ अहाहा.... सांबारच्या तडक्याचा, तुपाचा.....डोसा...."

माझ्या जाई व मोगऱ्याची होती नव्हती तेवढी फुले काढून एका बॉउल मध्ये ठेवली. त्याचा सुवास दरवळत होताच. डायनिंग टेबलवर ठेवलेले ताट पाहून पुढचे शब्द घशातच...... डायरेक्ट तुटूनच पडला. " अरे सांगशील का नाही कसे झालेय ते? " हातानेच आता वेळ नाही मला, आधी खाऊ दे अशा खुणा करीत डोळे, नाक, जीभ व मनाने तो खात राहिला. त्याला इतके खूश झालेले पाहून भरून पावले. मग त्याच्या आवडीचा अगदी उडपी स्टाइल मसाला चाय दिला.... तसे जवळ घेत म्हणाला, " अन्नपूर्णा सुखी भव! माझे सकाळचे शब्द परत घेतो. उडप्याएवढे नाही पण सुंदरच झालेय सगळे...
. जीयो! " आणि तो पळाला.

7 comments:

  1. उडप्याकडेही ताज्या ताज्या इडल्या, डोसा, उपमा खायची मज्जा वेगळीच... शिवाय इराणीकड़े खिमा आणि बुना खायची मज्जा पण वेगळीच ... :

    आणि आता एकडे रात्रीच्या ११:३० वाजता मी हा पोस्ट वाचून भूक भूक करतोय ... :D

    ReplyDelete
  2. तुमची post वाचुन मलाही आता ईडली सांबार चा वास यायला लागला आहे.. लगेच डाळ तांदुळ भिजत घालते :D

    ReplyDelete
  3. रोहन, आता गाडीवर जाऊन बुर्जीपाव हाणला असे म्हणू नकोस रे. नाहीतर पुन्हा माझा नवरा नाईट ड्रीमिंग करत राहील. मुलूंड चेकनाका, नितीन कंपनीच्या नाक्यावर....तिनहात नाका....:) हे सगळे त्याच्या तोंडून एकलेले...

    रोहिणी, अग हे सांसर्गिकच आहे.:)
    आभार.

    ReplyDelete
  4. chakka shevagyachya shengansahit!!! Va va va va... Meehee ya weekendla laambvar jaaun analya fresh shevagyachya shenga. :) Frozen ajibaat avadat naheet. Fresh milalya mhanoon khoosh jhale. Total 3 taas driving che (mhanaje navaryane kelelya) sarthak jhale. Kalach Meduvade ani shevagyachya shenganche sambar suddha khaoon jhale. Photo matra kadhala naahee asa sundar. Nahitar tula pathavala asata.

    ReplyDelete
  5. सीमा,तीन तास... :) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी:D अगदी नचिकेत सारखे. मेदूवडे पाठवयचेस ना...:(

    ReplyDelete
  6. अग्ग भाग्यश्री, अत्ता डाळ भिजत घातली तर नक्किच रात्री नव~याला डोसे इडल्या मिळतील न???हेहेही..फ़ारच सुरेख्.. मुंबई च्या आठवणि जेवढ्या काढाल तेवढ्या कमीच..

    ReplyDelete
  7. भानस,
    कामा निम्म्मित मी बंगलोर ला असल्या मुळे इडली, डोसा, साम्भर , खोबरयाची चटनी हे सर्वे ओघाने आलेच....
    आता पण मी उपमा खाऊन आलो आहे ऑफिस ला .....आमची करीता हे नित्याचेच आहे.....त्यामुले अप्रूप असे नही वाटत आता....पण जेव्हा सुरवातीला आलो तेव्हा खुप गम्मत वाटायची......वाटायचे ज्याची आपण एरव्ही अपेक्षा करायचे नासत्या करीता ते मिलते आहे अणि रोज!!!!!!! परंतू कही दिवसानी मात्र रोज तेच तेच खाऊन अगदी सवय नाही काही पण दूसरा पर्याय ही नाही म्हणून खात आहे .....

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !