जाता जाता एक नजर इथेही........

Friday, June 12, 2009

अश्वत्थामा

तुझ्या धीट नजरेत सदासर्वदा
आनंदाचा महासागर उचंबळत असतो.
माझ्या दुःखानेही गढूळ झालेला
कधी पाहिला नाही मी तो.

पण अवचित कधी,
वेदनेचा एक ठिपका उमलतो त्या अथांगतेत
नि पसरत राहतो___
___
टिपकागदावर शाई पसरावा तसा सर्वदूर-
तुझ्या अस्तित्वभर.
भासच का तो सये?
तसंच असूदे गं... तसंच असूदे.

मात्र लवमात्रही सत्यांश असला त्यामध्ये तर -
-
तर तुझे दुःख, वेदना, अश्रू, रोग, जखमा... ‌सारंसारं
देऊन टाक मला ___
__
माझ्या चिरंजीव जखमांसाठी तेल म्हणून ___!
_
नि नि:संग हो, निर्विकार हो, निरिच्छ हो ___!!
जशा त्या वेदना तुझ्या नव्हत्याच कधी _
_
भिऊ नकोस सये ___
त्या ओझ्याने पाठ वाकेल माझी,
पण मोडायची नाही.

काय म्हणतेस? दोन ओझ्यांचा गाढव?
हसत्येस?
हस सये - मनसोक्त - मनमुराद हस!
पुन्हा तो आनंदाचा महासागर
उचंबळू दे तुझ्या धीट, गहिऱ्या डोळ्यांत!

तुझ्यासाठीच चिरंजीव होऊन
जन्मोजन्मी तुझ्या दाराशी येणारा
नि तूच केव्हांशा दिलेल्या,
वाळल्या-भेगाळल्या जखमांसाठी

तुझ्या हास्याचच चिंधीभर मलमतेल मागणारा
मी एक अश्वत्थामा -- अश्वत्थामा--!!

ओळखलंस सये?

4 comments:

  1. कहर कविता आहे अगदी. तुमच्या अंतरंगाचे विविध पैलू ब्लॊगवर पाहायला मिळत आहेत.भावणारे लिखाण, लिहीत राहा.

    सुचित्रा.

    ReplyDelete
  2. सुचित्रा, अनेक धन्यवाद. वाटते कधी कधी मी फारच औदासिन्य प्रगट करते. असो.

    ReplyDelete
  3. आशाताई, खूप खूप आभार. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !