जाता जाता एक नजर इथेही........

Monday, August 3, 2009

अनुत्तरित.......

डोळ्यासमोर घडणाऱ्या घटनांमध्ये माणूस अडकतो. अनेकदा असे म्हटले जाते, की जोवर कुठली गोष्ट कानाने ऐकली व डोळ्यांनी पाहिली नाही तोवर ती कितपत खरी/खोटी हे ठरवणे कठीण असते. बरेचदा जे दिसते ऐकू येते ते तसे नसतेच असाही अनुभव येतो. पुन्हा जी व्यक्ती ते पाहते-ऐकते-अनुभवते, तिची त्यावेळची मनस्थिती. त्या घटनेमधील व्यक्तींशी तिचा असलेला संबंध - गुंतवणूक. तिचा स्वत:चा बाज - जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन - होकारार्थी/नकारार्थी, तिची जडण घडण, कार्यकारणभाव शोधण्याची/समजण्याची तिची कुवत. कुठल्याही घटनेवर घायकुतीने प्रतिक्रिया देणे/ संतुलित विचार करून-तारतम्य ठेवून मत प्रगट करणे/ अथवा अव्यक्त राहणे. तात्कालिक शांतता ठेवून काही काळाने उसळून बोलणे..... वन ट्रॅक माइंड सारखे एकाच विचारात अडकून पडणे. घटनेला दुसरेही काही पदर, बाजू असू शकतात याचा विचार कधीच न करणे. विचारांना स्वत:च्या मतांमध्ये जखडून ठेवणे. मनात कुढत राहून तोंड शिवून तिढा ठेवणे/वाढवत राहणे. संपूर्णपणे निर्विकार भाव दर्शविणे/ स्वत:ला कसलाच फरक पडत नाही हे वारंवार दुसऱ्याला व स्वतःला सांगत, बजावत राहणे-एक प्रकारे फसवत राहणे.

एखादी घटना घडते तेव्हा त्यावरची लगोलग प्रतिक्रिया - तीव्र, टोकाची/ धक्क्याची/भयाण शांततेची. आठ दिवसांनंतरची आसमंतातील धुरळा किंचित खाली बसल्यावर मनाने पुन्हा एकदा घेतलेला त्याच घटनेचा आढावा. नेमके संयुक्तिक कारण शोधण्याच्या किमान प्रक्रियेला मिळालेली चालना. भावनांवर ताबा मिळवत व्यावहारिक दृष्टिकोनातून घटनेला शोषण्याचा प्रयत्न. नंतर महिना-दोन महिन्याने पुन्हा एकदा जगलेली तीच घटना.... अन आता अचंबित झालेले तेच मन. घटना तीच-मनही तेच. मग आज का हे तितके कोसळले नाही/ उसळले नाही........ असे काय बदलले आहे की मी इतका अलिप्तपणे काठावर राहून शांतपणे अर्थ लावतो आहे, तोही जीवाची तगमग न करता. खरे तर बदललेले काहीच नसते. तेच आपण, तोच प्रसंग, तीच व्यथा..... मग? का एकदा त्या साऱ्यातून गेल्यामुळे तो आवेग राहत नाही. पण मग तसे असते तर माणूस आठवणींमध्ये गुंतून पडला नसता.

मोठ्या घटनाच नव्हे तर अगदी साध्याच, रोज घडणाऱ्या गोष्टी पाहा. एक दिवस म्हणजे चोवीस तास. प्रत्येकाचा या चोवीस तासांचा हिशेब निराळा. नेहमी विचारला जाणारा एक साधा प्रश्न -" कसा आहेस/ कसं चाललंय/ काय म्हणताय?" उत्तर - " बरा आहे/ ठीकच म्हणायचं/ चाललंय, कालचेच पान आजमध्ये जगतोय झालं." म्हणजेच या साऱ्यात काळ पुढे पुढे जातोय परंतु वेळेच्या गणितात माणूस तिथेच अडकून पडल्यासारखा दिसतोय. अमुक वाजता चहा नाही घेतला ना तर दिवस बोंबलाच समजा. पुन्हा तो आयता मिळायला हवा. शिळी तर सोडाच हो पोळी कशी तव्यावरून पानात यायला हवी. कपड्यांना कडक इस्त्री हवी. नवीन नाटक आले की लगोलग ते पाहायलाच हवे तेही पहिल्या तीन रांगांत बसून. जणू चौथ्या रांगेतून पाहिले तर नाटकाचा अर्थच बदलणार आहे. नोकरी करायलाच हवी - इथे दुमत असू शकतच नाही. ( जगण्यासाठी पैसे हवेतच-मग ते नोकरी करून मिळवा/व्यवसाय करून ) साड्या-दागिने हवेच. थोडक्यात काय अनेकविध आपणच जोपासलेल्या आपल्याच मतांसाठी चोवीस तासांतील बहुतेक सगळा वेळ खर्ची घालायचा. कालांतराने ती मते स्वतःलाही जाचक ठरतात, पण बदलायची कशी? त्यांसाठी घरच्यांना वेठीस धरलेले असते, शाब्दिक फटकारलेले असते. शिवाय - खरेच तेव्हा माझे चुकलेच, हे म्हणायचे धाडसही नाही आणि खोटा अहं आहेच भरीला तेव्हा आता भोगा स्वत:ही.

अन्न नासलं तर वासाने/दृष्यस्वरूपाने/चवीने समजते तरी ते नासलेय, परंतु विचारांचे काय करावे? डोहावर साचलेल्या शेवाळ्यासारखे अहंकाराने भरलेले बुळबुळीत विचार तसेच थिजून राहतात. त्याखाली जुन्या जखमा, हेवेदावे, भांडणे, अपमान सारे सारे सुरक्षित. ' शिळ्या कढीला उतच फार ' प्रमाणे हे शिळे सहेतुक जोपासलेले मानापमान वर उसळ्या मारतच राहतात अन पुन्हा नवीन वेळ फुकट जातच राहतो. समजत असूनही ज्यावर आपला ताबा नाही असा हा अंत नसलेला काळाशार डोह सगळ्यांच्या मनात आयुष्यभर जिवंत असतोच. यातल्या अनेक गोष्टींना मुरड घालता येऊ शकते. दिवसातला तासभर वेळ असोशीने जगण्यासाठी काढता येऊ शकतो. कणाकणाने झिजत, थिजत जाणारे आयुष्य उसनी धग लावून मिळमिळीत गरम करीत राहण्यापेक्षा थोडं स्वत:साठी-स्वतःच्या जीवलगांसाठी त्या वेळेपुरतेच उमलून जगायला काय हरकत आहे.

दररोज कशाची तरी गणितं मांडायला हवीतच का? एकदाच मिळतो म्हणे माणसाचा जन्म.... मग हे मिळालेलं आयुष्य आपण जगतोय का? आयुष्य किती आहे नक्की तेही माहीत नाही, तरीही भौतिक संचयवृत्ती वाढतेच आहे. ह्यातले काहीही कोणीही बरोबर घेऊन जाऊच शकत नाही हे सत्य माहीत असूनही हव्यास वाढतो आहे. मात्र त्याचबरोबर नात्यांचा, भावनांचा, प्रेमाचा ऱ्हास होतोय. कुणाला वेळ आहे या फालतू संकल्पनांत दवडायला. मुलांची कुवत, आवडीनिवडी ओळखून प्रेमाने.... मी नेहमीच तुझ्यासाठी कुठल्याही प्रसंगात उभा असणार आहे हा आश्वासक भाव मुलांत रुजवून, बऱ्या-वाईटाची जाणीव सप्रमाण करून देत, मैत्रपूर्ण संवाद व नाते निर्माण करून वाढवायचे का त्याच्यावर स्वतःच्या आकांशा लादत त्याचा बळी देत मोठे करायचे.

सारखी काहीतरी त्रैराशिके मांडत, गरजा वाढवत, अमुक मला हवेच या सदरात टाकून त्याच्या पूर्ततेसाठी नवीन गणिते मांडत धावतोय झालं. सगळं लगोलग हवंय पण मिळत नाही म्हणून मग त्याचं दु:ख.... मलाचा का मिळत नाही या विचारांनी ......अजून दु:ख. मग त्यावर उतारा..... कशाचातरी आधार घेत हलके करण्याचा शोध......... ही कवटाळलेली दुःखे अशी हलकी होत असती तर........ म्हणून मग जालीम उतारा...... वावटळ भिरभिरतच राहते. जोरात.....अव्याहत...... काळ मात्र थांबत नाही. कुठला क्षण शेवटचा याची अनभिज्ञता ' उद्या ' आहेच या विश्वासाचा गळा कापून एका क्षणात आयुष्य विझवून टाकते. खरेच का मी जीवन जगलो? हा जिवंतपणी पोटात खोलवर कुरतडणारा प्रश्न मेल्यावरही तसाच पडलेला असतो ..... अनुत्तरित.

2 comments:

  1. Rahunch jaatat anek goshti. Karu jara vel milala ki mhanat mhanat vel kadhich milat nahi. Race madhey utarle ki fakta dhavayche mahit asate, thambayche nahi.

    Aajchi post ekdam jad taklit. Aawadli...punha ekda vichar suru zale.

    ReplyDelete
  2. heera,आभार. खरेयं मलाही वाटले जरा थोडे हलके लिहायला हवे होते.असो.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !