जाता जाता एक नजर इथेही........

Friday, July 10, 2009

ग्राहकराजा जागा राहा....

टेलिफोन, सेलफोन कंपन्या आपणा सर्वांना किती प्रकारे छळतात याचा अनुभव अनेकदा येतोच. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी माणसेच यातून सुटली असावीत तीसुद्धा त्यांच्याकडे फोन नाही म्हणूनच. थोड्या दिवसांनी तुम्ही फोन का नाही घेतला म्हणूनही दंड करायला कमी करणार नाहीत. नुकताच मीही एक अनुभव घेतला. फार मोठे काही घडलेले नाही पण अगदी करंट गोष्टीशी निगडित असल्याने माझ्यासारखे बरेच लोक निघू शकतील आणि नजरचुकीने किंवा टेलिफोन कंपनीवर विश्वास ठेवून असतील तर किमान बिल चेक करून क्रेडिट मिळाले नसल्यास मिळवतील म्हणून हा प्रपंच.

भारत व उर्वरित जग इथे फोन करायचा झाल्यास मी रिलायन्सचे ग्लोबल कनेक्शन घेतलेले आहे. गेली पाच-सहा वर्षे आम्ही नियमित हीच सर्विस वापरून फोन करत आहोत. मे महिन्यात ' मदर्स डे ' येतो त्यामुळे रिलायन्सने मोठा गाजावाजा करत, मे महिन्यात आईला हवे तितके फोन करा..... वगैरे वगैरे म्हणत एकूण बिलावर ४५% डिस्कॉउंट जाहीर केले. मी खूश. महिना कुठलाही असो आई-बाबा व समस्त आप्तस्वकीय, दोस्तमंडळी..... आम्हा तिघांचीही त्यामुळे आमचे अव्याहत कॉल चालूच असतात. त्यामुळे ४५% म्हणजे मस्तच डिस्कॉउंट जाहीर केल्याने मी अंमळ जास्तच कॉल केले.
. मदर्स डेच्या दिवशीच मुलगा तीन आठवड्यांच्या मायदेशाच्या भेटिसाठी निघाला. मग तर काय माझ्या कॉल्सना लिमिटच राहिले नाही. शिवाय बॅक ऑफ द माइंड ४५% चे गाजर होतेच.

मे महिना संपला. जून महिन्यात येतो ' फादर्स डे '. पुन्हा एकदा रिलायन्सने आता बाबांना कॉल करा म्हणत २५%चे गाजर दाखवले. तो मेल मे महिना संपता संपताच आला होता. म्हणतात ना काहीच नसण्यापेक्षा २५% काय वाईट आहे. तरीही मी थोडा निषेध फोन करून नोंदवला. बाबां लोकांसाठी असा पक्षपातीपणा बरोबर नाही. आईलाच कायम झुकते माप का म्हणून... पण तो कस्टमर सर्विसवाला काय बोलणार यावर. त्याने हसून गुळमूळ काहीतरी सांगितले. कसे कोण जाणे मी त्याचवेळी त्याला मदर्स डेचे डिस्कॉउंट बिलात दिसेल ना असे विचारले. त्यावर ऑफकोर्स मॅडम नक्की मिळेल असे आश्वासन दिले. नेहमीप्रमाणे सात-आठ तारखेला बिलाचा मेल आला. बील चेक केले असता कुठलेही डिस्कॉउंट दिसले नाही.
.

हे अपेक्षीत होते तरीही वैताग आलाच. कॉल केला असता त्याने अगदी हळूच माझी चूक लक्षात आणून दिली. मेख अशी होती की मदर्स डेचे प्रमोशन १ मे पासून १ जून पर्यंत होते. त्यामुळे ते मे महिन्याच्या बिलात न मिळता जूनच्या बिलात मिळणार होते. मी स्वतःच्या मूर्खपणावर चडफडत त्याचे आभार मानले परंतु हे डिस्कॉउंट व फादर्स डे चे डिस्कॉउंट ( २ जून ते २३ जून हा प्रमोशन पिरेड होता ) ही जूनच्या बिलात मिळेल ना हे दोन दोनदा विचारून खुंटा बळकट करून घेतला. त्यानेही अजिबात चिंताच करू नका नक्की मिळेल. आता बाबांना कॉल करा असेही वर सांगितले.

गेल्या पाच वर्षात आमचे सरासरी बील $४५ च्या वर कधीही गेलेले नाही. पण मे महिन्यात मुलगा तिकडे शिवाय हे डिस्कॉउंट म्हणून असेल आमचे कॉल्स $१०० च्याही पुढे गेले. बील भरण्याची तारीख जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटची असल्याने वेळ होता. अचानक ७ जूनला मुलाचा कॉल आला, आई रिलायन्स थ्रू कॉल करता येत नाहीये. सर्विस तात्पुरती बंद केली आहे. मी बुचकळ्यांत. पुन्हा कस्टमर सर्विसला फोन लावला. काय झालेय असे विचारले तर म्हणे की आजवर तुमचे कधीही $५० च्या पुढे बील झालेले नाही त्यामुळे तुमच्या अंकॉट ला आम्ही ७५ पेक्षा जास्त क्रेडिट ठेवलेले नाही. या त्यांच्या गणिताचा मला इतका राग आला. मी त्याला विचारले की आधी कधी कॉल केले नाहीत म्हणून पुढेही कधी करू नयेत असे आहे का? गेल्या इतक्या वर्षात एकदा तरी आमचे बील पेड झाले नाही किंवा लेट पेड झाले असे कधी झालेय का? तर म्हणे नाही. मग तुम्ही सर्विस कशी बंद करून टाकता? बरे मे महिन्याचे बिल पेड करण्याची तारीख अजून आठवडाभर लांब आहे ना? शेवटी चार चार वेळा सॉरी म्हणत त्याने सजेस्ट केले की तुम्ही मेचे बिल आत्ता भरता का? मी लागलीच सर्विस सुरू करतो. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हताच मी फोनवरच बिल भरले. मात्र तो शब्दाला जागला आणि कनेक्शन माझा फोन सुरू असतानाच जोडून दिले.

जून महिना संपला. पुन्हा एक मेल आला जुलै महिन्यासाठी १५% डिस्कॉउंट दिले आहे. या सोमवारी जूनचे बिल आले. मी लागलीच चेक केले कारण या बिलात दोन्ही प्रमोशन चे डिस्कॉउंट मिळायला हवे होते. पण दिलेल्या प्रॉमिसेसना जागली तर तिला टेलिफोन कंपनी कसे म्हणता येईल. बिलात फक्त जूनचे डिस्कॉउंट दिलेले दिसत होते. मात्र आमचे क्रेडिट वाढवले होते. पुन्हा एकदा फोन केला. प्रत्यक्ष माणूस फोनवर सापडेपर्यंत त्यांच्या त्या चक्रातून फिरून आणि वेटींगमध्येच अर्ध्या लोकांचा पेशन्स संपतो आणि फोनचा नाद सोडला जातो. पण मी तग धरला.

पुन्हा एकदा मे पासूनचा पाढा वाचला. चेक करून सांगतो असे म्हणून त्याने मला दहा मिनिटे लटकवून ठेवले. मग आला लाइनवर, " सॉरी मॅडम, मी बिलींग डिपार्टमेंटशीच बोलत होतो. त्यांनी जूनचे डिस्कॉउंट दिलेय तुम्हाला." त्याला म्हटले मला ते दिसतेय पण मेच्या ४५% डिस्कॉउंट चे काय झाले? पुन्हा दहा मिनिटे मी होल्डवर. नंतर मात्र आवाज एकदम बदलला. मॅडम तुमचे बरोबर आहे. नजरचुकीने मे महिन्याचे डिस्कॉउंट द्यायचे राहून गेलेय. बिलींगवाल्यांच्या लक्षात आलेय, ते आता त्यांची चूक सुधारतील. तुम्ही बिलकूल चिंता करू नका. ऐका, म्हणे चिंता करू नका. त्याला म्हटले हेच मला गेल्या महिन्यातही सांगितले होते ना? बरं आता हे बिल मी भरायला हवे का? कारण माझे डिस्कॉउंट यापेक्षा जास्तीच आहे. तेव्हा तुम्ही ते ऍडजस्ट करून उलट माझ्याच अकॉउंटला क्रेडिट द्या. तर म्हणे नाही नाही मॅडम असे करू नका. बिल भरून टाका. तुम्हाला क्रेडिट नक्की मिळेल. पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे मी काय करू शकत होते?

मी बिल भरून टाकलेय. आता जुलैच्या बिलाची प्रतीक्षा करणे आणि पुन्हा एकदा क्रेडिट मिळाले का नाही याचा पाठपुरावा करणे आले. संपूर्ण अमेरिकेत व जगभर रिलायन्सचे प्रचंड कस्टमर आहेत. मे महिन्याचे प्रमोशन १ मे ते १ जून असे ठेवून रिलायन्सने खोडा घालून ठेवलाय. दोन महिने कोणहो एवढे लक्षात ठेवतेय? अगदी २५% कस्टमर जरी या प्रमोशनबद्दल विसरले तरीही किती पैसे द्यायचे वाचतील ते लक्षात घ्या. माझ्यासारखे जे चिवटपणे फोन करतील त्यांना चार वेळा सॉरी म्हणायचे व पुढच्या बिलात नक्की मिळेल असे म्हणून वाटेला लावायचे.

मित्र-मैत्रिणींनो तुम्हीही जर रिलायन्सचे कस्टमर असाल तर कृपया आपले बिल जरूर चेक करा. कदाचित असाच घोळ झालेला सापडू शकेल. ही डिस्कॉउंटची रक्कम फार मोठी नसेलही परंतु म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो आहे. ग्राहकराजा जागा राहा .......

4 comments:

  1. सगळे एकाच माळेचे मणी ... मी तर बरेच राडे केले आहेत ह्या फोन वरुन ... ;) आधी 'हत्च' वापरायचो. त्यांनी अव्वाच्यासव्वा बिल लावले म्हणुन तो (बिल न भरता) बंद करून एयर-टेल घेतला. ६-७ महिन्यात ह्यांनी सुद्धा रंग दाखवायला सुरवात केली. तरी तो वर्षभर वापरला. तक्रारी करून करून दमलो. शेवटी आता ३ महिन्यापूर्वी तो पण बंद केला आणि 'आता व्हाट अन 'आयडिया' सर जी' वापरतोय... :) बघुया आता हे कितपत चालते ... :D

    ReplyDelete
  2. मीही मायदेशात एयर-टेल वापरते. अरे बापरे त्यांच्या शोरूममध्ये प्रिपेडकार्डवर बॆलन्स ऎड करायला जावे तर नेहमीच दोनचार जणांचे चढलेले आवाज असतातच.:D
    स्टाफ व कस्टमरर्सची नेहमीचीच हाणामारी.

    ReplyDelete
  3. रिलायन्स

    मेरे पापा का सपना
    सबका पैसा अपना....

    हे लोकं सुधरणार नाहित कधीच. चोर कंपनी आहे (चोरवड गांवचा आहे हा चोर माणुस). लाइट बिल पण आमचं एकदम वाढलं टाटा कडुन रिलायन्स कडे गेल्यावर.

    ReplyDelete
  4. Very true Mahendra.पण काय करणार, आपण अडलोय ना ते नाडत आहेत.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !