जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, July 9, 2009

शेअरींग

वर्षानुवर्षे शेअरींग करून लोक राहत आहेतच. खरे तर कुटुंबपद्धती म्हणजेही शेअरींगच आहे. नवरा-बायको यांनी शेअरींग केले म्हणूनच तर पुढे निर्माण झालेल्या सगळ्यांना शेअरींग म्हणजे काय आणि ते कसे करावे, करतच राहावे हे कळले. कधी आवडून तर कधी अंगवळणी पडलेय म्हणून तर अनेकदा नाईलाज म्हणून..... अगदी लहान बाळं म्हणजे वर्षासव्वावर्षाची झाली की त्यांना एखादी वस्तू, गोळ्या-चॉकलेट दिले की आई म्हणा बाबा कोणीतरी हात पुढे करून तिच वस्तू परत त्याच्याकडे मागते. क्वचित कधी बाळ देते पण बहुतेक वेळा हात मागेच घेते. म्हणजेच एक प्रकारे ह्या छोट्याश्या गमतीच्या कृतीतून पहिला धडा मिळतो बाळाला. आणि तोही लागलीच जीवनाचे सत्य दाखवून देतो. त्याला न आवडणारी गोष्ट असेल तर लागलीच देऊन टाकतो आणि आवडणारी असेल तर..... . पुन्हा पुन्हा मागितली तर शेवटी मोठे भोकाड पसरून निषेध नोंदवतो पण देत मात्र नाही. हा खरे तर एक मोठा गहन विषय आहे. त्यावर पुन्हा कधीतरी लिहीन. आज शेअरींग म्हणजे नोकरी-शिक्षण निमित्ताने चार अनोळखी लोक जेव्हा एकत्र राहतात तेव्हा काय काय महाभारत-रामायण घडत असते व नंतर ते आठवून आठवून फारच करमणूक होते त्याबद्दल. हे वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या गमती आठवतील अन अजूनच जास्त हसू येईल.

तर एकदा एक माणूस.... म्हणजेच मी-रमेश, भारतातून अमेरिकेत यायला निघा्लोय. विमानतळावर जमलेल्या मोठ्या गोतावळ्याला टाटा, बाय बाय करून... आई-बाबांच्या डोळ्यातले पाणी, सांभाळून जा रे. यशस्वी हो. ( जणू काही युद्धावरच निघालाय.... अनोळखी देशात आपल्या माणसांना सोडून राहणे हे एक प्रकारे युद्धच म्हणायचे का? ) बायकोच्या डोळ्यात हुरहुर व आम्ही कधी येणार हे प्रश्नचिन्ह. पोरांच्या डोळ्यात आता बाबाची मजा... दररोज पिझ्झा, मॅक... काय कार्टी आहेत बाबा चाललाय दूरदेशी अन यांना पिझ्झा सुचतोय. मित्रमंडळीत थोडीशी असूया... चालायचेच. ती गृहीतच असते. मात्र प्रेमही असतेच ते अशावेळी दिसते. त्यांच्या सूचना.... जपून राहा रे. तिथे आम्ही नसणार तेव्हा उगाच राडे नकोत. आपण बरे की काम बरे असा राहा. आणि थोडा उपरोधिकपणा... आमची आठवण ठेवा नाहीतर तिकडे गेलास की कोण तुम्ही वगैरे प्रश्न तुला पडलेच ना तर इथे सुटिला आलास की तंगडे तोडून ठेवू तेव्हा..... मग पाठीवर दोन धपके, मिठ्या ...... शेवटी एकदाचा सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघालो.

सुखरूप पोचलो. ऑफिसला जॉईन झालो. सुरवातीला ऑफिसनेच दिलेल्या एका अपार्टमेंट मध्ये राहायला आलो. इथे पोचणे-जॉईन होणे आणि अपार्टमेंट मध्ये जाणे हे एकाच दिवसात झाल्याने नक्की काय चाललेय याचे आकलन होण्याइतके त्राण राहिलेले नव्हतेच. एकतर तिथून निघण्याआधीचे चार दिवस इतके भयंकर फास्ट व ताणाचे होते. अनेक कामे, कुठेतरी मनाच्या तळाशी सगळे नीट होईल ना हे प्रश्नचिन्ह, आपल्या माणसांना सोडून जायचे तेही इतक्या लांब त्याचे दडपण, बायकोचे, आई-बाबांचे हजार प्रश्न आणि त्याची स्वतःलाही माहीत नसलेली उत्तरे.

जेमतेम चार-पाच तास मिळालेली झोप. त्यातही बायकोचे कुशीत शिरून रडणे. ( या बायकांना रडण्याशिवाय दुसरे काही येतच नाही. जरा कुठे जवळ घ्यायला जावे तर.... मरो त्यापेक्षा झोपावे म्हणजे निदान मला इतके वाईट वाटतेय तुम्ही दूर जाणार त्याचे अन तुम्हाला नको ते सुचतेय ..... अजून काय काय--( ते खाजगी आहे. सगळेच कसे सांगू तुम्हाला. अहो बायको अशावेळी कशी बोलते ह्याचा अनुभव तर तुम्ही ही घेतलाच आहे ना.... अगदी अगदी. डिट्टो...
) ऐकण्यापेक्षा झोप बरी. ) मग तिची कशीबशी समजूत काढणे. मग हा एवढा मोठा प्रवास. जेटलॅग कसा येतो ते अनुभवण्याची पहिलीच वेळ. गोळाबेरीज मन आणि शरीर आता काहीही समजून घेण्यापलीकडे पोचलेले आहे. तेव्हा अपार्टमेंट मध्ये पोचल्या पोचल्या समोर जो कोच दिसला त्यावर मी स्वतःला झोकून दिले. दोन मिनिटातच गाढ झोपलो.

केव्हातरी जाग आली. काळोख पडला होता. अग दिवा लाव की. अरे कोणी ऐकतेय का..... मी ही असा संध्याकाळचा झोपलोय का पहाट झालीय.... काय चाललेय काय? आता हे कोण गदागदा हालवतेय..... ( डोळे उघडून पाहतो आन ताडकन उठून बसतो. समोर एक अनोळखी चेहरा दिसतो. त्याच्याकडे बघतो मग आजूबाजूला नजर फिरवतो. हे कोणाचे घर अन हा कोण उपटसुंभ? एका क्षणात लक्षात येते.... आपण अमेरिकेत आलोय. आणि हाही आपल्यासारखाच दिसतोय. त्याच्याकडे पाहून हसतो. ) मग हाय- हेल्लो- जुजबी ओळख होते. तोवर आणिक एकजण येऊन पोचतो.

एका अपार्टमेंट मध्ये तीन जण अशी सोय असते. ते दोघेही साऊथवाले- व्यंकटेश व किशोर .... आंडूगुंडू. माझ्यासाठी सगळे एकाच मडक्यातले. दोनचार दगड घाला मडके हालवा की जो आवाज येईल .... पण साऊथवाल्यांसाठी हे गणित इतके सहज नाहीये. अर्थात हे मला ओघाओघाने कळत गेले. दोन बेडरूम्स, माणसे तीन. आता आली पंचाईत. प्रचंड थंडीचे दिवस. मी पडलो पुण्याचा अन हे दोघे चेन्नईचे त्यामुळे थंडीची कोणालाच सवय नाही. म्हणजे अशा हाडे फोडणाऱ्या थंडीची. हे दोघे आधीपासून राहत असल्याने व उगाच कोणाच्यातरी बेडवर झोपण्यापेक्षा सोफा बरा असा विचार करून मी इथेच बराय असे म्हणून त्यांचा बेडरूम्स शेअरींग प्रश्न मी झटक्यात निकालात काढून टाकला.

एकीकडे सारखी घराची-आई-बाबा-बायको, पोरं आठवून आठवून जीव कासावीस होत होताच. भूकही लागली होती. रागिणीने आज जेवायला काय बरे केले असेल असा विचार चालू असतानाच किशोरने सांबार-भात खातोस का असे विचारले. बापरे! सांबार-भात, आजवर तर कधीच खाल्ल्याचे आठवत नाही. भूक तर लागलीये , चला आज खाऊ उद्यापासून करू काहीतरी असे म्हणत मी उठलो. किशोर मला घेऊन किचन मध्ये गेला. पाणी प्यावे या विचाराने मी फ्रीज उघडला अन काय सांगू संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडावे असा आ वासला.

फ्रीज उघडल्या उघडल्या डोळ्यांबरोबर नाकानेही ब्रह्मांड अनुभवले. एक थंडगार उग्र भपकारा आसमंत पुलकित करून गेला. सांबार-रस्सम-निरनिराळे भात, सांबार-भाताचे एकत्रित मिश्रण. दही नामक काहीतरी पांढरे, दुधाचा कॅन, ऑरेंज ज्यूस, रॉ भाज्या..... काही ठीक,काही सडलेल्या... देवा..... यावर ताण म्हणजे तीन चार डीश दिसल्या त्यावर दुसरी डीश टाकून झाकलेल्या होत्या. मी मनात विचार करत होतोच की हे काय असेल तोच किशोर ने एक डीश बाहेर काढली. त्यावरचे झाकण काढले तर आत कालवलेला काल रात्रीचा न संपलेला सांबार-भात होता. तो त्याने तसाच मायक्रोव्हेव मध्ये टाकला आता जेवण्यासाठी. मला ते पाहूनच असे काही मळमळले. रागिणीची प्रचंड आठवण आली. एक दिवस जरा कोशिंबीर नसेल किं वा खास आवडीची भाजी नसेल तर चिडणारा मी आणि आता हे असे जेवण....," किशोर, अरे मला ना भूकच नाहीये. मी झोपतो त्यापेक्षा. गूड नाइट." म्हणून मी त्या सांबार-भातापासून पळ काढला पण तो वास काही माझा पिच्छा सोडेना.

भुकेल्या पोटीच पण गाढ झोपलो. सकाळी लवकर जाग आली. उठून पाहिले तो व्यंकटेश किचन मध्ये खुडबुडत होता. मला उठलेला पाहून मॉर्निंग करून, आवर म्हणजे आपल्याला एकाच गाडीतून ऑफिसला जाता येईल अशी सूचना दिली. भरभर आवरून मी तयार होऊन आलो. चला आता कॉफी तरी घ्यावी म्हणून किचन मध्ये डोकावलो. व्यंकटेशने कॉफी, साखर दाखवले व दूध फ्रीजमध्ये आहे ते घे असे सांगून तो बूट घालायला गेला. भयंकर भूक लागलेली होतीच निदान मस्त कॉफी तरी ..... म्हणत एका कपात दूध ओतले..... इथले दूधही आपल्यापेक्षा वेगळे दिसतेय... साखर, कॉफी घालून व्यंकटेशच्या सूचनेप्रमाणे मायक्रोव्हेव मध्ये एक मिनिट ठेवून पहिला घोट घेतला अन हे काय.... आपण कॉफी पितोय का कॉफीच्या वासाचे ताक खरे तर नासलेले दूध पितोय हेच मला कळेना. तसाच घोट थुंकून टाकला. तोच किशोर आला. माझा भयंकर चेहरा व हातातला कॉफीचा कप पाहून म्हणाला, "अरे काय झाले?" सगळे ऐकून हळूच म्हणाला, " काय आहे ना त्या दुधाला आणून महिना होऊन गेलाय. आम्हाला कोणालाही लागतच नाही. तू जरा पाहून घ्यायचेस ना." हे एकले मात्र मला जे मळमळून आले....
. त्या दिवसापासून मी ब्लॅक कॉफी प्यायला सुरवात केली ते आजही तिच पितो आहे.

पहिल्या रात्री बेशुद्ध पडल्यासारखा झोपल्याने आसपासच्या घटना मला कळल्याच नाहीत. दुसऱ्या रात्री मात्र धमाल आली. बटाट्याच्या काचऱ्या व पाव खाऊन थोडे बरे वाटले मग थोडासा टिवी पाहून मी या जोडगोळीला गुडनाईट करून झोपलो. हीटर सुरू होता. साधारण साडेबाराच्या सुमारास दाणदाण चालत कोणीतरी बडबडते आहे असे वाटून मी दचकून उठलो. पाहतो तो काय, किशोर होता." ये पागल व्यंकटेश, इसको अक्कलही नही है. ८५ पे हीटर रखा है-- अरे चमडी जल जायेगा." असे म्हणत त्याने हीटरचे टेंपरेचर एकदम पासष्टावर नेऊन ठेवले. मी किलकील्या डोळ्यांनी पाहत होतो. तो गेला मीही गाढ झोपलो. जेमतेम अर्धा तासच मध्ये गेला असेल तोच व्यंकटेश तणतणत आला, " किशोर मै तुमको हमेशा बोलताय इतना टेंपरेचर कम मत रखो. मुझे ठंडी लगताय. ऐसे मे मर जायेगा एक दिन." आतून किशोरचा आवाज आला....," मर जायेगा.... पागल कुछ भी बकता है. सोने दे मुझे. " इकडे व्यंकटेशने पुन्हा हीटर पंच्याएशीवर नेऊन ठेवला. ही जुगलबंदी संपूर्ण रात्रभर सुरू होती. मी डोक्यावर पांघरूण ओढून या दोघांचा वेडेपणा पाहून पाहून दमलो पण हे दोघे थांबले नाहीत.

भांडी कोणी घासायची, कचरा कोणी उचलायचा, व्हॅक्युम कोणी करायचे पासून अगदी टीवीवर काय पाहायचे इथपर्यंत चाललेल्या हाणामाऱ्या पाहून मी चक्रावलो. तो सांबार-रस्समचा साठून राहिलेला व नव्याने भर पडत असलेला उग्र वास, दूध, ज्यूसचे नासून नासून शेवटी कशात रुपांतर होऊ शकते ते पाहून माझी त्यांच्याशी तुटलेली नाळ....क्लोजेट उघडले की कपड्यांनाही येणारा सांबाराचा वास, एवढेच काय कार्पेट, टॉवेल्स अगदी पाण्यालाही येणाऱ्या या वासाने माझे डोके असे काही भणभणून गेले. खरे तर लुसलुशीत डोसा, इडली, उपमा त्याबरोबर सांबार व पांढरीशुभ्र ओल्या खोबऱ्यावर तडका मारलेली चटणी हे माझे जीवलग पदार्थ. पण या भयंकर वासाने माझे सुख हिरावून घेतले.

अजून जर काही दिवस या वेड्यांबरोबर राहिलोच तर एकतर त्यांच्यासारखा होऊन जाईन किंवा वेडा तरी. मला दोन्हीही परवडण्यासारखे नसल्याने पंधरा दिवसात मी गाशा गुंडाळला व नवीन अपार्टमेंट शोधले. सुदैवाने इथे मला माझ्या सारखा पार्टनर मिळाला त्यामुळे काहीसे शेअरींग जमू लागले. अजूनही कधी कधी झोपेत मला त्या थंडगार सांबार-रस्सम-भाताच्या उग्र वासाने जाग येते अन मी दचकून उठतो... वाटते यमच घेऊन चाललाय अन जाता जाता टॉर्चर कसे असते याची एक झलक देतोय.

16 comments:

 1. मस्त.. :) मी कधी शेअरींग केलेले नाही. पण वाचूनच अंदाज आला काय भन्नाट प्रकार होत असतील ... खरच ...

  भ..न्ना..ट..!!! :D

  ReplyDelete
 2. It is not good practice to write so negatively about our fellow South Indians who just happen to speak different languages. Do you ever make similar fun of German language or French language? I doubt it. Indians look at each other through these us-vs-them lenses, and is it any wonder that true national integration has still not been achieved and that South Indians react negatively and suspiciously about North Indians who talk about them in the last sentence of this article as if they are like agents of 'Yam' who go around torturing. Frankly I am speechless at this prototyping of South Indians.

  And this man 'Ramesh', hero of the story, has experienced life to the point that he and his children know all about a non-Indian food like pizza and his children envy him about it, and yet in today's small world he had never eaten a very Indian dish like sambar-rice in his life?

  It makes me sad to read an Indian woman write like this about her fellow Indians.

  ReplyDelete
 3. सुदैवाने मला मराठी लोक भेट्ले. शेअरिंग असलं तरी आमचं घर चकाचक असतं. सांबार भाता पासून वाचवल्या बद्दल देवाचे आभार. आम्ही मस्त पोहे थालिपीठ उपमा करुन खातो. गाणी चित्रपट सगळं मराठी.

  ReplyDelete
 4. Anonymous,प्रथम तुमचे आभार.
  ह्या पोस्टचा मुख्य उद्देशच तुमच्या लक्षात न आल्याचे पाहून वाईट वाटले. हे साऊथ किंवा नॊर्थ विषयी नसून शेअरींग मध्ये राहताना माणसाने कसे वागू नये यासंबधी आहे. मला माझ्या सगळ्या देशबांधवांबद्दल अतिशय आदर आणि प्रेम आहे.
  आणि मी.रमेशच्या लहान मुलांबद्दल म्हणाल तर कुठल्याही साउथ इंडियन्सची मुले सांबार भात सोडून वरण भात खात असतील असे मला मूळीच वाटत नाही. ते त्यांनी न खाणे अगदी साहजीकच आहे. याउलट महाराष्ट्रात अतिशय आवडीने साउथफूड खाल्ले जाते.
  ही पोस्ट साउथ इंडीयन्सची मजा उडविणे यासाठी अजिबात लिहीलेली नाही.महाराष्ट्रात मराठी येत नाही म्हणून कुठल्याही राज्यातल्या लोकांशी मुद्दामहून मराठीत बोलण्याचा प्रघात नाही. याउलट अनेक साउथ राज्यात इंग्रजी तर सोडाच आपली राष्ट्रभाषा हिंदीही बोलली जात नाही. असो.

  तुम्ही मुळातच दुषित मनाने ही पोस्ट वाचलीत याचे मला दु:ख झाले.

  ReplyDelete
 5. रोहन, अरे खूपच गंमती असतात. साउथ काय नॊर्थ काय शेअरींग मध्ये कसे वागावे हेच बरेच जणांना कळत नाही. मग असे गोंधळ होणारच.

  साधक, बरेच दिवसांनी लिहीलेत.आभार, असाच लोभ ठेवा.:)

  ReplyDelete
 6. हिंदी बोलायला घाबरणारे मराठी लोक मी बरेच पाहिले आहेत. पण त्यांच्या मनात हिंदीबद्दल अढी नसते, हे सत्य आहे. तो मुद्दा घेऊन दाक्षिणात्यांवर तुम्ही जरूर टीका करा कारण ती रास्त ठरेल. पण परभाषांचा रुंडूगुंडू असा उल्लेख करणे, त्यांच्या अन्नाच्या वासावर ताशेरे, बेतालपणाच्या भूमिकेसाठी हेतूपूर्वक का नसेना पण दक्षिणबंधूंची निवड या गोष्टी खोलवरच्या पूर्वग्रहाच्या निदर्शक आहेत.

  साधक यांनीही सांबारभातापासून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. आनंद आहे. आपल्याला त्यांच्या अन्नाचा वास नवीन असतो, आणि त्यांना आपल्या अन्नाचा, यापलिकडे त्यात काही नाही. दक्षिणेकडचे लोक पुरणपोळी ते पोहे असे अनेक पदार्थ चवीने खातात. पण हे बाहेर सहसा मिळतच नाहीत. त्याला ते लोक काय करणार?

  तुम्ही म्हणालात: 'रमेशच्या लहान मुलांबद्दल म्हणाल तर कुठल्याही साउथ इंडियन्सची मुले सांबार भात सोडून वरण भात खात असतील असे मला मूळीच वाटत नाही.' मी रमेशच्या मुलांचा उल्लेख केलेला नाही. मूळ वाक्य हे: 'किशोरने सांबार-भात खातोस का असे विचारले. बापरे! सांबार-भात, आजवर तर कधीच खाल्ल्याचे आठवत नाही.' म्हणजे रमेशच्या लहान मुलांनादेखिल ३-४ हजार मैल दूरचे पिझ्झा वगैरे प्रकार माहीत आहेत कारण आता ते चैनी जीवन जगणार्‍या मराठी लोकांच्या जवळ आले आहेत, पण रमेशला मोठ्या वयातही सांबार-भात खाण्याचा अनुभव नाही. आपल्या ४००-५०० मैलावर असलेल्या अत्यंत श्रेष्ठ आणि समृद्‌ध संस्कृतीविषयी काय हे अज्ञान. सांबाराची चव माहित नसणे हे आपला एक मुद्दा 'महाराष्ट्रात साउथफूड आवडीने खातात' याचे निदर्शक नाही.

  तुम्ही मनापासून लिहिता आणि ते सहसा मस्त थाटावरच असतं. आता सतत केवळ स्तुतीच ऐकायला मिळाल्यामुळे असेल कदाचित, पण तुम्हाला स्वतःच्या लेखनातल्या मोठ्या त्रुटी पण लक्षात येत नाहीत. निंदकाच्या भूमिकेतून पाहून स्वतःचे लेखन वाचा, सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, आणि कमी लिहिलेत तरी चालेल, पण दर्जावर भर द्या. म्हणजे लेखनप्रयत्न जास्त कारणी लागेल. हे एक प्रामाणिक मत, ज्याचा हेतू तुमचा उत्साह कमी करण्याचा नाही. तर वाचकांचा उत्साह वाढेल असा जास्त डोळस विचार हवा. सर्वमान्य असे विनोद केले तर टाळ्या मिळतील, पण ते धोरण नेहमीच योग्य असतं असा प्रकार नाही.

  ReplyDelete
 7. भाग्यश्री ताई, नमस्कार...
  मी तुमचे पोस्ट नियमित पणे वाचते...मात्र प्रतिक्रिया आजच देते आहे....

  खरच....घरापासून दुर राहिल्या शिवाय घरची खरी किंमत कळत नाही..

  मनाली

  ReplyDelete
 8. मनाली तुझे स्वागत व आभार.

  Anonymous,मी लिहीलेले प्रसंग कोणाचे तरी अनुभव आहेत. आणि ते जसे आलेत तसेच लिहीलेत. ते जर नॊर्थ कडून आले असते तरीही तसेच लिहीले असते. वैयक्तीक मी संपूर्ण भारत हा माझा देश आहे असेच मानते. असो.

  रमेशला सांबाराची चव माहीत नाही असे कुठेही उल्लेखले नाही. परंतु सर्वसाधारण मराठी घरात वरणभात, दही-ताकभात खाल्ला जातो.पिझ्झा सारखे प्रकार संपूर्ण जगभर रूळले आहेत तेव्हा लहान मुलांना त्याचे आकर्षण असणे यात नवल ते काय.

  मी खरोखरच मनापासून लिहीते. माझी स्तुती ऐकणे हा माझ्या लेखनाचा उद्देश असता तर आपल्या या प्रतिक्रीयाना मंजूरी देऊन मी माझ्या ब्लॊगवर येऊ दिले नसते.कोणाही व्यक्ती, समाज-जातीवर लिहून, जोक्स मारून सवंग प्रसिध्दी मिळवण्याचा माझा कदापिही प्रयत्न असत नाही. मुळात मला स्वत:लाच हे पटत नाही.मुळातच माझे दाक्षिणात्य लोकांबद्दल पूर्वग्रहदूषित असल्याचे आपले मत वाचून आश्चर्य वाटले.ही माझी पोस्ट शेअरींग आणि त्यातून निर्माण होत असलेल्या गंमती याबद्दल होती.एखादी गोष्ट जशी आपल्याला दिसावी अशी वाटते तशीच दिसते प्रत्यक्षात ती तशी नसतेच. असो.

  तुम्ही म्हणालात तसे यापुढे निंदकाच्या भूमिकेतून मी अधिक लक्षपूर्वक लिहीण्याचा प्रयत्न करेन. सुचनेबद्दल आभार.

  निंदकाच्या भूमिकेतून माझ्या पोस्टवर आपण आपल्या प्रतिक्रीया आवर्जून टाकल्यात..... त्याचेही आभार.

  ReplyDelete
 9. भाग्यश्री, लेख प्रचंड आवडला आणि तुम्ही दिलेल्या कमेंट्सही पटल्या. लेख वाचताना कधीही, कुठेही असं वाटलं नाही की तुम्ही कुठल्या प्रांतातल्या लोकांची टिंगल टवाळी करण्यासाठी हा लेख लिहीत आहात. हा एखाद्याचा अनुभव आहे.. आणि तो जश्याच्या तसा मांडला आहे एवढेच.

  तुमच्या लेखांत नसले तरी ज्यांना कुणाला जर्मन, फ्रेंच, चिन येथील लोकांचे चांगले/वाईट अनुभव आले असतील ते त्यांच्या ब्लॉग वर मांडत असतीलच की. मग त्यांना आपण असं म्हणणार का? का रे बाबा तु जपानी बद्दल का नाही लिहीलेस? मला तरी नाही पटले.

  आणि यातील वर्णन हे खरं असेल जसं महिनाभरापुर्वीचे दुध, कालचा अर्धवट कालवलेला भात तर ते स्त्युत्य नक्कीच नाहीये..

  सो.. तुम्ही लिहीत रहा..वाचणारे वाचतील.. बोलणारे बोलतील..

  ReplyDelete
 10. अनिकेत, अनेक आभार. तुझ्या सविस्तर टिपणीने हलके वाटले.:)तरी मी अगदी मोजकेच प्रसंग टाकलेत, यापेक्षा भन्नाट प्रकार घडलेले एकलेत.

  ReplyDelete
 11. भाग्यश्री
  ब्लॉग हा आपल्या मनातले विचार लिहिण्यासाठी आसतो, तेंव्हा कोणी वंदो किंवा कोणी निंदो.. लिहित रहा. जे "काय वाटेल ते"!
  खरंच सांगतो, जर इतरांना हवं ते किंवा आवडेल ते लिहिण्याचं काम पत्रकार, किंवा प्रोफेशनल लेखक करतात. ते लिहितांनाच विचार करुन इतरांना आवडेल ते लिहितात. पण ब्लॉग वर आपल्याला जे आवडेल आणि पटेल ते लिहायचं असतं! सो किप रायटींग, आणि तुमचे लिखाण जस्टीफाय करण्याचा पण प्रयत्न करण्याची गरज नाही... असे मला वाटते. छान लिहिता, लिहित रहा....

  ReplyDelete
 12. आभार महेंद्र,:)

  ReplyDelete
 13. भाग्यश्री,
  तुझा ’शेअरिंग’ हा एका परदेशस्थाने अनुभवलेला विलक्षण अनुभव वाचला आणि त्याच्यावरची टीका-टिप्पणीही वाचली. अतिशय दिलखुलासपणे लिहिलेल्या स्फ़ुटावर झालेला खल वाचून वाईट वाटले. अनिकेत आणि महेंद्र यांनी जे म्हटले आहे की ’तुम्ही लिहीत रहा..वाचणारे वाचतील.. बोलणारे बोलतील..’ किंवा ’ब्लॉग हा आपल्या मनातले विचार लिहिण्यासाठी आसतो, तेंव्हा कोणी वंदो किंवा कोणी निंदो.. लिहित रहा. जे "काय वाटेल ते"!’ हेच फक्त पटण्यासारखे आहे.
  लहानपणी मी ऎकले होते माझ्या आजीला बोलताना की कोणाच्याही घरी गेले की शक्य असेल तर त्यांचे स्वयंपाकघर आणि बाथरूम बघावी. तिथल्या स्वच्छतेवरून (किंवा अस्वच्छतेवरून) तिथल्या माणसांच्या संपूर्ण जीवनाची आणि विचारसरणीचीही कल्पना करता येते. यामागच्या तिच्या तत्त्वप्रणालीवर एक लेख लिहिता येईल म्हणून तो विषय बाजूला ठेऊया. पण एव्हढे नक्की म्हण्ता येईल की माणसाने आपल्या स्वत:च्या घरात किती स्वच्छता ठेवायची (किंवा घर किती अस्वच्छ ठेवायचे) याबद्दल त्याचे पूर्ण स्वातंत्र्य मान्य करायलाच हवे. पण .... हा ’पण’ फार महत्त्वाचा आहे. जेव्हा घर ’शेअर’ करायचे असते तेव्हा माणसाने किमान स्वच्छता राखायलाच हवी. फक्त दुसऱ्यासाठी नाही तर स्वत:साठीही. आणि स्वत:ला जरूर नाही वाटली तर मग केवळ दुसऱ्यासाठी. त्याला पर्याय नाही. (मग तो फ्रीजमधला सांबार-भात असो किंवा वरण-भात असो.)
  ’शेअरिंग’कडे दोनच दृष्टीने पाहता येईल. १. त्याचा विनोदी ढंग. २. त्याला गंभीर लेखून. पण दाक्षिणात्यांवरचा टीका लेख म्हणून नक्कीच पाहता येणार नाही.
  भाग्यश्री, अशी उत्तरे देत बसलीस तर त्याला अंत नाही ग. लिहीत राहा पण केवळ स्वान्तसुखाय!
  अंजली

  ReplyDelete
 14. मंदाजली, आपण आवर्जून लिहीलेत खूप बरे वाटले. अनेक आभार.

  ReplyDelete
 15. मॅडम तुमची पोस्ट धमाल आहे पण मी कमेन्टस जास्त एन्जॉय केल्या, काय करु लोकलने प्रवास करणारा आहे ओ मी कुठे काय मॅटर झाला तर पहिला पोहोचतो, मदत वगैरे काही नाही नुसतं काय झालं? काय झालं? करत गर्दीत घुसतो, काय झालं असेल ते डोळाभर पाहतो आणि वाटेला लागतो.

  तुमची शेअरिंगची पोस्ट आवडली. तुमचा विशेष राग नाहीए साऊथ इंडियन पदार्थांवर हे मला सांगायला नको 'चॅलेंज देऊन तो गेला' अशी काहीतरी पोस्ट यापूर्वीही वाचली होती. माफ करा पोस्टचं नाव कदाचित वेगळं असेल, पण त्यात तुमचं डोशावरचं प्रेम नक्कीच दिसत होतं. कोणी चायनीस संभाषण ऐकलं तर ते च्यॅव मॅव काहीतरी करत होते असंच म्हणणार म्हणजे भाषेचा अनादर करायचा हेतू नसतो, तीचं वर्णन आपण करत असतो कि ती ऐकायला कशी वाटते? मराठी गाण्यांना, पुस्तकांना घाटी स्टफ म्हणणारे आहेतच की.

  मला जाम भिती वाटायला लागलीय मी परवाच कॅन्टीनात सरदारजीचा जोक सांगितला.

  ReplyDelete
 16. चुरापाव, आभार.

  मराठी गाण्यांना, पुस्तकांना घाटी स्टफ म्हणणारे आहेतच की.... हो ना. पण आपली बाजू घेऊन कोणी असे दुसरे भांडेल का... हा प्रश्न मात्र मला नक्की पडतो. चालायचेच.
  बाकी ’ओपन चॆलेंज देउन गेला ’तुमच्या लक्षात आहे हे पाहून विशेष आनंद वाटला. आभार.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !