जाता जाता एक नजर इथेही........

Monday, July 20, 2009

तू तर माझी बायको, शारदा.....

गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या गार्डन-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच सीनियर सिटिझन्स एका राउंड टेबल भोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे स्विमिंग पूल मध्ये थोडावेळ एक्सरसाईज करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स फ्लोट करत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते. दोघे बुद्धिजीवी मन लावून बुद्धिबळाचा डाव मांडून पाइप ओढत तल्लीन झाले होते.

गार्डनमध्ये चार कोपऱ्यात असलेल्या राउंड बेंचेस पैकी एका कोपऱ्यात काही आज्यांचे हास्यविनोद-गप्पा रंगात आल्या होत्या तर दुसऱ्या कोपऱ्यात सहा जणांचा ग्रुप हार्मोनियम वर येऊ घातलेल्या प्रोग्रॅमची रंगीत तालीम करत होता. तिसऱ्या कोपऱ्यात मे-जून चे सुटीचे दिवस असल्याने आजी-आजोबांकडे आलेल्या नातवंडानी आपला अड्डा जमवला होता. त्यांचा गलका, मस्ती.... पकडापकडी रंगात आली होती. या सिनियर्समध्ये- नव्वदीपर्यंत पोचलेल्या व अगदी तीन-चार वर्षांच्या नातवंडापर्यंत एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे हे सगळे, जीवन भरभरून उपभोगत होते. यातील अनेक जणांना पर्सनल प्रॉब्लेम्स होतेच. काहींच्या तब्यती अत्यंत नाजूक होत्या. काही जण आयुष्याच्या संध्याकाळी संपूर्णपणे एकटे-एकाकी होते. काहींचे जोडीदार अर्ध्यात साथ सोडून गेलेले, मुले दूरदेशात किंवा कामामुळे देशात असूनही जवळ नव्हती. दुःख, विरह, मनस्ताप सगळ्यांनाच घेरून असूनही या क्षणाला ही सगळी माणसे एका आनंदाच्या लाटेवर आरूढ होऊन हसत-खेळत होती. मी एका बेंचवर बसून सगळ्यांचा आनंद पाहत होते. अन जरासे द्ऱ असलेल्या चौथ्या कोपऱ्यात ती दोघे मला दिसली.

काका (आजोबा) पंचाऐशीच्या आसपास तर काकू ( आजी ) सत्त्यात्तर -अठ्ठ्यातर..... काकांच्या हातात काठी होती. किंचित गोंधळलेली, हरवलेली नजर वाटली. मात्र काकू शिडशिडीत बांध्याच्या, छोटासा अंबाडा, हलक्या गुलाबी रंगाची कलकत्ता साडी त्याला मॅचिंग ब्लाऊज व छोटीशी गोल टिकली, प्रसन्न मुद्रा..... स्मार्ट चालणे-बोलणे अशा होत्या. अरे, कालच तर मी यांना चौथ्या मजल्यावर पाहिले होते.... थोडेसे जुजबी बोलणेही झालेले. नेमके काकूंचेही माझ्याकडे लक्ष गेले. मी हसून हात हालवला तसे त्यांनीही.... ओळखलेय, काय म्हणतेस असे खुणेनेच विचारले. तसे मी उठून त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मी बेंचशी पोचताच त्यांनी पटकन माझा हात हातात घट्ट पकडून मला जवळ बसवून घेतले.

त्या हाताच्या स्पर्शात अनेक भाव होते. सलगी होती...... अचानक कोणीतरी आपल्याशी आपणहून बोलायला आलेय याचा आनंद होता. हाताच्या घट्ट पकडीत न जाणो मी पटकन निघून गेले तरचे हिरमुसलेपण टाळण्याचा प्रयत्न होता...... मला थोडासा वेळ त्यांच्यापाशी पकडून ठेवण्याची आंतरिक ऊर्मी होती. किती आणि काय काय बोलू असे त्यांना झाले होते. हे सगळे मला नेमके पोचवलेही होते त्या स्पर्शाने. आमच्या गप्पा सुरू झाल्या. पाच मिनिटातच माझ्या लक्षात आले की मी आलेय, बसलेय, आम्ही जरा मोठ्यानेच बोलतोय पण काकांचा चेहरा अगदी कोरा होता. ते आमच्याकडे पाहतही नव्हते. काठीची मूठ दोन्ही हाताने धरून त्यावर हनुवटी टेकवून कुठेतरी दूरवर संपूर्ण रिकाम्या नजरेने पाहत होते.

माझे काकांकडे पाहणे काकूंच्या लक्षात आले. त्यांनी जरासे माझ्या हातावर थोपटले आणि मग काकांच्या खांद्याला स्पर्श केला तसे काकांनी काकूंकडे वळून पाहिले. डोळ्यात थोडीशी ओळखीची झाक तरळली. दोन मिनिटे टक लावून काकूंकडे पाहून मग काका आपले माणूस दिसल्याच्या आनंदाने हसले. मग काकूंनी त्यांना हळूहळू फेऱ्या मारता का असे विचारले. तशी बरं, तू म्हणतेस तर मारतो फेऱ्या असे म्हणत काका उठले. ते जरासे म्हणजे दहा पावले गेल्यावर काकू म्हणाल्या, " अग, गेली सात-आठ वर्षे हळूहळू करत यांची स्मरणशक्ती क्षीण होते आहे. आताशा विस्मृतीने जवळजवळ संपूर्णच कब्जा घेतला आहे गं. प्रकृती चांगली आहे त्यांची. थोडेसे बिपी आणि जरासे डाव्या कानाने कमी ऐकू येते एवढाच काय तो त्रास आहे. पण या काहीही न आठवण्याने सगळी कसर भरून काढलीये बघ. तुला गंमत दाखवते थांब. " असे म्हणत फिरताना आमच्यापाशी आलेल्या काकांना त्यांनी हाताला धरून थांबवले.

काकांनी त्यांच्याकडे पाहिले.... नजरेत कुठेही ओळख दिसत नव्हती. खरं सांगते माझ्या छातीत धडधडले, आता जर काकांनी यांना ओळखलेच नाही तर? तेवढ्यात काकू म्हणाल्या, " अहो, सांगा बरे मी कोण आहे? नीट माझ्याकडे पाहा आणि आठवा..... काय, कोण आहे मी? " श्वास रोखून मी काकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. दोन -तीन मिनिटे स्थिर नजरेने काकूंकडे काका पाहत होते. काकू मध्येच त्यांच्याकडे तर मध्येच माझ्याकडे पाहत होत्या. नजरेनेच मला बघ तर ते आत्ता मला ओळखतील असे सांगत होत्या. मी मनात देवाचा धावा करत होते. तोच काकांनी मिस्कील( तसे मला तरी भासले ) हसत काकूंना म्हटले, " तू ना.... अग तू तर माझी बायको, शारदा. " अन अगदी लहान मूल जसे आईच्या हाताला धरून झोके घेते ना तसे काका काकूंचा हात घट्ट धरून हालवत होते. काकूंनी माझ्याकडे पाहत म्हटले, " चला आज तरी बायकोला ओळखले गं त्यांनी. अग दिवसातून दहा वेळा ही रीहर्सल चालते. तसे इतरही अनेक गोष्टी मी विचारते पण उत्तरे कधी बरोबर आणि बरेचवेळा चुकीचीच येतात. मात्र बायकोची ओळख अचूक आहे हो. "

मग थोड्या अजून गप्पा करून उद्या येशील ना गं बागेत... नक्की ये बरं का , चे प्रॉमिस घेऊन काकू काकांना घेऊन घरी गेल्या. दिवेलागणी झालेली. सगळे आजी-आजोबा आपापल्या घरी गेले होते. घराघरातून टिवीचे आवाज येऊ लागले. मीही उठले.... पण राहून राहून मनात येत होते, काकांचे बरेच वय झाले आहेच. तशात हा असा आजार. उद्या जर काकूंना ओळखण्याचा तंतूही तुटला तर शरिरी भावनांव्यतिरिक्त संवेदना, गुंतवणूक..... संभाषण या सगळ्याच्या परे काका पोचतील. समोरून पाहणाऱ्याला काकांची ही अवस्था वेदनादायक वाटली तरी त्यांना तिचे दुःख, त्रास वाटण्याच्या पलीकडे ते पोचलेले असतील. कशाचाच काहीही फरक पडत नाही अशी निर्वात पोकळी. परंतु काकूंचे काय होईल? काका अजूनही काकूंना ओळखतात हा एकमेव तंतू काकूंना जगवतो आहे. दररोज अनेकदा विचारून त्या खात्री करून घेत आहेत. जर काका विस्मृतीच्या काळोखात बुडाले तर काकूंच्या जगण्याचे प्रयोजनच संपेल. नाही नाही असे होता नये. कदापिही होता नये.

दुसरे काकांच्या आधी काकू गेल्या तर फारच मोठी गडबड होऊ शकेल. आपल्यामागे यांचे कसे होईल याविचाराने काकूंच्या जिवाला कुठेही शांती मिळणारच नाही. शिवाय काकांचेही काय होईल कोण जाणे.... त्यापेक्षा काकाच आधी....... काय हे विचार मी करतेय.... फार वाईट वाटले. अगदी खरं सांगते, राहून राहून मला वाटतेय की काकूही देवाकडे फक्त एवढेच मागत असतील. " देवा शेवटच्या दिवसापर्यंत हे मला ओळखू देत व ह्यांना माझ्याआधी ने रे बाबा. माझ्यामागे यांचे हाल नकोत. त्यांना समजत नसले तरी मला समजतेय ना. देवा, ऐकशील ना एवढे माझे....

7 comments:

 1. काय बोलू ... शब्द नाहीत ... !!!
  खुद्द माझ्या आजीबद्दल विचार करतोय. आजोबा बरेच आधी गेले. बाबा कामाला मुंबईला त्यामुळे गावाला कमी जातात. काका सुद्धा वारले आता. त्यामुळे तिला बरेचसे एकटे पण. आता मी जेंव्हा सुट्टीवर जातो तेंव्हा बराचसा वेळ गावाला जाउन राहतो... !!!

  ReplyDelete
 2. खरं आहे. विस्मृतीचा आजार फार दु:खदायक असतो. आमच्या नात्यातील एक आजी वय 90 च्या पुढे. त्यांना असाच विस्मृतिचा आजार होता. जेवण झालं हात धुतले की सुनेला जाउन म्हणायच्या तु मला जेवायलाच दिले नाहिस. खुप बरं वाईट बोलायच्या. तुमच्या लेखाने आज त्या आजींची आठवण

  ReplyDelete
 3. Rohan, kharech asha veli faar vait vatat asate parantu nakki kaay karave hehi samajat nahi. Aabhar.

  Rohini, agadi ashich ek aaji aamchyahi olkhit aahe. 15 mins purvi keleli goshta tya visarun jatat. changlya gappa marat astaat an thoda vel gela ki punha Kon ga tu? ase vichartaat. Aabhar.

  ReplyDelete
 4. म्हाताऱ्या लोकांना कोणी तरी जवळ हवं असतं. माझ्या एका मामांना पण अशिच सवय होती. घरी कोणी गेलंकी त्याचा हात धरुन बसवुन ठेवायचे, आणि मग काहितरी निरर्थक विचारत रहायचे, म्हणजे केंव्हा निघालास, मग कुठली बस मिळाली, की ट्रेन ने आलास, अगदी इथ्यंभुत वृत्तांत त्यांना सांगावा लागायचा. मग तो आलेला माणुस अगदी कंटाळून जायचा. पण आज लक्षात येतंय की ते जे कांही होतं ते फक्त कोणितरी जवळ बसावं, बोलावं, म्हणुन केली जाणारी एक केविलवाणी धडपड होती.. आज याचं वाईट वाटतं, की आम्ही त्यांना पाहिलं की त्या खोलितुन पळून जायचो.. त्यांना टाळायला...!!

  ReplyDelete
 5. एखाद्या दिपमाळेतला एकेक दिवा विझत जावा आणि शेवटी पुर्णपणे विझून अंधःकार पसरावा तशीच अवस्था ह्या "डीमेन्शीया" झालेल्या वृध्द लोकांची होते.
  ज्यांना आपण हसता-बोलतांना,चिडता-रागावताना पाहिलेलं असतं त्यांच्या नजरेतले असे शून्य भाव पाहताना खुप दुःख होतं.हे असं कणाकणाने संपणारं उदास आयुष्य पाहणं म्हणजे जवळच्या लोकांची परीक्षाच असते.आपलं जर असं झालं तर काय होईल हे विचार तर आणखिनच क्लेशकारक असतात.मला तर वाटतं अतिशय उत्तम असे वृद्धाश्रम निर्माण होणं हे आज अत्यंत गरजेच आहे.कारण नवनविन औषधोपचारांमुळे आयुर्मर्यादा वाढली आहे. एकाच घरात १-३,२०-२५,५०-६०,७५-८५ अशा ४/४ पिढ्या नांदत असतात्, आणि ५०-६० या गटावर सर्वाधिक ताण येतो,कारण VRSघेऊन ते घरांत असले तरीही नातवंडाकडे लक्ष द्यावे हे अपेक्षित असतंच्, तसंच स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांच्या तब्ब्येतीही जपाव्या लागतात आणि या सर्व गोष्टी नीट पार पाडत असतांनाच स्वतःची प्रकृती देखिल उत्तम ठेवण्याचं दडपणही असतं कारण ही कर्तव्य निभावणं भाग असल्याने VRS घेऊनही खर्या अर्थाने ती रिटायरमेंट नसतेच मुळी!याकडे एका सामाजिक समस्या या दृष्टीकोनांतुन पाहून त्यावर मार्ग शोधणं गरजेचं आहे.

  ReplyDelete
 6. No words to express Bhagyashree !!!काळजात कुठेतरी धस्स झाले.

  ReplyDelete
 7. माऊ,आभार.

  nimisha, आजकाला आयुर्मान वाढले आहेच आणि त्याचबरोबरीने स्वत:साठीही वेळ नाही इतके घाण्याला जुंपून घेतले गेल्याने नातेसंबंधातील संवादाची वीणच उसवली गेलीये. मला नेहमी वाटते वृध्दाश्रम व अनाथ तान्ह्या बाळांचा आश्रम हे एकाच ठिकाणी असावेत. या दोन्ही स्थितीत निखळ स्वार्थ-अपेक्षारहीत संवाद, आवर्जून दिलेला वेळ, स्पर्शातून जाणवत असलेले प्रेम, तुम्ही आम्हाला हवे आहात ह्याची सतत व्यक्त होणारी मागणी. तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोतच हे आश्वासन. तू म्हणतेस तसे जाणिवपूर्वक असे वृध्दाश्रम निघायला हवेत. धन्यवाद.

  महेंद्र, म्हातारेच काय आपल्यालाही संवादाची तहान असतेच ना रे.कधी कधी फार अस्वस्थ वाटते. एकीकडे जग फार जवळ आलेय असे आपण म्हणतो आणि त्याचवेळी प्रत्यक्ष जवळ मात्र कोणीच नाही ही स्थिती आहे. अजून पंचवीस-तीस वर्षानी काय होईल कोण जाणे.
  आभार.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !