गेली पन्नास-साठ वर्षे चित्रपटसृष्टीवर खलनायकी, विनोदी, गंभीर वळणाच्या अभिनयाने अधिराज्य गाजविलेले समर्थ अभिनेते नीळकंठ कृष्णाजी तथा निळू फुले यांचे आज पहाटे अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. एक अभिजात कलावंत पंचत्वात विलीन झाला.
निळू फुले यांनी हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांनाही संपूर्ण भारतातील लोकांनी नावाजले होते. रंगभूमीवर विविधढंगी भूमिका जिवंत करणारे अभिजात, हाडाचे कलावंत अशा निळू फुलेंनी चित्रपटांत चांगले यश मिळवूनही रंगभूमीची साथ सोडली नाही. त्यांनी नाटकांमध्ये साकारलेल्या सखाराम बाईंडरने नाटय़सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेले आणि मराठी रंगभूमीला एक नवा आयाम मिळाला. सिंहासनमध्ये त्यांनी केलेली दिगू या पत्रकाराची भूमिका म्हणजे सत्तेच्या बळावर स्थापित लोकांच्या निंदनीय, स्वार्थी कृत्यांचा माहीत असूनही प्रतिकार न करता येणाऱ्या माणसाच्या असहायतेचे दर्शन घडवते. दिगूला अजरामर बनविले त्यांनी. सामनामधील त्यांनी पाटलाची भूमिका रंगवितानाचा त्यांचा अभिनय डॉ. श्रीराम लागू यांच्या समर्थ अभिनयाच्या तोडीस तोड होता. सरपंच-आमदार-साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा विविध पदांवरील धनदांडग्यांची मस्ती ते सही सही रंगवत असत. अनेकदा त्यांना पाहिले तरी संताप येत असे. कलाकाराचे सारे यश यात सामावलेले असते.
' सामना', 'सिंहासन', 'जैत रे जैत' यासारखे मराठी चित्रपट असोत, 'कुली', 'सारांश', 'मशाल', 'नरम गरम'सारखे हिंदी चित्रपट असोत वा सूर्यास्त, सखाराम बाईंडरसारखी नाटके असो, निळू फुले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला. त्यामुळे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील निळू फुले यांना आदराचे स्थान होते. मराठी नाटकांबरोबरच मराठी चित्रपटांवरही त्यांनी आपला ठसा उमटवला. 'सिंहासन' चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस असो की 'सामना'मधील हिंदूराव पाटील असो, त्यांचा अभिनय सर्वांनाच भावला. अमिताभ बच्चनसारख्या अभिनेत्याच्या 'कुली' चित्रपटामध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचे वेगळेपण दाखवून दिले. त्यामुळे हा चित्रपट अमिताभबरोबरच निळू फुले यांच्यासाठीही लक्षात राहिला.
अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारे निळू फुले प्रत्यक्षात मात्र अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाचे होते. पांढरा पायजमा आणि वर झब्बा, खांद्यावर कापडी झोळी हाच त्यांचा कायमचा वेष. मामाकडे कधीकधी त्यांच्या झालेल्या भेटींची आठवण होते आहे. या महान कलाकाराला दंडवत. तुमच्यावर आमचे प्रेम होतेच ते असेच अखंड राहीलच.
आजच्या लोकसत्ता मध्ये ... अग्रलेख आणि ३ विशेष लेख आले आहेत त्यांच्यावर ... नक्की वाचा ... !!!
ReplyDeleteअग्रलेख ... http://www.loksatta.com/daily/20090714/edt.htm
३ विशेष लेख ...
१. भूमिका जगणारा -
२. बाइंडरबरोबरचा नाटय़प्रवास
३. निष्ठावान आणि दिलदार
http://www.loksatta.com/daily/20090714/vlekh02.htm
अजून ४ इतर लेख ...
१. त्यांचे हात ‘देणाऱ्याचे’ झाले.. - http://www.loksatta.com/daily/20090714/nil01.htm
२. ‘गणगोत’ भूमिकांचे - http://www.loksatta.com/daily/20090714/nil02.htm
३. जनसामान्यांचा जिवाभावाचा मित्र - http://www.loksatta.com/daily/20090714/nil03.htm
४. ‘सामना’तला हिंदुराव - http://www.loksatta.com/daily/20090714/nil04.htm
रोहन, नक्की वाचते. अग्रलेख मी वाचलाय, पण इतर लेख वाचते आता. धन्यवाद.
ReplyDelete