माणसाच्या जीवनात अगदी लहानपणापासून असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळी काही निर्णय विचार न करता घेतले जातात तर काही नाईलाज म्हणून, काही मला वाटते तेच बरोबर आहे ह्या समजुतीतून. कालांतराने ती समजूत योग्य होती की गैर होती ते कळून येतेच. काही दिवस उलटले की त्या प्रसंगांची तीव्रता काळाच्या प्रवाहात कमी होते व अगदी सहजपणे योग्य निर्णय समोर येतो. अर्थात तोवर वेळ कधीच निघून गेलेली असते. राहून राहून मन म्हणते, खरे तर हे इतके सरळ सोपे होते तरी पण मला त्यावेळी का बरे नाही सुचले. इतका मनः स्ताप मी का बरे करून घेतला? वाटले इतके हे टोकाचे नव्हतेच मुळी.
हे असे प्रसंग व नंतर त्या प्रसंगाकडे आपले मागे वळून पाहणे आपल्या आयुष्यात वारंवार येत असते. मागच्या प्रसंगी न सुचलेले पुढच्या प्रसंगीही सुचत नाहीच. कारण तेव्हा ती वेळच तशी असते. म्हणजे त्यावेळी आपल्याला तसे वाटत असते. म्हणजे या सगळ्याचे मूळ ती वेळ हेच आहे का? काळ कोणासाठीही कधीच थांबत नाही. तो थांबत नाही हेच चांगले आहे. नाहीतर आपण सगळेच डबक्यातल्या शेवाळे धरलेल्या पाण्यासारखे साचलेले असतो. तरीही सगळेच काळाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. कोणी त्याला आपल्या आठवणींमध्ये जखडून ठेवतात. तर कोणी त्याच्याबरोबर त्याच्या गतीने धावत राहतात. पण त्या धावण्यात आजचा दिवस जगायला मात्र विसरतात.
जवळ असलेल्या सुखांकडे न पाहता उद्याच्या सुखावर नजर ठेवून आज ला रटाळ, ओढग्रस्त, स्वतःसाठी व स्वतःच्या माणसांसाठी दोन मिनिटेही वेळ नाही असे जुंपून घेतात. दुर्दैवाने अशा आपल्यातल्या काही जणांचा काळ पूर्णविराम बनून येतो. बाहेर पडलेली आई-कामाला गेलेला बाबा-मुलगा, सगळ्या जाणीव पार करून दूर निघून जातात. आजही जीवन मनासारखे घालवले नाही अन उद्या उरलाच नाही.
अशा अचानक जाणाऱ्या माणसांचा ह्या जगातला काळ गोठला. अगदी साध्यासाध्या गोष्टीही करायच्या राहून गेल्या. लेक कधी पासून मागे लागली होती, चौपाटीवर जाऊयात. दररोज उशीर होतो यायला, लेकाला प्रॉमिस केलेय क्रिकेट खेळेन ...... आईबरोबर बसून निवांत गप्पा किती वर्षात केल्या नाहीत. चार दिवस सुटी काढून गणपतीला सगळ्यांना गावी घेऊन जाईन जाईन असे किती वर्षे घोकतोय पण अजून मुहूर्त सापडत नाही. बायकोला घरात झोपाळा बसवून हवाय, गॅलरीत नक्की लावता येईल. फार हौस आहे तिला, रात्री वेलची घातलेली कॉफी अन एकमेकाला बिलगून जगजितच्या सुरात विरघळून जायचे. ते विरघळणे वगैरे होईल की नाही माहीत नाही परंतु त्या झोपाळ्यामुळे तिला जे हे सुख मिळणार आहे ते मला पाहायचे आहे. कधी जमणार आहे हे सारे कोण जाणे..... उद्या उद्या करू म्हणता म्हणता उद्या राहिलाच नाही.
अपघाताने अथवा अचानक उद्भवलेल्या शारीरिक दुखण्याने माणसे जातात ते कालांतराने अपरिहार्यपणे मन स्वीकारते. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते त्यावेळी तिची मानसिक परिस्थिती तिच्यापुढे फक्त हाच पर्याय आहे व तोच स्वीकारणे भाग आहे हे निक्षून सांगत असेल का? जीवन स्वतःच्या हाताने संपवणे हे फार कठीण आहे असे मला तरी वाटते. एखाद्या कीडामुंगीला मारणे सुद्धा नकोसे वाटते. आपण सगळेच म्हणू की दुसऱ्या माणसाला जीवानिशी मारणे मला कदापिही शक्य नाही एकवेळ मी स्वतः जीव देऊ शकेन. हे म्हणणे योग्यच वाटते कारण कोणा दुसऱ्या माणसाचे जीवन संपविण्याचा विचार आपण करू शकतच नाही. तरीही कुठल्याही परिस्थितीत जीव देण्यासाठी स्वतःला तयार करणे आणि तेही अपरिहार्य पर्याय म्हणून, फार हिंमत हवी. जिवंत राहण्याची आसक्ती माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत असते तरीही माणसे जीव देतात.
खिडकीशी बसून लिहीत होते आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर मोगऱ्याचा गंध आला, येतच राहिला. अतिशय मंद सुगंध माझ्या अंतरात विरघळू लागला. फुलांचे सुवास हे मला अतिशय वेड लावतात. वर लिहीत असलेले विचार या गंधापुढे विरून गेले.जर हे विचार या सुवासात लुप्त झाले तर त्या जीव देणाऱ्या माणसांना त्यांच्या कुठल्याच सुगंधी, आश्वासक, मी तुझ्यासाठी सदैव आहेच अशा जवळच्या नात्याने तेवढा विश्वास देऊ केला नसेल का? दुःख ऐकून घेऊन काहीतरी मार्ग नक्कीच निघेल, असा धीर देऊ शकेल अशी एकही व्यक्ती जोडली नव्हती, की त्या जोडलेल्या माणसांनीही पाठ फिरवली असेल?
मनातले सगळेच सल दाखवता येत नाहीत. पूर्ण आयुष्यभर ते त्यांच्या नखांनी पुन्हा पुन्हा सुकलेली क्षते ओरबाडतच असतात. त्यांना बरोबर घेऊनच जगावे लागते. प्रत्येक मनाला वाटत असते हे माझे दुःख फार मोठे आहे, कालांतराने ते कुरवाळणे त्यातच रमणेही आवडू लागते. काही जणांना लोकांकडून सहानुभूती मिळवणेही आवडत असते. पण खरेच का दुःख वाटता येऊ शकते? वाटून ते हलके होऊ शकते? ऐकून चुकचुकणारे बरेच मिळतील पण ते कमी व्हावे असा प्रयत्न करणारे कीती असतील? आनंद हाच खरे म्हणजे वाटता येऊ शकतो. कारण समोरच्या माणसाने तो कौतुकाने स्वीकारला नाही तरीही कमी होणार नसतो. तो सर्वदूर तुमच्या मनभर साजरा होत असतो. त्याची लागण समोरच्यालाही थोडीफार होतेच.
पण दुःखाचे मात्र तसे होऊ शकत नाही. जाणीवा बोथट होतात म्हणून अश्रू सुकतात हे वरकरणी सत्य असेल पण त्यांचे दबले हुंदके मात्र त्याच हृदयाला ऐकू येतात ज्याने सारे भोगले आहे. म्हणूनच कवी ग्रेस म्हणत असावेत,
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद स्वराने,
कारण कितीही वाटू म्हटले तरी ते ना कोणी घेऊ शकत ना कोणाबरोबर शेअर केले की हलके झाले असे होऊ शकत. तात्पुरता निचरा होत असेलही. जेव्हा दुःख होते तेव्हा ते कायमस्वरूपी होते. ते हलके फक्त आपले स्वतः चे मनच करू शकते. आणि तेही काळाच्या प्रवाहीत राहण्यामुळेच घडू शकते. दु:खाला आठवणींच्या साम्राज्यात कैद करून ठेवू नये. शक्य तितक्या लवकर त्याला मागे टाकायचा प्रयत्न करायला हवा. याचा अर्थ ते संपते असे नाही. पण त्यात ’ आज व उद्याही ’गोठवून ठेवू नये. मनाच्या खोल अंधारकप्प्यात त्याला ढकलून द्यावे. पुन्हा नव्या उभारीने मनाची कवाडे उघडी ठेवून आसक्तीने जगावे. सुख-दु:खाच्या पाठशिवणीच्या खेळाशी समरसून खेळण्यास सिद्ध व्हावे.
Atishay sahaj-sope shabdankan keles. Aawadale.
ReplyDeleteManushya swabhavach aahe ha hatache sodun nehmich udyacha vichar karat rahayache an jagayalach visarayche. Chote chote aanand khoop sukhavoo shaktaat ha concept parat rujayala laglaay. Tu lihiles te kalate pan valat nahi tashich aaplya sarvanchi sthiti aahe.
Tuza blog nehami vachate,aawadate vachayala.Aaj comment takatey, lihiti raha.
Vishakha
विशाखा स्वागत व आभार.:)
ReplyDeleteभानस,
ReplyDeleteखुप सुंदर लिहीलंयस गं...नाही सांगता येत कुणालाच आपली काही दुःख.. अगदी कितीही कुणी जवळचं असलं नं तरीसुध्दा!आपण एखाद्या गोष्टीविषयी खुप सेन्सिटीव्ह असतो तशी आपल्या खुप जवळची व्यक्ती असेलच असं नाही,अगदी आपल्यावर ज्याचं जीवापाड प्रेम आहे असं आपल्याला निश्चित ठाऊक असतं अशा व्यक्तीलाही आपल्या मनांत कुठली वादळं घोंगावतायत याचा कधी कधी पत्तादेखिल नसतो.पण तेही काही मुद्दाम होत नाही फक्त त्यांची संवेदनशीलता वेगळी असते इतकंच!हे असे काही वादळी क्षण येतात त्यावेळी मात्र खुप एकटं,हरवल्यासारखं वाटतंच ग!पण जसा काळ सतत पुढे पळत राहतो तसंच आपणही आपल्या दुःखापासुन दूर दूर जात राहीलं पाहीजे हेच योग्य आहे.
nimisha,हो गं काही गोष्टी कुणालाच सांगता येत नाहीत.प्रत्येकाची संवेदनशीलता वेगवेगळी असते. खरं सांगू, आज मी तुझी वाट पाहत होते. हा अप्रत्यक्ष(जालावर) का असेना आपल्यात जो संवाद घडतोय.... .खूप आभार.
ReplyDeleteघेतलेले निर्णय चुक तर नव्हते नां? हा एक नेहे मी छळणारा प्रश्न आहे मला. असं वाटतं,अरे आपणही जॉब हॉपिंग केलं असतं तर?? कदाचीत आज जास्त पैसा मिळाला असता. पैसा मिळतो, त्याचं सुख मानायचं की इनकमटॅक्स जास्त भरावा लागतो म्हणून वाईट वाटून घ्यायचं?
ReplyDeleteछान झालाय लेख - नेहेमी प्रमाणेच...!
खरेच! घेतलेला निर्णय घेतांना आपण अनेकवेळा विचार करतोच परंतु मागे वळून पाहतानाही आपण पुन्हा पुन्हा तोच उहापोह स्वत:शीच करतो. कारण तोवर घेतलेला निर्णय योग्य होता की वेगळा मार्ग चोखंदळायला हवा होता हे कळून चुकलेले असते. पण म्हणून पुन्हा वेगळी वाट चालूच असे घडेलच असेही नाही. :)
Deleteधन्सं रे!