जाता जाता एक नजर इथेही........

Monday, July 6, 2009

एक अत्यावश्यक प्रभावी सुंकले.....

सकाळी सकाळी आई व काकूचे फोनवर तक्रारीचे सूर चालले होते. विषय त्यांचा नेहमीचाच-सेलफोन हा होता. काकूचे दोन ब्लॉक आहेत. एक तिसऱ्यावर तर दुसरा पाचव्या मजल्यावर. एक मुलगा वर राहतो परंतु स्वयंपाकघर एकच असल्याने सारखा राबता खालीच असतो. तो किंवा त्याची बायको एकमेकांना बोलवायचे असेल की लागलीच सेल काढतात. नुकतेच वरून खाली आलाय तोच सेल काढतो अन चालू करतो, अग अमुक झालं/ हे खाली आण..... कधी कधी उगाच काहीतरी. तो तो आमच्या काका-काकूचे पित्त खवळते. अरे आत्ता तर तू तिच्याशी बोलून आलास ना मग ..... सारखे काय हे सुंकले आपले कानाला अडकवलेलेच असते. आजकाल नवरा-बायको मध्ये ही नवीन फॅशन आलेली आहे. प्रत्यक्ष जवळ जवळ बोलतच नाहीत.... सारखे एसएमएस नाहीतर कानात वायरी आहेतच जानव्या सारख्या लोंबत. ही जानव्याची उपमा ऐकली ना की मला जाम हसू येते. एखादा तुंदिलतनू कानावर जानवे अडकवून हातात टमरेल घेऊन पळताना दिसतो......

सेलफोन वापरणाऱ्यांचे साधारण तीन गट पडले आहेत. पहिला गट- टीन एजर्स-कॉलेजमध्ये जाणारेपासून -साधारण चाळिशी पर्यंतचे, दुसरा गट- ऑफिस-धंदापाणी-पालक- यांच्यासाठी सेलफोन हा अत्यावश्यक आहे परंतु कारणीक, तर तिसरा म्हणजे सत्तरच्या पुढचे- सगळ्या प्रकारचे सीनियर सिटीझन्स. शिवाय या व्यतिरिक्त अजून काही वर्गवारी होऊ शकले-जसे, लहान मुले..... आई-बाबा, दादा-दिदी, आजी-आजोबा ज्याचा सेल हाताशी सापडेल त्याच्याशी मनसोक्त खेळून घेतात. आश्चर्य म्हणजे यांना कुठे काय प्रेस केले तर गेम मिळतील, दुसऱ्याला कॉल करता येईल... फोटो काढता येईल... सगळे माहीत असते. त्यांचे ऑब्झर्वेशन एवढे पॉवरफूल असते शिवाय भीती किंवा हिचकीच मनात नसते. बिनधास्त मनात येईल ते करून टाकतात. सुखी जीव..... त्यांनी घातलेले ( विशेषतः आजी-आजोबांच्या मते ) घोळ निस्तरता इतरांना मात्र नाकी नऊ येतात.

इतर काही वर्गवारीत अजून एक प्रचंड मोठा गट आहे, तो म्हणजे...... सगळे वाले... वाल्या......
..... हेहे, मोलकरणी, भाजी, रद्दी, दूध, किराणा, इस्त्री, काय वाटेल ते... त्यापुढे हे वाले-वाल्या जोडायचे. मात्र हे लोक फार व्यवहार चतुर आहेत. यांच्या फोनवर ऑउटगोइंगची सुविधाच नसते. म्हणजे निदान आपल्याला सांगताना तरी असेच भासवतात. आणि इनकमिंग फ्रीचे डील बरोबर मिळवलेले असते. ( आजकाल बहुतेक सगळ्याच सेलवर इनकमिंग फ्री असेलच ) त्यामुळे तुम्हाला त्यांची गरज लागली की बरोबर फोन केला जातोच. अनेकदा यांचा सेल सतत एंगेजच असतो.

आमच्या मोलकरणीचा सेल तर पाहावा तेव्हा एंगेज नाहीतर वाजतोय वाजतोय पण कोणी घेत नाही. एकदा तिला विचारले हा काय प्रकार आहे.... तर म्हणे अहो ताई तो धाकटा सारखा खेळत बसतोय. मग बॅटरी जातेय. ती चार्ज करायला लावावी तर लाइटच जात्यात मग काय करावं तुम्हीच सांगा. आणि काय आहे ना ताई, मी आले नाही..... जरासा उशिर झाला तर तुमचा जीव होतोय खालीवर म्हणून तुमासारख्यांसाठीच म्या घेतलाय ना ह्यो सेल. म्हणजे काय आमच्या पोरांना तुमच्या घरी निरोप देन्याकरता पळवायला नको, तुम्हास्नी धीर नसत्योच तव्हा फिरवत राहा.... काय? ऐका..... आता यावर मी काय बोलणार. कधीमधी का होईना या लोकांना फोन लागतो आणि खरेच खूपच सुविधा मिळते. नाहीतर आमच्या इस्त्रीवाल्याला वेळेवर शोधणे म्हणजे...... देव पण थकेल.

टीन एजर्स... ते संसाराची नवीनवलाई.....
( ही नवलाई कुठवर टिकावी हे सर्वस्वी त्या दोघांवर अवलंबून आहे बरे का. पोरं-बाळं झाली की ह्या सेलचा उपयोग विविध तऱ्हांनी होतो..... होतच राहतो..... म्हणजेच मजा.... धमाल..... उगाचच ह्याह्या... हूहू.... अत्यंत निरर्थक अशी तासन तास बडबड..... कधी कधी तर नुसताच मूक संवाद वगैरेतून बाहेर पडून उपयोगी-गरजेचे सदरातले संभाषण सुरू होते. ) या गटातल्यांना सेल म्हणजे एक आकर्षक तितकेच प्रभावी खेळणे आहे. सकाळी उठल्यापासून अगदी पार मध्यरात्रीपर्यंत चाललेले फक्त एका दिवसाचे संभाषण जर रेकॉर्ड केले तर अनेक सिनेमांचे स्क्रिप्ट तयार होऊ शकेल. शिवाय एसएमएस आहेतच भरीला. मी या गटात मोडत असताना सेलफोन नव्हते.... त्याचे वाईट नक्कीच वाटते पण तेव्हा प्रत्यक्ष दंगा जास्त होत होता. शेवटी आनंद मिळवण्यासाठी संवादाची गरज आहे ना.... माध्यम बदलले तरी धमाल तीच.... तशीच जोरदार.

माझ्या पोराचेच पाहते ना मी..... चक्क गेम्स -ते कसले एक्स बॉक्स, प्ले स्टेशन... हाणामाऱ्यांचे गेम्स खेळत असतो आणि त्याचा दुसरा मित्र कुठल्या तरी लांबच्या स्टेटमधून तोच सेम गेम खेळत --मग हे दोघे पार्टनर्स नॉनस्टॉप सेलवर एकमेकाला इन्स्ट्रक्शन देत शत्रूचा धुवा उडवतात...... माझी तर मतीच गुंग होते. शिवाय या हाणामारीत मध्ये मध्ये तो मलाही खेचण्याचा प्रयत्न करतो. आई, अग तू खेळून तर बघ. आय बेट एक-दोनदा खेळलीस ना की अडीक्ट होशीलच. .......
म्हणजे मी ही सेलवर शत्रूला मारण्याचे प्लॅन्स आखतेय, शत्रू मेला की आनंदाने ओरडतेय अशी दृश्ये मला दिसू लागतात.

कामानिमित्त सारखा सेल वापरणाऱ्यांकडे निरखून पाहिले की लक्षात येते, बिचारे गांजलेले असतात. सेल वाजला.... किंवा मेल अलर्ट आला की यांच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी पडते. मग नाईलाजाने काय आहे ते चेक केले जाते. ( आजकाल बऱ्याच कंपन्यांनी सेलवर नेटची सुविधा देऊन सगळ्यांना चोवीस तासाच्या बांधीलकीच्या खोड्यांत अडकवले आहे. ) अगदी सुटीवर असलात तरीही हे कॉल्स व मेल्स तुमची पाठ सोडत नाहीत. शिवाय तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात गेलात तरी सेल असतोच.... कॉल करणाऱ्याला तुमची रात्र आहे का दिवस हे कळणे शक्य नसतेच..... शब्दशः २४/७ अशी गत होऊन जाते.
. असे असले तरी यासगळ्यांसाठी सेल ही अत्यावश्यक चीज आहे.

पालकांसाठी मात्र मला सेल ' वरदान ' वाटतो. आजकालच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात आपले मूल कुठे आहे, काय करतेय, कोणाबरोबर आहे.... अनेकविध प्रश्नांचे उत्तर काही प्रमाणात मिळू शकते. कधी अचानक काहीतरी संकट ओढवले, पडले-लागले, पैसे संपले-पाकीट मारले.... उशीर होणार आहे...... पालकांना नाना विवंचना... त्यात आई-बाबा नोकरी करणारे त्यामुळे सेल म्हणजे मुले व पालक यांच्यातली लाईफ लाइन झालीये. जीवन इतके क्षणभंगूर झालेय....सेलवर सारखे ... पोचलास का? जेवलास का? खरे तर ही चाचपणी असते आपले माणूस जीवंत आहे ना? लोकल-बसची हाणामारी... अतिरेक्यांची टांगती तलवार यासाऱ्यातून आज तरी ते वाचलेय ना. बरं नुसतीच मुले नव्हेत तर पालकांच्या आई-बाबांचीही खबर सारखी ठेवणे अत्यावश्यक आहे. मग ते बरोबर राहत असू दे की परगावी-परदेशी.

आजी-आजोबा-बहुतांशी सर्वच सीनियर सिटिझन्स सेल ठेवतात. किंबहुना त्यातल्या बऱ्याच जणांना घरातले जबरदस्तीने देतात. आणि सतत जवळ बाळगा असा लकडा लावतात. त्यांचा वापरण्याकडे कल कमीच असतो. काही जणांची तो वाजला की घेण्यासाठीची नेहमीचीच तारांबळ असते. कुठेतरी ठेवला जातो--आणि विस्मरण होते किंवा कधी ऐकू कमी येत असते तर कधी ऍलर्जी असल्यासारखा सेल टाळला जातो. काही जणांचा तात्त्विक वाद अंमळ जास्तच अग्रेसिव्ह असतो....... आमच्या वेळी तर घरी फोनही नव्हता. मग काय आमचे निरोप पोचले नाहीत का कामे झाली नाहीत. नको ते चोचले आहेत झाले. फुकटचे बडेजाव दाखवायचे अन एवढे महागडे सेल घ्यायचे वर हरवायचे..... पैशाची तर काही किंमतच राहिली नाहीये. आश्चर्य म्हणजे जगभर कोठेही गेलात तरी सीनियर सिटीझन्सच्या या मतात तीळमात्रही फरक दिसत नाही. आमच्या कंपनीतल्या रिटायर व्हायला आलेल्या यच्चयावत बायका... पुरूष...... बार्ब, कॅथी, डेबी.... अग्नेस, जॉन..... किती तरी जण... ‌ सगळ्यांचे हेच मत होते. They use to hate cellphones.

जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती..... शिवाय वयोगट- ऑफिस-धंदापाणी-अत्यावश्यक सेवावाले आहेतच.... तरीही मला व्यक्तिशः सेल आवडतो
. हवाच या सदरात मोडतो. म्हणजे उपयुक्ततेपासून अगदी उगाचच निरर्थक गप्पां करिताही मला आवर्जून हवाहवासा वाटतो. एक तर इथे त्रिशंकूची अवस्था... पोर कुठे... आई-बाबा- सगळी आपली-प्रेमाची माणसे कुठे..... या सगळ्यांशी जोडणारा, प्रेम वाहून आणणारा व नेणारा..... जरासे खूट्ट वाजले तरीही ते तत्काळ कळवणारा. मी एकटी आहे ही जाणीवच न होऊ देणारा प्रामाणिक, सेवेस तत्पर सखा.

6 comments:

  1. 'सेल' हवाच या सदरात मोडतो. म्हणजे उपयुक्ततेपासून अगदी उगाचच निरर्थक गप्पां करिताही मला आवर्जून हवाहवासा वाटतो.

    बरेच दिवसांनी सेल फोन वर तात्विक लेखन वाचले ... :) भानस ताई माझी एक गंमत आहे. सेल फोन मुंबई मध्ये ५ विक्स सुरु आणि एकडे आलो की ५ विक्स पूर्ण बंद .. त्यामुळे adiction नाही आणि कंटाळा पण नाही ... :)

    बाकी ते प्ले स्टेशन, X-बॉक्स मज्जा असते. मी अजून सुद्धा वेळ मिळाला की गेम्स खेळतो...

    ReplyDelete
  2. रोहन,हे चांगले आहे. सुवर्णमध्य...:)
    आता पुढच्या सुटीला शौमित्र आला की मी त्याचे हे आरडाओरडा करून गेम्स खेळणे रेकॊर्ड करून ठेवणार आहे....:) आभार.

    ReplyDelete
  3. छान आहे लेख. माझा एक वर्षाचा मुलगा माझ्या सेलचे प्रोफ़ाईल वायब्रेटवर कसं सेट करतो मलाच कळत नाही. पण मग नंतर अर्थातच मला एकही फ़ोनची रिंग ऐकु येत नाही आणि त्याला फ़ुल्लटाईम आई मिळते...भारतात जर अमेरिकेसारखं डे टाईम मिनिट्सची भानगड आली की आपोआप कमी होतील लोकं जास्ती बोलायचे असं मला वाटतं. इन कमिंग फ़्रीचा जोरदार वापर आपल्याईथे दिसतो..

    ReplyDelete
  4. अगं इथेही वीकएडं आणि नाईटस प्रकार आहेच जोरदार.:) शेवटी सोयीस्कर वेळा शोधतोच आपण.
    तुझ्या बाळाची आयडीया मस्त आहे.:) आभार.

    ReplyDelete
  5. माझ्या सारखा माणुस तर सेल फोन फक्त कॅमेरा म्हणुनच वापरतो . इंटरनेट तर कधी तरी असेस करतो फोन वर. एकदा विचार केला होता, की इंटरनेट काढुन टाकावं फोन वरुन, पण एम एम एस ( इतकं विचित्र नजरेने बघु नका हो.. काही ऑफिशिअल फोटोग्राफ्स, फेल्ड मशिन्सचे रिसिव्ह कराय्चे असतात फिल्डमधल्या इंजिनिअर्स कडुन - हल्ली काय एम एम एस म्हंटलं की लगेच लोकांना वेगळंच वाटतं)

    पण हे पोस्ट एकदम मस्त जमलंय.पालकांसाठी कसला वरदान हो? विनाकारण खर्च वाढतो. आणी ट्रेन मधे पहातो नां, मुलं असतात दादरला आणि घरी सांगतात अंधेरिला कॉलेज मधे आहे म्हणुन.. काहीच फायदा नाही ... पण असायला हवाच.. कमित कमी त्यांना गरज वाटेल तेंव्हा त्यांना घरी कॉंटॅक्ट करण्यासाठी सेलफोन आवश्यक आहेच !

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !