जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, September 15, 2010

तो....

काठाशी निष्प्राण पडलेले दगड उचलून उचलून तो तळ्यात फेकत होता
एका मागून एक.... यंत्रवत,
हात - दगड - पाणी - डुबुक..... तडफड,
पाण्याचे ते तडफडणे निरखत होता...... पुन्हा पुन्हा.....

आजकाल बरेचदा तो इथे येतो, वेळी.... अवेळी,
तडफडणार्‍या पाण्यात प्रत्येकवेळी त्याला तोच दिसतो,
एकाकी.... घुसमटलेला

ऊन रणरणते तापलेय रे, जरासा सावलीत थांब की
रस्त्यावर अजूनही जीव बचावून उभे ते झाड, त्याला रोज अडवते
सावली देण्याचा त्याचा तो अट्टाहास, त्याचा जीव गुदमरून टाकते

मुसळधार पावसात भिजणारे ते गरीबाचे पोर
कोरड्या डोळ्यांनी लोकांच्या छत्र्या निरखत होते
त्याला इतके निर्विकार पाहून त्याचे डोळे का भरत होते....

आशेचा किरण ही नसलेल्या मार्गावर तो पुढे पुढे निघालाय खरा
शाश्वत सोडून पळत्याच्या मागे....
कशाची ही अगम्य ओढ? का नुसतीच फरफट?
उत्तर नाही....
तरीही, त्याचं नशीब त्याच्यामागे धापा टाकत येतच राहिले,
त्या बिचार्‍याला पर्यायच नाही.....

ही कुठली ’ भूक? ’
’ अन्न ’ हा केवळ एक शब्द आहे की, अन्न आहे आनंद
का कोण जाणे आजकाल वारंवार हा प्रश्न त्याच्या ’ भुकेला ’ तो विचारत असतो
ती फक्त हसते, तिचे ते हसणे त्याला उगीचच कुत्सित भासते....

जेव्हां उमजले त्याला की, ’ तो ’ आरसा ही आहे
स्वत:पासूनच चेहरा लपवत, स्वत:लाच चुकवत तो कुठेसा पळतो आहे
वेडाच नाहीतर काय....
काळ्या रंगाला अंधारापासून हिरावून घेता येईल का कधी...

कुठले भविष्य, कोण दिशेला...
पलीकडे मायबापाचा श्वास कोंडला
अस्वस्थ टाहो आभाळास भेदूनी गेला
मायेचा हुंदका मुक्यानेच जळून गेला

आता व्यर्थ आहे हिशेब सारा....
सांजवेळी फुटे प्राणांत गलबला
उरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह
अन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,

संपूर्ण रिता......

32 comments:

  1. आपल्या सगळयांच्याच वाटयाला असे क्षण येतात..

    ReplyDelete
  2. baapre... aga winter laamb aahe ajun. He kaay. :) Farach serious.

    ReplyDelete
  3. >>उरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह
    अन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,

    संपूर्ण रिता......

    भावना कसल्या जबरदस्त शब्दबद्ध केल्या आहेस गं ताई! मानलं!

    ReplyDelete
  4. हो गं सीमा. विंटरची फक्त नांदी झालीये. कधी कधी डोक्यातले रसायन ’घोटाला ’ मारते. :D

    धन्यू गं.

    ReplyDelete
  5. धन्यवाद विभी.

    अक्षरे जोडली की शब्द होतो त्यात प्राण फुंकला तरच तो अर्थपूर्ण होतो, अन्यथा नुसत्याच रेघोट्या.

    ReplyDelete
  6. इतकं सिरियस?
    काळ्या रंगाला अंधारापासून हिरावून घेता येईल का कधी...

    ReplyDelete
  7. बाप रे.. फारच भेदक !!

    ReplyDelete
  8. काय गं? काय झालं?

    ReplyDelete
  9. good expression.....kharech ajun winter yaychay ga...

    please ek pleasent kavita lihi na.....sagle kase chan ani utsahi ase

    ReplyDelete
  10. भानस, हृदयद्रावक आहे गं!

    ReplyDelete
  11. धन्यवाद महेंद्र.

    ReplyDelete
  12. काही नाही गं अनघे, असच...

    ReplyDelete
  13. माधुरी, यस्स्स... दुपारीच बोललोय आपण. आता काहीसे हलकेफुलके... :)

    ReplyDelete
  14. काय लिहु ...वेदना पोहोचत आहेत खोलवर...

    ReplyDelete
  15. >>अस्वस्थ टाहो आभाळास भेदूनी गेला
    मायेचा हुंदका मुक्यानेच जळून गेला

    अप्रतिम....खुप सुंदर...्मस्त

    श्री ताई अचानक एवढ सिरीयस का बर???

    ReplyDelete
  16. >>>>>>उरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह
    अन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,

    संपूर्ण रिता......

    भावना कसल्या जबरदस्त शब्दबद्ध केल्या आहेस गं ताई! मानलं!
    +१
    तायडे अगं ईतके गुढगंभीर का गं वातावरण??

    ReplyDelete
  17. विभिच्या कमेंटला दुजोरा.... मागं एकदा लिहिल्याप्रमाणं लेखातली तडफड चांगलीच जाणवून देखिल शब्दांमुळे आनंद देण्यार्‍या तुझ्या पोस्ट्स ग्रेट.... मानलं!

    ReplyDelete
  18. धन्यवाद श्रीराज.

    ReplyDelete
  19. देवेंद्र आभार.

    ReplyDelete
  20. योमू, अरे आता छान आहे. कधीकधी येतो असा झटका... :D

    ReplyDelete
  21. तन्वी, वर सीमा आणि माधुरीने म्हटलेय नं... थंडी... हा हा... कदाचित तिच्या चाहुलीचा परिणाम असेल हा. बाई बाई पुढचे २१० दिवस कसे सरणार... :(

    धन्यू गं.

    ReplyDelete
  22. आनंद, थांकू थांकू. तुझ्या शब्दांनी खूप आनंद झाला.

    ReplyDelete
  23. छानच जमली आहे !! अप्रतिम...

    ReplyDelete
  24. me kavitanchi farshi mothi Fan nahi pan tari tumchi kavita avadali!
    Gele mahinabhar javalpas dar-roz tumchya navya post chi vaat pahat aahe.darrozach nirash hote aahe,krupaya lavkar navin post takavi.

    pushpa

    ReplyDelete
  25. पुष्पा, ब्लॊगवर स्वागत आहे. मुक्तक आवडले हे वाचून व ते आवर्जून कळवलेत, खूप आनंद वाटला. अनेक धन्यवाद.

    गेल्या महिन्याभरात नवीन काही लिहीले नाही कारण मी मायदेशी आलेय व भटकंती सुरू आहे. सध्या नाशिकला आईकडे आहे. मनात बरेच काही साचलेयं, लिहायचेही आहे. थोडीशी सवड व विजदेवीची कृपा झाली ( :D ) की लगेच लिहीन.

    पुन्हा एकदा धन्यवाद.

    ReplyDelete
  26. भाग्यश्री तुला मिस् करणार्यांच्या लिस्टमध्ये मीसुद्धा आहे हां

    ReplyDelete
  27. धन्यू रे! :)
    आनंदाची बातमी वाचून खूप छान वाटले. कॊलतेच तुला उद्या. मस्त गप्पा मारू.

    पुन्हा एकदा... थांकू थांकू.

    ReplyDelete
  28. :-S गंभीर आहे. पण नक्की का ते नाही समजलं. :-S

    ReplyDelete
  29. सौरभ, काही कुटुंबाला डावलून अतिरेकी महत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन फक्त पुढे पुढे जाणारे चेहरे दिसतात ना... त्यातल्याच एकाचे मनोगत म्हण... :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !