जाता जाता एक नजर इथेही........

Friday, February 26, 2010

अशी आमुची माय मराठी......

( वरील पुस्तकांची मुखपृष्ठे श्री. प्रकाश ढवळे व संकलन श्री. नचिकेत यांच्या सौजन्याने )

संत वाड्मय हा मराठी साहित्याचा प्राण आहे. ज्ञानेश्वरांनी जिच्या द्वारे अमृताशी पैजा जिंकायची भाषा केली अश्या आपल्या मराठीतले संत साहित्य लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत नेहमीच वाचले जाते. मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १० व्या आणि ११ व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३ व्या शतकातली आहे. १९ व्या शतकापासून हिंदी, उर्दू आणि इंग्रजीशी देवाणघेवाण वाढल्यामुळे मराठी भाषाही बदलत गेली.

संस्कृत-प्राकृत- मराठी हा तिचा प्रवासही मोठा लक्षणीय आहे. आपल्याला लाभलेली ही वैभवशाली मराठी भाषा प्राचीन आहे. मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली; पण तिला तीर्थाचे स्वरूप ज्ञानेश्वरांनी आणले. "माझा मराठाचि बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन'' या शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी मायमाउली मराठी भाषेची अशी थोरवी गायली आहे. मातृभाषेतून आपले विचार रोखठोकपणे व विलक्षण तळमळीने व्यक्त करून तुकाराम महाराजांनी अभंगरचना केली; जी इंद्रायणीत बुडूनही अमर राहिली. समर्थरामदासांचे `मनाचे श्लोक' आणि `दासबोध' या ग्रंथांनी भक्तिमार्गाबरोबरच संसाराची शिकवण दिली. असे प्राचीन संत, वाड्मय आपल्या मराठी भाषेचे अनमोल लेणं आहे.

पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने ’ विवेक सिंधुया ’ काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे. सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे.श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. या शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. पहिले साहित्य संमेलन इ.स.१८७८ साली पुण्याला झाले व माननीय न्यायमूर्ती रानडे त्याचे अधक्ष होते. त्यानंतर १९२१ पर्यंत साधारणपणे दर पाच वर्षातून एकदा होत होते. १९२६ ते १९५० सालामध्ये १९३७, १९४५,१९४८ हे अपवाद वगळता वर्षातून एकदा झालेच. इचलकरंजी येथे १९७४ साली भरलेल्या ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी संमेलनाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. होते.

पहिल्या विश्व मराठी संमेलनात जागतिक मराठी भाषा दिनाची संकल्पना आकारास आली . ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांना मानवंदना देण्यासाठी २७ फेब्रुवारीला या कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला जागतिक मराठी भाषा दिनाचे कोंदण लाभले.
जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !!!

( माहिती जालावरून )

18 comments:

  1. छानच माहिती.

    जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  2. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  3. चांगली माहिती आहे...

    तुम्हाला मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  4. जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  5. मस्तच माहिती आहे, खुप काही नविन कळालं..

    मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

    - विशल्या!

    ReplyDelete
  6. सुरेख माहिती...

    जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  7. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  8. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले.
    ---

    The first Sahitya Sammelan was held in 1878 in Pune; Justice Ranade presided over it. Since then it was held intemittently, about once every years, up to 1921. From 1926, it has been held almost every year. In 1926-1950 span, it was not held only in 1937, 1945, 1948. Its 50th edition was held in Ichalkaranji in 1974.

    - Naniwadekar

    ReplyDelete
  9. हेरंब, मनमौजी, davbindu, आनंद, विशाल, माऊ, suhasonline व नानिवडेकर,मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

    नानिवडेकर, माहिती दिल्याबद्दल आभार. त्याप्रमाणे बदल केले आहेत.

    ReplyDelete
  10. > त्यानंतर १९२१ पर्यंत दरवर्षी होत होते.
    >

    भाग्यश्री : १९२१ पर्यंत साहित्य संमेलन अधूनमधून (४-५ वर्षांतून एकदा कधीतरी) होत असे. मी about once every five years लिहिणार होतो, पण तो '५' आकडा टाकायचा राहिला.

    एखादी मूळ लेखात आलेली चूक दाखवली तर तू ती सुधारतेस ही आनन्दाची गोष्ट आहे. कारण अशा चुका तशाच राहू दिल्या तर त्या तशाच स्वरूपात अनेक ठिकाणी अवतरतात. विशेषत: छन्दशास्त्राचं ज्ञान नसलेले लोक छन्दहानी करणार्‍या कवितेतल्या चुका दुरुस्ती सुचवल्यावरही तशाच राहू देतात तेव्हा ते मला बघवत नाही.

    ReplyDelete
  11. भाग्यश्री
    माझ्या आजोबांनी (के. भि. ढवळे) प्रकाशित केलेली पुस्तके, प्रकाशने काढलेले त्यांचे सुरेख फोटो आणि नचिकेतने केलेले कोलाज सुंदर जमले आहे. हे पुस्तकांचे देखणे रूप पाहून आजोबांची आठवण झाली. नचिकेतचे पणजोबा आणि तुझे पणजेसासरे. सुमारे पन्नास वर्षे मराठी माणसाला धार्मिक पुस्तकांनी आणि बालगोपालांना गोष्टीच्या पुस्तकांनी त्यांनी आपलेसे केले होते. मोहवून टाकले होते. आजही अगोदरच्या पिढीतील माणसे त्यांच्याबद्दल आदराने बोलताना पाहिली की मन भरून येते. तुझ्या ब्लॉगमधील त्यांचा समावेश मनाला आनंदवून गेला.
    आई

    ReplyDelete
  12. आई, काल मनात ही कल्पना यायला, प्रकाशमामा ऑनलाईन सापडायला व लगोलग नचिकेतनेही कोलाज बनवून दिल्याने हे साधले. माझ्या पणजेसास~यांची ( के.भि.ढवळे. ) यांची सारीच पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रात व जगभरातील मराठी माणसाच्या मनात एक आगळेच स्थान ठेवून आहेत. माझ्या ब्लॉगवर हे कोलाज टाकताना मलाही अतिशय आनंद झाला.

    ReplyDelete
  13. धनंजय, सकाळी तुझी टिपणी पाहिली पटकन सुधारणा करून टाकले. बाहेर जायचे असल्याने पुन्हा जालावर जाऊन साहित्य संमेलनाचा इतिहास शोधला नाही. सहसा तुझी अशी माहिती देण्यात चूक होणार नाही, अशी खात्री असल्याने तुझ्यावर विसंबून राहिले...:). पण मनात कुठेतरी जर ५० वे संमेलन १९७४ साली भरले असेल तर काहितरी गडबड होतेय एवढे लक्षात आले होते. बरे झाले तू कळवलेस ते. सुधारणा केली आहे. आता १९८१ पर्यंतची यादीच तयार केली आहे. अध्यक्ष-स्थळासकट. विश्वसंमेलनही आहेच. मधली वर्षेही शोधून काढते.:)
    पुन्हा एकदा धन्यवाद.

    ReplyDelete
  14. कुसुमाग्रजांबद्‌दल थोडी माहिती :
    कुसुमाग्रज (१९१२-१९९९) दत्तक गेले होते, आणि त्यामुळे त्यांना नवीन नांव मिळालं. कुसुमाग्रजांनी गजानन रंगनाथ शिरवाडकर (या ‘मूळ’) नावानी, किंवा ते नांव असताना पण कुसुमाग्रज या मुद्रेखाली, कविताही लिहिली होती. त्यावरून दत्तकविधान बर्‍याच उशीरा (१९३५ कडे) झालं असावं, आणि त्यांनी ज़ाणीवपूर्वक ‘विष्णु (वामन)’ नांवाचा स्वीकार केला असावा. तेव्हा 'वि वा शिरवाडकर' खेरीज़ ग रं शिरवाडकर असाही त्यांचा उल्लेख काही ज़ुन्या पुस्तकांत दिसतो.

    मराठीतले पहिले दोन्ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जन्मनांवानी गणेश/गजानन. दोघेही दत्तक गेले. दोघेही ‘विष्णु’ नावानी प्रसिद्‌ध झाले. खांडेकरांना पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना विचारलं की तुमच्या भाषेतला पुढला पुरस्कार विजेता कोण असावा? ते लगेच म्हणाले: ‘अर्थातच कुसुमाग्रज’. १९७७-७८ कडे दुर्गाबाईंना पुरस्काराबद्‌दल विचारणा झाली. पण त्यांनी सरकारकडून पुरस्कार स्वीकारायचा नाही हा आपला निर्णय बदलला नाही. याबद्‌दल ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’ पुस्तकात माहिती आहे. नंतर कुसुमाग्रजांना पुरस्कार मिळाला, आणि खांडेकरांचे बोल खरे ठरले.

    ReplyDelete
  15. तुझे आजच्या लेखाचे आकर्षक चित्र (फोटो) बघून छान वाटले..

    ReplyDelete
  16. धनंजय, कुसुमाग्रजांबद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद.

    ReplyDelete
  17. मधुमती, यस्स्स्स.... मला माहित होते तुला नक्की आवडेल.:)

    ReplyDelete
  18. माझ्या मते 'छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठी भाषेस पुन्हा एकदा राजाश्रय मिळवून दिला.'

    त्याआधी सर्व जुने महाराष्ट्रिक राजघराणे मराठीच वापरायचे. शिवाय हल्लीच इसविसन पूर्वीचे मराठी शिलालेख हड़प्पा भागात सपद्ल्याची एक बातमी वाचल्याचे स्मरते.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !