जाता जाता एक नजर इथेही........

Monday, July 13, 2009

त्यांचे बरोबरच होते....


प्रवास मग तो कुठल्याही वाहनाने करायची आम्हा सगळ्यांची तयारी असते. त्यातल्या त्यात सगळ्यात त्रासदायक व कंटाळवाणा म्हणजे विमानप्रवास व आनंददायी म्हणजे ट्रेनचा प्रवास. मायदेशात आल्यावर जितके शक्य असेल तितके आम्ही ट्रेनने प्रवास करतोच. दोन वर्षांपूर्वी मी व लेक असेच मुंबई-पुणे-मुंबई प्रवास करायला निघालो. नाशिक किंवा पुणा प्रवासासाठी शक्यतो आपला सेकंडचा डब्बाच मस्त वाटतो. अनेकविध गोष्टी आजूबाजूला घडत असतात. शिवाय दरवाज्यात जाऊन उभे राहता येते. उघड्या खिडक्यांमधून मस्त वारा येत असतो. आमचे येणे पावसाळ्यातच होते त्यामुळे घाटातले आल्हाददायक वातावरण, पावसाचा मधूनच शिडकावा-क्वचित सपकारे.

मुंबईहून सुटल्यापासून नॉनस्टॉप चाय... चाय.... कॉफी, टोमॅटो सूप- या सगळ्या गाड्यांमधले टोमॅटो सूप खास वेगळेच असते. पुन्हा चव तीच. अनेक प्रकारचे नाश्ता... काही मिळत नाही असे नाहीच. चिक्की, चॉकलेट्स , काही वेळा तर फिरणी व गुलाबजामही पाहिलेत. मुख्य म्हणजे एकदम प्यारा ' बटाटेवडा '. मग तो गाडीतला असू दे, कर्जतचा असू दे... केवळ अप्रतिम. आठवणीनेही तोंडाला पाणी सुटले. त्याच्याबरोबर जराशी तळलेली / कच्ची हिरवी मिरची, लसणाची लाल कोरडी चटणी. आता कधी बरे मिळणार हे खायला...... , वातावरणनिर्मिती फार महत्त्वाची आहे हो. नुसताच वडापाव तर काय घरातही आपण बनवतोच. पण एकीकडे पाऊस, गाडीतला कोलाहल, विकणाऱ्यांचे निरनिराळे भसाडे, टीपेला पोचलेले आवाज, सहप्रवाशांची आणि आपलीही गडबड, मध्येच लहान मुलांची पळापळ, रडणे, हट्ट-रूसवेफुगवे..... त्याची लज्जत काही औरच असते ना.

गाडी ठाण्याहून निघाली. मी व लेकाने समोरासमोरच्या खिडक्यांचे आरक्षण दोन महीने आधीपासून करून ठेवले होते. गाडीत प्रचंड गर्दी होतीच. दोनदोन व तीनतीन अशा सीटसपैकी दोनदोन च्या खिडक्यांत आम्ही दोघे होतो. अगदी गाडी सुटता सुटता एक बाई दोन लहान मुलांना घेऊन चढली. एक वय वर्षे सात दुसरे चार. आमच्याच इथे परंतु तीनतीन मध्ये तीच्या सीटस होत्या. धावतपळतच गाडी तिने पकडली होती. त्यामुळे तिला चांगलीच धाप लागलेली. शिवाय दोन्ही लहान पोरे व सामान होते. पोरे आली तीच डायरेक्ट खिडकीत गेली. साहजिकच आहे. बॅग्ज वर ठेवायला गेली तर जागा आधीच इतरांच्या बॅग्जने भरली होती. मग ही माझी जागा आहे तर मग कोणी बॅग्ज ठेवल्या, काढा इथून.... वगैरे बडबड सुरू झाली. कोणीही फारसे लक्ष दिले नाही शेवटी एक आमच्या डोक्यावर, एक पायाशी करत बॅगा सुस्थळी पडल्या.

तिच्या तीन सीटस मध्ये एकही खिडकी नव्हती. एकाबाजूची कॉर्नर तर समोरची कॉर्नर व मधली अश्या सीटस होत्या. मुलांना खिडक्या हव्या होत्या. नुकतेच आल्याने मुले आधी खूप एक्साईटेड होती. वीस-पंचवीस मिनिटे खिडकीत उभे राहिली. पण मग त्यांचेही पाय दुखले असावेत. दोन्ही खिडक्यांत साधारण पन्नासच्या आसपासचे दोघे बसले होते. त्यांना या मुलांच्या सारख्या चाललेल्या चुळबुळीने , एकमेकांशी थोडीफार भांडणे, मध्येच आईकडे वळून बोलणे-तिच्याकडे जाणे ( सगळ्यांचे पाय तुडवीत ) परत खिडकीत येणे या सगळ्यांची कटकट होऊ लागली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसू लागली.

मुले उभे राहून दमली तशी त्यांनी भुणभूण थोडीशी रडारड सुरू केली, मला खिडकी पाहिजे... मला खिडकीत बसायचे. प्रथम ही मागणी हळू आवाजात व मधूनच होत होती. दहा-पंधरा मिनिटात अगदी टीपेला पोचली. खिडकीत बसलेले दोघेही जाम वैतागले होते. त्यांनी दुर्लक्ष करण्याचा मार्ग अवलंबला होता. पोरे काही भेकायची थांबेनात. आईही फार काही समजूत काढत नव्हतीच. पण शेवटी तिला दखल घेणे भागच असल्याने तिने खिडकीतल्या दोघांनाही म्हटले, " दोनो बच्चे रो रहे ना, उनको बैठने दो जरा खिडकीमे. आप लोग तो बडे हो ना. ' त्या दोघांनीही एकदा तिच्याकडे पाहिले आणि सरळ खिडकीतून बाहेर पाहायला सुरवात केली. पोरे हा संवाद ऐकत होतीच. त्यांना वाटले आता आपल्याला बसायला मिळणार परंतु तसे न झाल्याने त्यांनी एकदम मोठा गळा काढला.

आसपासची सगळी माणसे या दोघा खिडकीत बसलेल्यांकडे पाहत होती. कदाचित मनात म्हणतही असतील, कमाल आहे, एवढे मोठे झाले तरी खिडकीचा मोह सुटत नाही. ती लहान पोरे इतकी रडताहेत जरा द्यावे की बसायला. थोडक्यात बऱ्याच जणांना ती दोघे भावनाशून्य, माणुसकीच नाही, वगैरे वगैरे प्रकारातली वाटत होती. (स्वत:वर वेळ येत नाही तोवर दुसऱ्याला बोलणे सोपे असतेच.) त्यांनी केलेले दुर्लक्ष आईला फारच डाचले शिवाय पोरांच्या गळा काढण्यानेही ती भयंकर वैतागली. तिने डायरेक्ट त्यातल्या एकाला म्हटले, " क्या रे कबसे बच्चे रो रहे, तुमको दिखता नही क्या? अभी इत्ते बडे होके भी तुमको खिडकी माँगती है, तो मेरे बच्चे तो छोटेछोटे हैं ना. थोडा खिसको औरे उनको जगा दे दो. " हे सगळे अरेरावीने. जणू हिची मुले ही त्यांची जबाबदारी असल्यासारखी.

तरीही ती दोघेही संयम राखून होती. त्यातल्या एकाने अतिशय शांतपणे तिला सांगितले, " आम्हालाही दिसतेय तुझी मुले रडता आहेत, परंतु त्यांना खिडकी हवीशी वाटणारच हे माहीत असूनही ती मिळण्याची खबरदारी तू घेतली नाहीस. पावसाचा आनंद लुटण्यासाठी आम्ही महिनाभर आधी तिकिटे बुक करून ठेवलीत. मुले सारखी आमच्या पायावर पाय देत आहेत, पण तू एकदाही त्यांना तसे करू नका असे सांगितले नाहीस. उलट आल्यापासून त्यांना सोडूनच दिले आहेस. तेव्हा कृपया त्यांना आवर घाल व जागेवर बसव. " हे ऐकले मात्र तिने जो काही तोंडाचा पट्टा सुरू केला...... त्या दोघांना पूर्ण व्हिलनच ठरवून टाकले.

मला फारच वाईट वाटले व रागही आला. माणूस वयाने कितीही मोठा झाला तरी खिडकीत बसण्याचे सुख प्रत्येकाला हवेच असते ना? बरे त्यांनी हे सुख मिळावे म्हणून आधीपासून त्याची तजवीज करून ठेवली होती. आता या प्रकाराने त्यांचा आनंद काही काळतरी हिरावून घेतला गेलाच शिवाय निष्कारण या बाईकडून हे सगळे ऐकून घ्यावे लागले. रीक्वेस्ट करणे तर दूरच राहिले ही तर अरेरावीच करत होती. मनात कुठेतरी त्यांनाही मुलांना खिडकीत बसायला मिळावे असे वाटतही असेल परंतु कधीही प्रवास केला तरी पुन्हा याचीच पुनरावृत्ती होणारच , म्हणजे खिडकीत कधीच बसायचे नाही का? शिवाय आपल्या मुलांची काळजी आपण करायची नाहीच वर लोकांनी मात्र ती केलीच पाहिजे अशी धारणा. ही कसली जबरदस्ती?

अगदी असे गृहीत धरूयात की आयत्यावेळी ठरल्याने विंडोसीटस मिळाल्या नसतील. पण मुलांना समजावण्याचा प्रयत्न तर करू शकत होतीच. थोड्या वेळाने आपण त्यांना विचारू तुम्हाला दहा मिनिटे बसू द्याल का...... किंवा चक्क त्यांचे लक्ष दुसरीकडेही वळवायचा प्रयत्न करता आला असता. यातले काहीच न करता खिडकीतल्या दोघांवरही ती डाफरत होती. केवळ बाई म्हणून ते दोघेही शांत-सौजन्याने बोलत होते. तर हिचा आवाज अजूनच चढत होता. संपूर्ण प्रवासभर पोरांचे रडणे, हिचे त्यांच्यावर ओरडणे मध्ये मध्ये या दोघांना टोमणे मारणे चालू होते. आजूबाजूच्या सगळ्यांच्या आनंदाची, मजेची हिने वाट लावून टाकली.

सुदैवाने तिचा रोख आम्हा दोघांकडे वळला नाही. माझ्या लेकाने तर आधीच सांगून टाकले होते, आपण चार वर्षांनी हा आपला आवडता प्रवास करतोय. त्यासाठी तू विमानाचे तिकीट बुक करतानाच हे ट्रेनचे तिकीट बुक केले आहेस तेव्हा मी मुळीच ऍडजस्ट्मेंट करणार नाही आणि तूही तुझी खिडकी द्यायची नाहीस. आधी मी थोडावेळ त्यांना बोलावून जागा देणारही होतो पण आता हिची ही अरेरावी ऐकून तर अजिबातच नाही. मी यावर मौन राहिले एकीकडे मला सारखे वाटत होते त्या छोट्यांचा काय दोष, त्यांना बोलावून खिडकीत बसू द्यावे. मात्र एकीकडे असेही वाटत राहीले अशानेच लोकांना गृहीत धरण्याच्या प्रक्रियेस चालना मिळते. मनातून त्या दोघांचे काही चुकलेय असे मात्र मुळीच वाटले नाही.

5 comments:

  1. agadi kharay!!
    ase anubav khoop vela yetat.
    tujha anubhav chhan shabdbaddha kela aahe. :)

    ReplyDelete
  2. "सगळ्यात त्रासदायक व कंटाळवाणा म्हणजे विमानप्रवास व आनंददायी म्हणजे ट्रेनचा प्रवास..." अगदी बरोबर बोललात... :D

    "चिक्की, चॉकलेट्स , काही वेळा तर फिरणी व गुलाबजामही पाहिलेत. मुख्य म्हणजे एकदम प्यारा ' बटाटेवडा '. "

    वा.. वा.. पण हल्ली(३-४ वर्षे) 'दिवाडकर'च्या वड्याला मज्जा नाही राहिली ... त्यापेक्षा कर्जत स्टेशनच्या बाहेर मस्त वड़ा मिळतो. किंवा कर्जत - खंडाळ्याच्या मध्ये एक चहा आणि वड़ा - ईडली वाला चढतो. तोपण मस्त असतो ... :)

    बाकी खिड़कीच म्हणाल तर ... मी सुद्धा असे दंगे लहानपणी केले आहेत आणि खिडक्या सुद्धा दिल्या आहेत काही वेळेला. शेवटी तुम्ही म्हणालात ते खरे ... "खिडकीत बसण्याचे सुख प्रत्येकाला हवेच असते ना? बरे त्यांनी हे सुख मिळावे म्हणून आधीपासून त्याची तजवीज करून ठेवली होती. आता या प्रकाराने त्यांचा आनंद काही काळतरी हिरावून घेतला गेलाच ..."

    ReplyDelete
  3. प्राजु, आभार. खुप दिवसात दिसली नाहीस? हॊलंडच्या ट्रिपनंतर गायबच आहेस.:)

    रोहन, आभार. मी सुद्धा असे दंगे लहानपणी केलेत...हेहे..:D, मीसुध्दा दंगे नाही पण भूणभूण नक्कीच केली असेल. मग आईने एक फटकाही दिला असेल,:D. ओह्ह... वड्याला मज्जा नाही राहिली...:(.

    ReplyDelete
  4. भानस,
    मला वाटतं परदेशांत राह्यल्यामुळे तु भारताला फार म्हणजे फारच मिस करतेयस असंच तुझी ही पोस्ट वाचून वाटतंय...तुमच्या सारख्या वर्षा-२ वर्षानी येणार्यांसाठी हा मुद्दाम अगदी "खास मज्जा येते" या कल्पनेमुळे केलेला सेकंड क्लासचा प्रवास अगदी फार छान वगैरे वाटत असेल तर मला वाटतं तु आणखी खुप नाही पण निदान काही दिवस तरी ही "गाडीतला कोलाहल, विकणाऱ्यांचे निरनिराळे भसाडे, टीपेला पोचलेले आवाज, सहप्रवाशांची आणि आपलीही गडबड, मध्येच लहान मुलांची पळापळ, रडणे, हट्ट-रूसवेफुगवे..... ही लज्जत " अगदी मनमुराद अनुभवावीस आणि पुर्ण समाधानानेच परत त्या बिचार्या परदेशांत जावेस कि जिथे लोकं अगदी वेड्यासारखी उगीचच शिस्तीने गाडयांमध्ये चढ उतार करतात्...कुठे गाड्यांमध्ये छानपैकी भांडाभांडी रंगत नाही,पोरं केकटंत नाहीत्,सहप्रवासी आपल्या मोबाईलवरून सर्वांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात बोलत नाहीत किंवा सिनेमाची गाणी तरी ऐकवत नाहीत,मस्त गरमा-गरम बटाटे वडे खाऊन कागद बोळा करुन फेकत नाहीत्....किती ग खरंच तुम्ही दुर्दैवी...हे तुम्हाला तुमच्या हक्काचं सुख मिळु नये....देव करो आणि तुमच्या त्या देशांतल्या लोकांनाही ही अक्कल येवो!

    ReplyDelete
  5. nimisha, मायदेशाला मी खूप मिस करते हे नक्कीच आहे. बाकी प्रत्येक गोष्टीकडे पाहू तसे फायदे व तोटे असतातच.:) आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !