जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, July 5, 2009

एक विलक्षण अनुभूती....

डोळे निववणारी निळाई
सीगल
रंगीबेरंगी याट्स
समोर दिसतेय ते कॆनडा
दिपस्तंभ व कॆनडाला नेणारा ब्रीज
अथांग निळाई

दोन लोदे
रिव्हर क्रूज


काल ४ जुलै, अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. त्यामुळे लाँग वीकएंड आलेला. असे तीन दिवस जोडून सुटी व समर म्हणजे सोने पे सुहागा. फिरायची आवड दोघांनाही असल्याने कुठेतरी जावे असे आम्ही दोघेही घोकत होतो. परंतु काही ना काहीतरी खुसपट निघत गेली आणि आमचा तीन दिवसांचा मोठा प्लॅन आखण्याचा बेत फिसकटला. शेवटी अगदी काहीच नाही तर मॅकिनॉव आयलंडला जावे असे ठरविले. माझे आई-बाबा आलेले असताना आम्ही सगळे चार दिवस मॅकिनॉवला जाऊन आल्यामुळे राहण्याचा विचार नव्हताच. शिवाय आता लास्ट मिनिटला हॉटेलचे रेटस गगनाला भिडले होतेच. एका दिवसासाठी $२५० किंवा त्यापेक्षा जास्तच. तेव्हा उगाच वायफळ पैसे खर्च करण्यापेक्षा पहाटे निघून रात्री बारापर्यंत परतावे असे ठरविले.

लवकर उठायचे म्हणजे....
तरीही चारचा गजर लावला. मी उठलेही. पण....... भल्या पहाटे उठून चहा करता करता मनाने कच खाल्ली. एकदा जाऊन तर आलोय, शिवाय इथे पाहुणे येतील तेव्हा त्यांना घेऊन जाणे होईलच. मग आज जावे का? आता हा विचार काल डोकावला असता तर सुखनैव झोपले तरी असते. जाऊ दे झालं. तोवर चहाही झाला. चहा म्हणजे माझा वीक पाँईट आहे. अर्ध्या रात्री उठवून विचारले कोणी, चहा घेणार का? उत्तर होच मिळेल. बरं चहा घेतला तर झोप लागत नाही वगैरे प्रकार नसल्याने कधीही अर्धा कप चहा चालतो..... नाही धावतो . अगदी आमच्या बाबांसारखा. पॅटिओवर बसून साडेचार वाजता चहा घेण्याचे सुख अनुभवले. किंचित गारवा.... दव पडल्याने ओलसर खुशाळलेले गवत आणि कोवळी किंबहुना त्याही आधीची लालसर किरणे. झाडांचे शेंडे उमलायला लागलेले... पक्षांचे हलके हलके सुरू असलेले कूजन...... अगदी भारलेले व जीवन रसाने ओतप्रोत भरलेले आल्हाददायक वातावरण होते. मन प्रसन्न झाले. चला या निमित्ताने या सुंदर पहाटेची अनुभूती मिळाली.

मनाची कशी गंमत असते नाही. लागलीच काय गमावले काय मिळवलेचा हिशेब सुरू होतो. बरं ही विचारप्रक्रिया इतकी भिनलेली आहे ना की तिला थांबवताही येत नाही. त्यामुळे आजकाल त्या भानगडीतही मी पडत नाही. आता मनाने कच खाल्ली होतीच मग नचिकेतला उठवलेच नाही. मात्र मॅकिनॉव नाही तरी कुठल्यातरी जवळपासच्या बीचवर तरी जायचेच असा चंग बांधून गुगलबाबाला हाताशी धरले. आणि म्हणतात ना चाह है तो राह है....
, एक सुंदर ठिकाण दिसले. सगळ्यात जमेची बाजू म्हणजे फक्त एक तास वीस मिनिटांवर होते. तोवर पुन्हा एक चहाचा राउंड झाला..... सहा वाजले. आता पुन्हा एक डुलकी काढावी असा विचार केला.... अन काय डायरेक्ट नऊच. ते सुद्धा मैत्रिणीचा फोन आला म्हणून नाहीतर........

शेवटी ब्रंच करून आम्ही एकच्या आसपास निघालो. फार कडक ऊन नव्हतेच पण साचून राहिलेले मळभही नव्हते. ढग सूर्याशी पकडापकडी खेळत होते. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश होता परंतु भाजणारी आग नव्हती. आम्ही ज्या बीचवर निघालो होतो त्याचे नाव, पोर्ट ह्युरॉन बीच. उत्तर-पूर्वेला अगदी कॅनडाच्या एक्झीटनंतर दहा मिनिटांतच हा बीच येतो. म्हटले तर अगदी फ्रीवे ९४ वरच आहे तरीही शांत.... कमी गर्दीचा. साधारण दोन तासाच्या( ड्रायव्हिंग डिस्टन्स ) परिघातले लोक इथे येत असावेत. नावाजलेला नसल्याने फारशी हॉटेल्सही आजूबाजूला दिसली नाहीत. एकुलते एक हॉलिडे इन कॅनडा एक्झीटनंतर लागते. व नेहमीची यशस्वी मॅक, टाको व सबवे...
.

बीचचे पार्किंग बरेच पुढे आहे. परंतु बहुतांशी सगळे जण जवळपासच्या गल्ल्यांमध्येच गाड्या लावतात. आम्हीही त्यांचेच अनुकरण केले. गाडी लावत असतानाच अथांग पसरलेला निळा रंग डोळे निववत होता. दुपारचे अडीच वाजलेले, सूर्य अगदी डोक्यावर तळपत असूनही अजिबात जाणवत नव्हते. वाळूचा थोडासा ओलसर मऊ स्पर्श तळव्यांना सुखावत होता. बीचवर चहलपहल होती. बरीच चिल्लीपिल्ली छोट्या छोट्या बादल्या... तस्तम आयुधे घेऊन किल्ले करण्यात, चपटे रंगीबेरंगी दगड गोळा करण्यात दंग होती. मधूनच पाण्यात जाऊन लोळत होती.

थोड्या अंतरावर टीन एजर्सचा एक मोठा ग्रुप होता. त्यांची मस्त धमाल सुरू होती. एकमेकाला उचलून तर कधी एकाने हात व दुसऱ्याने पाय धरून झोका देत देत पाण्यात फेकत होते. बॉल खेळत होते. पण सगळे काही सेफ उगाच वेडेप्रकार नव्हते. एक मेक्सिकन गब्बू पोर बहिणीबरोबर पाण्यात हुंदडत होते. बहीण लहान असूनही मस्त पोहत होती, अन हे साहेब अगदी जपून जपून पावले टाकून अगदी काठावर डुबडूब करत की लागलीच आईकडे येऊन वेफर्सचे बकाणे भरत. थोड्याचवेळात त्याला अगदी त्याचाच डूप्लीकेट दोस्त मिळाला. फक्त रंगाचा काय तो फरक. मग काय दोन लोदे शरीराला कमीतकमी कष्ट देत निळ्याशार पाण्यात निवांत लोळत होते.

बरेच जण डोळ्यावर पट्ट्या ठेवून टॅन होण्यासाठी पहुडले होते. चालत चालत थोडे पुढे गेल्यावर लाइट हॉउसशी पोचलो. वर जायचे होते परंतु गेट लॉक करून ठेवल्याने नाईलाज झाला. बीचवरून समोर पाहिले की कॅनडा दिसते. बीचवरून चालत राहिलो तरी कॅनडात जाऊ. अर्थात मध्ये कोठेतरी बॉर्डर केली असेलच. रिव्हर साइड बोटींगही सुरू होते. शिवाय स्वतःच्या खाजगी याटस तर अगणित दिसत होत्या. लाटांवर आरूढ होत रंगीबेरंगी शिडे दिमाखात हेलकावत होती. मध्येच अचानक सूर मारत लाटांना भेदून अचूक मासे टिपणारे सीगल्स.... ... अतिशय स्वच्छ नितळ- निर्मळ गोडे पाणी. पाण्यात पाय बुडवले... जरासे थंड वाटले, शहारा आला...... ̮लगेच दोनच मिनिटात उबदार झाले. किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटा पावलांशी लडीवाळपणे खेळत फुटत होत्या. अथांग पसरलेल्या निळ्या छटांची डोळ्यांचे पारणे फेडणारी आभाळ व पाण्याची एकमेकांशी चाललेली जुगलबंदी. तासनतास हे दृश्य डोळ्यात साठवले तरीही मन भरणारच नव्हतेच ..... शेवटी लवकर परत येऊच असे म्हणत आम्ही निघालो.

5 comments:

  1. आज पोस्ट बरीच उशिरा आली. नाइट करून झोपायच्या आधी येते की नाही तेच बघत होतो. :) आलीच शेवटी. फोटोमुळे वेळ गेला असेल जास्त...

    वर्णन छान आहे ...मी सुद्धा इकडे यायच्या आधी ३-४ दिवस दिवेआगर आणि हरिहरेश्वरला गेलो होतो. विक डे असल्याने अजिबात कोणी नव्हते. मस्त एकदम ... :)

    समुद्र आणि माझ खुप जवळचे नाते असावे. गावाला सुद्धा तासन-तास बसून मी समुद्रावर फिरलो आहे.

    ReplyDelete
  2. भानस,तु खुप छान लिहीलंयस.....पहाटेच्या वेळेची विलक्षण अनुभूती आणि मनाच्या एका कोपर्यात चाललेले 'काय मिळवलं...काय गमावलं',हे जमाखर्च....अगदी खरयं....मनाचे खेळ असेच निरंतर सुरु असतात आणि त्यातुनच आपण छोटे छोटे आनंदाचे क्षण वेचत राहतो.तु त्या समुद्रकिनार्याचं वर्णनही मस्त केलंयस्...तुझी ही पोस्ट मला खुप आवडली.

    ReplyDelete
  3. रोहन, सकाळीच अचानक पाहुणे आल्याने थोडा वेळ गेला.... त्यामुळे पोस्ट थोडी उशिरा...
    अरे आंबोलीचे धबधबे कसले कोसळत आहेत, पाहिलेस ना? I wish...आत्ता जाता आले असते.
    दिवेआगर व हरिहरेश्वर सुंदरच आहे.:)

    nimisha, मन:पूर्वक आभार.:)

    ReplyDelete
  4. सगळी कडे धबधबे कोसळत आहेत आणि मी इकडे काम करत बसलोय ... :( मुंबईला गेलो तरी लडाखला जायचे आहे त्यामुळे आता मुहूर्त गणपति झाले की त्यानंतर... :) जाणार नक्की ... चांगले ७-८ दिवस आहेत हातात... :D

    ReplyDelete
  5. या पोस्ट वरची कॉमेंट टाकायची होती बरेच दिवसांपासुन. समुद्र किनारा हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय. कितिही वेळ मी समुद्रावर काहिही न करता घालवु शकतो. मला आठवतं मी एक अख्खं पुस्तक टोपाझ नावाचं वाचुन संपवलं होतं एका दिवसात.
    मला खरं तर एकटं रहायला फार आवडतं समुद्रावर.. सारखं.. अरे बाबा, वडा पाव खायचाय, किंवा मला शहाळं हवं, कींवा ताडगोळॆ आण नां....लवकर.. असल्या ऑर्डर्स नको वाटतात. तसंही मुंबई च्या समुद्रावर तर खाण्याशिवाय आणि गर्दीशिवाय काहिच नसतं. तुमच्या समुद्रावर बराच रिकामा किनारा दिसतोय..

    एकटे पणा एंजॉय करायचा असेल तर अगदी राम प्रहर, समुद्र आणि ’मी’ ही माझी अल्टीमेट कल्पना. अर्थात बायको मुलांसोबत पण एंजॉय करतो, पण समुद्र म्हणजे लोनलीनेस एंजॉय करायचं ठिकाण असा कन्सेप्ट झालाय माझा! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !