जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, March 2, 2010

कटाची आमटी

जिन्नस

 • चण्याच्या डाळीचा कट सहा वाट्या/ चण्याची शिजवलेली डाळ एक वाटी
 • चिंचेचा घट्ट कोळ एक चमचा
 • गूळाचे चार मोठे खडे ( चिरलेला गूळ चार ते पाच चमचे )
 • चार चमचे कोरडे खोबरे व एक चमचा जिरे
 • एक चमचा काळा मसाला, दोन चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ
 • फोडणीसाठी दोन चमचे तेल व मोहरी- हिंग- हळद प्रत्येकी एक चमचा
 • तीन चार लवंगा, दालचिनीचे मोठे दोन तुकडे, तमालपत्राची चार पाने व पाच सहा कडीपत्त्याची पाने

मार्गदर्शन

पुरणपोळी करताना शिजलेली डाळ चाळणीवर टाकल्यावर खाली जे पाणी उरते त्यालाच कट असे म्हणतात. चण्याची डाळ खास शिजवून चांगली घोटून त्यात पाणी टाकूनही कट तयार करता येतो. एक वाटी शिजवून घोटलेल्या डाळीत सहा वाट्या पाणी टाकून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यात कोळलेली चिंच, तिखट व चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर ठेवावे. दुसरीकडे कढईत कोरडे खोबरे व जिरे खमंग भाजून घेऊन त्याची पूड तयार करून घ्यावी. डाळीला उकळी फुटू लागली की खोबरेजिऱ्याची पूड त्याला लावावी. गूळ व काळा मसालाही घालावा. फोडणीच्या पळीत तेल घेऊन चांगले तापले की नेहमीची फोडणी करून त्यात लवंगा, दालचिनी, तमालपत्र व कडीपत्ता घालून ही फोडणी डाळीवर घालावी. मिश्रण चांगले हालवून एक सणसणीत उकळी आणून उतरावे. ही चविष्ट कटाची आमटी पुरणपोळीच्या जेवणाबरोबर फारच छान लागते.

टीपा

चण्याच्या डाळीमुळे या आमटीचा एक खास स्वाद असून नेहमीच्या जेवणातही आवडते. शिवाय पटकन होणारी व रोजच्याच वापरातले सारे जिन्नस असल्याने खास तयारी करावी लागत नाही. काळा मसाला/गोडा मसाला यातले काहीही चालते. आवडत असल्यास शेवग्याच्या शेंगाही घालतात. शेंगा घालायच्या असतील तर डाळ घोटून पाणी घालून शिजायला ठेवतानाच घालाव्यात व त्या शिजल्या की मग वरीलप्रमाणेच आमटी करावी.15 comments:

 1. अगं अडलय का काही तुझं चतुर्थीला असल्या कठीण पोस्ट टाकायच्या ...वर मेले तोंडाला पाणी सुटेल असे फोटो टाकायचे...........

  सही दिसतेय एकदम आमटी....

  (रोहनला ऑफिसला बोलावले पाहिजे कंपनीवाल्यांनी लवकर...तोवर मात्र माझा निषेध कायम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म!!!!!!)

  ReplyDelete
 2. yupeeee...frst comment is mine.....taka taka..tithe US la basun jiv ghyaa lokancha......nishedhhhhhhhh.....ata nahi commentate..

  ReplyDelete
 3. उद्याच करते...बर झालं ..ही पोस्ट टाकलीस...मेनु फ़ायनल झाला..धन्यवाद !!

  ReplyDelete
 4. तन्वी, रोहन जीवाचे ठाणे करतोय.:P अग उपास सोडताना कर.:)

  ReplyDelete
 5. माऊ,काय गं पार्टीचा बेत आहे वाटते. आणि मला आमंत्रण नाही..... निषेध, निषेध....:((

  ReplyDelete
 6. ख मं ग!
  वास आला ग बाई वाटणाचा इथवर, आणि चवही रेंगाळली जिभेवर.
  [पार्सल पाठवायची सोय आहे का ग? असेल तर सोबत पुरण पोळी पण पाठव] :)

  ReplyDelete
 7. ही आमटी पुरणपोळी जेवणाबरोबर आई हमखास बनविते... खुप छान लागते..

  ReplyDelete
 8. क्रान्ति, जरूर.:) आणि मी मायदेशात आले की आपण करू गं अंगतपंगत.

  ReplyDelete
 9. आनंद,पुरणपोळी सोबत कटाची हवीच. दोन्ही एकमेकाची लज्जत अजूनच वाढवतात.:)

  ReplyDelete
 10. holichya muhurtawar kat kela aahes tu...tujha rohan chya watine pan nishedh aahe....

  ReplyDelete
 11. अपर्णा, कटात तुम्ही पण सामील व्हा म्हणून आमंत्रण दिले होते ना...:)

  ReplyDelete
 12. अपर्णा .. तन्वी.. ज़रा अंमळ उशीर झाला यायला. मी आलोय हां आता. पण सध्या निषेध बंद आहेत. मी पण टाकतो एक फोटो पुरण पोळी - कटाच्या आमटीचा.. काय... :D

  ReplyDelete
 13. रोहन,टाक पटापट.म्हणजे मला जोरदार निषेध नोंदवता येईल.....:P

  ReplyDelete
 14. व्वा मस्तच...

  वाचल्याबरोबर खमंग फोडणीचा वास आला ..तोंडाळ पाणी सुट्ल..आम्ही पोळ्याबरोबर कायम बनवतो..आता परवा आहेच गौरींच आगमन.

  पुन्हा एकदा चव चाखायला मिळणार.मी तर वाटी भरून फक्त रस्साच पितो म्हणजे आमटीचा.

  ReplyDelete
 15. राजू कांबळे, ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत! :)

  " गणपती बाप्पा मोरया "

  खूप खूप धन्यवाद! आमटीचा आस्वाद गौरींच्या जेवणावेळी घेतला असेलच. :) :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !