जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, March 16, 2010

सत्य.....

सकाळपासूनच काही ना काही उलटसुलट घडत होते. त्यात नेमकी मोलकरणीने दांडी मारली. चडफडत वासंती आवरत होती. लेकाचे आवरून त्याला पाळणाघरात सोडून शाळेचा पहिला तास गाठणे आज जमणारच नाही. गेल्याच आठवड्यात मुख्याधापकांनी ताकीद दिली होतीच त्यात आज उशीर झाला तर...... " अरे, चल रे पटकन. किती चेंगटपणा करतोस. आवर ना. " पण छोटा आदी त्याच्याच नादात होता. कसेबसे त्याचे आवरून, डबे भरून घेतले. ढिगाने वह्या आणल्या होत्या घरी तपासायला त्या बॅगेत कोंबल्या, उरलेल्या हातात घेतल्या.

लोकांना वाटते, " शिक्षकाचे काम किती छान. मुलांना सुट्टी की तुम्हालाही सुट्टी. मज्जाच मज्जा. पण ह्या वह्या, पेपर तपासणे चालूच असते सुट्टीतही ते दिसत नाही कोणला. कारटी इतका उच्छाद मांडतात वर्गात की कधी कधी तर कसे आवरावे हेही कळत नाही. आणि या वह्या-पेपरातले अक्षर लावता लावता जीव मेटाकुटीला येतोय. अगदी सगळ्यांनाच जणू पुढे डॉक्टर व्हायचेय, त्याची जोरदार तयारी आतापासूनच चालू केलीये. अरे पण मी कुठे केमिस्ट आहे. काल डोके दुखलेय तेच अजून थांबले नाही तो पुन्हा भर नको. आदी, चला निघा आता. "

आदीला सोडून त्याच रिक्षाने वासंतीने शाळा गाठली. पहिली घंटा होऊनच गेली होती. अगदी बालबाल बचावले बाई आज. असे म्हणत वह्यांचा ढिगारा व बॅग सांभाळत ती तिसरीच्या वर्गात पोचली. प्रार्थना होईतोही पोरांना दम कुठे होता. त्यातही चुळबूळ, खुसखुस सुरू होतीच. सकाळी सकाळी उगाच ओरडायला नको म्हणून थोडे दुर्लक्ष करून ती खुर्चीत टेकली. चला आता पोरांच्या वह्या वाटून टाकाव्यात, असे म्हणत हाताला आली ती पहिलीच वही तिने उचलली आणि उघडली. किती गुण मिळालेत हे पाहावे म्हणून जरा चाळली आणि ती सटकलीच.

" ही माझी सही नाही आणि हे मार्कही मी तुला दिलेले नाहीत. खरे सांग तू केलीस ना माझी सही. " तरातरा रियापाशी जात चिडून वासंतीने विचारले. " नाही मॅडम, मी नाही केली सही. " तिसरीत शिकणारी रिया घाबरून म्हणाली. " किती खोटे बोलतेस गं, हेच शिकवले वाटते आईने तुला? आधी हात पुढे कर. कर म्हणते ना..... " रियाने कसाबसा हात पुढे केला तोच ’ फटाक-फटाक " वासंतीने चांगले दोन रट्टे मारले. रिया रडू लागली. " रिया, खरं सांग. खरं सांगितलेस तर मी माफ करेन तुला. अग काय विचारतेय मी. खोटे रडू नकोस. " " मॅडम, मी खरं सांगतेय. मी नाही हो सही केली. नका ना मारू मला. दुखतेय खूप. "

इतका खोटेपणा तोही या लहान वयात. वासंतीचा राग अनावर झाला, तिने खसकन रियाचा चिमुकला हात पुढे ओढून घेतला आणि सटासट मारतच सुटली. ताड, ताड, ताड,...... रियाला सहन होईना, डोळ्यातून अखंड पाणी ओघळू लागले. ती घाबरून गेली आणि मारही सहन होईना, शेवटी तिने कबूल करून टाकले की हो मी सही केली. हे ऐकताच वासंती मारायची थांबली. आसुरी विजयी मुद्रेने तिने म्हटले, " शेवटी सत्य आलेच ना बाहेर. मग हे आधीच कबूल केले असतेस तर.... " संपूर्ण वर्गाकडे एक नजर टाकून तिने रियाच्या वहीवर एक मोठी फुली मारून शून्य काढले आणि वही तिच्या बेंचवर आपटली.

दिवस फार धावपळीत गेला. संध्याकाळी थकून घरी पोचली. आजही पाचवीच्या वह्यांचा एक भला मोठ्ठा गठ्ठा होताच सोबत. वैतागून तिने टेबलवर तो आदळला तोच छोटा आदी पळत आला व वासंतीला बिलगला. तिने त्याला उचलून घेतले तोच त्याची नजर वह्यांवर पडली. " आई, मला ना तुझ्या वह्या तपासायला खूप आवडते. मलाही तुझ्यासारखे काम करायचेय. आजही देशील ना मला एक वही, प्लीज ना ममा...... " हे ऐकले आणि वासंती हबकली, " आदी, तू काल ही इथून वही घेतली होतीस का? " " हो..., अग खूप मज्जा आली. मी अगदी तुझ्यासारखीच चेक केली आणि तू कशी सही करतेस ना तशीच सही पण केली. दे ना ममा, आज पण एकच वही दे ना.... " हे ऐकले आणि वासंतीने बसकणच मारली. काय केले मी आज..... रिया.......

इकडे, रियाच्या आई-बाबांनी तिचा इतका लाल झालेला-सुजलेला हात पाहिला आणि त्यांना काहीच समजेना. पोर रडून रडून अर्धमेली झालेली. रियाचे आई-बाबा फार गरीब होते. आई चार घरची धुणीभांडी करी आणि बाबा वॉचमन होते शिवाय एका गॅरेजमध्येही काम करत होते. लेकीला चांगल्या मोठ्या नाव असलेल्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेले. तिने खूप शिकावे मोठे व्हावे यासाठी दोघे ढोर मेहनत करत होते. आणि आज सुजलेला हात व मुसमुसणाऱ्या रियाला जवळ घेऊन तिच्या कोवळ्या हातावर मलम लावत आई करवादली, " जळ्ळली मेली ती शाळा आणि शिक्षण. काही नको. बस झालं. उद्यापासून माझ्याबरोबर चल मुकाट भांडी घासायला. मोठी आलीये शिकणारी. " रियाला छातीशी कवटाळून माय रडत राहिली.

25 comments:

  1. हे तुझ्या ब्लोगचे नवीन रूप छान वाटले..अगदी आल्हाददायक आहे.

    ReplyDelete
  2. The blog looks good. I have been watching this blog from day 1 but I am a silent admirer hence did not comment. Now that you have completed one year and 50,000 hits I could not resist my urge of writing the comment but still shy of writing my name.
    Silent Admirer

    ReplyDelete
  3. मधुमती, तुला नवीन रूप आवडल्याचे पाहून बरे वाटले. धन्स.

    ReplyDelete
  4. Silent Admirer, आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.:) नववर्षाच्या शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  5. वाचायला घेतले तेंव्हा आईच लिहिते आहे असे वाटले. ती सुद्धा शिक्षिका आहे ना. विषय खरं तरं गहन आहे हां. अनेकदा शिक्षकांचे देखील चुकते. पण ते देखील अनेकदा हतबल असतात.

    तुम्ही लिहिले आहे तसे बरेच वेळा आणि बरेच जनांबरोबर होत असेलही. तुम्ही लिहिलेले खरे आहे की ???

    ReplyDelete
  6. रोहन, घटना एका ख~या घडलेल्या प्रसंगावर लिहीली आहे. शिक्षकही माणसेच ना... शिवाय हाताखालून बरीच मुले गेलेली असतात, त्यामुळे अनेक ब~यावाईट गोष्टींही पाहिलेल्या. पण कधीकधी सगळ्यांनाच एकाच तराजूत तोलू नये. हकनाक बळी जातो एखाद्या अश्राप जीवाचा. ख~या घटनेत प्रकरण फक्त पट्टीवर थांबले नव्हते.:(

    ReplyDelete
  7. हेरंब, सत्याचे पडसाद भयंकर असतात कधीकधी.

    ReplyDelete
  8. हे अस खुपदा घडत....याचा परिणाम म्हणजे मुलांना शाळेची भीती वाटते. शिक्षा करणे ही सुद्धा एक कला आहे....ज्याला अवगत झाली तो खरा हाडाचा शिक्षक!!!
    (बरोबर लिहतोय ना मी????)

    ReplyDelete
  9. असे प्रसंग येतात माझ्या आयुष्यात तेव्हा बेनेफिट ऑफ डाऊट बॅट्समनला देऊन मी ते दृष्य असत्य गिळायचा प्रयत्न करतो... थोड्या वेळाने सत्य आपोआप स्वयंदृष्यमान होते.
    हे अनुभुतीपूर्ण कथन आहे...

    ReplyDelete
  10. असं काही वाचलं की एकदम सेंटी व्हायला होतं
    सोनाली

    ReplyDelete
  11. फ़ारच सुंदर लिहिलेस...डोळ्या समोर आले...ब~याचदा शिक्षक स्वताच्या घरचे frsustrations वर्गातील मुलांवर काढतात..आणि मग हे असे होते...

    ReplyDelete
  12. Ek number! Asha anek gosthi astaat, jya "Distaat tasha Nastaat"! Majhya baabtit suddha anekda ase ghadale aahe...Garisamajatun anekvela lok majhya pasun dur gele jevha mi 100% pramanik hoto! Chan lihiliye post!

    ReplyDelete
  13. शिक्षीकेने मुद्दामहुन केले नाही तरी याचा कोवळ्या बालमनावर खोलवर परिणाम होवु शकतो...

    ब्लॉगचे नविन कपडे छान आहेत...

    ReplyDelete
  14. मनमौजी, अगदी बरोबर. शिक्षाही शारिरीकच असली तरच मुले नीट वागतात, असा एक समज सर्वसामान्यत: भिनलेला आहे.” छडी लागे छ्मछम, विद्या येई घमघम ’हा वाकप्रचार सरसकट कुठल्याही वयासाठी वापरला जातोय. आणि मुले त्यातून एकतर अतिशय कोडगी होतात किंवा शाळेलाच घाबरतात.

    ReplyDelete
  15. शिरीष, स्वागत आहे. हो ना.व्यक्त होण्याआधी दोन क्षण विचार केला तरी अनेक प्रसंगांना वेगळे वळण देता येऊ शकते. प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete
  16. सोनाली, हो ग. जीव कळवळतो.

    ReplyDelete
  17. आशिष,आपले स्वागत आहे.अनेकदा आपण सगळेच समोर जे दिसतेय आणि त्यातून आपल्याला जो अर्थ अभिप्रेत होतोय तेच सत्य समजून पुढच्या प्रतिक्रिया देतो. थोडक्यात घाईने. मग निष्कारण गैरसमज होणे ओघाने आलेच. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  18. माऊ,आमच्या शाळेतही असेच एक शिक्षक होते. नेहमी कावलेले,सगळ्यांवर खेकसायचे, मारायचे. कधी शांत, प्रेमळ त्यांना कोणीही पाहिलेच नाही.नववीत असताना कळले की त्यांच्या घरी खूप कटकटी होत्या.:(

    ReplyDelete
  19. आनंद,मुलांना आवडणारे अनेक शिक्षक असतातच. आमच्याही एक आवडत्या बाई होत्या. खूप चांगल्या, एकदम स्मार्ट, हुशार. आम्ही अगदी भारलेले होतो. पण चिडल्या की विशेषत: मुलांच्या पोटात-बेंबीपाशी कचकचून चिमटा काढत. उगाचच कुठल्याही कारणाने त्या असे करत नसल्या तरी ते चुकीचेच होते. आम्ही मुली तर ते पाहूनही भेदरून जायचो. मुले अक्षरश: रडत.तरीही सगळे त्यांच्यावर खूप प्रेम करत होते.बरेचदा शिस्त-मी हे खपवून घेणार नाही यासाठी अतिरेक होतो.

    ब्लॉगचे नवे रूप आवडले...,आभार.

    ReplyDelete
  20. Khup Chan lihita tumhi Bhanas ! Keep it up

    ReplyDelete
  21. नम्रता, ब्लॉगवर आपले स्वागत व प्रातिक्रियेबद्दल आभार. अशा प्रोत्साहनांमुळेच उत्साह वाढतो. :)

    ReplyDelete
  22. फारच छान लिहिलंय .. मस्तच

    ReplyDelete
  23. Binary Bandya, स्वागत व प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  24. बरोबर बोललीस गं. सगळ्यांना एका तराजूत कधी तोलू नये आणि समोरच्याचं ऐकून घेतल्याशिवाय कोणता निष्कर्षही काढू नये. आणि एवढ्या लहान मुलांना एवढं मारणंही पटलं नाही. बाकी नेहमीसारखीच छान.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !