जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, March 27, 2010

श्रीखंड

नवीन वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडवा. म्हणजे श्रीखंड पुरी हवीच. त्याचदिवशी खरे तर शुभेच्छांबरोबर श्रीखंडही द्यायचे होतेच. आनंदला म्हटलेही होते. पण लेकाने तुझे फोटूबिटू नंतर आधी आम्हाला वाढ असे फर्मान सोडले आणि बापलेकाने मिळून मनसोक्त हाणले मग इतके आहारले की ताटावरच पेंगायची वेळ आली. कालच तन्वीने फर्मावले, " तायडे, काहीतरी खादाडी येऊ दे गं. " तशातच खादाड राज्याच्या सेनापतीने, " खाण्यासाठी जन्म आपुला " ची आठवण करून दिली. मग काय, आज पुन्हा बनविले. लगेहाथ फोटोही काढले. अक्षय तृतीया येतेच आहे तेव्हां करता येईलच.

जिन्नस

  • दोन लिटर दूध/ तयार दही एक किलो
  • साखर
  • वेलदोडा पूड छोटा चमचा, आवडत असल्यास चारोळी व जायफळ
  • केशर/ खाण्याचा केशरी रंग

मार्गदर्शन

दूध प्रथम तापवून घ्यावे. कोमट झाले की विरजण लावावे. व्यवस्थित दही लागले की पातळ फडक्यावर घालून, बांधून ८ ते १० तास टांगून ठेवावे. जेणेकरून त्यातले सगळे पाणी निघून जाईल. पाणी निघून गेल्यावर फडक्यात जे घट्ट दही उरेल ते म्हणजेच चक्का. हा चक्का एका भांड्यात काढून घेऊन त्यात जेवढा चक्का असेल तितकीच साखर घालून एकजीव करावी. हे मिश्रण पुरण यंत्रातून किंवा श्रीखंड गाळण्याच्या यंत्राने किंवा बारीक छिद्राच्या गाळणीने गाळून घ्यावे . चमचाभर दुधात केशराच्या काड्या खलून घेऊन ते या गाळून तयार झालेल्या श्रीखंडावर टाकावे व वेलचीपूड टाकून सगळे मिश्रण एकदा नीट एकत्र करावे. वाढताना दोनतीन चारोळ्या पेरून वाढावे.

इथे जे डॅननचे तयार दही मिळते त्याचेही श्रीखंड वरील प्रमाणेच करावे. पुरण यंत्र-श्रीखंड गाळावयाचे यंत्र किंवा गाळणीही नसली तर मोठ्या डावाने/चमच्याने मिश्रण पंधरा मिनिटे चांगले फेसावे. बहुतेक सगळ्या गुठळ्या मोडतील. डॅननच्या दह्याचे श्रीखंड करणार असल्यास ते लो-फॅट, फॅट फ्रीही बनवता येईलच. परंतु श्रीखंड कसे शाहीच करावे. डाएटचा विचारही मनात आणू नये. आंबटगोड श्रीखंड, टुमटुमीत फुगलेल्या पुऱ्या व उकडलेल्या बटाट्याच्या पितळेच्या पातेल्यातील भाजी बरोबर आहारले जाईल इथवर आकंठ हाणावे आणि मस्त ताणून द्यावी.




टीपा

श्रीखंड किंचित आंबट लागायला हवे. एकदम गोडमिट्ट श्रीखंडाला ती मजा नाही. खाल्ले की जिभ टाळूला चिकटून मस्त मिटक्या मारल्या गेल्या की समजावे एकदम पर्फेक्ट झालेय. श्रीखंड आदल्या दिवशी बनवून ठेवल्यास जास्त चांगले लागते. घट्ट दह्यात साखर मुरली की ते चढत जाते. दह्याचा आंबटपणा व साखरेची गोडी दोन्ही एकमेकाचे पूरक बनून अप्रतिम श्रीखंड तयार होते. जेवढा चक्का असेल तेवढीच सर्वसाधारणपणे साखर घ्यावी. आपल्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करावी. चारोळ्या बरेचदा खवटच निघतात. तेव्हा शक्यतो घालूच नये. त्याऐवजी बदाम-पिस्त्याचे पातळ काप आवडत असल्यास घालावेत.

22 comments:

  1. तायडे सही.... मस्त दिसतेय श्रीखंड... हम भी अभी करेंगे....

    ReplyDelete
  2. वा... आपण आपले काम चोख बजावत आहात. प्रमुख सल्लागार उगाच नाही आहात आपण... :)

    ReplyDelete
  3. व्वा! क्या बात है. उन्हाळ्यात तोंडातुन लिटरभर पाणी गळालं!
    धन्यवाद ताई!

    ReplyDelete
  4. वा वा!
    एकदम मस्त, फोटोतले श्रीखंड पुरीला लावून खावेसे वाटत आहे.
    सोनाली

    ReplyDelete
  5. छान झालय हो...पेंगता पेंगताच कोमेंटले आहे...

    ReplyDelete
  6. सक्काळी सकाळी श्रीखंडाची आठवण !! पाणी सुटलं तोंडाला :)

    ReplyDelete
  7. श्रीखंड घरी करणं बहुधा इतिहासजमा झालं असावं (चितळेंपासून वारणा-गोकुळपर्यंत सर्वांच्या सौजन्यानं).

    पण आजचा लेख वाचून श्रीखंडाची प्रचंड आठवण आली. त्यात इथं (बंगालमध्ये) श्रीखंड औषधालाही मिळत नाही, तेंव्हा फोटोवरच समाधान मानून घ्यावं लागतंय.

    ReplyDelete
  8. तन्वी, आपकी फर्माइश पुरी कर दी हैं। :)

    ReplyDelete
  9. सेनापती, आभारी आहे. :) रोहन, पुरले का तुला? :P

    ReplyDelete
  10. आनंद, शेवटी मिळाले का नाही तुला खरेखुरे श्रीखंड?

    ReplyDelete
  11. सोनाली, जरा आर्यनलाही चाटव गं. :)

    ReplyDelete
  12. माऊ... :)) तू पण शोमू-नचिकेतच्या पंगतीत...

    ReplyDelete
  13. हेरंब, मग होऊन जाऊ दे की......,तुझी बायको डोळे मोठे करेल.... आधीच काम काय कमी आहे त्यात ही भर घालतेय.... हेहे.

    ReplyDelete
  14. विवेक, तुम्ही बंगालमध्ये आहात तर.... गुलगुलीत रोशगुल्ले... अहाहा!!! इथे येईतो मी तरी कुठे श्रीखंड घरी केले होते. उठसुट खंडेलवाल नाहीतर प्रशांतकडे पळायचे.... अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  15. नाही ना, पण हा फोटो पाहुन खरंच खुप बरं वाटल, पुढील सप्ताहांत घरी जात आहे, तेंव्हा इच्छा पुर्ण करुन घेइन.. :)

    ReplyDelete
  16. वाह!!!! कालच श्रीखंड हाणल आम्ही. . .घरच नाही चितळे काकांच!!! :) फोटू तर लय भारी आहे!!!

    ReplyDelete
  17. श्रीताई,
    आर्यनचे अभिनंदन केलेस, ब्लॉगवरच्या नविन पोस्ट वाचल्यास का?
    सोनाली

    ReplyDelete
  18. सोनाली, अग बाळराज्यांच्या सगळ्या लीला डोळे भरून पाहिल्या-वाचल्या. नुसता गोडूराम आहे गं.

    ReplyDelete
  19. NO comment is called as NI SHE DHA...mahit aahe ka????

    ReplyDelete
  20. अपर्णा... हा हा... छान वाडगाभरून दिलेय खायला तरीही नि षे ध... नॉट फेअर यार... :P

    ReplyDelete
  21. गेल्या आठवड्यातच ताव मारला होता पण आता हे फ़ोटो पाहुन तोंडाला पाणी सुटल्यावाचुन राहिल नाही....

    ReplyDelete
  22. davbindu, पुन्हा एकदा होऊन जाऊ देत....,:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !