जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, July 31, 2011

कोबीच्या वड्या

मुळा, कोबी, फ्लॉवर, नवलकोल सारख्या उग्र वासाच्या भाज्या बरेच जण नाखुशीने खातात. कोबीची किंचित करपवलेली, चण्याची डाळ भिजवून घातलेली भाजी कढईतून डायरेक्ट पानात वाढायची व सोबत तुपाचे बोट लावलेले गरमगरम फुलके, सुंदरच लागते. मात्र थंड झाली की जरा कंटाळवाणी होते खरी. पुन्हा गरम करून खातांनाही त्याची मूळ चव बदलतेच. मग नकोशीच होते. कोबी हा बारा महीने व मुबलक मिळतो. त्यात भरपूर ' क ' जीवनसत्त्वं तसंच ' अ ' जीवनसत्त्वं , लोह आणि कॅल्शिअम असतं. करायला सोपी व चटकन होणारी भाजी असल्याने बर्‍याच घरात आठवड्यात एकदा तरी केली जातेच. कधी चण्याची भिजवलेली डाळ घालून तर कधी बटाटा घालून. कोरडी भाजी असल्याने डब्यासाठी सोयीची होते पण थंड खावी लागल्याने ढकलावी लागते. कोबीमध्ये मिळणारी जीवनसत्त्वे पाहता तो खायला हवा. मग कधीतरी छानश्या वड्या करून खाव्या. कोबीच्या भाजीला नाके मुरडणारेही अतिशय आवडीने वड्या खातात. करायलाही सोप्याच आहेत फक्त भाजीइतक्या झटपट होत नाहीत हेही खरेच. किंचितशी योजकता दाखवली तर अगदी संध्याकाळी कामावरून आल्यावरही होऊ शकतात. रोजच्या पोळीभाजीला फाटा देऊन कोबीच्या वड्या, सूप व पुलाव असा सुटसुटीत मेन्यू एखाद्या पावसाळी संध्याकाळची खुमारी नक्कीच वाढवेल.

वाढणी : तीन माणसांकरिता

साहित्य :


तीन वाट्या किसलेला कोबी
एक वाटी बारीक चिरलेला कांदा
सव्वा वाटी भिजवलेली चण्याची डाळ
दोन टेबलस्पून डाळीचे पीठ
दोन टेबलस्पून तांदुळाचे पीठ
अर्धी वाटी ब्रेडचा चुरा
सहासात ओल्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
अर्ध्या लिंबाचा रस
दोन चमचे तिखट, एक चमचा जिरेपूड, दीड चमचा धणेपूड, एक चमचा गरम मसाला, हिंग, हळद
दोन चमचे तीळ, एक चमचा साखर व स्वादानुसार मीठ
पाच ते सहा चमचे तेल ( शॅलोफ्रायसाठी )








कृती :
करकरीत ताजा कोबी किसून घ्यावा. कांदा बारीक चिरावा. ओल्या मिरच्या व भिजवलेली चण्याची डाळ वाटून घ्यावी. खोलगट भांड्यात किसलेला कोबी, कांदा, वाटलेली चण्याची डाळ, कोथिंबीर, लिंबाचा रस, तांदुळाचे व चण्याच्या डाळीचे पीठ, ब्रेडचा चुरा, हळद, हिंग, तिखट, धणेजिरेपूड, गरम मसाला, तीळ, साखर व मीठ घेऊन एकजीव करावे. पाण्याचा एकही थेंब घालू नये. गरज पडतच नाही. शक्य तितके घट्ट भिजवण्याचा प्रयत्न करावा.





कुकरच्या भांड्यात भिजवलेले पीठ घट्ट असल्यास मुटके करून किंवा सैल झाल्यास पसरून घालावे व इडली किंवा मोदकासाठी जसे वाफवतो ( शिट्टी न लावता ) तसेच वाफवून घ्यावे. मध्यम मोठ्या आचेवर साधारण पंधरा मिनिटात होतात.



जरा निवले की सारख्या आकाराच्या वड्या पाडून पसरट तव्यावर तेल सोडून शॉलोफ्राय कराव्यात. चटणी, सॉस बरोबर गरमगरम वाढाव्यात.



टीपा :


भिजवलेला गोळा सैल वाटल्यास एखाद दोन ब्रेडचे स्लाइस मिक्सरमधून काढून घालावेत. ब्रेडच्या चुर्‍यामुळे वड्या कुरकुरीत व्हायला मदत होते.
शक्यतो कोबी घट्ट व करकरीत असावा. कोबीची बाहेरील पाने अलगद सोडवून घेऊन त्यात भिजवलेला गोळा गुंडाळून वाफवल्यास कोबीच्या पानांचा वास लागतो. मी तशा पद्धतीने वाफवून घेतल्यात. परंतु नुसत्या वाफवून घेतल्यास फारसा फरक पडत नाही म्हणून कृतीमध्ये तसेच लिहिले आहे.
उकडलेला गोळा ओलसर असल्यामुळे वड्या नीट कापल्या न गेल्यास तळहातावर घेऊन त्यांना आकार द्यावा.
तीळ थोडे जास्ती घातले तर छान लागतात. हिरव्या मिरच्या सगळ्यांना झेपतील त्या प्रमाणात घालाव्यात.
लसूण व आलंही घालूनही कोबीच्या वड्या करता येतात व त्याही छानच लागतात.
चण्याची डाळ भिजवून घालावयाची नसेल किंवा तितका पुरेसा वेळ नसेल तर डाळीचे पीठ पाच ते सहा चमचे घ्यावे. तांदुळासोबत ज्वारीचेही पीठ असल्यास घालता येईल. ते दोन चमचे घालावे.


18 comments:

  1. सुभानअल्लाह !!!!
    मला हवे मला हवे... :)

    ReplyDelete
  2. सही सही.. माझ्या आवडत्या...

    वड्या, पराठे, भाजी.. कोबीचं काहीही चालेल.. अत्यंत प्रिय भाजी आहे माझी :))

    ReplyDelete
  3. उमा, कधी येतेस घरी सांग... म्हणशील ते खिलवते. :)

    ReplyDelete
  4. अरे वा ! आहेस की तू माझ्या जोडीला हेरंब... मलाही मुळ्याचे, कोबी-फ्लॉवरचे सगळे पदार्थ आवडतात. :) आभार्स !

    ReplyDelete
  5. मी युएस ला आले तर आधी मला तुझ्या हातचा मार खावा लागेल त्याच काय???

    ReplyDelete
  6. भारी आहे ग ! लेक खाईल की नाही कोण जाणे ! दाखवते मी तिला हे फोटो. :)

    ReplyDelete
  7. कोबी अमेरिकेत आल्यापासून शत्रू झालीय माझी कारण मला इथला कोबी गोड लागतो आणि भाजी गोड हा प्रकार काही पटत नाही बघ...ही रेसिपी मस्त वाटते मुख्य ते पानात उकडवलस ते...मला सांग सरळ भाजणीमध्ये केल्या वड्या तर होतील का? (माझ्याकडे भाजणी पण पडून आहे तिला मार्गी लावता येईल का म्हणून ग...नाही तर थालीपीठ आणि एकंदरीत गोल लाटून भाजलेला कुठलाही आयटम माझ्या हाताला यश देत नाही...(हा कंस हेरंब वाचत नसेल अशी माफक अपेक्षा ठेवून लिहीलं आहे याची नोंद हे ओ ने घ्यावी...))

    ReplyDelete
  8. भाजणीमधे कोबी किसून घालून तू करू शकतेस पण त्याचे थालिपिठच लावायला हवे. नाहीतर मोकळ भाजणी करू शकतेस की. ( अर्थात तिच्यात कोबी नसतो ) छान लागते.

    धन्यू गं !

    ReplyDelete
  9. अनघा, अगं लेकीला सांगूच नकोस. :) तिला मुळीच कळणार नाही. खाऊन झाल्यावर तिला सांग. :D:D

    ReplyDelete
  10. हा हा... उमे, उगाच बहाणे नको सांगूस... :D:D

    ReplyDelete
  11. मस्तच ग श्रीताई ...श्रावण सुरु असल्याने तोंडाला पाणी आल.... :)
    तू खादाडीचा वेगळा ब्लॉग कर ना मस्त...

    ReplyDelete
  12. श्रावण सुरू असल्याने... ही ही, नाविलाज से क्या? :D:D

    देवेन, अरे वेगळा ब्लॉग करायला तितके मटेरियल हवे नं. बघू पुढे कधीतरी... धन्यू रे!

    ReplyDelete
  13. भाग्यश्री, माझी आई कोबीची भजी करते... पण हे काहीतरी वेगळेच आहे... असो आत्ताच प्रिंट-आउट काढलंय. संध्याकाळी घरी सुपूर्द करीन.

    आणि हो केक बनवून झाला हा; पण आमच्याकडे केशर नव्हतं. त्यामुळे केक वेलची-फ्लेवरचा झाला होता :D

    ReplyDelete
  14. कोबीचा कंटाला येतो खरा. पण हा प्रकार केलाच पाहिजे.

    ReplyDelete
  15. वेलची फ्लेवरचाही छानच लागतो. अगदीच काहीतरी न जुळणारा पदार्थ घातला नाही म्हणजे झालं. श्रीराज, कोबीच्या वड्याही आवडतील तुला. :) धन्यू रे!

    ReplyDelete
  16. आशाताई, जरुर करून पाहा. नक्की आवडतील. :) खूप आनंद झाला तुमचा अभिप्राय पाहून. अनेक धन्यवाद!

    ReplyDelete
  17. लहानपणी कुठल्यातरी सिरियलमध्ये एका एपिसोडमध्ये एका पात्राला 'गोभी के कोफ्ते' प्रचंड आवडत असतात असं दाखवलं होतं.. ते पाहून मी आईला ते करून द्यायला सांगितलेलं.. तेव्हा आईनं कोबीच्या वड्या करून दिल्या होत्या...
    कोफ्त्यापेक्षा नक्कीच भन्नाट असणार त्या :)
    ह्या तशाच दिसताहेत!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !