चायनीज फूडला आपण व ते आपल्याकडे आता चांगलेच रूळलेत. गाडीवरचे असो किंवा चांगल्या हॉटेल मधले असो, प्रत्येकाची स्वत:ची खासियत आहे. इथे जागोजागी चायनीज जॉइंट्स आहेत. पण इथले चायनीज एकतर गोडाकडे झुकणारे किंवा तिखट करा म्हटले की हमखास आंबटढोक लागणारे. सुरवातीला तर आपल्याकडच्या गाडीवरच्या चायनिजच्या आठवणी काढून काढून खायचो..... आता हळूहळू इतक्या वर्षात हेही आनंदाने खाऊ लागलोत पण मनात मात्र अजूनही ती चव रेंगाळतेच. कधीकधी फारच इच्छा झाली की मग मात्र खटाटोप करतेच. चायनीज मग ते मान्चुरिअन असो, पनीर चिली वा चायनीज राईस- न्यूडल्स काहीही करा आधीच्या तयारीलाच वेळ जास्त. प्रत्यक्ष पदार्थ पंधरा मिनिटात तयार आणि पुढच्या पंधरा मिनिटात चट्टामट्टा.....
जिन्नस
- एक मध्यम गाजर किसून, किसलेला कोबी दोन वाट्या, किसलेला फ्लॉवर एक वाटी
- प्रत्येकी अर्धी वाटी मटार व मका दाणे
- अर्धी वाटी चिरलेली कांद्याची पात व पातीचे कांदे
- एक मोठी सिमला मिरची व एक मध्यम कांदा चौकोनी तुकडे करून
- चार-पाच लाल सुक्या मिरच्या, तीन चार हिरव्या मिरच्या
- दहा-बारा लसूण पाकळ्या व बोटभर आले बारीक चिरून
- मशरूम्स, बेबी कॉर्न, वॉटर चेसनटस, बांबूच्या पातळ पट्ट्या ( ऐच्छिक )
- एक मोठा चमचा व्हिनीगर, दोन मोठे चमचे सोया सॉस, चार मोठे चमचे तेल व तळण्याकरीता तेल
- चार मोठे चमचे कॉर्न स्टार्च , तीन कप पाणी व चवीनुसार मीठ
मार्गदर्शन
फ्लॉवर, कोबी, गाजर किसून घ्यावे. मटार व मक्याचे दाणे फार टचटचीत असतील तर मिनिटभर मायक्रोव्हेव मध्ये ठेवून वाफवून घ्यावेत किंवा उकळते पाणी त्यावर ओतून संपूर्ण निथळून घ्यावेत. कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी. एका भांड्यात हे सगळे घालून हाताने कुस्करून घ्यावे. मग चवीपुरते मीठ घालू पुन्हा कुस्करावे. मिठामुळे पाणी सुटेल. आता त्यात दोन चमचे लाल तिखट व दोन चमचे मैदा, एक चमचा तांदुळाचे पीठ घालून एकत्र करावे. नंतर त्यात दोन मोठे चमचे कॉर्न स्टार्च घालावे, जेणेकरून मिश्रण बांधले जाईल. मग छोटे छोटे गोळे वळून मध्यम आचेवर लालसर रंगावर तळून घ्यावेत.
भोपळी मिरची व कांद्याचे चौकोनी तुकडे करावेत. हिरव्या मिरचीचे पोट फोडून घ्यावे. बेबी कॉर्न, वॉटर चेसनटस, बांबू पट्ट्या, मशरूम्स यातले जे उपलब्ध असेल व आवडत असेल ते प्रत्येकी अर्धी वाटी चकत्या करून घ्यावे. पातीचा कांदा मुळे काढून संपूर्णच ठेवावा. लसूण व आले अगदी बारीक चिरावे. किसून अथवा मिक्सरला वाटून घेऊ नये. एका पसरट कढईत चार चमचे तेल घालून मोठ्या आचेवर ठेवावी. तेल तापले की त्यात आले लसूण टाकून मिनिटभर परतावे. त्यावर हिरव्या मिरच्या व लाल मिरच्या टाकून पुन्हा मिनिटभर परतावे. घेतलेल्या सगळ्या भाज्या आता त्यावर टाकाव्यात व पाच ते सात मिनिटे परतत राहावे. आच कमी करू नये. भाज्या अर्धवट शिजतील की मग व्हिनीगर व सोया सॉस घालावे. चवीनुसार मीठ व दोन भांडी पाणी घालून आच मध्यम करावी. झाकण ठेवू नये. साधारण पाच-सहा मिनिटात उकळी फुटली की तळून ठेवलेले गोळे घालावेत. लगेचच अर्धी वाटी गार पाण्यात कॉर्न स्टार्च विरघळवून घेऊन या मिश्रणाला लावावे व हालवत राहावे. कॉर्न स्टार्चमुळे मिश्रण थोडेसे घट्ट होऊ लागले की नीट ढवळून तीनचार मिनिटात बंद करावे. साध्या गरम भाताबरोबर, चायनीज फ्राईड राईसबरोबर किंवा नुसतेच......, आवडेल तसे परंतु गरम गरम खावे.
टीपा
मान्चुरिअन चे गोळे करताना तिखट आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करावे. मिठामुळे पाणी सुटतेच तेव्हा वरून आणखी पाणी चुकूनही घालू नये. ग्रेव्हीत मीठ घालताना, गोळ्यात मीठ घातलेले आहेच व सोया सॉसमध्येही मीठ असते हे लक्षात घेऊन घालावे. नाहीतर हमखास खारट होण्याची शक्यता असते. ग्रेव्ही कोरडी हवी असल्यास कॉर्न स्टार्च लावून झाल्यावर जरा जास्त वेळ आचेवर ठेवावे. आणि जास्त पातळ हवी असल्यास त्यानुसार पाणी वाढवावे. ग्रेव्हीला जास्त तिखटपणा हवा असेल तर लाल व हिरवी मिरची जरा जास्त वेळ तेलात परतावी. अती तिखट हवे असेल तर ओली लाल मिरची दोन चमचे पाण्यात किंचितसे मीठ घालून वाटून घेऊन आले-लसणाबरोबर परतावी. ग्रेव्ही अगदी खडखडीत कोरडी हवी असेल तर अर्धा चमचा कॉर्न स्टार्च पाव वाटी पाण्यात कालवून मिश्रणाला लावून मोठ्या आचेवर परतून लागलीच वेगळ्या भांड्यात काढून घ्यावे. मान्चुरिअन उरल्यास पुन्हा खाताना अर्धी वाटी पाणी घालून उकळी आणून खावे. कॉर्न स्टार्चमुळे खूपच घट्ट झालेले असते.
काय हे सकाळी सकाळी चार वाजता वाचायला दिलंस??
ReplyDeleteआता पुन्हा मला पण काहीतरी खावंच लागेल. आज डबा नेणार नाही ऑफिसमधे, आणि सावंतवाडी रेस्टॉरंटला जाउन मस्त पैकी चमचमीत कोंबडी वडे खाउन येणार.. :)
शुभप्रभात! अरे, तू इतक्या पहाटे उठलास? ह्म्म्म.... बघ यामुळे तुला आज कोंबडी-वडे मिळणार ना चापायला... :)
ReplyDeleteमस्तंच, सकाळी सकाळी तोंडाला पाणी सुटलं...
ReplyDeleteतोंडाला पाणी सुटेश.. 'व्हेज मान्चुरिअन' वरची पोस्ट वाचून झाल्यावर आता मी कोबीची भाजी पोळी जेवतोय. "बहुत नाइन्साफी है ये"
ReplyDeleteआजच्या दिवसाची सुरूवात चायनीज खाउन. . क्या बात है!!!
ReplyDeleteएक मस्त रेसिपी दिलीत, या weekend ला नक्की करून पाहिन.
ReplyDeleteसोनाली
सकाळीच दिसले ब्लॉगविश्वावर सरदेसाई बाई आलेल्या आहेत, विषय पाहिला तर खादाडी... आधि कलटी मारली, स्वत: स्वत:वर अन्याय का करावा म्हटलं!!! आता जेवण झालय पोटोबा भरलाय... तरिही हे फोटॊ पाहून लगेच एक-दोन मंचुरियन तोंडात टाकावे वाटले..... :)
ReplyDeleteनि.....षे......ध..........
फोटो एकदम सही...(हे लिहायला मनावर , जिभेवर दगड ठेवलाय....)
आनंद, मनमौजी ....., शुभदिन!:)
ReplyDeleteहेरंब, खरेच रे.... बहुत नाइन्साफी हैं ये!:P
ReplyDeleteसोनाली, केलेस की सांग ग मला.... आवडले का ते....
ReplyDeleteतन्वी, चक्क माझी पोस्ट पाहून दुर्लक्ष...... :((. हम्म्म.... आता खरेच मी आणि माझी भाचरे मिळून तुला कामाला लावणार पाहा.... हा हा....
ReplyDeleteवा.. वा.. उत्तम. महिनाभर अशेच पोस्ट येऊ दया आता... :D
ReplyDeleteरोहन, कसा बरोबर डाव साधला?:D तू तिकडे आम्हाला सोडून हादडलेस ना? वर आता जळवशीलही.... म्हणून आधीच.... हा..हा....
ReplyDeleteस्वत: स्वत:वर अन्याय का करावा?? म्हणून मीही भरल्या पोटी पाहातेय...आणि तसंही तन्वी आणि मी किचन तुझ्या ताब्यात दिलंय त्यामुळे प्रॅक्टिस करुन घे मग आम्ही आहोतच चापायला...
ReplyDeleteअपर्णा, तुझा निषेध.... :P. तुझ्यासाठी खास केले आणि तू आत्ता पाहतेस म्हणजे...... :(
ReplyDeleteआज दिवसभर हक्का नुडल्स चा वास घुमतोय नाकात आणि डोक्यात.... :D तुमच्या व्हेज मंचूरियनचा प्रभाव दिसतोय. हेहे.. ५०वी खाऊगल्ली पोस्ट. अभिनंदन.. :)
ReplyDeleteरोहन, खरंच की.... माझ्या लक्षातच आले नव्हते. :) आम्ही मुंबई विमानळावर उतरलो की शोमू पाचपाखडीचा शिवसागर आहे ना.. त्याला फोन करून हाका न्युडल्सचे पार्सल तयार ठेवायला सांगतो. इतक्या प्रवासानंतरही ते घेतल्याशिवाय घर गाठता येत नाही...:D. आत्ताच १३ तास ड्राईव्ह करून शोमूला स्प्रिंगब्रेक साठी घेऊन आलोय... त्याला तुझी कमेंट वाचून दाखवली आणि पायावर धोंडा पाडून घेतलाय.... हा..हा...
ReplyDeleteह्यावेळी आल्यावर फोन करायची गरज नाही... मीच फोन करून हाका न्युडल्सचे पार्सल तयार ठेवायला सांगतो. बास कधी येताय ते कळवा... :D
ReplyDeleteरोहन, धन्स रे.पाहुया कधी योग येतो ते...आणि नेमका तू असायला हवास ना आपल्या गल्लीत... :)
ReplyDeleteअरे वा! मी मांच्युरियनचीच रेसिपी शोधत होते कालपासून... विकांताचा मेन्यु म्हणून....
ReplyDeletethank you.
प्रज्ञा, ब्लॉगवर स्वागत आहे. :) जमले आणि आवडले का ते कळव गं. मला खात्री आहे नक्कीच जमेल.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल आभार!