त्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........
पुढे........
या चिडवाचिडवीमुळे साहेबांना फार काही सांगावेच लागले नाही. साडेचार होऊन गेलेच होते. त्यांनी हसत परवानगी दिली तसे पटकन प्रसाधन गृहात जाऊन तोंड धुऊन हलकासा पावडरचा हात फिरवून फ्रेश होऊन शमाने पाचला ऑफिस सोडले. चांगला दीड तास आहे अजून..... सहज पोचून जाऊ आपण. अभी तसा शहाणा आहे. नेहमी वेळेवरच येतो. असे बसस्टॉपवर एकट्या मुलीने वाट पाहत उभे राहणे म्हणजे किती दिव्य आहे......... नेमक्या मेल्या बसस्टॉपवरच्या सगळ्या नंबरच्या बसेसनाही अगदी उत येतो अशावेळी. लागोपाठ येतच राहतात..... आणि मग सगळे टकमका पाहत बसतात.
असे झाले की वाटते, नकोच ते भेटणे.... कोणीतरी घरी जाऊन चुगलखोरी करायचे. सारखी छातीत धडधड. आईला माहीत असले तरी कधी आणि कुठे भेटतोय याचा हिशेब थोडाच ना देतेय मी...... बुरखावाल्यांचे बरे आहे नाही..... निदान तेवढा तरी फायदा बुरख्याचा......... " अचानक बसला जोरात ब्रेक लागला तशी शमा भानावर आली. आत्ता या क्षणाला अभीशी बोलायलाच हवे या अनावर ऊर्मीने तिने पर्स मधून सेल काढला. अभीचा नंबर लावला...... तिच्या लाडक्या गाण्याचे सूर ओघळू लागले....... रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन....... अभी, अभी... घे ना रे फोन..... आज, आत्ता या क्षणी मला तुझा आवाज ऐकायचा आहे. हा आपला क्षण तुझ्याबरोबर पुन्हा अनुभवायचा आहे....... अभी..... सूर संपले..... सेलचा नेहमीचा मेसेज वाजू लागला तसे तिने चिडचिडून फोनचा गळा दाबला. अभी कुठे आहेस रे तू.......... काळाच्या ओघात तूही हरवून जावेस..... बस तोवर प्रियदर्शनीला पोहोचली होती. तिच्या सीटला काहीसे खेटूनच कोणी उभे होते. त्याची कटकट होऊन तिने वर पाहिले, तर बुरखावालीच होती.......... तिला हसूच आले. नकळत शमा पुन्हा भूतकाळात रममाण झाली.
आजची त्यांची भेट शमेसाठी खासंखास होती. गेल्याच आठवड्यात- रवीवारी, दोघांच्याही घरचे भेटले होते. लग्नाची बोलणी सुरू झाली होती. साखरपुड्याची तारीखही जवळपास निश्चित झाली होती. त्यामुळे आज कसे अगदी, सीना तानके भेटता येणार होते. उगाच कोणी पाहील का.... ची भिती नाही की उशीर झाला म्हणून, आई ओरडेल ची चिंता नाही. आज अगदी राजरोसपणे सगळ्यांना सांगून-सवरून ते दोघे भेटणार होते. एकदम वेगळेच फिलिंग आलेले. तिला आठवले....... रवीवारी निघताना अभी म्हणाला होता, " शमे, पुढच्या भेटीत तुझ्यासाठी मस्त साडी घेऊ गं. आपल्या या भेटीची खास आठवण राहायला हवी. " आनंदातच शमेने आईला फोन करून भरभर सगळे सांगितले. अभी येईल गं मला घरी सोडायला.... तेव्हां उशीर झाला तरी तू मुळीच काळजी करू नकोस असेही वर सांगून तिने फोन ठेवला आणि निघाली. बसही पटकन मिळाली आणि चक्क खिडकीही मिळाली. आज सगळेच कसे मनासारखे घडतेय नं असे म्हणत आनंद स्वरातून ओघळत, गुणगुणत राहिली.
बरोब्बर सहा पंचविसाला सायन हॉस्पिटलपाशी बस पोहोचली. शमा पटकन उतरली. उतरतानाच तिची नजर अभीला शोधत भिरभिरली........ हे काय....... हा अजून पोहोचलाच नाही का? बास का महाराजा........ म्हणे मी तुझी वाट पाहत असेनच........ बस गेली तशी बसस्टॉप जरासा निवांत झाला. शमेने आजूबाजूला नजर टाकली पण कुठेही अभी दिसेना. मन थोडे खट्टू झाले खरे...... पण मान उडवून तिने नाराजी झटकली. येईलच दोन-पाच मिनिटात. खरे तर त्याला कधीच उशीर होत नाही. नेहमी आपली वाट पाहत असतो. तेव्हां आजच्या उशीराचा उगाच बाऊ नको करायला. फार तर काय एखादी बस येईल आणि लोकं पाहतील....... इथे चांगल्या चार पाच नंबरांच्या बसेस येतात. तुमची बस नकोय मला....., स्वत:शीच ती बडबडत होती. नजर मात्र अभीची चाहूल घेत राहिली. बरे फोनवर अभीने अमुक एका नंबरच्या बस स्टॉपवर असेही म्हटले नव्हते..... तसाही इथे हे लागून दोनच तर बस स्टॉप आहेत. म्हणजे कुठेही तो असला तरी मला दिसेलच की. येईलच इतक्यात.......
पंधरा मिनिटे झाली..... अभीचा पत्ताच नाही. नेमके शेवटच्या मिनिटाला काहीतरी काम आले असेल....... ट्रेन चुकली असेल....... सायन स्टेशनवरून चालत येईल ना तो...... जरा लांबच आहे तसे इथून..... अर्धा तास...... पाहता पाहता साडेसात वाजले. आता मात्र शमेचा धीर खचला...... डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले. नेमके आजच अभीने न यावे...... का? बरा असेल ना तो? अपघात .... काही बरेवाईट तर घडले नसेल नं...... अग आईगं....... छे! काहीतरीच..... हे काय वेड्यासारखे विचार करतेय मी........ इथे जवळपास कुठेही पब्लिक फोनही नाही. नाहीतर निदान त्याच्या घरी तरी फोन केला असता. रडवेली होऊन शमा अजून पंधरा मिनिटे थांबली...... अभी आलाच नाही. हळूहळू कुठेतरी रागही आलेला होताच........ आता तर ती जामच उखडली. दुष्ट कुठला........ आता पुन्हा भेटायला बोलाव तर मला...... मुळीच येणार नाही मी. किती आनंदात होते आज ......... छानशी साडी घेऊ, मस्त काहीतरी चटकमटक चापू...... मधूनच हात हातात घेऊन रस्त्यातून चालू...... सगळे मांडे मनातच राहिले...... गालावर खळकन अश्रू ओघळले तशी ते पुसून टाकत, घरी जावे असा विचार करून ती निघाली.
रोड क्रॉस करून समोर जावे लागणार होते...... तिथून बस घेऊन घरी....... गाड्या जाईतो थांबावे लागले तेव्हां सहजच तिची नजर सायन हॉस्पिटलच्या गेटकडे आणि बसस्टॉपकडे गेली. हे सायन हॉस्पिटलचे इकडून पहिले गेट आणि पहिला बस स्टॉप असला तरी हॉस्पिटलचे दुसरे गेट आहेच आणि तिथेही बसस्टॉप आहेतच की. घातला वाटते मी घोळ......... अक्षरशः पळतच ती निघाली. जेमतेम पंधरावीस पावले गेली असेल तोच समोरून घाईघाईने येणारा अभी तिला दिसला. चेहरा चांगलाच तापलेला होता..... तिच्याकडे लक्ष गेले आणि तो तटकन तिथेच थांबला. भर्रर्रकन शमेने त्याला गाठले...... जणूकाही आता पुन्हा तो गायबच होणार होता. त्याला काही बोलायची संधी न देताच, " अभी, अरे किती हा उशीर केलास तू? बरोब्बर सहावीसला मी पोहोचलेय इथे. तेव्हांपासून तुझी वाट पाहतेय. तुला यायला जमणार नव्हते तर कशाला बोलावलेस मला........ सव्वा तास मी एकटी इतक्या नजरा आणि लोकांचे शोधक प्रश्न झेलत कशी उभी होते ते मलाच माहीत. " असे म्हणताना पुन्हा तिचे डोळे त्या जीवघेण्या वाट पाहण्याच्या आठवणीने भरले आणि ती मुसमुसू लागली.

तोवर दोघांनाही काय घोळ झाला होता हे लक्षात आलेच होते. चूक कोणाचीच नव्हती. आता अजून वेळ फुकट घालवण्याचा मूर्खपणा तरी नको असे म्हणून अभीने टॅक्सी थांबवली. दोघे बसून टॅक्सी निघताच तिचे डोळे पुसून तिच्या टपलीत मारत अभी म्हणाला, " पुढच्या वेळी अगदी रेखांश अक्षांशही सांगेन, आजूबाजूला असलेल्या दुकानाच्या पाट्या- खुणाही सांगेन. म्हणजे आमच्या महामायेच्या कोपाला निमित्त नको मिळायला...... ये पण तू कसली गोड दिसत होतीस गं.... खास करून मुसमुसताना पुढे काढलेले ओठ..... मला तर हा एपिसोड परत पण आवडेल........ " तसे खुदकन हसत शमा म्हणाली, " हे रे काय अभी....... आम्ही नाही जा....... त्यासाठी इतका वेळ एकटीने उभे राहायची माझी तयारी नाही. आज माझी मुळीच चूक नाहीये आणि काय रे शहाण्या, इतका वेळ तिथे माझी वाट पाहात उभे राहण्यापेक्षा आधीच का नाही मला पाहायला आलास...... हा सारा वेळ फुकट गेलाच नसता.... तू पण ना....... जरा लेटच आहेस.... "
उशीर होऊनही प्लाझाच्या समोरच्या रेमंडस व इतरही काही कंपनीचा माल असलेल्या दुकानातून अभीने शमेला चामुंडा सिल्कची सुंदर साडी घेतली. शमा तर हरखूनच गेली होती. चांगली साडेपाचशेची साडी होती. त्यावेळेच्या मानाने भारीच होती. तिचा पगार मुळी साडेआठशे होता. नुसती किमतीने महाग म्हणून नाही पण खरेच अप्रतिम साडी होती. मग दोघांनी जिप्सीत मस्त हादडले आणि दहाच्या आसपास दोघे घरी पोचली. आई-बाबा जरासे चिंतेत वाटले तरी त्या दोघांना पाहताच एकदम खूश झाले. कॉफी घेऊन अभी गेला. कितीतरी वेळ ती आईला साडी दाखवून दाखवून आपल्याच नादात बडबडत होती........
" अहो बाई, तुम्हाला गरोडीयला उतरायचेय ना........ मग उठा की आता........ ग्लास फॅक्टरीपासून हाका देतोय..... पण तुमचे लक्षच नाही...... " कंडक्टर तिला हाका मारत होता...... त्याला थॅंक्स म्हणत ती पटकन उठली...... उतरली. जणू काही बावीस-तेवीस वर्षांपूर्वीची अल्लड-अवखळ शमाच उतरली होती. मनाने पुन्हा एकवार ती ते सगळे क्षण-वैताग-आनंद तसाच्या तसा जगली होती. अभीला विचारायलाच हवे आज....... माझा पूर्वीचा अभी कुठे हरवलाय........... सारखे काम काम....... वेडा झालाय अगदी. कुठेही लक्ष नाही...... थट्टा नाही की रोमांन्सही नाही. पाहावे तेव्हां क्लाएंट, प्रपोजल आणि टूर्स यात अडकलेला. एखादे प्रपोजल फिसकटले की आठवडाभर घर डोक्यावर घेतोय...... पण, आयुष्य चाललेय हातातून निसटून त्याचे काही नाही. किती बदलला आहेस अभी तू......... ते काही नाही. आज लेकही गेलाय मित्राकडे स्लिप ओव्हरला...... फक्त तू आणि मी, मस्त कॅंडल लाइट डिनर करू आणि दोघे मिळून सायनच्या बस स्टॉपवर उभ्या असलेल्या त्या शमा-अभीमध्ये विरघळून जाऊ........... असे मनाशी ठरवत सोसायटीच्या गेटच्या दिशेने ती भरभर चालू लागली...........
समाप्त....
.
