जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, February 19, 2011

आभार्स ! ! !

" ब्लॉगबाळ " काल दोन वर्षांचं झालं. याचा वाढदिवस असणं आणि नेमकं त्याचवेळी मी प्रवासास जाणं, हा योगायोग दोन्ही वेळी झाला. गंमतच आहे. काल पोस्ट टाकणे अशक्यच होते. पण माझ्या मैत्रिणीने ' उमाने ' खास लक्षात ठेवून शुभेच्छा व केक बझवर टाकला. खूप खूप आभार्स बयो! जी खूश हो गया!!

आजकाल वाढदिवस या शब्दानेच मला कापरे भरते. मेली ' कशाकशाची ' जाणीव ठळकपणे होते. आत्ता आत्ता पर्यंत आरशात पाहून, नटणे-मुरडणे, गिरक्या मारणे, स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडणे, ( हे लिहिता क्षणीच... , " खर्रच?? वेडपट कुठली... असे स्वतःलाच म्हणत काढलेली मोठ्ठी जीभ..... " ) प्रकार सुरू होते. आता किती जमेस धरता येईल चा हिशोब आणि आरशापासून लांब लांब पळावेच्या स्थितीशी मन रेंगाळू लागलेय. असेही, " म्हातारे जरा धडपड कमी कर " म्हणत तन्वी, अंमळ दमात घेत असतेच. तरीही या बाळाच्या वाढदिवसाची दखल घ्यायला हवीच. काहीसे उदास, व्याकुळ झालेले मन याच्या आगमनाने, चहलपहलीने भरून टाकले. सदैव माणसांच्या गर्दीत रमणारी मी, अलिप्त, शून्यवत होत चालले होते. या बाळाने चैतन्य फुंकले. एक अनामिक ओढ निर्माण केली. ' वैयक्तिक आनंद ' मिळवून दिला.

आपण सगळीच कुटुंबासाठी जगतो, झटतो. त्यांच्या सुखात आपले सुखं पाहतो. कित्येक प्रसंगी स्वतःला बाजूला सारून इतरांना प्राधान्य देतो. ती क्रिया इतकी सहज व प्रेमाने केलेली असते की तिला त्यागाचे लेबल जोडावेसे वाटतच नाही. आपण हे असेच केले पाहिजे, ही भावना गृहीत असते. हा सारा पसारा आपण स्वतःला विरघळून टाकून जपलाच पाहिजे हे जितके खरे तितकेच, स्वतःचे जग - अस्तित्व, असणेही गरजेचे. जे मनात येईल ते न संकोचता, खाडाखोड न करता, बेगडीपणा, मुखवटे न चढवता व्यक्त होण्याची गरज. मनाचे कोंडलेपण मोकळे करण्याची गरज. त्यातूनच शब्दांचे पूल बांधत उमलत जाणारा संवाद, ' स्व ' अस्तित्वासाठी अपरिहार्य!

गेली काही वर्षे प्रत्यक्षात तशी मी एकटीच झालेय. आधीचे प्रचंड गोत जुन्या गावीच राहिले. जीवनचक्रानुसार वाहते पाणी बनावेच लागते. मायदेश सुटला... इथे येऊन रुजवलेले बंधही अंतरांच्या परिमाणात दुरावले.... चालायचेच! वर्षातले सात महिने थंडी व पाच महिने तब्येतीत लाड करून घेणारे हिमं, यांच्या सोबतीत जिवंतपणाची लक्षणे गोठायला लागलीत की काय असा प्रश्न वारंवार पडू लागला. मनात नेहमीच अनेक विषय, आठवणी, माणसे, प्रसंग, फेर धरून असतातच. ऊन पावसाचा खेळ सततचा व आवडीचाही. डायरीची अखंड आराधना. ते पृष्ठावर आलेले भाव रिते केल्याशिवाय मन शांत होईना झालेले. तश्यांत या एकटेपणात तुटलेपणाची भावना तीव्र बळावत चाललेली. संवाद खुंटायला लागलेला. अन अचानक एके दिवशी अरुणदादा रोहिणीच्या बोलण्यातून हे विश्व गवसले. त्यांचे ऋण कायमचेच.

मनाला जिवंत ठेवणारी एक ओघवती वाट सुरू झाली. आपल्या समोर प्रत्येक गोष्ट येईलच असे नसतेच. पेपर, बातम्या यातूनही अनेक घटना नजरेतून सुटतात, वाचायच्या राहून जातात. या ब्लॉगविश्वामुळे त्याची नोंद मिळू लागली. राजकारण, समाजकारण, आनुषंगिक चर्चा, संवाद, वादविवाद, मायदेश व देशोदेशीचे पर्यटन, अतिशय तरल भावानुभव देणारे ललित, निरनिराळ्या विषयांना समर्थपणे हाताळत लिहिलेल्या उत्तमोत्तम कथा, नेमक्या भावना भिडवणाऱ्या कविता, आवडीची खादाडी व त्यांची रसभरित वर्णने, फोटू.... अश्या अनेकविध अंगांनी काही वर्षे अडखळत सुरू असलेला हा प्रवास पुन्हा प्रवाहित झाला. अर्थात हे सारे इंटरनेट कृपेनेच शक्य झाले.

अगदी सहज म्हणून सुरू केलेला ब्लॉग दोन वर्षे टिकलाय याचा खूप आन्ंद आहे. सातत्य पहिल्या वर्षाइतके नसले तरी हुरूप तितकाच आहे. गेल्या दोन वर्षातील या लेखन प्रवासाने मला खूप आनंद दिला. अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या. निःस्वार्थी प्रेम करणारे प्रचंड गोत दिले. दोन दिवसांपूर्वीच राजीव ( श्री. फळणीटकर ) यांच्याशी बोलता बोलता किती वाजलेत हा विषय येताच चटकन तुमचे इतके वाजलेत ना? असे म्हणताच, ते किंचित चकित झाले. मायदेशाचे वेळेचे गणित चटदिशी सांगता येईलच पण या ब्लॉगमैत्रीमुळे चक्क देशोदेशीच्या टाईमझोनचे कोष्टक मनात पक्के गिरवले गेले. विचार करावाच लागत नाही या वेळेच्या गणिताचा. काश, शाळेत असताना हे साधले असते....

रोहन मुळे कित्येक वर्षांनी , ' तिकोना गडाचा ' ट्रेक करता आला. तो आनंद अवर्णनीयच! महेंद्रच्या सततच्या प्रोत्साहनामुळे लिहिते राहण्याचे बळ मिळत गेले. च्यामारिकेत दोन टोकाच्या ठिकाणी असूनही हेरंबअपर्णा या दोघांसमवेत चालणारा रोजचा हल्लागुल्ला अपरिहार्य बनला. या दोन वर्षात अनेक बंध जुळले, त्यांनी सातत्याने व भरभरून प्रेम दिले, जीव लावला. कित्येक वाचकांनी अतिशय नियमीतपणे नोंद घेऊन आवर्जून ती पत्राद्वारे, अभिप्रायाद्वारे पोचवली. त्यातून पांढऱ्यावर काळे उमटवत राहण्याची ऊर्मी बळावत गेली. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार! नेटभेट भुंगाचे आभार्स! दीपक, जवळजवळ नऊ हजार डाऊनलोडस झालेत!! खूप खूप आनंद मिळवून दिलास. धन्यू रे! कांचनने, ' मोगरा फुलला ' च्या दिवाळी अंकात संपादकीय लुडबुडायला दिले. धन्यू गं. अजून बरेच जण आहेत.... पण....

तीस सेकंदाची वेळ कधीचीच संपलिये. ' आवरा ' चे संगीत लाउड लाउड होत चाललेय. तेव्हां आता कलटी मारावी. काट्याला काट्याने मारावे तसे म्हणत हिमाला बदाम कुल्फीने हुडहुडी भरवतेय. आपापल्या भौगोलिक क्षेत्रानुसार कुठे कुडकुडत तर कुठे घामाच्या धारांसोबत ती यथेच्छ हाणा.


36 comments:

  1. ब्लॉगबाळाला वादिहाहाशु !!!

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.. त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा.. अशा 'अनेकवार' शुभेच्छा देण्याची वेळ आमच्यावर 'वारंवार' येवो :)

    >> पेपर, बातम्या यातूनही अनेक घटना नजरेतून सुटतात, वाचायच्या राहून जातात. या ब्लॉगविश्वामुळे त्याची नोंद मिळू लागली

    अगदी अगदी. असंच होतं कित्येकदा.. पण ब्लॉग्जमुळे अपडेटेड राहतो.

    जाताजाता (मुद्दाम) हळूच कुल्फी टाकल्याबद्दल सौम्य णी शे ढ.. (वादि आहे म्हणून सौम्य)

    मंगळवारी भेटूच पुन्हा हल्लागुल्ला करायला ;)

    ReplyDelete
  2. हेरंब, अनेक धन्यवाद. :)
    किती दिवसात खादाडी नाही झाली ना, म्हणून... ;)

    ReplyDelete
  3. श्रीताई, ब्लॉगबाळ आणि आई दोघांच त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा..

    अग हल्लागुल्ला आहे म्हणून तर हा हिवाळा सुसह्य झाला त्यामुळे तुझे हाबार्स...

    काय योगायोग आहे बघ तू पोस्ट टाकतेस का हे पाहता पाहता मी तुझ्या ब्लॉगवरची भगरीची खिचडी कधीपासून पेंडिंग होती ती केली आणि मस्त जमली...तेवढ ती कुल्फी मिळाली असती तर बरं झालं असतं ..आज इथे चक्क जवळपास कुल्फी वेदर पण होतं......:)

    हा ब्लॉग असेच अनेकानेक वादी साजरे करो...पुढच्या वेळी हवं तर माझ्याकडे साजरा करूया.......:P

    ReplyDelete
  4. ए तु नेहमी दोनदोनच का फ़ोटुज टाकते गो...एव्हड्या तुझ्या चाहत्यांना कसे पुरणार् गो...पुणेरीपणा दाखवणे तोही नको तिथे जरुरी आहे का??
    जरा दिल् खोलके लिखति हो..वैसे कुछ दिया कर् ना..इतके टेम्प्टिन्ग् कुल्फ़ी अन् त्याही दोनच्?? ...कहर् गो बाई कहर् !!!..

    ReplyDelete
  5. बाकी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा....

    ReplyDelete
  6. :) शुभेच्छा गं!!!! मस्त!! दोन वर्षाचं बाळ अगदी दुडूदुडू धावतंय!! :)
    पोस्ट सुंदर झालेली आहे....पटली पटली! :)

    ReplyDelete
  7. य्ये बायो... :)
    अनेक अनेक शुभेच्छा आणि त्रिवार अभिनंदन गं बयो... लिहीत रहा... :)

    कुल्फीबद्दल नो निषेध... उलट फर्माईश पुरी केल्याबद्दल आभार!! :)

    ReplyDelete
  8. अपर्णा, खूप खूप धन्यू गं. खरेच बाई, त्यामुळेच हिवाळा सोसवतोय. :D अरे वा! भगरीची खिचडी! :)

    ReplyDelete
  9. उमा, अगं त्या प्लेटमध्ये उगाच गचडी नको म्हणून... तर तू लगेच पुणेकरांवर घसरलीस, :D. असा नगरी नगरी भेदाभेद नक्को करू जी! आधीच तुझं माझं नी हैराण जीवन... :P

    आधी हाणून मग शुभेच्छा काय गो बये??? कहर आहे कहर नुसता... हा हा. आभार्स गं! :)

    ReplyDelete
  10. अनघा, अनेक धन्यवाद! तुला पोस्ट पटली, आजचा उरलेला दिवस मस्त जाणार. :)

    ReplyDelete
  11. तन्वी, थांकू थांकू! चटकमटक काहितरी टाकणार होते पण वादि म्हणजे गोडधोड... समीकरण फिट बसलेय ना खोपडीत... :D :D

    ReplyDelete
  12. श्रीताई अभिनंदन... खूप खूप शुभेच्छा !!

    ReplyDelete
  13. धन्यवाद सुहास. :)

    ReplyDelete
  14. श्रीताई अभिनंदन... असेच जबरी लिहीत जा...

    ReplyDelete
  15. श्री,
    ब्लॉगबाळाचं आणि तुझंही अभिनंदन. माझा उल्लेख तू प्रेमाने केलास खरा पण जर संकोचल्यासारखं झालं. मी केवळ एक सूचना केली पण तू ती बहराला आणलीस. तू राखलेलं वैविध्य आणि जपलेलं सातत्य पाहून थक्क झालो. मला मागे टाकून तू खूप खूप पुढे गेलीस याचा मला जो आनंद वाटतोय तो शब्दात मावणार नाही.पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुलेशु.

    अरुणदादा

    ReplyDelete
  16. धन्यवाद आनंद. :)

    ReplyDelete
  17. अरुणदादा, अनेक आभार्स! :)

    ReplyDelete
  18. अभिनंदन!!! त्रिवार अभिनंदन!!!
    खरं म्हणजे इतके दिवस सातत्याने लिहित रहाणे पण काही सोपे नाही आणि ते तू साधलंस.. आपल्या पूर्वी सुरु झालेले अनेक चांगले ब्लॉग्ज आता एकही पोस्ट नसल्याने मृतवत झालेले आहेत, त्यामानाने आपल्या काळातले ब्लॉगर्स बऱ्यापैकी ऍक्टीव्ह आहेत . ( तन्वी, तू, हेरंब, विभी, सुहास , अपर्णा वगैरे वगैरे.. ) लिहित राहा आम्ही वाचायला आहोतच... :)

    ReplyDelete
  19. अनेक धन्यवाद महेंद्र! तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे अजूनही उत्साह टिकून आहे. :)

    ReplyDelete
  20. ब्लॉगबाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! असाच मोठ्ठा हो!
    आणि ब्लॉगमातेचं अभिनंदन!

    ReplyDelete
  21. श्रीताई अभिनंदन..ब्लॉगबाळाला वादिहाहाशु !!!

    ReplyDelete
  22. वाढदिवसाच्या दिवशीच तुमच्या ब्लॉगबाळाची ओळख झाली. खूप खूप शुभेच्छा..

    ReplyDelete
  23. ताई अभिनंदन,
    आमची बाळाशी आताशी तर ओळख होतेय.बाळाला अजुन बरच मोठठ् झालेल पाहायचय.अनेक शुभेच्छा..

    ReplyDelete
  24. भाग्यश्री, अभिनंदन गं! अनघा म्हणाली तसं बाळ खरंच दुडूदुडू धावू लागलंय... दिसायला तर गोंडस आहेच :)

    ReplyDelete
  25. गौराई, आभार्स गं! :)

    ReplyDelete
  26. योमू, अनेक धन्यवाद! :)

    ReplyDelete
  27. मेघना, माझ्या घरी तुझे मन:पूर्वक स्वागत व अनेक आभार! :)

    ReplyDelete
  28. रोहित, शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक आभार. :)

    ReplyDelete
  29. श्रीराज, धन्यू धन्यू रे! :)

    ReplyDelete
  30. धन्यवाद, BinaryBandya. :)

    ReplyDelete
  31. ताई,
    तुझ्या ब्लॉगबाळाला अन त्या ब्लॉगबाळाच्या वाढदिवसाबद्दल तुला, खूप खूप शुभेच्छा गं!
    आमचं जग असंच समृद्ध करत राहा! :)

    ReplyDelete
  32. वाह वाह... असंख्य शुभेच्छा :)

    ReplyDelete
  33. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  34. विद्या, शुभेच्छांसाठी अनेक धन्यवाद! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !