जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, July 2, 2009

ये रे माझ्या मागल्या.....

कधी कधी माणसाने कितीही प्रयत्न केला तरीही त्याचे लक जर साथ देत नसेल तर त्या प्रयत्नांचे फळ मिळतच नाही. विशेषतः धंद्याच्या बाबतीत ह्याचा अनुभव प्रकर्षाने येतो. अनेक वेळा आपण पाहतो एखादी जागा..... उदा द्यायचे तर ठाण्याच्या गोखले रोडवर नातू हॉस्पिटल( आईस फॅक्टरी) च्या गल्लीच्या तोंडाशी डाव्या हाताला मेडिकल स्टोअर आहे, ते गेली अनेक वर्षे यशस्विरीत्या टिकून आहे. परंतू उजव्या हाताला असलेल्या दुकानाने किती प्रकारे कात टाकली पण काही केल्या जम बसला नाही. ९१ पासून मी पाहतेय.... आधीचे मला माहीत नाही. अनेक प्रकारच्या मालाने जागा घेऊन झाली. कधी पर्स-पाकिटे- चामड्याच्या अनेकविध वस्तू, कधी चप्पल-बूट, कधी फक्त लहान मुलांचे कपडे तर कधी साड्या, फक्त पुरषांचे कपडे, स्टेशनरी, कधी रेडिओ-सेलफोन्स- तत्सम इलेक्ट्रॉनिक्स वस्तू.... अगणित प्रकारे दुकान यशस्वी करण्याचा प्रयत्न झाला....... म्हणावे तसे यश लाभत नाही. शेजारची सगळी दुकाने यथास्थित...... अव्याहत सुरू आहेत, मग असे का होतेय? उत्तर सापडत नाही..... मात्र एक प्रशंसनीय बाब म्हणजे त्याने प्रयत्न सोडलेला नाही. लवकरच कुठल्या न कुठल्या धंद्यात यश मिळू दे... .


हे झाले कुठलाही धंदा नेमके यश देत नसल्याचे उदा. दुसरे म्हणजे कितीही प्रयत्न केला तरीही मूळ धंदा तुम्हाला सोडतच नाही हे. आम्ही जेव्हा दादर-नायगाव च्या मध्यात राहत होतो तेव्हा केशरबागची गल्ली सोडून पुढे गेलो की एक डेड एन्ड असलेला गोल फिरून गेलेला रस्ता आहे. ( कल्डीसॅक सारखा) त्या गोलात एका सिंधी माणसाचे दुकान होते. रस्त्याला चढ असल्याने दुकानात जाण्यासाठी किमान सात-आठ पायऱ्या चढाव्या लागत. माझ्या आठवणीत( बहुतेक मी दुसरी-तिसरीत असेन) हे दुकान वडा-पाव, निरनिराळे भजी प्रकार, शेव, फाफडा...... याचे होते. हा सिंधीबाबा चांगला गोलमटोल-उंच होता. प्रचंड मोठ्या कढई समोर रिकामा तेलाचा मोठा डबा पालथा घालून त्यावर बसून कायम तळतानाच दिसे. तळणीच्या धगीने नुसता लालेलाल झालेला असे. दुकानात एक छोटा मुलगा लोकांना पदार्थ द्यायला ठेवलेला होता. याचा वडापाव संपूर्ण एरियात अत्यंत फ़ेमस होता. दुकानात कायम प्रचंड गर्दी. अगदी भर पावसातही छत्र्या घेऊन लोक पायऱ्यांवर रांग लावून शांतपणे उभे असत. एकदम मितभाषी, हसतमुख, जिंदादील मनुष्य. गिऱ्हाईकांचा ओघ इतका होता की हा सकाळपासून रात्रीपर्यंत तळणीवरच बसलेला असे.......बिचारा दमून जाई पण लोक उभेच. अशीच पाचसहा वर्षे गेली.

एक दिवस झटका आल्यासारखे त्याने वडापावाला रामराम ठोकला आणि टॉवेल-पंचे, पायपुसणी, चादरी... इत्यादीचे दुकान टाकले. वडापाव घ्यायला आलेले लोक एकदम बावचळले. हे काय नवीनच खूळ घेतले याने..... आता इतके चांगले पदार्थ कुठे मिळतील, चांगले चालणारे दुकान वेड्याने असे का बंद करून टाकले...... याची चर्चा करत आठ दिवसात लोक याला संपूर्ण विसरले. याने मांडलेल्या टॉवेल-चादरींकडे कोणीही ढुंकूनही पाहिले नाही. असेच जवळजवळ दोन महिने गेले. पुन्हा एकदा दुकानाने कात टाकली आणि याने साबणाचा धंदा मांडला. कपड्यांचा साबण ....लाईफबॉयचा कीस, चुरा..... घरगुती साबण, सर्फ इत्यादी चांगल्या कंपन्यांचेही प्रॉडक्ट ठेवले. भांड्यांचे साबण, सुवासिक साबण, अनेकविध आकारांचे लहान मुलांना आकर्षीत करतील असे साबण आणि मेणबत्त्यांचे बरेच आकार व रंग...... पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तुरळक ओळखीचे लोक थोडेफार खरेदीला येत. एरवी तो आणि कामाला असलेला पोरगा दिवसभर माश्या मारत बसत. हा वैतागला. पण अजूनही उमेद टिकून होती.

पुन्हा एकदा झडझडून कामाला लागला अन तेलाचे दुकान .... ̱घाणी टाकली. अनेक प्रकारची तेले ठेवली. वरच्या दोन धंद्यापेक्षा थोडी परिस्थिती बरी होती. अडले पडले लोक येऊ लागले. एक दिवस आमची आई गेली तेल घ्यायला. तिने विचारले, बरे चाललेय ना? तसे म्हणाला, " बहेनजी, अहो ते वडे तळून तळून थकलो पार. कंटाळलो, म्हणून दुसरे काय करता येईल पाहतोय. पण जम काही बसत नाही. " आईने त्याला बसेल रे धीर नको सोडू असे सांगितले खरे पण काय कोण जाणे तो आणि वडा-पाव याव्यतिरिक्त कुठलेही समीकरण जमेचना. शेवटी हाही धंदा बंद झाला. मग त्याने गूळ, साखर, मीठ व सुकामेवा ( संपूर्ण किराणा सामान नाही ) असे दुकान सुरू केले. तेही अवघ्या महिनाभरात बंद पडले.

आमच्या गॅलरीतून याचे दुकान दिसत असे. एक दिवस सकाळी सकाळी आईने पाहिले तर याच्या दुकानापुढे भली मोठी रांग लागलेली. अजून मला आईच्या चेहऱ्यावरचे मिश्किल हसू आठवतेय...... तिने भावाच्या हातात पैसे ठेवले आणि सांगितले जा...... चार वडापाव आणि एक प्लेट भजी घेऊन ये.
भाऊ गेला.... आणि खरेच की सिंधीबाबा भल्या मोठ्या कढईसमोर बसून वडे तळत होता आणि पोरगा भराभर पुड्या बांधत होता. लोकं इतकी खूश झाली..... आला रे लाइनवर अशी चर्चा करत एकाच्या जागी दोनदोन वडापाव हाणत होती. बिचाऱ्याने जंगजंग पछाडले पण इतर कुठल्याही धंद्याने त्याला यश दिले नाही. शेवटी पुन्हा एकदा झारा हाती घेतला... आणि गर्दी आवरेना झाली. नंतर त्याने कधीही दुकान बदलण्याचा विचार स्वप्नातही केला नसावा........ .

12 comments:

  1. एकदम बरोबर मी सुद्धा काही वर्ष तिकडे वेगवेगळी दुकाने बघतोय पण तुम्ही म्हणताय त्या कोपऱ्यावर २-३ वर्ष झाली आता 'sorry madam' नावाचे कपड्यांचे दुकान आहे. चांगले चालते आहे. बाजुलाच त्याने आता 'sorry Sir' म्हणुन दुकान काढले आहे.

    बाकी हा सिंधीबाबा कुठे आहे जरा पत्ता नीट सांगा बरे ... वडे हाणून येतो पुढच्या वेळी ... हा हा ... !!!

    ReplyDelete
  2. हं खरंय..होत असं कधी कधी.... पण सगळ्याच गोष्टींचा कार्यकारण भाव नाही लक्षात येत आपल्या..काही वेळा जागाच लकी असते तर कधी कितीही जीव तोडून प्रयत्न केले तरी अपुरेच पडतात.

    ReplyDelete
  3. रोहन,बरे झाले तू सांगितलेस...असेच चांगले चालू दे त्याचे दुकान...:) सिंधीबाबाचे सुंदर वडे खाऊन मलाच तीस वर्षे झालीत...आता तो असेल नसेल...:( पण तू ये जाऊन, असलाच तर खूश होशील यात शंका नाही.
    आलास का?:)

    nimisha, अगदी खरं..... कार्यकारण भाव लक्षात येत नाही म्हणूनच तर त्रास होतो ना. आभार.

    ReplyDelete
  4. खरच आहे. प्रत्येक वेळी नशिब साथ देतचं असं नाही. पण जिथे प्रामाणिक प्रयत्न असतिल तिथे नशिबाची साथ जरुर मिळावी असे मनापासुन वाटते. बाकी हिंदी सिनेमात म्हणतात ना तसे 'बॅडलक ही खराब है' :) ... लेख नेहेमी प्रमाणेच छान झाला आहे.

    ReplyDelete
  5. हो ना गं रोहिणी. आता हेच बघ ना, रोहन म्हणाला की ते दुकान आता चांगल चालतयं...बरं वाटलं ऐकून.त्याच्या धडपडीचे फळ मिळाले. बाकी बॆडलकही खराब है... आवडीचे वाक्य. आभार.

    ReplyDelete
  6. haa sindhee sadhyaa beer aani itar wine haa dhandaa karat aahe.tyaachaa haa dhanda kasaa chaalato, te malaa maahit naahee.
    mangesh

    ReplyDelete
  7. अग रोहनची कमेंट वाचून एक मजेदार विचार डोक्यात आला....तो म्हणतोय की आता त्या जागी जे दुकान आहे ते चांगलं चाललंय्...त्या दुकानाचं नांवच बघ नं..."सॉरी मॅडम" - अग या दुकानदाराने जणू त्या जागी असलेल्या मूळ वास्तुदेवतेची जणु या नावांतून क्षमा मागितली आहे असं वाटतयं - "माते झालं गेलं माफ कर आणि मला आता धंद्यात यश मिळू दे"......आणि झाली ना ती प्रसन्न,हो नं?

    ReplyDelete
  8. होय एकडे मेक्सिकोला आलोय मी ... वडापावपासून सगळे मिस करतोय :( ... त्यात तुम्ही ह्या आशय पोस्ट ताकता ... :D मग काय होणार ... ;)

    ReplyDelete
  9. लेख छान जमलाय गं!!

    ReplyDelete
  10. त्याचे म्हणजे त्या जागेवरती ... मालक बदलले पण असतील ना ... असो असेच हटके टोपिक्स वर लिहित जा ... मज्जा येते वाचायला ..

    ReplyDelete
  11. nimisha,त्या दुकानदाराने वास्तुदेवतेची जणू क्षमाच मागितली आहे हा तुझा विचार मनापासून भावला.:)

    रोहन, अरे mannab म्हणतय की सिंधीबाबाने पुन्हा नवीन प्रयत्न सुरु केलाय....:( जाउ दे. तुझा फेरा वाचला.

    मुग्धा, mannab...... :)

    ReplyDelete
  12. 'sorry madam' हे mens store आहे ... आणि बाजूचे sorry sir हे women store ... माफ़ी वगैरे आहे की नाही काही माहीत नाही ... :D

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !