जाता जाता एक नजर इथेही........

Monday, January 25, 2010

चवळी - उसळ

जिन्नस

  • भिजलेल्या दोन वाटी चवळ्या.
  • एक चमचा जिरे, चार चमचे सुके खोबरे व दोन-तीन सुक्या लाल मिरच्या
  • चार-पाच अमसुले, दीड चमचा घाटी मसाला, चवीनुसार मीठ
  • चार चमचे तेल, फोडणी-नेहमीचीच ( मोहरी+हिंग+हळद व लाल तिखट-आवडीनुसार )
  • मूठभर कोथिंबीर बारीक चिरून

मार्गदर्शन

चवळी ( कडधान्य ) भाजी करण्याआधी आठ-दहा तास भिजत घालावे. चांगले भिजले की उपसून ठेवावे. पातेल्यात तेल घालून ते चांगले तापले की मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर भिजलेल्या चवळ्या टाकून परतावे. दोन भांडी पाणी घालून झाकून मध्यम आचेवर दहा मिनिटे शिजू द्यावे. एकीकडे खोबरे, जिरे व सुक्या मिरच्या भाजून वाटून घ्याव्यात. चांगली वाफ आली की झाकण काढून त्यात हा वाटलेला मसाला, लाल तिखट व अर्धी कोथिंबीर घालून पुन्हा पाच-सहा मिनिटे शिजू द्यावे. आता चवळ्या बोटचेप्या झाल्या असतील. त्यात चवीनुसार मीठ, आमसुले व घाटी मसाला व एक भांडे पाणी घालून एक सणसणीत उकळी आणून आचेवरून उतरवावे. वाढताना कोथिंबीर घालून गरम गरम वाढावी.

टीपा

चवळ्यांचा गाळ होईल इतक्या शिजवू नयेत. घाटी मसाला नसल्यास चार-पाच लसूण पाकळ्या ठेचून फोडणीत घालाव्यात. जिरे, खोबरे, मिरची बरोबरच अर्धा मध्यम कांदाही भाजून वाटून चवळीला लावावा. गूळ-साखर आवडत असल्यास घालावी. घालावयाची असल्यास, एक चमचा साखर/तीन मध्यम गुळाचे खडे घालावेत. वरून फोडणी आवडत असल्यास घालावी. त्याने उसळ अजूनच खमखमीत लागते. ही फोडणी करताना तीन चमचे तेलात मोहरी, हिंग व सुक्या मिरच्या घालाव्यात. हळद-तिखट घालू नये. सुक्या मिरच्या नसल्यास आच बंद करून नंतरच लाल तिखट घालावे. अन्यथा तिखट पटकन जळते.

8 comments:

  1. जिन्नस ... मार्गदर्शन ... टीपा .. निषेध ... काय हे?? हां... ज़रा १२ दिवस थांबा की ... :D

    नाहीतर पुढे काय होणार तुम्हाला माहीत आहेच ... गल्ली - गल्ली मे फिरता हु ... ;)

    ReplyDelete
  2. Ghati masala!! Vaaa... :) Mast disatey.

    ReplyDelete
  3. रोहन, गल्ली-गल्ली मे फिरता हु... हाहा... मजा येईल.

    ReplyDelete
  4. प्रभावित,Thanks to you....:)घाटी मसाला संपला की मग..... :(

    ReplyDelete
  5. होय मज्जा येइल... पाण तुम्ही आलात तर .. मी तर चाललो ३ विक्स मध्ये तिकडे ... :D

    ReplyDelete
  6. तशी माझं स्वयंपाकघरातलं ध्यान(???) सगळ्यांनाच माहित झालं असेल तरी मी अशा पाककृत्या का वाचते माहिते?? बोटचेप्या , सणसणीत , खमखमीत अशा चविष्ट शब्द फ़क्त याच पोस्टमध्ये भरभरून सापडतात ना? म्हणून...नाहीतर घरी ये स्वयंपाकघराला चावी नाहीचेय....:)

    ReplyDelete
  7. रोहन, कधीकधी ना मला हेवा वाटतो तुझा.:P
    मला पण जायचेयं लवकर.....:)

    ReplyDelete
  8. अपर्णा,तू पण ना..... :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !