जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, January 14, 2010

२५ डिसेंबर २००९, पहाटेचे तीन तास.......

संपूर्ण वर्षातून नाताळच्या सुटीतच फक्त लेक दोन आठवडे सलग राहत असल्याने दरवर्षी किमान हे दिवस तरी सगळ्यांनी एकत्र ट्रीपला जावे असा प्रयत्न गेली दोन वर्षे नेमाने करत आहोत. पण यावर्षी मनासारखे काहीच जमेना. कुठेच जाणे होणार नाही असे वाटत असतानाच शेवटी ठरले की सॅन फ्रॅन्सिस्कोला जायचे. परंतु हे बऱ्याच उशिरा ठरल्याने अस्मानात नेण्यासाठी विमानाच्या तिकिटांनी अस्मानाला भिडणारे दर दाखवून डिसेंबरच्या १५-२० फॅरनाईटमध्येही आम्हाला घाम फुटवला. शेवटी मी व नवरा डायरेक्ट विमानाने व लेक कनेक्शन घेऊन अशी तिकिटे कशीबशी मिळाली .

इतकाला दर देऊन लोकं जातातच कशी? शी बाई एकाही विमानात तीन जागा असू नयेत या माझ्या चिडचिडीवर नवऱ्याने, " आता तूही जात्येच आहेस ना. मग हेच वाक्य दुसरे कोणीतरी अगदी असेच बोलेल आणि चिडचिडेल ना. " ऐकवून अजूनच माझा पारा चढवला. पण त्याचे म्हणणे खरेच असल्याने उघडपणे मी काहीच दाखवले नाही.

लेकाच्या कानावर हा वेगवेगळ्या विमानांचा घोळ घालताच त्याने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने अगदी खालच्या आवाजात पण लगातार भुणभूण-सुतारपक्ष्यासारखे टोचणे सुरू केले. " ह्म्म्म.... स्वतः जा डायरेक्ट फ्लाईटने. मला मात्र तंगडवा. मी बसतो अटलांटा विमानतळावर तीन तास माश्या मारत. तुम्ही तिकडे पोचून मजा करा. वगैरे.... " हा आमचा सुतारपक्षी इतका टकटकला की शेवटी मला वाटू लागले काहीतरी घोळ होणारच आहे. हाहा..... त्यात भर म्हणजे तिथे मित्राला आम्हा दोघांना पिकअप करायला दोन वेळा यावे लागणार होते. मध्ये सहा तासाची गॅप होती. त्यामुळे तितका वेळ कुठे बरे काढता येईल याचीही बरीच चर्चा झाली. शेवटी तुम्ही पोचा तर मग पाहू काय करायचे असे ठरून आम्ही निघालो.

२५ डिसेंबराला शक्यतो कोणी प्रवास करत नाही असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे सुरक्षा तपासणी व चेक इन बॅग्ज करिताही फारशी गर्दी असणार नाही तेव्हा तुझ्या नेहमीच्या पद्धतीने झाडू मारण्यासाठी आपण पहाटेच्या पहिल्या प्रहरी विमानतळावर जाणार नाही आहोत असे नवरा व लेकाने जाहीर करून टाकलेले. माझ्या काळजात धडधड. २५ डिसेंबराला सगळेजण भरभरून गिफ्ट्स वाटणाऱ्या सँटाक्लॉजची वाट पाहत उबदार पांघरुणात गुडुप झालेले असतील आणि फक्त आपणच काय ते प्रवासाला निघालेले असू असा विचार अनेक जणांच्या मनात येऊ शकतो ना? मग ते अनेक जण नेमके पहाटे पहाटेच विमानतळावर अवतरले तर आपला ' अवतार ' अगदी फोटोजनीक होऊन जाईल. हा विचार मी बोलून दाखवायचा अवकाश शत्रुपक्षाने हल्ला चढवला. " अरे बाबा, हिला नेमक्या अशाच शंका कश्या येतात रे? आई तू बघच आता उद्या काय काय होते ते. मला एकट्याला पाकटवलेस ना आता मज्जा बघ. " सुतारपक्षी शापवाणी ऐकवून टकटकायचा थांबला होता.

नवरा व लेकाच्या जाहीरनाम्याला भीक न घालता मी दोघांनाही पहाटे साडेचारला उठवले व त्यांचे तांडव ऐकत एकदाचे आवरून आम्ही शार्प साडेपाचला घर सोडले तेव्हा कुठे माझा जीव किंचितसा थंडावला. विमानतळ तासभर अंतरावर आणि फ्लाईट ८. ५० व ९ ची म्हणजे आम्ही अगदी वेळेत होतो. दिनांक २५ डिसेंबर २००९, डेट्रॉईट विमानतळावरील मॅक्नमारा टर्मिनलवर आम्ही पहाटे ६. २० मिनिटांनी पोचलो.

मॅक्नमाराला आत शिरलो आणि संपूर्ण विमानतळच माझ्याभोवती गरगर फिरतोय की काय असे वाटू लागले. भूतो न भविष्यती इतकी गर्दी होती. मी नवरा व लेकाच्या चेहऱ्याकडे पाहिले तर, त्यांचे इतका वेळ हसरे-भंकस करणारे चेहरे हबकलेले. लेक आमची क्रेडिट कार्डे घेऊन बोर्डिंग पाससाठी सेल्फ मशीन वर पळाला. मी व नवरा चेक इन च्या भल्या मोठ्या लाईनीत उभे राहिलो. तोवर नवऱ्याने सुरू केलेले, " कशाला इतके सामान लागते तुला? काय दगड भरून आणलेत का बॅगेत? सुटसुटीतपणाचा फायदा कधी कळणार तुम्हा लोकांना..... " मी चूप . ऐकून घेणे भाग होते निदान त्यावेळी तरी. मनात म्हटले नंतर सांगते तुला बॅगेत दगड भरलेत का तुझे सामान ते. आता या क्षणी तू घे बोलून.

तेवढ्यात एक चेक-इन ची रांग मॉनिटर करणारी बाई माझ्या जवळ आली आणि तिने फ्लाईट कितीची आहे ते विचारले. मी वेळ सांगताच म्हणाली, " ओके. मिळेल तुम्हाला. " तोवर सात वाजून दहा मिनिटे झाली होती. तिला मी विनंती केली, " बाई गं, सिक्युरिटीलाही भली मोठी लाइन आहे तर जरा मदत करतेस का? " त्यावर तिने शांतपणे सांगितले, " हनी, काळजी करू नकोस. बहुतेक तरी तुझी फ्लाईट मिळेल तुला. पण आज अर्ध्याहून जास्त लोकांच्या फ्लाईट्स ऑलरेडी चुकल्यात आणि चुकणारही आहेत. तुझ्या पुढे जी मुलगी उभी आहे ना तिची आठची फ्लाईट आहे तिलाही मी काही मदत करू शकत नाही. सो बी पेशंट ऎंड हॅव अ गुड टाइम. " तिचे ते कटू सत्य सांगणारे शब्द आणि चेहऱ्यावरचा थंडपणा पाहून माझी खात्री पटली की आज दिवसभर आपली फरफट नक्की आहे.

तोवर मुलगा त्यांचे दोघांचे बोर्डिंग पास घेऊन आला. त्याची बॅग चेक इन करायची नव्हती शिवाय त्याची फ्लाईटही वेगळी असल्याने त्याला सिक्युरिटी च्या लाइन मध्ये उभे राहायला सांगितले. शेवटी पावणे आठला आमचा नंबर लागला. बॅग चेकईन करून घेणारी ने अगदी तोंडभर हसून मला आश्वासन दिले, " डिअर अग इतकी वरीड कशाला होतेस? बघ तुझी बॅग तर गेली सुद्धा आता तूही जाशील. " सुरक्षेच्या लाइनकडे पाहूनच माझे धाबे दणाणलेले तरीही तिचे बोलणे ऐकून मला म्हणावेसे वाटले, " बाई गं तुझ्या तोंडात मॅकचा किंवा तुला जो पाहिजे तो बर्गर पडो. " पटकन सिक्युरिटीच्या लाइनमध्ये लेकाला जॉईन झालो. आश्चर्य म्हणजे ही रांग बरीच भरभर हलत होती. कुठेतरी आशा पल्लवित झाल्या. मिळणार रे आपल्याला फ्लाईट असे मी बोलून दाखवताच लेकाने फक्त एक स्माईल दिले. स्माईलमध्ये दडलेले शब्द मला स्पष्ट ऐकू आले, " मॉम, बेस्ट ऑफ लक. "

आमचा नंबर आला तेव्हा इतक्या अनेक फ्लाईट्सच्या अनुभवांनी आधीच सगळी तयारी करून आम्ही हुश्शार खडे होतो. मात्र एक गोष्ट सारखी जाणवत होती की सिक्युरिटीची लाइन जरी हलत असली तरी आज काहीतरी वेगळेच टेन्शन आहे. कर्मचारी प्रत्येकाचे ओळखपत्र चार चार वेळा पाहत होते. फोटो आणि माणूस तोच आहे ना? सामानही पुन्हा पुन्हा मशीनमधून तपासत होते. बहुतेक वेळा अशा मोठ्या सुट्ट्यांना जरा जास्तच कडक सुरक्षा असतेच तेव्हा हे रोजचेच आहे असे म्हणत मी माझीच समजूत काढत होते. एकदाचा आमचा नंबर आला. दोघेही पिंगपूंग न वाजता पार झालो. आमचे सामानही आले. तोवर लेकही दुसऱ्या रांगेतून क्लिअर झालेला. त्याला तू तुझ्या गेटवर पळ आपण आता डायरेक्ट सॅन
फ्रॆन्सिस्कोलाच भेटू असे म्हणत पाठवून दिले.

अन वळून पाहिले तो काय माझी पर्सच दिसेना.
इतर सगळे सामान समोरच होते. तोच मशीन मधून पर्स बाहेर येताना दिसली. मी उचलायला जाणार तोच चेक करणाऱ्याने ती उचलली आणि पुन्हा मशीनमध्ये टाकली आणि अजून एकाला बोलावून स्क्रीनवर काहीतरी दाखवू लागला. अरे देवा! हे काय भलतेच....... मी घड्याळ पाहिले तर ८. ३० झाले होते. आमचे गेट होते नंबर ७५ वर आणि सिक्युरिटी आहे गेट नंबर ३८ वर. म्हणजे आता सुसाट धावायचे होते तेही एक बॅग-पर्स व जाडे जाडे कोट घेऊन. वीस मिनिटे आधी तुम्ही गेटवर पोचलेला नसलात तर तुमचे तिकीट कॅन्सल होईल ही घोषणा अक्षरशः दर पाच मिनिटांनी सगळ्यांना धडकी भरवत होतीच.

अरे दे रे बाबा माझी पर्स, आहेच काय त्यात इतके चार चार वेळा पाहण्यासारखे हेच मला समजेना. तोच एक थोडा वरिष्ठ कर्मचारी माझ्याकडे आला व म्हणाला, " मॅम मला तुमची पर्स संपूर्ण रिकामी करून चेक करावी लागेल. तेव्हा मला कृपया परवानगी द्या. " अगदी मृदू आवाजात त्याने मला ही दुष्टवाणी ऐकवली. कर बाबा काय करायचे ते कर पण पटकन कर असे मी म्हटले. त्याने माझी पर्स एका ट्रेमध्ये भसकन ओतली. प्रत्येक गोष्ट हातात घेऊन पाहिल्यासारखी करून पुन्हा भरून एकदाची पर्स माझ्या हवाली केली वर अगदी गोड हसून आभार मानून हॅव अ गुड फ्लाईट असे म्हणून तो गेला.

मी आणि नवरा अक्षरशः रेसमध्ये धावणारे घोडे कसे तोंडाला फेस येईतो जीव काढत सुसाट पळतात तसे आमच्या गेटकडे पळत सुटलो. ३८ नंबर वरून ७५ नंबर गाठताना सकाळी सकाळी चांद तारे दिसले. गेटवर पोचलो तर संपूर्ण सन्नाटा. काँउंटरवर एक बाई अतिशय मख्ख नजरेने सगळीकडे पाहत बसली होती. तिच्यापाशी पोचलो आणि आमचे विमान .... पण तोंडातून एकही शब्द निघेना. फक्त आमच्या धपापणा~या हृदयाचा आवाज काय तो येत होता.

एकदा आमच्या अवस्थेवर नजर टाकून तिने पूर्वीच्याच मख्खपणे खिडकीकडे बोट दाखवून जे बाहेर दिसतेय ना तेच तुमचे विमान आहे आणि त्याचे दरवाजे आता बंद झालेत. तेव्हा तुम्हाला आता या फ्लाईटने नक्कीच जाता येणार नाही. अशी भयंकर घोषणा करून आम्हाला वाऱ्यावर सोडून स्वतः पोबारा केला. डोळ्यात झरझर आसवे जमा झाली. खरे तर इतके मोठे काय घडले होते...... ही नाही तर दुसरी फ्लाईट मिळेलच. फक्त कटकट झालीये आणि बराच वेळ आता विमानतळावर बसून राहावे लागेल इतकेच. पण हे त्या क्षणी जीवाला कसे पटावे? ही फ्लाईट मिळावी म्हणून किती आटापिटा केला होता जीवाचा.

पहाटे साडेपाचला घर सोडूनही आमची ८.५० ची फ्लाईट चुकली होती. मात्र लेकाला त्याची फ्लाईट मिळून तो अटलांटाला रवाना होणार होता. चला निदान दुःखात थोडेसे सुख. सुतारपक्ष्याला फोन लावला व त्याची भुणभूण कामी आल्याची आनंदाची वार्ता ऐकवली. बिचारा.... ते ऐकून अगदी कानकोंडा झाला. अग मॉम, मी गंमत करत होतो ग...... यू नो दॅट.... राइट? असे सारखे म्हणून सॉरी सॉरी करत होता. मग मित्रालाही गाढ झोपेतून उठवले आणि फ्लाईट चुकल्याचे व तीही तुझ्या न उच्चारलेल्या शब्दांमुळेच असे वर त्यालाच सुनावून थोडी भडास काढली. मित्र खो खो हसत होता.

२५ डिसेंबराला सकाळी नऊ वाजेतो जवळपास दीडदोनशे लोकांच्या फ्लाईट्स या सगळ्या गोंधळामुळे चुकल्या. आणि यातले ९०% लोकं दोन ते अडीच तास आधी विमानतळावर आलेले होते. नंतर बातमी आली, ऍमस्टरडॅमहून डेट्रॉईटला येणाऱ्या नॊर्थ वेस्टच्या इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये उमर फारूक अब्दुलमुतालक, वय वर्षे २३ या नायजेरियन विद्यार्थ्याकडे काही आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या व तो अल-कायदाशी संबंधीत होता. पुन्हा एकदा टेररिस्ट अटॅकचा प्लॅन केला गेला होता. ही बातमी सारखी टीवीवर फ्लॅश होत होती आणि संपूर्ण विमानतळावर सन्नाटा पसरला होता. त्यादिवशी दिवसभर प्रचंड गोंधळ सुरूच होता. अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या व चुकल्याही. आम्ही तिथून उडेपर्यंत बरेच काही घडले-गमतीजमतीही झाल्या, ते पुढच्या भागात.........

24 comments:

  1. हो ना.. त्या उमर फारूक मुळे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था झाली होती यावेळी.. १-२ जणांचे असेच किस्से ऐकले. सुतार पक्षी. हा हा

    ReplyDelete
  2. पुर्वी भित्यापाठीच लागणारा ब्रम्हराक्षस आता अशा अतिरेकी लोकांपायी सगळ्यांच्याच पाठी लागला आहे....पण तरी तुझी फ़क्त पर्स तपासणीवर सुटका झाली असं समज....मी २६/११ नंतर विमानतळावर साडे सहा महिन्यांच्या बाळाला सेक्युरीटी नामक दिव्यांतून कसं आणलंय ते माझं मलाच माहित आहे....असो...तुमच्या ट्रिपमधल्या बाकी गोष्टी ऐकायला जास्त मजा येणार हे नक्की....:)
    लिहिते रहो....

    ReplyDelete
  3. हेरंब तर काय इतका ताप झाला ना.... अर्थात या अशा लोकांमुळे सगळ्यांनाच फार त्रास होतोय शिवाय सारखी भीती... कधी फट म्हणता कुठे आवाज येईल आणि काय काय होईल... :( सुरक्षा कर्मचारीही प्रचंड तणावाखाली शिवाय लोक त्यांच्या नावाने दोन्ही बाजूने ढोल बडवणार ना.... वैताग झालाय सगळा.आभार.

    ReplyDelete
  4. अपर्णा हो बाई मला पुन्हा एकदा ९/११ नंतरची ट्रीप आठवली. भयंकरच दिवस होते ते. २६/११ नंतरही पुन्हा एकवार तशीच परिस्थिती ओढवली अन आता तर इतके थ्रेट्स आलेत की पुढे काय काय होईल कोण जाणे. अर्थात म्हणून काही प्रवास थांबणार नाहीतच.:) आभार.

    ReplyDelete
  5. अरे वा ! म्हणजे पोस्ट छान झाली म्हणून अरे वा. फ्लाईट चुकली म्हणून अरेरे !
    उत्सुकता लागुन राहिली शेवटच्या वाक्या पर्यंत. पुढील वर्णनाची वाट पहात आहे.

    ReplyDelete
  6. सुतारपक्षी, हा...हा...हा...
    छान लिहिलयं, पुढच्या भागाची वाट पाहत आहे...

    ReplyDelete
  7. पोस्ट खुपच मस्त झाली आहे, मला सुरुवातीलाच अंदाज होता की तुम्ही त्या नायजेरीनच शेवटी काहीतरी सांगान. :-)

    -अजय

    ReplyDelete
  8. mastach !! jast pratikriyaa mag dein..as usual...in hurry....

    ReplyDelete
  9. साधक अरे त्यादिवशीची एकेकाची अवस्था अगदी पाहण्यासारखीच होती. त्यातले काही आणतेच भेटीला.:)आभार.

    ReplyDelete
  10. आनंद प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.सुतारपक्षी पुढचे दोन दिवस अजिबात टकटकला नाही.हा हा..

    ReplyDelete
  11. अजय मेले करतेय कोण आणि भरतेय कोण... सणासुदीचे विमानतळावर रखडल्यामुळे सगळेजण अतिशय भडकले-वैतागले होते. अगदी उगड उघड शिव्या देत होते...

    ReplyDelete
  12. माऊ अग तुझ्या इतक्या गडबडीतही प्रतिक्रिया दिलीस .... खूप बरे वाटले.:)

    ReplyDelete
  13. अगदी शब्दशः वर्णन! अस्संच टेंशन येतं बघ! धावपळ तरी किती करणार!
    लेक केव्हढा मोठा आहे तुझा? तुझ्या एकूण इमेज वरुन तरी वाटत नाही इतका मोठा असेलसं!

    अश्विनी

    ReplyDelete
  14. अच्छा शोमुला सुतारपक्षी म्हणतेस काय???? झाला ना मग त्रास...........

    मला ना खरच त्या विमान नावाच्या प्रकाराचा कायम कंटाळा आहे,विमानतळ त्याहून नावडते.....

    आता वाचताना मजा येतेय गं पण तेव्हा तुझी काय अवस्था झाली असेल ते चांगलेच समजतेय.....

    ReplyDelete
  15. तन्वी अग आम्ही एक से एक विमानतळ अनुभव घेतलेत. संपूर्ण १२ तास काढलेत एकदा.... आठवले तरी कटकट होते.हेहे... सुतारपक्षी गेला पुन्हा कॊलेजला...

    ReplyDelete
  16. आश्विनी हो ना गं. ताण असतो मनावर त्यामुळे आपण धावपळ करतो पण नंतर इतका त्रास होतो त्याचा. आजकाल विमानप्रवास हा फार तापदायक झालाय खरा पण पर्याय नाही.:(
    अग माझा लेक कॊलेजमध्ये आहे.:)आभार.

    ReplyDelete
  17. मी दर ५ आठवडयाने एकदा उडतो... :(
    (मला ना खरच त्या विमान नावाच्या प्रकाराचा कायम कंटाळा आहे,विमानतळ त्याहून नावडते X 100) ... :D

    अनुभव मात्र जबरी आहे... :)

    ReplyDelete
  18. Maja ali vachayala. :) Sutarpakshachi tak tak pudhe 10 divas aiku ali nahi ga. Ki Aaibhovati taktakat?

    Narm vinodi :) likhan is your strong point.

    Very nice.

    ReplyDelete
  19. प्रभावित अग तुझ्याकडे आलो तोवर सुतारपक्षी थंडावला होता.... :))आणि हो गं आईभोवती जास्तच जरा...:)

    ReplyDelete
  20. रोहन हो रे.... मी इमॆजिन करू शकते... तुला किती वैताग येत असेल ते.:( निदान तुझी त्या चेक इन च्या त्रांगड्यातून तरी सुटका आहे ते बरेय.:)

    ReplyDelete
  21. भाग्यश्री...काय अप्रतिम लिहिले आहेस तू !!वर्णन इतके सुंदर लिहिलेस कि अगदी प्रसंग डोळ्या समोर उभा राहतो. सुताराची टकटक
    म्हणजे ... एकदम आवडली मला. शत्रू पक्ष ..अगदी धमाल.तुम्हाला कितीही त्रास झाला असला तरी ..तुझ्या शैली मुळे वाचक तुमची ट्रीप एन्जॉय करतील.. आणि आता तुम्हीही कराल !!

    ReplyDelete
  22. khupch chan lihile aahe. tumhala zalela trass jasachy tasa samor oobha rahil.

    ReplyDelete
  23. मधुमती तुझ्या अभिप्रायानेच माझा त्रास संपला.:) खूप खूप छान वाटले.

    ReplyDelete
  24. प्राजक्त अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद. मी नेहमीच वाट पाहते.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !