आज दुपारी नेहमीप्रमाणे जालावर मटा वाचायला घेतला तर नजर एका बातमीवर खिळून राहिली. 'बंद गिरणी आगीत खाक '. माझे सारे बालपण गिरणगावात गेलेले. आमच्या घरातले कोणीही मिल मध्ये कामाला नसले तरीही आसपासचे बहुतांशी लोक वेगवेगळ्या मिल्समध्येच होते. मिल्स, तिथे चालणारे काम, रात्रपाळी-दिवसपाळी-ते तीन पाळ्यांचे गणित, डबेवाले, मिल्सच्या बाहेर बसणारे अनेकविध विक्रेते. केवळ मिलच्या जीवावरच चालणाऱ्या खानावळी. गणपती-गोविंदा, शिमगा व दिवाळीला मिळणारी उचल, ओव्हरटाइमची रोखी. मिल्सची स्वतःची असलेली दुकाने, त्यांची मिळणारी कुपने. त्यांच्या मुकादमांची-कटकटींची, खाड्यांची चालणारी चर्चा.
त्यांचे संप, मागण्या, कामगार नेते श्री. दत्ता सामंत, हे सगळे आमच्याही अगदी जिव्हाळ्याचे होते. दत्ता सामंत यांचा आमच्या मनावर फार पगडा होता. ना मी कधीही त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले का ऐकलेले( लहानपणी ). पण आमच्या शेजारी राहणाऱ्या घाटीमामांच्या तोंडून त्यांचे नाव वारंवार ऐकून ऐकून आम्ही अक्षरशः भारले गेलेलो. गिरणी मालक भयंकर पिळवणूक करणारेच असतात व फक्त कामगार नेते श्री. दत्ता सामंतच एकटे त्या सगळ्यांशी निकराने लढा देत कामगारांचे भले करत आहेत. अगदी शाळेतही यावर नेहमीच चर्चा रंगे. सामंतसाहेबांचे सगळेच बरोबर नसेलही परंतु त्यांना कामगारांचा कळवळा आहे यावर आमच्यात नेहमीच एकमत होते. सहावी-सातवीतले आम्ही, जे समोर दिसे त्यावर गाढ विश्वास होता आमचा. पडद्यामागे काय चालते हे कधी दिसले नाही आणि दिसले असते तरी त्या वयात फारसे कळलेही नसतेच म्हणा.
जळालेल्या गिरणीचे नाव वाचले. ' गोल्ड मोहोर ', अरे देवा! केसरबागेच्या बरोबर समोरच आमची चाळ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर. आमची शाळा म्हणजे, ' तीर्थस्वरूप ताराबाई मोडकांची- शिशुविहार माध्यमिक विद्यामंदीर. ' ' दादासाहेब फाळके ’ मार्गावरूनच आम्ही रोज शाळेला जात-येत असू. ' गोल्डमोहोर ' मिल आमच्या वाटेवरच. ' रूपतारा स्टुडिओच्या ’ साधारण समोरच म्हणायला हवी. ' गोल्डमोहोर ' एवढे लांबलचक नाव फारसे कोणी घेत नसे. सगळे ' भोवंड ' म्हणत असत. ' भोवंड ' का व कधीपासून म्हणू लागले हे मला कधीच कळले नाही. कदाचित दिवसरात्रीतून बरेचवेळा मिलचे भोंगे वाजत आणि ते ऐकून लोकांना भोवळ येत असेल. त्यात तिथे भंगी वस्तीही फार होती. त्यामुळे भोवळचे भोवंड झाले असेल असा आपला आम्हा मुलांचा एक तर्क होता.
मिल दादासाहेब फाळके मार्गावर असली तरी जराशी आतच म्हणायला हवी. रस्त्यावरून येता जाता मिलचे पिवळे गेट व गेटावर नेहमीच असलेली वर्दळ, कारणीक छुटकू-फुटकू दुकाने हेच ठळक नजरेत भरे. सकाळची उसळ-पाव, वडा-पावच्या गाड्यांची गडबड तर संध्याकाळ झाली की सगळ्याच मिल्सच्या आजूबाजूस दिसणारे ठरलेले दृश्य..... जवळच दोन-तीन देशी दारूची दुकाने व उकडलेली अंडी, शेंगदाणे, वाळूत भाजलेले काळे शिंगाडे व उकडलेले हिरवे शिंगाडे पुढ्यात घेऊन बसेलली लहान लहान मुले किंवा बाया. रात्र चढू लागली की बुर्जीपावच्या गाड्या लागत. मिल मधून कामगार बाहेर पडला की हातभट्टीची मारूनच घरला जानार.... त्या घेतल्याबिगर जमतच नाय. कायबी सुदरत नाय गड्या. एकदा का सांज झाली की ' दारवा ' पाहिजे म्हंजी पाहिजेच. मग बायको-पोरांना बडविणे प्रकारही रोजचेच. शिवाय उधारी प्रकारही होतेच. पठाणी व्याजही होते. मिलच्या दारावर दहा तारखेला किंवा रोखीच्या दिवशी पठाण उभे असत आणि जर कोणी ठरलेले पैसे दिले नाहीत तर तिथेच त्याला बडवतही. पैसे काढून घेत मात्र त्याच्या घरी जाऊन बायकोच्या हातावर राशनपाण्याचे पैसेही टिकवत. अर्थात अपवादही होतेच पण हाताच्या बोटावर मोजण्यापुरतेच.
असे असले तरी मिल्स सुरू होत्या तोवर रोजगार होता. अर्धा पगार ' दारवा 'वर उडाला तरी कच्च्याबच्च्यांच्या तोंडात घास पडत होता. सणासुदीला स्वतःच्या मिलच्याच कापडांचे फ्रॉक, सदरे-विजारी, साड्या अंगाला लागत होत्या. पाहता पाहता मिल्स बंद पडल्या. काहींनी एका क्षणात दम तोडला तर काही झिजून झिजून संपल्या. रडत खडत का होईना जोवर धूर निघत होता तोवर एक वेळचे अन्न तोंडात पडत होते. शेवटी एक एक करत गिरण्या संपल्या त्याबरोबरच गिरणगावही विझले. हळूहळू उभे राहिले टोलेजंग टॉवर-मॉल्स. स्वार्थ कोणाला सुटलाय हो... पण असा हजारो कुटुंबांना रस्त्यावर आणून साधलेला स्वार्थ....... बायका पोरांची लागलेली हाय-खपाटीला गेलेली पोटे, म्हाताऱ्या आईबापाचे कोरडे शुष्क ओठ अन आटलेले-फूल पडलेले धुरकटलेले डोळे. पांढऱ्या दाढीची खुंटे खाजवत गुडघे पोटाशी घेऊन उकिडवे बसून भकास नजरेने आकाशाकडे पाहत बसणारे वडील-बाप्ये-घरातले कर्ते पुरूष. अतिशय केविलवाणी अवस्था. आभाळच फाटलेले तिथे कोण कोणाला व कुठले ठिगळ लावणार हो.
माझ्या अनेक मैत्रिणींच्या घरी फार हलाखीची परिस्थिती होती. अनेकदा डबाही नसे. त्यांच्या आया इंडस्ट्रियल इस्टेट मधील छोट्या छोट्या दुकानांमधून घरी कामे आणत. ढिगावारी नग जोडायचे/घासायचे/वेगळे करायचे अशा प्रकारचे अतिशय कष्टाचे व कटकटीचे काही काम मिळे. ते करून दिले की दुकानदार त्यात हजार नुक्स काढणार आणि पैसे कमी करणार. मेहनत भयंकर व कमाई अतिशय मामुली. संपूर्ण घरदार पाठ मोडून काम करी तेव्हा कुठे चूल पेटे. आठवले तरी जीव कळवळतो.
दोनच दिवसांपूर्वी तीन गिरण्यांच्या आधुनिकीकरणाचा करार झाला आणि आज ही आग. घातपाताची शक्यता सर्वत्र एकमुखाने चर्चेत आहेच. आगीचे स्वरूप इतके भीषण असावे की २२ फायर इंजिन व फायर इंजिनच्या जोडीला १७ जम्बो टँकर असूनही आगीवर काबू मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. फायर ब्रिगेडच्या मदतीला सरकारी आस्थापनांचे पाण्याचे टँकरही होते तरीही दुपारी एकच्या सुमारास लागलेली आग विझवायला तीन- चार तास लागले. आता आगीने काय लागतानाच रौद्रावतार धारण केला असेल का? मग लागलीच का फायर ब्रिगेडला बोलाविले नाही?
थोडक्यात काय अजून एक मिल पद्धतशीर रित्या धारातीर्थी पडली. आता सगळे फार्स होतील पाहा. राजकारणी धडाधड आगीत उड्या टाकून रणशिंग फुंकतील. चौकशी झालीच पाहिजे. पूर्वनियोजित कटच आहे हा तेव्हा सुत्रधारांना शिक्षा व्हायलाच हवी वगैरे नाटके करत नाचतील मग, ' नेमके नेमक्या जागी पोहोचले ’ की चार-आठ दिवसात कुठली गोल्डमोहोर मिल अन कुठली आग? वरपर्यंत मिलीभगत आहे झालं. अपघात का घातपात हे सत्य वरकरणी गुलदस्त्यातच राहिलही नाही म्हणजे तीच शक्यता जास्त असली तरी सगळेच मनोमन जाणून आहेत. मन फार फार दुखलेय आज. आयुष्याची अनेक वर्षे गोल्डमोहोर मिलला व अश्या गिरणगावातील अनेक मिल्सना वाहून टाकलेल्या साऱ्या कामगारांच्या दुःखात मीही सहभागी आहे.
गिरन्या बंद पडला आणि गिरनी कामगार रस्त्यावर आला.....मी कामगार वर्ग जवळून पहिला आहे....म्हणून तुम्ही केलेले त्यांचे चित्रण खरच भीडणारे आहे..उत्तरार्ध बद्दल बोलायाचे झाले तर हे तर जगजाहिर आहे की काही तरी मिलीभगत आहे....अगदी सर्वांचीच, मंत्र्यांचाही स्वार्थ आहे त्यात..सरकार चौकशी करेलही पण जिथे चोरच पुलिस असतो तेव्हा न्यायाची काय अपेक्षया??....सुशिक्षित वर्ग तरी न्यायासाठी न्यायालयात जाउन लढु शकतो पण बिचारा कामगार वर्ग हे नाही करू शकत..आणि अजुन दुखाची बाब म्हणजे आपल्या सारखा सुशिक्षीत वर्गही सगळे जानुनही कामगारांच्या पाठी उभे राहून त्यांची लढाई लढायला धजतो..हे पण विसरतो की आपणही एक काम्गाराच आहोत पण so called sophesticated labours..:(
ReplyDeleteअगं मलाही ती बातमी वाचली तेव्हा असंच वाटलं होतं..बाकी आंबेडकर रोडवर मावशी राहायची त्यामुळे हिंदमाताला खरेदी हा कॉलेजलाईफ़मधला मोठा कार्यक्रम असायचा...फ़ार वाईट वाटतंय...
ReplyDeleteहोय की.. पद्धतशीर पाडली की म्हणजे जाळली की.. :( आता काय mall येइल की २ वर्षात तिकडे आणि आत्ता शिव्या देणारे सर्व लोक जातील तिकडेच पिच्चर बघायला आणि खरेदी करायला... :(
ReplyDelete्गिरणी बंद पडल्याने फायदा कोणाचा होणार ?? मला तर वाटतं की मिली भगत असावी यांची.
ReplyDeleteथोड्य़ाचा दिवसात याची कोट्यावधी किमतीची जमिन कोणीतरी शेट विकत घेइल आणि मग ह्या जमिनिवर मॉल, टॉवर्स अन बॉलिंग ऍली सुरु होतील..
इथे जे काम करणारे आहेत ते उंच आभाळाकडे टॉवरच्या वरच्या न दिसणाऱ्या मजल्याकडे बघत आपली मिल शोधायचा प्रयत्न करतिल..
खुप वाईट वाटलं.. ती बातमी पाहिली, अन पहिली प्रतिक्रिया तीच होती माझी.. :)
atuldeshmukh,जिथे चोरच पोलिस असतो तिथे न्यायदेवता आंधळीच असते....गिरणी कामगार असो वा So called sophesticated कामगार असो...भरडले सगळेच जातात...:(
ReplyDeleteअपर्णा, फार त्रास झाला गं. शाळेतल्या काही जीवाभावाच्या मैत्रिणींचे ’बाब” आठवले.आमचीही परिस्थिती यथातथाच होती गं...पण मोजकेच का होईना दोन फ्रॊक होते,नीट जेवण मिळत होते.अन्नाची किंमत फार लहानपणी कळली ग...
ReplyDeleteरोहन,ही अनुषंगाने येणारी आणखी एक दुर्दैवी गोष्ट आहे.हजारो लोकांचा रोजगार छिनून पाचशे लोक कामाला लागतील. रोजमर्रा जिंदगी चालूच राहील...कालाच्या ओघात सगळ्यावर विस्मरणाच्या रोगाची पुटे चढतील...शेट लोक अजून अजून श्रिमंत होतील अन याच उठलेल्या मॊलच्या समोर उभा राहून मनाने कधीचाच शंभरी गाठलेला एखादा बाबा धुसर झालेले डोळे पुन्हा पुन्हा पुसून मिलचा एखादा दिवस-कधीकाळी नांदत असलेले सुख आठवायचा प्रयत्न करत असेल.
ReplyDeleteमहेंद्र, खरेच आहे रे.मिल कश्या असतात हे पुढच्या पिढीला चित्रातच दाखवावे लागणार आहे.:(
ReplyDeletegiranyaa, tyaatalyaa kamagaaraamche aayushya phakt pustakaammadhyech bhetalam hota. ekadam bhidanaare lihile aahes.
ReplyDeletebaakee aag laagalee mhanaje giranee paadanyaacheehe vel yet naahi, aani insurance che paisehe milataat!!!
नक्कीच मिलिभगत आहे ही....
ReplyDeleteही बातमी कळल्यावर खरच वाईट वाटल.हि गिरणी तुमच्या शाळेच्या वाटेवर असल्याने तुमची अटॅचमेंट समजु शकतो मी...वर सर्वांनी म्हटल्याप्रमाणे काही दिवसातच तिथे नवा मॉल उभा राहील असे मलाही वाटते.
गौरी,अचानक घराचा पोशिंदा घरातच राहू लागला की चांगली चांगली घरेही त्या फटका~यासरशी कशी कोलमडतात हे इतके लहान असूनही कळायचे ग.:(इन्शुरन्सचा पैसा तर घेतीलच शिवाय जागाही कित्येक करोडना विकून टाकतील.
ReplyDeletedavbindu,खरे आहे. लवकरच मॊल उभा राहील आणि रोहन म्हणतो तसेच आज हळहळणारे तिथे जातीलही.:( आभार.
ReplyDeleteभांडवलशाही व्यवस्थेत प्रत्येकजण हा 'नफा कमावण्याच्या'व्यवसायात असतो.यामुळे समाजाचे खरंच भले होते?
ReplyDeleteयोगेश, आपले स्वागत व प्रतिक्रियेबद्दल आभार.नफा कमावणे हे उद्दिष्ट्य असल्याशिवाय कोणी मेहनत करणारच नाही. परंतु समाजाचे भले व्हावे हा हेतू मनी धरून करणारे राहीले नाहीत हे दुर्दैव आहे. परिणाम समोर आहेतच.
ReplyDelete१०१ % घातपात, काही दिवसांनी बातमी येईन की कुणीतरी ही जमीन विकत घेतली आणि तिथे मोठाला टॉवर होईन. लोक आंधळे आहेत पण एवढी साधी गोष्ट न कळण्याइतके निश्चीतच दुधखुळे नाहीत ना.
ReplyDelete-अजय
अजय,नक्कीच रे.
ReplyDelete