जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, January 13, 2010

बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १

जिन्नस

 • पाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या
 • ओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी
 • सात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर
 • दोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर.
 • दोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रंग येईल अश्या मिरचीचे असावे )
 • सहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल.

मार्गदर्शन

दोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत. साधारण १०/१२ तासांनंतर चांगले मोड आलेले वाल पाण्यात ( शक्यतो कोमट पाणी घ्यावे ) भिजत घालावेत. जेणेकरून वालाचे साल चटकन सुटेल. हे सोललेले वाल म्हणजेच डाळिंब्या.
कढईत तेल घालून चांगले गरम झाले की मोहरी, हिंग व हळदीची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. हिंग किंचित जास्तच घालावा. ( फोडणी चांगली सणसणीत झाली पाहिजे ) त्यावर लागलीच सोललेल्या डाळिंब्या टाकून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतावे. डाळिंब्या फोडणीस टाकल्या की त्यांचा पंचेंद्रियांना खवळवणारा सुगंध सुटतो.
या नुसत्या वासानेच डाळिंब्या सोलताना घेतलेल्या कष्टांचे चीज होते. फोडणी सगळ्या डाळिंब्यांना लागली की दोन-तीन भांडी पाणी घालून ढवळून झाकण ठेवावे.

एकीकडे ओले खोबरे/ भाजून घेतलेले सुके खोबरे ( आवड किंवा उपलब्धतेनुसार जे घेतले असेल ते- ), हिरव्या मिरच्या, आले व भाजून घेतलेले जिरे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. साधारण दहा मिनिटे चांगली वाफ आली की झाकण काढून डाळिंब्या ढवळून पाणी कमी झाल्यासारखे वाटल्यास पुन्हा भांडभर पाणी घालून मध्यम आचेवरच अजून पंधरा मिनिटे ठेवून एक चांगली उकळी काढावी. आता जवळपास डाळिंब्या शिजत आल्या असतील. झाकण काढून त्यात वाटलेले खोबरे, जिरे, मिरच्या व आले,
लाल तिखट तसेच चवीनुसार मीठ व आमसुले घालून मिश्रण ढवळून पुन्हा सात-आठ मिनिटे शिजवावे. नंतर साखर व आवश्यकता वाटल्यास अर्धे भांडे पाणी घालून तीन-चार मिनिटे शिजवून आचेवरून उतरवावे. अत्यंत चविष्ट लागणारी उसळ. वाढताना ओले खोबरे व कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे. सोबत पोह्याचा भाजका ( किंचित जळका ) किंवा तांदुळाचा तळलेला पापड, गरम गरम तांदुळाची भाकरी व सोलकढी असेल तर.... बेत एकदम फक्कडच जमेल. ब्रह्मानंदीच....... .

टीपा

डाळिंब्यांची उसळ जितकी पातळ वा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी घालावे. आवडत असल्यास लसूण घालावा. मसाला वाटतानाच त्याबरोबर लसणीच्या पाच-सहा पाकळ्या वाटाव्यात. आमसुलाऐवजी चिंचही वापरता येईल. (आमसुले आवडत नसल्यास किंवा ऍलर्जी असल्यास तसे करावे परंतु या उसळीसाठी आमसुले जास्त छान. ) डाळिंब्या शिजायलाही हव्यात पण शक्यतो मोडताही नयेत हे लक्षात घेऊन हलक्या हाताने ढवळाव्यात. वाफ आणताना झाकणावर पाणी ठेवल्यास डाळिंब्या शिजण्यास मदत होते. साखर आवडत असल्यास घालावी. लाल तिखट अजिबात न घालता फक्त हिरवाच रंग हवा असेल तर हिरव्या मिरच्या जरा जास्त घालाव्यात.

डाळिंब्यांची उसळ विविध पध्दतीने करता येते. प्रकार-२ टाकतेच दोन दिवसात. शिवाय डाळिंबी भातही अप्रतिम लागतो.

15 comments:

 1. आहेस कुठे?? सकाळी सकाळी भुक लागली. आता डबे हुडकतो किचनमधे जाउन. माझं वजन वाढायला तुम्हा लोकांचे हे असे चवदार पोस्ट्स जबाबदार आहेत... :)

  ReplyDelete
 2. महेंद्र आहे इथेच आहे.:) अरेच्या...वजन कमी होतेय म्हणाला होतास ना?

  ReplyDelete
 3. बाई,,का चिडवता हो तुम्ही???
  एकदम फ़क्कड ,लई भारी,,,,,,,,झक्कास !!

  ReplyDelete
 4. भाग्यश्रीताई,
  सकाळी सकाळी भूक चाळवलीत.
  खरच मस्त वाटल पोस्ट वाचून. एकदम लहानपणीची आठवण झाली.
  आमच्या शेजारची आवळस्कर आजी डाळींबीची उसळ जगात सर्वश्रेष्ठ करते. ती उसळ खाण म्हणजे स्वर्गसुख.


  अनिकेत वैद्य.

  ReplyDelete
 5. माऊ अनेक आभार.:)

  ReplyDelete
 6. अनिकेत खरेय तुमचे म्हणणे.:)डाळिंब्यांची उसळ ज्यांना आवडते ते अगदी असेच म्हणतील.

  ReplyDelete
 7. रोहन सारखे आम्ही ही आता निषेध करणार :(

  ReplyDelete
 8. मी निषेध करणे सोडले आहे ... :( काही उपयोग नाही... :P

  ReplyDelete
 9. आनंद रोहनने निषेध करणे सोडलेय.... हा हा...
  आभार.

  ReplyDelete
 10. रोहन तुझ्या त्या कुल्फीच्या फोटोचा निषेध आहे हा.:)

  ReplyDelete
 11. मी आणि तन्वीने मोठा प्लान बनवला आहे .. निषेध करायला ... :P कळेलच लवकर .. हेहे ...

  ReplyDelete
 12. रोहन काय ते लवकर सांगून टाका रे. आता दिवसभर डोक्यात हेच राहील. मग भाजीत मीठ जास्त पडले तर नचिकेतला मी तुम्हा दोघांचे नाव सांगणार...:P

  ReplyDelete
 13. Namaskar Tai,
  Yaat kanda vaparta yeto ka? Tasech Dalimbi bhat recipe kadhi taknar?

  Dhanyavaad

  ReplyDelete
 14. नमस्कार, खूप खूप धन्यवाद! अभिप्राय पाहून खरेच छान वाटले.

  डाळिंब्यांची स्वत:ची अशी खास चव व वास असल्यामुळे कदाचित कांद्यामुळे ती बिघडू शकेल. आणि डाळिंब्यांना इतर कशाचीही गरजच नसते इतक्या त्या खास आहेत. मला तरी वाटते की कांदा घालू नये. अगदी घालायचाच असेल तर दोन चमच्यापेक्षा जास्त तर मुळीच नको.

  आता डाळिंबी भात लवकरच करावा लागणार.... आत्ताच खावासा वाटू लागलाय. :) केला की लगेच कृती टाकते. त्यानिमित्ते ब्लॊगचा उपवासही सुटेल. :)

  पुन्हा एकदा धन्यवाद. लोभ आहेच तो अजून वाढावा. :)

  ReplyDelete
 15. Namaskar Tai,
  Blogcha upvaas...agdi barobar! Upvaas kaay ,agdi anshanach jhaale!Khup divsaat kaahi naveen vaachle naahi.Jaraa kaalji vatat hoti tumchi.Tumche uttar vaachun chhaan vatale.Dalimbi bhaat recipe chi vaat pahat aahe bar ka!☺
  Dhanyavaad
  Pushpa

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !