मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आम्ही दोघींनी दंगा मांडलेला. तोच, एकेकाळी रोज गाठभेट होणार्या एका ओळखीच्यांचा फोन आला. " कधी आलीस? कशी आहेस? मुक्काम किती? यावेळी जमलं तर भेटूयात आपण. पुढच्या वेळी येशील तेव्हां न जाने हम अल्ला को प्यारे... " असे म्हणत नेहमीचे त्यांचे गडगडाटी हसणे. भरभर प्रश्न विचारणे आणि स्वत:च त्यांची स्वत:ला हवी असलेली उत्तरे देत ते निकालातही काढणे. माझ्या शहाळी प्रेमाची उजळणी झाली. " अगं, परवाच गेलो होतो शहाळे आणायला. चक्क तो नारीयलपानीवाला तुला विचारत होता. वो हमारी छोकरी किधर हैं? दिखतीच नही बिलकुल. मी त्याला सांगितले, अरे वो तो उडनछू हो गयी. भूल जाव उसको और हमको देखो. " पाठोपाठ हसण्याचा गडगडाट.
जसा अचानक फोन आला तसाच अचानक तो बंदही झाला. नेहमीसारखाच. पंधरा मिनिटे हा कोसळता धबधबा अखंड झेलून मी थोडीशी भिरभिरलेच होते. बोलत होते ते पण धाप मला लागली होती. क्षणात कित्येक वर्षे डोळ्यासमोर तरळून गेली. तसे ते माझे साहेब कधीच नव्हते. मात्र शेजारी होते. आईच्या घरापासून पाच मिनिटांवरच राहत असल्याने आम्ही एकाच कॉन्ट्रॅक्ट बसने रोज जा ये करत असू. मी नुकतीच लागलेली, अजून रुळत होते. तेव्हांपासून यांनी जी साथ केली ती आजही तितकीच टिकून आहे. गेल्या अकरा-बारा वर्षात प्रत्यक्ष भेटी तश्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच घडल्या. त्यांचे वयही तसे बरेच झालेय. वयानुसार येणारी दुखणीही आहेतच. घरातही फार काही सुसंवाद आधीही नव्हता आणि आजही नाहीये. " जीवनाचे सगळेच चॅप्टर आपल्याला हवे तसे कसे लिहिता येतील? काहीतरी डावेउजवे असणारच. असे मी कधीतरी म्हणून गेलेली. " ते वाक्य ' घर ' हा शब्द निघाला की लगेच ते मला परत करतात आणि पुन्हा नेहमीचे गडगडाटी हसतात. पंचवीस वर्षांच्या सहवासाने त्यातला उपहास, कारुण्य ठसठशीत समोर येते. जसे ते दाखवत नाहीत तसे मीही न दाखवता मंद हसते. तो मंदपणा त्यांच्यापर्यंत अचूक पोहोचतो. की लगेच आमच्यात ' तेंडल्या ' येतो. पुन्हा एक अखंड उत्साहाचा धबधबा उसळायला लागतो. क्रिकेट त्यांच्या नसानसातून वाहत असते.
मी नकळत या सार्यात गुंतत गेलेली. तोच समोरून प्रश्न आला, " अजूनही तुमचे संबंध आहेत? कमालच आहे? आता कशाला ही झेंगट सांभाळते आहेस? काम ना धाम, उगाच नको ते ताप नुसते. "
" अगं, असं काय म्हणतेस? अशी तोडून का टाकता येतात माणसे? "
" हो येतात. काम संपले की तुम तुम्हारे रास्ते हम हमारे रास्ते. अशी खरकटी उगाच डोईजड होऊन बसतात. तुला इतकेही समजत नाही म्हणजे... "
" काय समजत नाहीये गं? थोडक्यात स्वार्थ पुरा होईतो ओळख, संबंध, मैत्री ठेवायची आणि मग झटकून टाकायचे, असेच म्हणते आहेस ना? आणि जी ओळख स्वार्थाविनाच होते तिचे काय करायचे? का अशी ओळख होतच नसते? "
" अगदी बरोब्बर नेमक्या शब्दात बोललीस. हेच मला म्हणायचे आहे. अशी ओळख झाली तरी मैत्री स्वार्थाशिवाय होत नसते. तुझा स्वभाव आता तरी बदल जरा. किती तरी लोकांनी गैरफायदा घेतलाय तुझा हे विसरून कशी जातेस तू. जसे लोकं आपल्याशी वागतील तसेच आपण त्यांच्याशी वागायला हवे हे शीक जरा. "
पुढे बराच वेळ ती मला काय काय ऐकवत होती. त्या शब्दांच्या वावटळीतून अनेक भिंती माझ्याभोवती उभ्या राहत गेल्या. ही माझी खूप जुनी मैत्रीण. जवळची. मी आजही तिला तितकीच जवळची मानतेय, पण ही तर शेकडो कोस दुरावलीये. या इतक्या अदृश्य भिंती कधी उभ्या केल्या तिने ? का?
तिचे शब्द अजूनही ऐकू येतच होते. " अगं, इतकी ढील कशाला द्यायची मी म्हणते? हाय आणि बाय करावं मोकळं व्हावं. तू पण ना.... अशीच बावळट राहशील कायम. बरं चल मी पळते आता. फोन करतेच तुला मग भेटू पुन्हा सवडीने. " मी नुसतीच मान डोलवली.
ती गेल्यावर मी आरशासमोर जाऊन उभी राहिले. " काय? सारे आलबेल आहे ना? "
प्रतिबिंब गालातल्या गालात हसून म्हणाले, " तूच सांग.. "
" मी हादरलेय. आज एक विकेट पडली. कदाचित कधीचीच पडली असावी फक्त मला आज कळली आहे. "
" मग त्यात नवीन ते काय? आयुष्याचे पीच पावलोपावली बदलतेय ना? असे व्हायचेच. "
" अगं, मैत्री ही काय वरवरची असते का? त्यात्या वेळेपुरती, कारणीक, गरजेची, तकलादू? "
" हे असे बावळट प्रश्न विचारण्याची सवय तुझी कधी सुटणार गं बाई? आता इतके रामायण ऐकूनही तू हा प्रश्न विचारतेस? "
" तू मला तिच्यासारखेच भिरभिरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी बावळट असेनही पण स्वार्थी नाहीये. एक तर, मैत्री असते किंवा नसते. उगाच संभ्रम नकोत. बांडगुळासारखी लटकणारी मैत्री ही अशी गळून पडतेच. पण म्हणून मी काही सगळ्यांना एकाच तागडीत तोलायची नाही. भेटीगाठी, स्वार्थ, तात्पुरती, साखरपेरणी शब्दांची, मौताज नसते मैत्री. माझा विश्वास आहे या नात्यावर आणि कायम राहील. नात्यात गुंता असायचाच. त्याला गृहीत धरून त्याची संगती लावत ते नाते पुढे नेण्यात तर, ' खरा कस ' लागतो. अलिप्तता, पलायनवाद हे उत्तर असूच शकत नाही. मैत्री ही आपल्याला हवी तशी आणि हवी तितकीच होऊ शकत नाही. या कुंपणांची मौताज मने फक्त सौदाच करतात. सगळ्याच गोष्टी समीकरणात मांडता येत नसतात. एक अधिक एक इतके सोपे भावनांचे गणित नसते. "
प्रतिबिंब पुन्हा गालातल्या गालात हसले. मला का कोण जाणे पण त्यात कुत्सित भाव दिसले. चिडून काहीतरी बोलायला जाणार होते पण ते पठ्ठे पळून गेले. मग मी त्याचा नाद सोडला आणि पुन्हा मैत्रीला शोधायला सुरवात केली.
खरेच का केवळ स्वार्थापोटी संबंध असावेत? मग माझा स्वार्थ असताना त्या समोरच्याने पाठ फिरवली तर तो दोष कोणाचा? माझा? का तोही त्याचाच? प्रत्येक ओळखीचे रुपांतर स्नेहात होऊ शकत नाही, मान्य. पण म्हणून स्नेह वाढवायचाच नाही हे समीकरण कसं योग्य? मैत्रीतही एक ठरावीक स्पेस - अंतर राखलेले असतेच की. सौजन्य व सामंजस्याने प्रेरित होऊन आखलेली अतिशय पुसटशी लक्षुमण रेषा. तुला हवे तेव्हां मी आहेच गं, हे आश्वासन देणारी. अनावश्यक हक्क टाळणारी. दुसर्यावर स्वत:ला लादून त्याच्या भावनांची नासधूस न करता हळुवार फुंकर मारत गोंजारणारी. व्यवहाराच्या, स्वार्थाच्या अभेद्य भिंती उभ्या होण्याआधीच रोखण्याची ताकद असलेली समर्थ मैत्री निर्माण करण्याची आंतरिक ऊर्मी आपल्यात असायला हवी. केवळ, " काय म्हणतेस? कशी आहेस? " इथेच खुंटणारी, काठाकाठाने सामाजिक नियमात पोहणारी मैत्री निव्वळ कुचकामीच. जवळीक भासवून पोटात शिरून, दुसर्याच्या दुखर्या जागा नेमक्या हेरत काढून घेतलेल्या गुपितांची चारचौघात वाटणी करत कुचाळक्या करणारी मैत्री आणि खरा स्नेह यातला फरक ओळखता यायला हवाच. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता नये या नियमाला अनुसरून कोणालाही आपल्यावर आक्रमण करू देऊ नयेच, बांडगुळे नसावीतच हे जितके खरे तितकाच मैत्रीतला सच्चेपणाही जपता आला की मनामनातल्या दरीची निर्मितीच थांबेल. असेल ती फक्त एक निखळ स्वच्छ पायवाट. मुळात आयुष्यात इतर अनेक कठीण झगडे आहेतच निदान ही वाट सहज, प्रेममयी करणं तरी आपल्याला नक्कीच जमेल, जमायला हवच... काय?
'व्हॅलेंटाईन डे' ला 'फ्रेंडशिप डे' ची पोस्ट? ;) हेहे..
ReplyDeleteजोक्स अपार्ट.. अतिशय सुंदर आणि नेमकं लिहिलंस. लायनींच्या बिटवीनही वाचता आल्याने अजूनच आवडली पोस्ट.
हा हा... मला पोस्टतानाच वाटले होते हे.:D
ReplyDeleteभापो ना...:) धन्यू रे!
good
ReplyDeleteसुंदर चिंतन म्हणेन या पोस्टला...
ReplyDeleteयातली काही वाक्य बोल्ड करून लक्षात ठेवली पाहिजेत पण नाही ग जोपर्यंत ते संबंध ताणले गेलेत हे लक्षात येत तोवर पुलाखालून बरच पाणी वाहून गेल असतं..आता ते संबंध नाहीत हे सत्य स्वीकारून पुढे जाणं इतकच करू शकतो आपण...नाही तर जो त्रास होतो तो फक्त आपल्याला ..न सांगता गेलेल्यांना नाही.....
ब्लॉगोबा, स्वागत व धन्यवाद!
ReplyDeleteअपर्णा, धन्यू गं. हो गं असेच होते. :(
ReplyDeletetai
ReplyDeleteekdam manatal konitari sangitlyasarkh vatal
jevha 'jevdhyas tevhad theva' aas sangnare lok bhettat tevha vatat ki he uthal vicharanche zalet ki aapanach ugach sagli nati/sambandh dharun thevu pahatoy
ashanchya gardit ekat padayla hota
मस्तच....
ReplyDelete"अशी ओळख झाली तरी मैत्री स्वार्थाशिवाय होत नसते. तुझा स्वभाव आता तरी बदल जरा. किती तरी लोकांनी गैरफायदा घेतलाय तुझा हे विसरून कशी जातेस तू. जसे लोकं आपल्याशी वागतील तसेच आपण त्यांच्याशी वागायला हवे हे शीक जरा."
खरं सांगू अगदी जीवाभावाच्या मित्र मैत्रीणीनीही मला कधी कधी असे सल्ले नेहमी दिले.. कधी ते बरोबर होते कधी चूकही पण काय करणार आपण मनाचे गुलाम..ते जे सांगेल ते करायचे आणि ऐकायचे अशी स्थिती आहे आपली..
असो.. बाय द वे तुझ्या वाक्यांची "रनिंग बिटविन द विकेट्स" सहीच आहे.. अगदी तेंडल्याची असते ना तशी...!! :)
बासुंदी फार गोड नाहीच चांगली लागत...नाही का? :)
ReplyDeleteतसं पाहायला गेल तर 'मैत्री' हा शब्द आपण (म्हणजे आपला समाजही ) फारच उथळपणे वापरतो. ओळखीच्या प्रत्येक माणसाशी काही आपली मैत्री नसते. आणि मैत्री व्हायला फार काळची ओळख असावी लागते अस काही नाही. आणि अनेकदा मैत्री चिरकाल नसते हे सत्यही आपण विसरतो - अर्थात अनुभव आपल्याला जागे करतात म्हणा! जोवर ती आहे तोवर मात्र ती 'खरी' असली की झाल! ज्याक्षणी त्यात काही 'देणे घेणे' येते - तेव्हा ती संपल्यात जमा असते. पण अनेकदा आपण त्या मैत्रीच्या (कल्पनेच्या) प्रेमात असतो आणि मैत्रीच्या मृत्युच्या इशा-यांकडे डोळेझाक करतो....
ReplyDeleteश्री,
ReplyDelete" जीवनाचे सगळेच चॅप्टर आपल्याला हवे तसे कसे लिहिता येतील? काहीतरी डावेउजवे असणारच."
ही जाणीव फार महत्वाची आणि जीवनाचे चॅप्टर लिहीतांनाही जुने चॅप्टर जरी डावे असले तरी ते विसरायचे नाही हा मनाचा मोठेपणा तू असाच जप.
बाकी पोस्ट भन्नाट.
अरुणदादा.
तायडे :)
ReplyDeleteतुझ्या मैत्रीणीचं आत्यंतिक टोकाचं मत पटत नाहिये मला नक्कीच...
हळव्या ताईची हळवी , सुंदर पोस्ट :)... पण एक सांगू नव्या माणसांकडून जुने फटके खाणे मात्र कमी केले पाहिजे ना.... नाहितर आपल्याला दुहेरी त्रास होतो गं!!
तू म्हणतेस तशी मैत्री सापडणं हे मात्र मोठं भाग्याचं, आणि आम्ही भाग्यवान आहोत!! :)
माणसं बदलतात. आपणही बदलतोच. पण आपल्या जवळचं कुणीतरी असं बदलून पार अनोळखी झालेलं दिसतं तेंव्हा धक्का बसतो ग!
ReplyDelete'व्हॅलेंटाईन डे' ला 'फ्रेंडशिप डे' ची पोस्ट? ;) +१
ReplyDeleteमस्त ताई.. भावली एकदम पोस्ट!!
रोहीत, खरेय तुझे. कसे वागायचे हेच समजत नाही. :(
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद रे!
हा हा... दीपक, ’तेंडल्या के क्या कहने !’
ReplyDeleteधन्यू रे! :)
हे हे... अनघे, मधून मधून थोडी खारट लागायलाच हवी का? हां त्याशिवाय मधुरतेची किंमत तरी कशी कळायची म्हणा.
ReplyDeleteआभार गं.
सविता, हो नं. मैत्री, स्नेह हे प्रत्येक ओळखीत शक्य नसतेच. तार जुळायला लागते. पण जुळलेल्या तारा तुटायला लागल्या की जीव दुखतोच.
ReplyDeleteधन्यवाद गं.
bhannat zali aahe post.....akdam wegli zali aahe post.....
ReplyDeleteby the way....khup ooshira...navin varshyachya hardik subecha!
kahi aprharya karnamule wish karu shaklo nahi so sorry! yandahi sundar vishay wachayla milu det.
अरुणदादा, अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार. :)
ReplyDeleteतन्वी, अनेक आभार. :)
ReplyDeleteनव्या माणसांकडून जुने फटके खाणे मात्र कमी केले पाहिजे ना.... नाहितर आपल्याला दुहेरी त्रास होतो गं!!
+१०० अगदी तसेच होते आणि पुन्हा ते माणूस मजेत.
गौरी, हो ना जसे आपण बदलत जातो तशीच सभोवतालचीही बदलणारच हे गृहित धरलेलेच असते आपण. पण इतका बदल... का ती मुळात तशीच असतात आणि आपले मन मात्र ते पाहू इच्छित नसते. :(
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल धन्यू गं.
हेहे... डे पाहून कुठल्या पोस्टा मी टाकतेय रे! :D
ReplyDeleteआभार्स!!!
प्रसाद, मी विचार करतच होते की तुझा अज्याबात पत्ता का नाहीये. क्षेम आहे ना सारे? मेल टाकशील...
ReplyDeleteशुभेच्छा बद्दल व अभिप्रायाबद्दल धन्यू रे! आनंद झाला तुला पाहून. :)
विचारांचा नुसता गुंता झाल्यासारखा वाटतोय तुझ्या डोक्यात. पण छान सोडवलाय, तरीही कुठे तरी गाठी राहून गेल्या आहेत असे वाटते..
ReplyDeleteछान पोस्ट.
माझ्या कडून ब्लॉगर्स वर कॉमेंट पोस्ट होत नव्हता, मध्यंतरी, पण आज जमतंय, म्हणून पुन्हा आलो कॉमेंट टाकायला.
मैत्री म्हणजे काय? खरच मला अजुनही ते निश्चित शब्दात सांगता येणार नाही. पण माझ्या दृष्टीने मैत्रीची सरळसोपी व्याख्या म्हणजे असं नातं जे एकमेकांना ते जसे आहेत तसं स्विकारतं. अर्थात फार गहन आहे हा विषय पण तरीही फार काही न सांगता तु तुझ्या शैलीत छान लिहील आहेस. लगे रहो............
ReplyDeletemazya...blogla bhet dya hooooooo
ReplyDeleteमहेंद्र, तुझी प्रतिक्रिया पाहून आनंद झाला. धन्यू रे!
ReplyDeleteकाही काही वेळा इतक्या संमिश्र भावना एकमेकावर कुरघोडी करतात की गुंता होतो. :D बरं तो संपूर्ण उकलणेही एका हाती शक्य नसते.:)
देवेन, एकदा आपण यावर चर्चा करूच या. लगेच कधी हा प्रश्न टाकून मला कोंडीत पकडू नकोस. :D अश्या बर्याच गोष्टींची आपली यादी लंबेलाट झालीये, पण होप्स आहेत तोवर हरकत नाही... :)
ReplyDeleteमैत्रीत, समोरच्यात स्वत:ला शोधण्याचे विचार जोवर शिरत नाहीत तोवर सारे ठाकठीक म्हणायचे... निदान आपल्या बाजूने...
आवर्जून अभिप्राय दिलास, अनेक धन्यवाद!
प्रसाद, अरे मला आधी कळलेच नव्हते तुझी नवी पोस्ट आल्याचे म्हणून उशीर झाला. माफी!
ReplyDeleteaaho sorry mahnoo naka ho...pan tumchi pratikriya nehmich oospurt astat..magnoon
ReplyDelete" जीवनाचे सगळेच चॅप्टर आपल्याला हवे तसे कसे लिहिता येतील? काहीतरी डावेउजवे असणारच."+100
ReplyDeleteफार भावली गं पोस्ट...मैत्री खरी निर्व्याज हवी..पण काय माहित कुठे आपण चुकतो समजुन घ्यायला..मस्त लिहिलेस..
http://marathikavitaa.blogspot.com/2009/04/blog-post_3584.html
ReplyDeleteबघ वाचुन...आवडली का सांग...
माझा काहीतरी प्रॉब्लेम होता, ब्लॉगर्स वर कॉमेंट्स देता येत नव्हत्या . शेवटी आका ने सांगितलेले सेटींग केल्यावर जमायला लागलंय.
ReplyDeleteम्हणजे काका आता ब्लोग्गरवाल्यांना पण नियमित दर्शन देणार अशी बातमी आहे तर...आका ठाकु
ReplyDeleteभाग्यश्री, तुझा एक गुण जो अगदी ठळक दिसतो...अगदी पहिल्या भेटीत ही तो कळेल तो हाच की तुझ्याशी बोलताना आम्हाला कधीच तू एखाद्या दूरस्थ बेटासारखी नाही वाटलीस... you are so approachable...
ReplyDelete...आणि हो, तुझ्यावर तुझी ही 'ब्लोगर-भावंडे' खूप प्रेम करतात. तुझा गैरफायदा घेण्याचा विचार ही कधी आमच्या मनात येणार नाही.
श्रीराज, काय म्हणू यावर? घशात आवंढा दाटून आलाय. धन्यू म्हणून तुझ्या इतक्या आपुलकीच्या शब्दांना औपचारिक करत नाही. भापो. :)
ReplyDeleteबर्याच दिवसानी आपली पोस्ट वाचली. नेहमिप्रमाणे फ़ारच छान.
ReplyDeleteजाधवसाहेब, आपले अनेक आभार. आन्ंद वाटला लेख आवडल्याचे वाचून. मधून मधून भेट देत राहा. :)
ReplyDelete