जाता जाता एक नजर इथेही........

Friday, December 25, 2009

सहीच.....

Creativity at it's best


कॊम्प्युटर कॊम्प्युटर काय लावलंय....... शेवटी मोडीतच ना...

लय डोकेबाज.....

u must be kidding......

.......

अजुबा!

PHD in English


बाकीचे झाडामागे का रे?

Platini Vs Diego Maradona


कहीं तो यस्स्स बोल यार ......

Truth of Life

( मला विरोपातून आले होते. शिर्षके मी टाकण्याचा प्रयत्न केलाय. )

Thursday, December 24, 2009

दार उघडा दार......


सगळ्यांना नाताळच्या पूर्वसंध्येच्या अनेक शुभेच्छा! आपणा सर्वांसाठी सांताक्लॊज पोतडीभरून सुख घेऊन आलाय...... आत्मविश्वास, विद्या, चांगुलपणा, मेहनतीची प्रवृत्ती व हिम्मत, कष्टाची तयारी, आनंदी वृत्ती, उत्तम आरोग्य, थोरामोठ्यांचे आशीर्वाद व प्रेम सगळे कसे ठासून भरलेय त्याच्या थैलीत. उघडताय ना दार?


Wednesday, December 23, 2009

साखळीतली माझी कडी.........टॅगले म्या....

एका शब्दात लिवा म्हणे..... कसे जमनार तुम्हीच सांगा बरे...... अवो इतकं सिंपल का आहे ते. बरं असू दे.... डायरेक्ट मुद्द्यावरच येते म्हणजे तेवढेच कमी शब्द होतील. ( पण मी म्हणते इतकी कंजूशी का करावी माणसाने? आता याला काय पैसे पडतात का? जरा गप्पा-खिदळणे झाले की दिवस कसा मस्त जातो... ) सुटली का तू पुन्हा..... कंसात लिहिले म्हणजे ते शब्द गणले जाणार नाहीत असे वाटतेय का? चला..... कामाला लागा. चौतीस प्रश्न आहेत आणि वेळ फक्त पंधरा मिनिटे. ( चोर लेकाचे. मुद्दामहून कमी वेळ ठेवलाय..... , हा... पण मी सोडणार नाही. विक्रमदित्याची भन हाय मी...... वेताळा .... अरे शब्दांना म्हण गं.... तुम्हाला सोडणार नाही...... ही ही हा हा ...... ) अग दोन मिनिटे संपलीही..... खरड पटपट.....


1.Where is your cell phone?
गपगार पडलाय ( शोमू घरी आलाय ना )

2.Your hair?
सरळ-सिल्की

3.Your mother?
जीवलग

4.Your father?
मिश्किल व आनंदी जीव

5.Your favorite food?
आईच्या हातचे काहीही

6.Your dream last night?
शोमूने नासा जॉईन केले

7.Your favorite drink?
आले व गवती पात घालून केलेला चहा व शहाळे

8.Your dream/goal?
बरीच आहेत.....

9.What room are you in?
फॅमिली रूम

10.Your hobby?
आवडत्या माणसांबरोबर बसून दंगा करणे

11.Your fear?
रोज रात्री स्वप्नात मी जिन्यावरून गडगडत जाते ( हे स्वप्न मला गेली कित्येक वर्षे नेमाने पडतेय.... आणि ते पडले की मी आधार शोधते पडू नये म्हणून.... आणि नवरा किंचाळतो. एकही दिवस ही बया सुखाने झोपू देणार नाही. थांब मीच ढकलून देतो तुला ( स्वप्नात बरं का ) ..... चांगली सडकून आपटून घे म्हणजे तू सुटशील आणि मी पण..... लोक्स ओळीने दहा दिवस मी तुम्हाला दिसले नाही तर समजून घ्या काय झालेय ते...... हाहा... अरे देवा एका शब्दात लिहायचे होते ना..... पण हे कंसात आहे तेव्हां........ )

12.Where do you want to be in 6 years?
मायदेशात

13.Where were you last night?
घरीच लेकाबरोबर पीएस३ खेळत होते

14.Something that you aren’t diplomatic?
माझ्या जीवलगांबरोबर

15.Muffins?
डार्क चॉकलेटवाले कुठलेही ( पण फक्त दोन घास.... नंतर त्याचा घास लागतो मला )

16.Wish list item?
कुठून सुरवात करू...... मारुतीच्या शेपटावाणी लंबेलाट यादी आहे बुवा......

17.Where did you grow up?
दादर- आमची मुंबई

18.Last thing you did?
शोमूला बुरजी करून दिली ( रात्री २.३० वाजता....)

19.What are you wearing?
नाइट ड्रेस

20.Your TV?
एलएमएन-मूव्हीज, नुसती रडारड....

21.Your pets?
नोप. मासे सोडून( टँकमधले बरं का..... हो नाहीतर द्याल शार्कच्या तोंडी ढकलून....)
कुठलाही प्राणी पाहिला की मी रस्ता बदलते. मुलखाची घाबरट.

22.Friends
अनेक, काही खासम खास..... नंबर वनवर माझी ममा.....

23.Your life?
सध्या तरंगतेय( लेक आलाय ना )

24.Your mood?
एकदम झकास. ( काल रात्री आयमॅक्सला जाऊन " अवतार " पाहिला...... निसर्गसौंदर्याने डोळे सुखावलेत..... मस्तच. जबरी फिक्शन, जरूर पाहा. आणि हो मी त्याला अवतारच म्हणते.......ऍवॅटार नाही.....)

25.Missing someone?
हो तर.... आई-बाबा-लेक( जवळ नसतो ना नेहमी ) आणि माझे ठाण्याचे घर.

26.Vehicle?
बी. एम. डब्ल्यू एक्स थ्री व होंडा सिव्हिक-इक्स.

27.Something you’re not wearing?
कुत्सितपणा व माज

28.Your favorite store?
डोळ्यांना व मनाला सुखावणारी ( फुले-भाजी मार्केट- गौरीला डिट्टो..... व मेसीज मधले होम सेक्शन )

Your favorite color?
मोतिया व लिंबू

29.When was the last time you laughed?
काल ( दोन वर्षापूर्वीचा मी, आई, बाबा, शोमू व वहिनी आणि दोघी भाच्या असा एक फोटो आहे..... त्यात मी बकासुरासारखी दिसतेय आणि बाकीचे सगळे सापळे...... या सगळ्यांच्या वाटचे जेवण मी हादडले होते बहुतेक.....हीही...)

30.Last time you cried?
२००८ नोव्हेंबराला मायदेशाहून आई-बाबांचा निरोप घेऊन निघाले तेव्हां.....

31.Your best friend?
माझी ममा ( नचिकेत आणि शोमू बदडणार मला )

32.One place that you go to over and over?
नवऱ्याच्या मागे ( काय करता राव..... आपल्याला हवे तेच करवून घ्यायचे असेल तर सारखी भुणभूण-कटकट करावी लागते. हीहीहाहा.....)

33.One person who emails me regularly?
कोन नाय बा...... ( जो तो आपापल्या व्यापात बिजी.......वेळेचा सवाल हाय.... आणि इतकं प्रेम कोण करतंय आजकाल )

34.Favorite place to eat?
आई जिथे स्वयंपाक करत असेल ते

Tuesday, December 22, 2009

निक्कीजी त्वाडा जवाब नही.......

लेक ताहो









समर मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोला मित्र-मैत्रिणीकडे गेलो असता ' लेक ताहोला ' जाण्याचा योग आला. अतिशय सुंदर रमणीय ठिकाण. डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग. अथांग पसरलेले निळेशार पाणी. समर असल्याने पाणी कोमट होते. मग मस्त डुंबलो.....लोळलो, खेळलो. ' लेक ताहोला ' पोचलो तेव्हां दिवस कलला होता. पटकन हॉटेल वर पोचून सामान टाकून लेकवर पळायचे हेच डोक्यात होते. तरीही गावात शिरताना आजूबाजूला नजर टाकत होतोच. सगळ्यांच्या नजरा अर्थातच कुठले चांगले फूड जॉइंट आहेत हे धुंडाळत होत्या. निसर्ग पाहून डोळे-मन सुखावेल पण पापी पेट का क्या करे.... आता इतका सुंदर नजारा, कमरे एवढ्या पाण्यात डुंबत केलेल्या हुशाऱ्या, लाटांबरोबर केलेली पळापळ.... मग वाळूचे केलेले किल्ले, करत करत दमलो. आता काय करता राव चाळिशीत आलोय ना.... कधी कधी हिसका दावायचीच ना ती..... दम लागायचाच. तरी एकमेकांना सांगत होतो.... मस्ती जरा जास्तच होतेय....मग होईल फासफुस.... हा हा.... पण मूड मस्त बन गया था....

आम्ही दोघे आणि मित्र-मैत्रीण व त्यांची दोन लहान मुले. मोठा आठ वर्षाचा आणि धाकटा अडीचचा. आमचा पोर या वयातून कधीचाच पार झालाय त्यामुळे सवय नाही राहिली राव. पोरांबरोबर पकडापकडी खेळ, कुठे उड्या मार....नुसती धमाल चालली होती. सूर्य अस्तास गेला तसे हॉटेलमधल्या तरण तलावात येऊन डुंबलो. प्रत्येकाला कडकडून भूक लागलेली. काय खायचे यावर चर्चा सुरू झाली. करता करता त्यादिवशी फार उशीर झाल्याने नीटसे काही खाणे मिळाले नाही. जो तो वैतागला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रोपवे मधून पार वर जाऊन अख्खा लेक डोळ्यात साठवायचा प्रयत्न केला. खूप उनाडलो. रूमवर परत आलो तर काल संध्याकाळपासूनची इंडियन खाण्याची भूक मनात दंगा करू लागली. अरे, गावात शिरताना आपण एक धाबा पाहिला होता ना रे? काय नाव होते बरे..... हां ' निक्की दा ढाबा....' चला जायचे का तिकडे? हो.....सगळ्यांनी एका सुरात होकार भरला. लागलीच निघालो.

' निक्की दा ढाब्यावर ' पोचलो. जेवणाची वेळ झाली होतीच. हॉटेल खूप मोठे नसले तरी अडचण होईल असेही नाहीये. टिपीकल सजावट होती. एकीकडे बुफे लावलेला होता. काही नेहमीची कामाधामाची माणसे त्यांचे ठरावीक जेवण जेवून पटापटा पळत होती. आमच्यासारखी ट्रीपला आलेले दोन-तीन ग्रुप्स आरामात गप्पा-गोष्टी, रमतगमत बसले होते. हॉटेलचा मालक आला. हाय हेल्लो झाले. कहाँ सें हो जी....... मग प्रथम इथे कुठे मायदेशात कुठे सगळी देवाणघेवाण झाली. मालक बोलघेवडा होता. अघळपघळ बोलत होता....मध्येच मुलांशी त्याने थोडी मस्ती केली...... मग थोडे चुटकुले.... हसीं मजाक झाला. यामध्ये ऑर्डरही घेऊन झाली. " आत्ता आणतो सगळे तोवर कुछ पियेंगे? लस्सी ट्राय करो जी....बहोत बढीयाँ...... एकदम पंजाबदी याद ताजा हो जावांदी...... " पण आम्हाला असे पोट भरायचे नव्हते.

मित्राचे धाकटे लेकरू एका जागी बसावे म्हणून त्याच्यासाठी थोडे बर्फाचे खडे एका ग्लासमध्ये मागवले होते. मधूनच एखादा खडा खायचा नाहीतर बशीत घेऊन मीठ टाकायचे.... त्याचा मस्त टाईमपास आहे हा. रमला होता चांगला. आमची मैत्रीण पण जरा हुश्श करून बसली होती. मी बुफे घेतला होता....त्यामुळे डोकावले तिथे. नेहमीचेच पदार्थ होते. पाहता पाहता सगळ्यांचे जेवण आले. काही वेळ सगळे हातातोंडाच्या लढाईत मग्न होते. जरा पोट भरल्यावर पुन्हा गप्पा सुरू झाल्या. तोच ढाब्याची मालकीण आमचे " हाल " विचारायला आली. " कैसा लगा खाना? यहाँ हमारा ढाबा कई सालोंसे हैं.....बहोत बिजी रहते हैं......" वगैरे सुरू झाले.

एकीकडे आम्ही जेवत होतोच. मोठ्याने पास्ता घेतला होता आणि त्याला मीठ हवे होते. पण मिठाचा ताबा धाकट्याकडे होता. त्याच्याकडे मागावे तर तो भोकाड पसरणार म्हणून मित्र म्हणाला की त्या शेजारच्या टेबलावरचे घे रे. पोर उठले तोच निक्कीबाईंनी एकदम ’नो ’ असा जोरदार आवाज दिला. पोरगं एरवी आईबाबाकडे वळूनही पाहणार नाही ते त्या आवाजाने एकदम सहमल....दचकून, घाबरून चुपचाप खुर्चीवर अंग चोरून बसलं. आणि आमच्या सगळ्यांच्या तोंडाकडे पाहू लागलं. तोवर निक्कीबाईंनी धाकट्याचा ताबा घेतला.....एकीकडे तोंड चालूच होते. " पुत्तरजी, ऐसे नमक जाया नही करतें. देखो भैय्याको नमक देदो. अच्छे बच्चे गुड बिहेव करते हैं. चलो भैय्याको नमक देदो....." आता हे एवढे सहज सोपे असते तर आम्ही सगळ्यांनी केले नसते का? पण......काहींना जाम हौसच असते दुसऱ्याच्या पोरांना शिस्त लावायची आणि आईबापाला कानकोंडं करवायची.

तिच्या कडक आवाजाला....म्हणजे तिने प्रयत्न केला होता धाकट्याशी बोलताना तो गोड गोड करायचा....पण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ना..... धाकटे पोर घाबरले आणि त्या गडबडीत निक्कीने डाव साधला आणि मोठ्याला मीठ दिले. दुसऱ्याच क्षणाला धाकट्याने गळा काढला आणि निक्कीने धूम ठोकली. मग पुन्हा मीठ-बर्फाची मनासारखी जुळवणी होऊन रडे थांबायला पंधरा मिनिटे बाबापुता करावे लागले. सगळे पुन्हा स्थिरावले. माझ्या मनात निक्कीचा आगाऊपणा खदखदत होता. एकतर आजकाल सगळीकडे लहान मुलांना रमवायला काहीतरी देतात. कलर्स म्हणा, छोटेसे गेम्स म्हणा.....जेणेकरून पोरे आईबाबाला दोन घास जेवू देतील. ते तर दूरच राहिले वर त्याला ही बया रडवून गेली.

बुफे मधले पदार्थ चाखून झाले. मग मोर्चा स्वीट्स कडे वळवला. शोधतेय शोधतेय पण काहीच सापडेना. आयला....म्हटले असे कसे होईल. बहुतेक ठिकाणी दोन तरी गोड पदार्थ असतातच. इथे दोन नाही पण एकतरी असलाच पाहिजे. निक्की तर हॉटेलचे-फूडचे लय गुणगान करत होती. च्यामारी काहीच दिसत नव्हते. नवऱ्याला म्हटले अरे तू शोध बरं....निक्कीच्या रागाने मला गोड सापडतच नाहीये. सगळे हसत होते.....नवरा उठला...शोधून आला. नाही गं....बहुतेक आजच्या बुफेत गोड नाहीच ठेवलेय. आँ......... कमालच झाली. एकही गोड पदार्थ नाही? बुफेचा रेट होता.... $११.९९ आणि गोड नाही. आता बरी तावडीत सापडली निक्की. मी अगदी आसुरी आनंदाने उठले आणि निक्कीला गाठले.

निक्की आमच्या पोराला रडवून जी पळाली ती काउंटरमागे जाऊन दडली होती. मी तिला हाय केले......तशी झाले का जेवण? आवडले का? अगदी गोड बोलू लागली. " हां ठीक होते....पण मी गोड पदार्थ शोधत होते.....कुठे वेगळ्या जागी ठेवले आहेत का? तर दाखव मला..... माझा स्वीट टूथ आज अगदी खवळलाय. " त्यावर निक्कीबाईंनी गाल संपूर्ण ताणून जितके मोठ्ठे हसता येईल तितके हसून मोठ्या गर्वाने मला सांगितले. " अग आज भारीच गंमत झाली. सकाळी ब्रेकफास्टला इतकी प्रचंड गर्दी होती की हे बुफेचे जेवण बनवतानाच नाकात दम आला. आमच्या शेफला गोड बनवायला वेळच नाही मिळाला. मग मीच म्हटले.....कोई गल नहीं जी, इक दिन मिठ्ठा नही होगां तो काम चला लेंगे....... लोगोंको बोल देंगे नही हैं. " मी अवाक. वा! निक्की त्वाडा जवाब नही......

संताप संताप झाला माझा. आमच्या एवढुश्या पोराला शिस्त लावतेय बया. स्वत: धाबा टाकून बसलीये. आणि वर लोगोंको बोल देंगे नही हैं, काम चला लो....... इतनी चंगी-भली तो तुम हो नही जी...... तिला म्हटले, " मग बुफेचा आजचा रेट काय आहे? " " वहीच रोजका...लिखा हैं ना वहाँ. " पुन्हा मीच अडाणी असल्यासारखा चेहरा करून बोर्डाकडे तिने बोट दाखवलेंन. मग मात्र माझा टेंपर गेला ( म्हणजे मनात कधीचाच गेला होताच आता उघडपणे गेला ) " मला वाचता येतोय तो बोर्ड. मी तुला रोजचा भाव विचारत नाहीये. आज तू बुफेत स्वीट्स दिलेले नाहीस. का तर म्हणे तुम्हाला वेळ नाही मिळाला म्हणून......आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची राहिले दूरच तू तर मोठ्या दिमाखात मला सांगते आहेस...... ये ना चालबे. तेव्हां आजचा बुफेचा रेट ९.९९ हा असला पाहिजे ना?" तिने माझ्याकडे मारक्या म्हशीसारखे पाहत हात उडवले ( बहुतेक मनात शिव्या देत होती बया ) आणि म्हणाली, " ऐसे थोडा ना होता हैं? रेट तो वहीं रहेगा. " मी म्हटले मी जे खाल्ले नाही त्याचे पैसे देणार नाही.

तोवर तिच्या नवऱ्याच्या लक्षात आले होते. आपल्या बायकोने धंद्याचे टेक्नीक सोडून भलतीच लाइन पकडली आहे. तो आला पळत. " मॅडमजी कोई गल नही जी. आप चिंता न करो. बिल देख लोजी पहले फिर दे देना.....खाना पसंद आया के नही? नही आया होतो बोलो जी ........ हमें भी इंम्प्रूव्ह करना हैं....... आयीये आप बैठीये..... " असे म्हणत मला आमच्या टेबलपाशी घेऊन गेला. बिलात त्याने बुफेचे दोन डॉलर कमी लावले वर आग्रह करकरून सगळ्यांना मसाला-अद्र्कवाली चाय पाजली. हा हा....भलता गैरसमज करून घेऊ नका .......फुकट नाही काही. म्हणजे खरे तर त्याने गोड गोड बोलून ' चाय ' पाजून आणखी खर्चात पाडले. निक्की सगळा वेळ मला खाऊ का गिळूचा चेहरा करून पाहत होती. हा हा........

जाऊ दे गं.... कुठे दोन डॉलरसाठी हाणामारी..... सगळे म्हणत होते. पण हा प्रश्न दोन डॉलरचा नाहीये. तत्त्वाचा आहे. जिला दोन वर्षाच्या मुलाची मेंटॅलिटी समजत नाही...... त्याला रडवले.... मोठ्याला घाबरवले वर आम्हा सगळ्यांची नजरेने
हेटाळणी केली....... साधे पोरांना ताब्यात ठेवता येत नाही...... तिला मी का म्हणून बक्षावे? आणि हे तिने केले नसते तरीही स्वीटस द्यायचेच नाहित वर पैसेही घ्यायचे हा प्रकार तिने करताच नये ना..... नंतर सगळ्या ट्रीपभर निक्की.... असे म्हटले, की......

Monday, December 21, 2009

आमचे लाडके कांबळेसर......


काल संध्याकाळी लोकसत्ता( ऑनलाईन ) वाचायला घेतला. आणि धक्काच बसला. अविश्वासाने मी पुन्हा पुन्हा बातमी वाचली. भरभर मटा व सकाळ मध्येही वाचली. दुर्दैवाने बातमी खरीच होती. माझे आवडते कांबळेसर हैदराबादमधील हुसेन सागर तलावात बुडून निवर्तले होते. दिनांक १४ तारखेपासून बेपत्ता असलेल्या कांबळेसरांचे असे जाणे मनाला अतिशय चटका लावून गेले.

आज सगळ्याच पेपरात म्हटले आहे की त्यांनी आत्महत्या केली असावी. मानसिक स्थिती बरेच दिवसांपासून बिघडली होतीच. तशात त्यांनी औषधोपचार ही दोन दिवस घेतले नव्हते. हे सगळे वाचून जीवाला फार लागले. अतिशय हुशार व समतोल विचार असणाऱ्या आमच्या सरांना इतका प्रचंड त्रास होत असावा की दुसरा पर्यायच उरला नाही. का अजून काही वेगळेच कारण असेल? ते जे काही असेल ते असो तरीही सारखे वाटते आहे सरांनी असे कसे केले? आम्हाला माहीत असलेले सर तर एकदम तडफदार, हसतमुख, गप्पा विनोद करणारे, सगळ्या पोरांवर( आम्ही स्टुडंट म्हणजे त्यांची पोरेच होतो )प्रेम करणारे होते.

अकरावी व बारावीला मी हायर लेवल मराठी घेतले होते. कांबळेसर तेव्हां २८/३० चे असतील. पहिल्याप्रथम सरांना पाहिले तेव्हां काही खास प्रभाव पडला नाही. मात्र त्यांनी बोलायला सुरवात केली आणि सगळा वर्ग मंत्रमुग्ध झाल्यासारखा ऐकत राहिला. अत्यंत शुद्ध, स्वच्छ व थोडीशी आलंकारिक भाषा. भाषेवरचे प्रभुत्व जबरी होते. संतवाग्डमयाबद्दलचा त्यांचा सखोल अभ्यास होता. मुख्य म्हणजे सगळ्या पोरांना आपलेसे करण्याची व शिकवण्याची एक विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. ' माझ्या जल्माची चित्तरकथा ' लिहिणारी आई व ' मी कृष्ण ' लिहिणारे बाबा त्यांना लाभलेले होते. शिकवत असताना आमच्यात ते सहजी मिसळून जात. विशेष म्हणजे शिकवताना कधीच ते फक्त पुस्तकी शिकवत नसत. निरनिराळी उदाहरणे, सामाजिक दाखले, प्रसंग, आणि मुख्य म्हणजे जे सांगतील ते सप्रमाण सांगायचे. कविता शिकवताना त्यातले भाव अलवारपणे उलगडून दाखवत.

सरांची दलित चळवळ-संघर्ष, त्यांनी यासगळ्यासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहेच. मंडल आयोग लागू करण्याच्या प्रक्रियेत ते अतिशय सक्रिय होते हे मला नीट आठवतेय. पण हे सगळे पुढे जाऊन केले्ले. आम्हाला माहीत असलेले आमचे सर म्हणजे अतिशय अभ्यासू, लेखक, तरल संवेदनशील कविता लिहिणारे व तडफदार भाषण करणारे. सरांच्या पत्नीही आमच्या चांगल्या ओळखीच्या होत्या. बारावीनंतर सर शिकवायला नसले तरी नेहमीच भेट होई. अमुक पुस्तक वाच गं नक्की असे ते आवर्जून सांगत. अनेकदा पुस्तके आणूनही देत. कविता करायला प्रोत्साहन देत. वृत्त, छंद यांचा प्रभावी उपयोग कसा करावा, निबंध लिहिताना अतिशय मुद्देसूद व सप्रमाण माहिती देऊन लिहावेत. उगाच फाफटपसारा लिहीत बसू नये. एक ना दोन अनेक गोष्टी समजावून सांगत.

कॉलेज संपले आणि सरांशी असलेला संपर्क जवळ जवळ तुटलाच. मधल्या काळात सरही रुतब्याने-मानाने-कर्तुत्वाने खूप मोठे झाले होते. व्यस्तही झाले होते. नेहमी सरांच्या चळवळीच्या बातम्या, भाषणे वाचत ऐकत होतो. " रामायणातील संस्कृती संघर्ष " हे त्यांचे लिखाण म्हणजे रामायणाची केलेली एक वेगळीच समीक्षा आहे. समाज परिवर्तनाकरिता त्यांनी भरीव योगदान दिले आहे. माझ्यासाठी मात्र प्रा. अरुण कांबळे हे आमचे अतिशय लाडके सर होते व सदैव माझ्या मनात ते जिवंत राहतील. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

दाद द्यायलाच हवी असे........

हल्लीच माझ्या मैत्रिणीच्या मुलाची बॅग गडबडीत रिक्शातून घ्यायचीच राहून गेली. मुलगा बिचारा अगदी घाबरला, गोंधळला....कपडे-सामान सुमान गेले वर आई-बाबा ओरडतील ही भिती. रिक्षा तर गेली निघून. बरे याच्याकडे सामान जास्त असल्याने मित्र आलेला सोबत दुसऱ्या रिक्शातून आणि त्याने हा घोळ केलेला. आता मित्राला किती दोष देणार आणि देऊनही उपयोग काय..... बॅग थोडीच मिळणार होती. शेवटी मन खट्टू करून हा घरी पोचला. दुसऱ्या दिवशी मित्राचा फोन.... रिक्षावाल्याने बॅग घरी आणून दिली आहे. एका क्षणात सगळ्यांचे चेहरे खुलले. आनंदीआनंद पसरला. त्या रिक्षावाल्याला बक्षीस द्यायलाच हवे असे पटकन मैत्रीण म्हणाली. हल्लीच्या जगात इतके चांगले कपडे, इतर सामान कोण आणून देतेय परत. प्रामाणिक होता गं अगदी. रिक्षावाल्याच्या या प्रामाणिक कृतीने या सगळ्यांची रुखरूख संपली. मुलाची सुटी आनंदात जाणार.

ही घटना जितक्या लोकांना कळली तितक्या सगळ्यांचा चांगुलपणावरचा विश्वास वाढीस लागला. उद्या जर आपल्याला कोणाचे काही सामान सापडले आणि त्यात त्याच्या मालकापर्यंत पोचण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध असेल तर ते नक्कीच पोचते केले जाईल हा मनात असलेला भाव अजून दृढ झाला. मला वाटते तात्कालिक फायदा तर झालाच पण दूरगामी परिणामकारक फायदा जास्त महत्त्वाचा. या घटनेतून काही घटना आठवल्या. प्रामाणिकपणा हा वयातीत व सांपत्तिक स्थितीशी अजिबात संबंधीत नसतो. तो मुळात मनातच असावा लागतो. अतिशय पैसेवाले लोकही उचलेगिरी, भामटेगिरी करताना आपण पाहतोच. आणि एखादा अत्यंत गरीब अचानक सापडलेले कोणाचे पैसे सचोटीने परत करताना दिसतो. खरे तर त्याची परिस्थिती फार वाईट असते पण मनाने तो सच्चा असतो. विश्वास या शब्दाचा अर्थ त्याला कळलेला असतो. बरेचदा बाहेरच्या देशात हे चांगुलपणाचे अनुभव जास्त येतात असे दिसते परंतु मला मात्र नेहमी वाटते प्रामाणिकपणा देशातीत आहे. कारण त्याचे मूळ तुमच्या संस्कारात-मनात रुजलेले असते.

लोकलने रोज प्रवास करणाऱ्या सगळयानांच डब्यात येणाऱ्या कानातले, क्लिप्स, पिना, तत्सम खजिना घेऊन येणाऱ्या बायका-पोरी म्हणजे खास जिव्हाळ्याच्या. घ्यायचे असो वा नसो स्त्रीसुलभ हौस असतेच प्रत्येकीला. मैत्रिणींसोबत चर्चा करत हे बघ गं... कसे दिसतेय? घेऊ का? वगैरे संवाद नेहमीचेच. या विकायला येणाऱ्या पोरी-बायकाही उत्साहाने व धंद्याचे टेक्नीक अंगी बाणवून असतात. मग कधी कधी एखादी नेहमीची खास सलगीने जवळ येईल व ताई हे बघा खास तुमच्याकरता आणले मी. खूप छान दिसेल तुमच्या कानात. घेता का? अशी साखरपेरणी करत हक्काने तुम्हाला घ्यायला भाग पाडेल. अशातलीच ती एक. संध्याकाळची ठाणा लोकल ठरलेली होती. अगदी ती चुकलीच तर तिच्या मागची. रोजच ही साधारण विशीच्या आसपासची मुलगी पाठीवरच्या झोळीत तान्हुले आणि हातात चार खच्चून भरलेले ट्रे घेऊन भायखळा- करी रोडच्या मध्ये चढे. मरणाची गर्दी त्यात बाळ आणि या ट्रेंचे वजन. मला तर भितीच वाटे. पण ही एकदम बिनधास्त.

स्वच्छ धुतलेली टेरीकॉट-पॉलिएस्टर मिक्स साडी, नीट विंचरलेले केस. पावडर-टिकली लावून हसतमुखाने गोड गोड बोलत माल खपवत असे. दिवाळी अगदी दोन दिवसावर आली होती. जोतो काही न काही खरेदीच्या मागे होता. सगळ्यांच्या मनातला उत्साह चेहऱ्यावरही दिसत होता. ही लगबगीने माझ्याजवळ आली. ताई हे पाहिलेत का? तुम्हाला आवडतात ना तसेच खडे व मोती एकत्र असलेले सुंदर कानातले आणलेत मी. थोडे महाग आहेत पण खऱ्या मोत्याला मागे टाकतील, एकदम झकास आहेत. घ्या न ताई. ती आर्जवे करू लागली. कानातले खरेच छान होते. मी एक घेतले. पैसे द्यायला पर्स उघडली आणि लक्षात आले की एकदम पाचशेचीच नोट आहे. नाहीतर दहा व पाच. कानातले पंचावन्न रुपयांचे होते. शिवाय मी टिकल्याही घेतल्या होत्या. सगळे मिळून साठ रुपये झालेले. तिच्याकडे सुटे नव्हतेच. आता आली पंचाईत. ती म्हणाली ताई ठाण्याला खूप वेळ आहे मी तोवर आणत्ये सुटे करून.

मी तिला पैसे देऊन टाकले. समोरच बसलेल्या दोन-तीन अनोळखी बायकांनी, अहो कशाला दिलेत इतके पैसे?काय मूर्खपणा.... असा दृष्टिक्षेपही टाकला. पण मी दुर्लक्ष केले. दादर आले आणि पाहता पाहता डब्यात प्रचंड गर्दी झाली. जरा इकडचे तिकडेही व्हायला जागा नव्हती. करता करता भांडुपाला गाडी आली.... निघाली आणि ती मला प्लॅटफॉर्मवर दिसली. माझ्या समोरच्या बायांना पण दिसली. एक पटकन म्हणाली, " आता ही बया कसली परत करतेय तुमचे पैसे. गेले समजा. नको तिथे विश्वास कशाला ठेवायचा मी म्हणते. " मलाही एक क्षणभर वाईट वाटले. निदान हिने मला सांगायचे तरी.
मी पैसे तीच्या लेकराला दिले असते तर मला आनंद तरी झाला असता. आताही लेकरालाच मिळतील पण कुठेतरी माझी रुखरूख असणार त्यात. आणि पुढे मी कधीही कोणावर विश्वास ठेवणार नाही. जाऊ दे झालं....एक धडा मिळाला. असे म्हणून मी विषय डोक्यातून काढून टाकला.....अर्थात म्हणून तो गेला नाहीच.

दिवाळी धामधुमीत गेली. जोडून चौथा शनिवार व रविवार आल्याने मस्त मोठी सुटी मिळाली. या सगळ्या मजेतही कुठेतरी मनात ठसठस होतीच. नंतरचा आठवडाही काहीतरी होत राहिले आणि माझी नेहमीची ट्रेन काही मिळाली नाहीच. पंधरा दिवसांनंतर संध्याकाळी खिडकीत बसून छान डुलकी लागलेली तोच माझ्या हातावर एकदम काहीतरी जड वजन जाणवले. कोणी काय ठेवलेय म्हणून डोळे उघडले तर ही समोर. " ताई, जीवाला नुसता घोर लावलात माझ्या. अवो माझा नवरा एक नंबरचा उडाणटप्पू. रोजच माझे पैसे हिसकून घेतोय. कसेबसे लपवत फिरते मी. त्यात तुमची ही जोखीम गेले पंधरा दिवस सांभाळून जीव दमला माझा. हे घ्या तुमचे उरलेले पैसे. मोजून घ्या नीट. म्हनला असाल ना चंद्रीने पैसे खाल्ले म्हणून. ताई अवो हे पैसे घेऊन कुठं बंगला बांधणार का मी. रोज तुम्हाला तोंड कसे दाखवले असते सांगा बरं. या लेकराची शपथ. आपल्याला नग बा कोनाचा पैसा." असे म्हणून तिने ४४० रुपये माझ्या हातावर ठेवले. तिचा तो आवेश आणि खरेपणा मनाला भिडून गेला. त्यातलेच शंभर रुपये तिच्या लेकराच्या हातावर ठेवले आणि थँक्स मानले. खुशीत गाणे गुणगुणत मला टाटा करून गेली.


गावदेवी मार्केटमध्ये जुनेपुराणे कपडे घरी येऊन घेऊन जाणारे चारपाच जण बसतात. एकदा असेच तिथे चौकशी करत होते. तिथलाच एक मुलगा...साधारण बारा तेरा वर्षाचा असेल. म्हणाला, तुम्ही व्हा पुढे मी सायकलवरून येतोच मागोमाग. मी बरे म्हटले आणि निघाले. घरी गेले पाच मिनिटातच बेल वाजली. तो आलाच होता. कपडे बरेच होते. मग त्याने अगदी धंद्याच्या खास सराईत नजरेने प्रत्येक कपड्याचे मोजमाप केले. सिल्क कसे उपयोगाचे नाही. अजून पँट नाहीत का? साड्या काढा ना ताई अजून वगैरे बडबड करत शेवटी कसे उपयोगाचे कपडे कमीच आहेत मग कसे जमायचे अशी गोळाबेरीज करून काही पैसे माझ्या हातावर ठेवले आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी बेल वाजली, पाहिले तर हा उभा. मला पाहिले आणि खिशातून पाकीट काढले आणि माझ्या हातावर ठेवले. " अग बाई! हे तुला दिलेल्या कपड्यात का गेले होते?" नवरा नियमीतपणे सात वर्षे वैष्णवदेवीला जात होता त्यातल्या शेवटच्या ट्रीपचा प्रसाद, आठशे-नऊशे रुपये व एक मोठे देवीचे चांदीचे नाणे त्या पाकिटात होते. आणि पाकीट मी देऊन टाकलेल्या कोटाच्या खिशातल्या आतल्या कप्प्यात होते. त्यामुळे कळलेच नव्हते.

त्या पोराने इतके पैसे व नाणे परत आणून दिलेत हे मला खरेच वाटेना. त्याचे आभार मानून त्याला शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले. तशी स्वारी खूश झाली. म्हणाला, " दिदी भगवान का प्रसाद हैं ना उसमें. में अगर ये सब नही लौटाता तो बहोत पाप लगता. और मैं जानता था आप बहोत खूश होके मुझे बक्षीस दोगी. अब ये मेरा हक का पैसा हैं. बराबर ना? " मी हो म्हणून त्याचे पुन्हा कौतुक केले तशी, फिर कपडा देना हो तो बुला लेना मैं आजाउंगा. असे म्हणत उड्या मारत पळाला.

माझी आजी एकटीच एकदा एशियाडने प्रवास करत होती. नाशिक-पुणे. मध्ये कुठेतरी बस थांबली तशी ही बाथरुमला जायला उतरली. बाजूच्या माणसाला सामान ठेवलेय रे बाबा, आलेच मी पटकन असे सांगितलेले. पण काहीतरी गडबड झाली आणि आजी परत आली तर बस गायब. आजी गोंधळली. सामानही गेले. शिवाय आजीने पैसे बॅगेत ठेवलेले होते त्यामुळे आता घरी पुण्याला कसे जायचे हा प्रश्न पडला.

आजीभोवती गर्दी जमली. ती पाहून दुसऱ्या एशियाडच्या ड्रायव्हरने आजीला काय झाले म्हणून विचारले असता हे रामायण कळले. त्याने लागलीच फोन करून पुढच्या थांबण्याच्या ठिकाणी कळवले काय झालेय ते. वर त्यांना आजीला टाकून गेलेच कसे असा दम भरून आजींचे सामान उतरवून घ्या आजी मागच्या बसने येतच आहेत असे सांगितले. आजीला दुसऱ्या बसमध्ये बसवले. आजी म्हणाली, " दादा तिकिटाला पैसे तर नाहीत रे माझ्याजवळ. " तसे," आजी अवो चूक आमची हाये. आता त्या बसवाल्याने तुम्हाला शोधायला नको होते का? सांगा बरं....असे कोणी आजीला टाकून जाते का? काही काळजी करू नका. सामान वाट पाहतंय तुमची. नीट सुखरूप जा बरं का आता. "

आणि खरेच की, सामान आजीची वाट पाहत होते. बस पोचल्या पोचल्या एका कंडक्टरने आणून आजीच्या ताब्यात दिले वर सॉरी पण म्हणाला. नंतर आजीला मी विचारले, " आजी तुला भिती वाटली असेल ना गं....एकतर सामान गेले त्याचे दु:ख् राग व आता घरी कसे पोचणार याची चिंता. " आजी पटकन म्हणाली, " अग चिंगे सामानाची मला बिलकूल चिंता नव्हती. ते मिळणार होतेच. हा फक्त पुण्याला मिळतेय का मध्येच आणि मी घरी कशी आणि कधी पोचणार हा प्रश्न मात्र पडला होता. मला बराच वेळ आजीच्या विश्वासाचे नवल वाटत राहिले.

Sunday, December 20, 2009

कळविण्यास अतिशय आनंद होत आहे.....

सनविवि,

कळविण्यास अतिशय आनंद होत आहे....

दीपावलीचे औचित्य साधत "
नेटभेटच्या " सलिल चौधरी व प्रणव जोशी यांच्या अथक मेहनतीने मराठीतले पहिलेवहिले ई-मासिक प्रसिद्ध झाले. ऑक्टोबर २००९ च्या पहिल्याच मासिकात माझे " बाबांची खिचडी " व " खारीचे योगदान " हे दोन लेख समाविष्ट आहेत. अंक येथे वाचता येईल. या पहिल्याच अंकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

पहिल्या अंकाच्या जोरदार स्वागताने व प्रतिसादाने नोव्हेंबरचा अंक अजूनच सुंदर व कसदार लिखाणाने समृद्ध झाला आहे. नोव्हेंबर २००९ च्या अंकात "
रुमाल " व " नको म्हटले होते ना, तरीही...." हे दोन लेख समाविष्ट केलेले आहेत. अंक येथे वाचता येईल.

" नेटभेट ई-मासिकाचा नोव्हेंबरचा " अंक जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न व अंक निर्मितीसाठी घेतलेल्या श्रमाचे चीज होते आहे. सलिलने म्हटलेच आहे की ६००० पेक्षा जास्त वाचकांनी मासिक वाचले असून १५०० लोकांनी डाउनलोडही केले आहे. हे वाचून खूप आनंद झाला.

नोव्हेंबरच्या या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता या वर्षाचा शेवटचा म्हणजे डिसेंबर २००९ चा अंक प्रसिद्ध झाला असून यात माझा "
खरी कमाई " हा लेख समाविष्ट केलेला आहे. तीनही अंकात माझ्याकडून थोडेसे योगदान देण्याची सलिल व प्रणव यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. अंक " येथे " वाचता येईल.

ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हे तिनंही अंक आपण जरूर वाचावेत. ते डाउनलोड करूनही घेता येत असल्याने आपल्याला जशी सवड होईल तसतसे वाचता येतील. अंक कसे वाटले ते आवर्जून कळवा अशी विनंती आहे. नेटभेटच्या या ई-मासिकाला वाचकांचे उदंड प्रेम नेहमीच लाभावे ही मनोमन इच्छा आहे.

आपण वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे सतत लिहिते राहण्याची प्रेरणा मिळते व उत्साह वाढतो. आपला लोभ आहेच. माझ्या सगळ्या वाचकांचे मन:पूर्वक आभार.

भाग्यश्री

Saturday, December 19, 2009

तो, ती आणि कुत्तरडे......

तो .... आजकाल कामे फारच वाढलीत. या डेडलाईन्स, विकली रिपोर्ट्स, टार्गेट्स आणि या उठसूट होणाऱ्या मीटिंगांनी डोके नुसते भंजाळून गेलेय. रोजचे आठ-साडेआठ होतातच ऑफिसमधून निघायला. घरी पोचेतो दहा. किती वेळा आईला सांगितले जेवण झाकून ठेवून देत जा. पण तीही जाम हट्टी आहे. ऐकतच नाही. तिचेही बरोबरच आहे म्हणा..... ती ताटकळत बसते म्हणून निदान काहीतरी बोलणे होते. बाबांची आणि मनूची तर भेटच होत नाही. आपण चौघे शेवटचे एकत्र कधी जेवलो होतो ते पण आठवत नाही. पूर्वी रोज रात्री आठ वाजता जेवणाच्या टेबलवर आलेच पाहिजे हा नियम होता. अगदी बाबांनाही सुटका मिळत नसे. मस्त गप्पा होत. चिडवाचिडवी होई.

मनूला पिडायला लागलो की आई लागलीच मनूच्या पार्टीत. मनू पहिल्यापासून जाम कांगावखोर. नुसती जरा वेणी ओढली तरी असा गळा काढेल की मी मारलेच आहे तिला. पुढे पुढे आई -बाबांना पण कळत असे. ते लक्षच देत नसत. मग धुसफुसत जिभा काढून वेडावून जाईल पळून. मनूशी तर गेल्या दहाबारा दिवसात सेलवरच बोलतोय. नाहीतर एसएमएस. अरे काय जिंदगी आहे ही. स्वतःच्या बहिणीशी एका घरात राहून मी सेलवर बोलतोय. हे सारे कशामुळे तर या मीटिंगांवर मीटिंगा आणि त्यातली निरर्थक बडबड. धड एकाचेही लक्ष नसते. कामाचे सोडून इतरच धंदे. पुन्हा यामुळे कामे तुंबतात ती वेगळीच. कामे करायला वेळच नाही तर प्रोजेक्ट पुरा होणारच कसा. वैताग झालाय नुसता.

काल रमाचा चार वेळा फोन आला. प्रत्येक वेळी मी मीटिंगमध्ये. तरी बिचारीने पुन्हा फोन केलाच. " पंधरा दिवस झाले रे अभी भेटून ..... आज थोडासा वेळ काढशील? " इतकी गोड बोलते ही बया की असे वाटते सगळे सोडून द्यावे आणि पळत जावे तिच्याकडे. मी फोन नाही केला तरी उगाच फालतू रुसवेफुगवे करत नाही. लग्नाचेही ठरवायला हवेय. उगाच वेळ कशाला काढायचा. पण या बकवास रूटीन मध्ये लग्न करून तिलाही कुठे आईच्या शेजारच्या खुर्चीवर बसवू... काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा लवकर. आज भेटलो की बोलायलाच हवे. चल आवर आणि सूट नाहीतर तो तिरशिंग्या काहीतरी उकरून काढेलच. पळ, पळ अभी.

==============================

ती ..... लोकांना उद्योगच भारी. ज्याला त्याला माझ्या लग्नाची काळजी पडलीये. निष्कारण आईचे डोके खात बसतात. मग ती मला भंडावून सोडते. " अग अभी काय म्हणतोय? कधी करायचे लग्न? त्याच्या घरातलेही कसे काही बोलत नाहीत कोण जाणे. इथे रोजचा मेला उच्छाद झालाय. आडून आडून सारख्या चौकश्या चालूच. मी काय म्हणते निदान साखरपुडा तरी करून घेऊयात ना. म्हणजे लोकांची तोंड तरी बंद होतील." आईचेही बरोबरच आहे म्हणा, तिला काळजी वाटते. पण अभीचा माझ्यावर किती जीव आहे हे तिला कुठे माहीत आहे.

आज भेटलो की त्याला सांगायलाच हवा आईचा निरोप. आणि कशाला आता पुढे ढकलत राहायचे? दोघेही नोकरीत सेटल झालोय. घरही आहेच. अभिचे आई-बाबा तयारच आहेत. आई तर सारख्या म्हणत असतात, " रमे एकदाचा याचा ताबा घे बाई म्हणजे जरा ताळ्यावर तरी राहील. अग घराची नुसती धर्मशाळा करून टाकलीये याने. उठतो.. आवरतो की जो जातो तो एकदम रात्री दहानंतरच उगवतो. तू आलीस ना की येईल बघ लवकर. " ह्म्म्म... तो लवकर येईल की नाही कोण जाणे पण निदान हे असे महिना-पंधरा दिवस भेट नसण्यापेक्षा बरे ना. आज अभीशी बोलायलाच हवे.

==============================

अभी ..... " अग कुठे बसली आहेस? का अजून वाटेतच? शी यार...... आधीच वेळ कमी त्यात तू ये आरामात डुलत डुलत...... मी आलो वेड्यासारखा धडपडत. "
रमा .... " अरे हो हो... अभी उगाच चिडचिडू नकोस. मला येऊन पंधरा मिनिटे झाली. कुठे पाहतो आहेस? दिसले का? अरे त्या शहाळेवाल्याच्या पुढे..... हा..... दिसले का? नशीबच माझे."
अभी ..... " रमे अग या शहाळ्याच्या राशीत तू दिसतच नव्हतीस ना..... काय आज मला सुखाने जगू द्यायचा विचार दिसत नाही तुझा. "
रमा ...... ( लाजते.... ) " हे रे काय अभी.... मी नाही जा..... ( अभी एकटक पाहतोय हे पाहून अस्वस्थ होते. अभीला घट्ट मिठी मारायची अनावर इच्छा कशी दाबावी हे न कळल्याने .... उघडपणे लटक्या रागाने....) एकतर इतके दिवस न भेटून असा छळ करायचा...... दुष्ट कुठला ..... आणि आता हे असे पाहून...... "
अभी ..... " रमे... एका महत्त्वाच्या विषयावर तुझे मत हवे आहे. जरा नीट विचार करून उत्तर दे. "
रमा ..... " आधी विषय तर कळू देत ना... आणि उगाच दमात कशाला घेतो आहेस? सांग काय म्हण...... "
( तेवढ्यात कुठुनसा एक हडकुळा, चिडका, चिघळलेल्या जखमा व त्यांच्यावर बसलेल्या माश्या, लसलस करणारी जीभ काढत एक कुत्रा एकदम रमाच्या रोखाने पळत येताना रमेला दिसतो. रमा एक नंबरची घाबरट. अगदी लहानपणापासून कुत्री-मांजरी म्हणजे रमाची जन्मजात शत्रू. आणि ही सगळीही रमेच्या मागेच नेमकी कशी लागतात हा कधीही न सुटलेला प्रश्न. त्या कुत्र्याला पाहताक्षणीच रमाल धडकी भरली. तिचे अभीवरचे लक्ष एका क्षणात उडाले आणि ती फक्त त्या कुत्र्याकडेच पाहत बसली. अभी त्याच्याच तंद्रीत होता. )
अभी ..... " रमा, आपण आता लग्न करायचे का? म्हणजे तुझे आई-बाबा व माझे आई-बाबा कधीचेच तयार बसलेत. आपण मुहूर्त पाहा हे सांगण्याचीच खोटी आहे. तेव्हां.... अग मी काय म्हणतोय? तुझे लक्ष कुठेय? रमे.... "
रमा ..... " अभी, अरे बघ ना रे... तो कुत्रा कसा गुरकावतोय माझ्यावर. त्याचे दात पाहिलेस.... आईगं.... शी आणि लूत लागलीये का रे त्याला. "
अभी ...... " ए हाड हाड.... तुझ्या आयला... हाड .... रमे अग गेला तो. तू पण ना नुसती भित्रीभागू आहेस अगदी. जरा हाड केले असतेस तर गेला असता ना तो.... तर मी काय म्हणत होतो.... "
( कुत्रे पुन्हा लसलस करत जबडा वासून रमेच्या समोर येऊन जरा जवळच उभे राहते. त्याचा तो आत्ता लचका तोडू का मग.... असा वखवखलेला चेहरा पाहून रमाची पाचावर धारणच बसते. दोन्ही पाय पोटाशी घेत अभिचा हात घट्ट धरत ती अंग चोरून घेऊ लागते. )
अभी ..... " रमा बस झाला हा तुझा मूर्खपणा. ते कुत्तरडं तुला काहीही करणार नाहीये. मी इतके महत्त्वाचे बोलतोय ते ऐकायचे सोडून.... हे काय करते आहेस? आपल्या लग्नाचा इतका महत्त्वाचा-आनंदाचा निर्णय घ्यायचाय. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, माझ्यावरचे प्रेम मला पाहायचे होते ....... आणि तू.... शी..... सारा मूडचा सत्यानाश करून टाकलास."
रमा ..... " अरे असे काय रे अभी, तुला माहिती आहे ना मला कुत्र्यामांजरांची फार भीती वाटते. मला कंट्रोलच होत नाही. मलाही आज अगदी हेच तुझ्याशी बोलायचे होते. आता पुरे झाले ना दूर राहणे. मला नाही राहवत तुला सोडून. अभी अरे बघ ना ते कुत्रं अजूनच जवळ आलंय... हाकल ना रे त्याला. आईगं.... चावलं चावलं...... " ( रमा डोळे घट्ट बंद करून थरथरत असते. अभी ताडकन उठून उभा राहतो. रमेचे बखोटे धरून तिला उभे करतो. कुत्र्याच्या पेकाटात एक लाथ घालतो आणि टॅक्सीला हात करतो. दोघेही टॅक्सीत बसतात. )
रमा ..... " अभी नको ना रे रागावूस. प्लीज. खरेच मला फार भीती वाटते रे. एक तर इतक्या दिवसांनी आपण भेटलो होतो आज. त्या कुत्र्याला तरी आत्ताच तडमडायची गरज होती का? अभी बोल की काहीतरी. असा ओठ आवळून खिडकीबाहेर बघत बसू नकोस रे. दहा मिनिटांत घर येईल. अभी..... "
( अभी जाम भडकलेला असतो. रमा रडू लागते. टॅक्सीवाला आरशातून पाहतोय या जाणीवेने धड रडताही येत नाही आणि अभीच्या जवळही जाता येत नाही.... घर येते.)
अभी ..... " हा ... बस. यही पें रोक दो. रमा घर आलंय. खाली उतर. मला उशीर होतोय. "
रमा ......" भाईसाब आप टॅक्सी चलाईये. जहाँ सें आयें हैं वही पें वापस जायेंगे. "
अभी .... " रमा, उगाच शाहणपणा करू नकोस. घरी जा मुकाट्याने. माझे टाळके सटकलेय आता. तेव्हां उगाच आणखी तमाशा नकोय. "
रमा ..... (अभीला बिलगत) "अभी आधी मला जवळ घे. कधी घरी येतोस आई-बाबांना घेऊन ते ठरव. आणि हो मी अशीच आहे.... मुलखाची भित्री. तेव्हां सवय करून घे. पुढच्या वेळी प्रथमच कुत्र्याला पळवून लाव. म्हणजे हे असे टॅक्सीचे पैसे फुकट जाणार नाहीत. ऐकतो आहेस ना..... काय म्हणतेय मी."
अभी .... ( रमाच्या आर्जवांनी-जवळ येण्याने कधीचाच विरघळलेला. आणि आपण तरी इतका संताप कशाला करून घेतला.... बिचारी खरेच घाबरते हे माहीतीये तरी पण.... )" म्हणे सवय करून घे. रमे एकतर भेटत नाही म्हणून ओरडत असतेस. आता आज पळत आलो तुला भेटायला तर तुझी ही नाटके. बरं बरं चुकलो बाई. नाटके नसतीलही गं पण झाला ना मूडचा सत्यानाश. आता लग्नाच्या अलबममध्ये पहिला फोटो हाच लावूयात. तू पोटाशी पाय घेऊन चेहऱ्यावर समोर वाघ उभा असल्यासारखी थरथरत बसली आहेस .. ‌ समोर ते कुत्तरडे शेपटी हालवत जीभ लसलसवत आणि तुम्हा दोघांकडे पाहून कपाळावर हात मारलेला मी..... काय...... वेडाबाई आहे गं अगदी. माझी वेडाबाई."

रमा अजूनच त्याला बिलगते. टॅक्सीवाला दोघांकडे पाहून हसतो. आणि यूटर्न मारून पुन्हा रमेच्या घरापाशी टॅक्सी आणून उभी करतो. रमा टॅक्सीचे दार उघडते तो समोर अजून एक कुत्तरडे तिची वाट पाहत असल्यासारखे कुठुनसे तिरासारखे पळत येते. ते पाहताच रमा जोरात किंचाळते, अभी कपाळावर हात मारतो.... टॅक्सीवाला गालातल्या गालात हसत राहतो.


Thursday, December 17, 2009

पोह्याचे समोसे

जिन्नस

  • एक वाटी मैदा व एक वाटी रवा
  • एक वाटी जाडे पोहे
  • एक मध्यम बटाटा उकडून, एक मध्यम कांदा बारीक चिरून
  • एक वाटी मटार दाणे, मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
  • चार/सहा हिरव्या मिरच्या व पेरभर आल्याचा तुकडा व दोन् चमचे जिरे वाटून
  • अर्ध्या लिंबाचा रस, एक टे‌ स्पून साखर व चवीपुरते मीठ
  • चिमटीभर गरम मसाला
  • तळण्याकरीता तेल, दोन चमचे तेल मोहनाकरीता व दोन चमचे तेल भाजीकरता.

मार्गदर्शन

घाटकोपर वेस्टला स्टेशनला अगदी लागूनच ' वेलकम ' नावाचे उडप्याचे हॉटेल आहे. मायदेशात असताना वारंवार जायचोच पण आजकाल जेव्हां जेव्हां जातो त्या त्या वेळी वेलकम गाठतोच. तिथला पोह्यांचा समोसा छान असतो. पण खूप तेलकट असतो त्यामुळे आवडला तरी एखादाच खाता येतो. शिवाय इथे तो कसा मिळावा.... म्हणून मग आवरण-सारणातही थोडा बदल करून घरीच करते. त्यामुळे आकार टिपीकल समोशाचा नसून चौकोनी आहे. एकदम खुसखुशीत आवरण आणि हे थोडे तिखट-आंबट-गोड सारण व सोबत हिरवी व चिंचेची गोड चटणी, अगदी काहीच नसले तर सॉसही चालतो.

रवा व मैदा एकत्र करून त्यात चवीपुरते मीठ व दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालून कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून झाकून ठेवावे.

उकडलेला बटाटा साले काढून हाताने कुस्करून घ्यावा. ( अगदी पीठ करू नये ). एका पसरट पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून तापत ठेवावे. तेल चांगले तापले की आच मध्यम ठेवावी व बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. तीनचार मिनिटे परतल्यावर वाटलेली मिरची-आले-जिरे घालून दोन मिनिटे परतावे. त्यावर मटार दाणे, कुस्करलेला बटाटा व चिरलेली कोथिंबीर घालून चार-पाच मिनिटे परतावे. त्यावर भिजवलेले पोहे, गरम मसाला, चवीनुसार मीठ व साखर घालून सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चार-पाच मिनिटांनी आचेवरून उतरवून त्यावर लिंबू पिळावे.

एकीकडे कढईत तळण्यास पुरेसे तेल घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवावे. मळून ठेवलेला रवामैदा चार-पाच वेळा मिक्सर मधून काढून मऊ करून घ्यावा. या गोळ्याच्या छोट्या लिंबाएवढ्या लाट्या करून घ्याव्यात. एकावेळी दोन लाट्या घेऊन उभ्या दोन पट्ट्या लाटून घ्याव्यात. अधिकाच्या चिन्हात एकमेकावर या पट्ट्या ठेवून मध्यभागी दोन चमचे सारण ठेवून घड्या घालून बंद करावे. असे सगळे समोसे भरून घ्यावेत व ओलसर कपड्यात गुंडाळून ठेवावेत. तेल चांगले तापले असेलच. हलक्या हाताने सोनेरी रंगावर तळून टिपकागदावर काढावेत. गरम किंवा गार कसेही मस्तच लागतात खरेच पण थंड झालेले खायला उरतच नाहीत.

टीपा

यात कांदा ( कच्चा ) व कोथिंबीर लिंबाबरोबर एकत्र केली तरीही छानच चव येते. गरम मसाला आवडत नसेल तर घालू नये. थोडे जास्तीच तिखट हवे असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवावे.