जिन्नस
- एक वाटी मैदा
- एक वाटी रवा
- थोडे दूध (अंदाजे )
- एक नारळ
- पावणे दोन वाट्या साखर
- चार चमचे तूप
- एक चमचा तांदळाचे पीठ
- एक चमचा वेलदोडा पूड
- तळण्याकरीता तेल किंवा तूप
मार्गदर्शन
रवा व मैदा एकत्र करून त्यात दोन चमचे तुपाचे किंवा तेलाचे मोहन घालून संपूर्ण दुधात किंवा पाण्यात ( वा अर्धे अर्धे करून ) घट्ट भिजवून झाकून ठेवावे. नारळ खोवून घ्यावा. शक्यतो काळसर खोबरे ( पाठीचा भाग ) घेऊ नये. खोबऱ्यात साखर घालून मध्यम आचेवर ठेवून ढवळत राहावे. खाली लागू देऊ नये. मिश्रण एकजीव होऊन मऊसर शिजले की तांदुळाची पिठी व वेलदोड्याची पूड घालून पुन्हा थोडे शिजवून आच बंद करावी. मळून ठेवलेला रवा-मैदा साधारण तासाभराने चांगला कुटून मऊ करावा. पेढ्याएवढे छोटे गोळे करून घ्यावेत. एकीकडे तळण्याकरिता तेल -तूप ( जे आवडत असेल ते ) तापत ठेवावे. एक गोळा घेऊन पुरीसारखा लाटून त्यात खोबऱ्याचे तयार सारण भरावे. अर्ध्या गोलाच्या कडेला दुधाचे बोट फिरवून त्यावर दुसरी बाजू घट्ट दाबून बंद करून कातणीने कातून मध्यम आचेवर तळून काढाव्यात.
टीपा
रवा-मैदा मिक्सर मधून काढल्यास अक्षरशः तीनचार मिनिटात चांगले कुटून होते. सारण भरताना कमी भरू नये मात्र करंजी फुटेल इतपतही जास्त असू नये. पुरीच्या दोन्ही कडा जुळवताना अर्ध्याच भागाच्या कडेला दुधाचे बोट लावावे म्हणजे व्यवस्थित चिकटतात. तांदुळाच्या पिठीमुळे सारण चिकट होत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या दोन तीन दिवसात संपवाव्यात.
मला फार आवडतात या करंज्या...
ReplyDeleteफक्त एक ऑब्जेक्शन आहे....आम्हाला विश्वास आहे की तू त्यात नारळाचेच सारण भरले आहेस...एक करंजी अशी समोर दाखवून उगाच जखमेवर नारळ दाखवण्याची गरज नव्हती!!!!!!!!!
(येssss.... रोहनच्या आधि माझं कमेंट......)
हा हा...तन्वी अग माझी काय हिंमत ग असे करण्याची...:D रोहन आधीच रुसलाय करंज्या दिल्या नाहीत म्हणून त्यात तू अजून तेल ओत...:)
ReplyDeleteनिषेध.. निषेध.. त्रिवार निषेध.. तुमच्या पोस्टचा सुद्धा आणि 'तन्वीं'च्या कमेंटचा सुद्धा (माझ्याआधी कमेंट टाकली म्हणुन) ;) ...
ReplyDeleteतसेही बरोबर बोलल्या आहेत त्या... समोरच्या २ बघा कश्या मुद्दामून अर्ध्या खाऊन ठेवल्या आहेत. :P
ठीक आहे.. मी जातोय घरी आज.. तेंव्हा आईला आणि शमीला सांगतोच बनवायला. भेटू ३-४ दिवसांनी ऑनलाइन... टाटा.
भानस, का लेकरावर असा अन्याय करताय?? एक तर सध्या मी इजिप्तच्या वाळवंटात येऊन पडलोय. . .खायचे वांधे अन् त्यात तुमची ही भन्नाट पोस्ट!!! काय कराव बर??? फोटो पाहून समाधान!!! असो कधी येऊ मग करंजी खायला??? :)
ReplyDeleteरोहन अरे वा! निघालास पण.:)
ReplyDeleteतरी मी तुला विचारले होते टाकू का नको....तर म्हणालास यावेळी आपला कुक आहे, टाका बिंधास. म्हणून....हेहे
मनमौजी अरे एकदम इजिप्तमध्ये पोचलास होय. हम्म्म्म... सध्या फोटोंवर समाधान मान. आणि ये की कधीही विचारायचेय काय...:)
ReplyDeleteकाय ग हे काय चालले आहे तुझे...असे रोज रोज चिडवुन खाणे बरे नव्हे...माझा पण ह्या पोस्ट ला निषेध आहे.[:)]एकतर यु एस मधे बसुन असे लोकांना चिडवणे NOT GOOD....
ReplyDeleteमाऊ....तू पण??? हा हा.....
ReplyDelete