मी विसाव्या वर्षीच नोकरीला लागले. कॉमर्सचा शेवटचा पेपर टाकून घरी आले तर कॉल लेटर वाट पाहत होते. दुसऱ्याच दिवशी जॉईन झाले. पाहता पाहता मैत्रिणी-मित्रांचा गोतावळा वाढला. एक मैत्रीण .... खरे तर अगदी जवळची म्हणावी तश्यांत न मोडणारी असली तरी वर्तुळातली. घरी तीन मुले जरा टिपीकल नवरेशाही गाजवणारा नवरा. पहाटे चारापासून ही उठलेली. तरी कामे संपत नसत. आठला नवरा व ती खाली उतरत ऑफिसला जाण्यासाठी. दोन मिनिटे उशीर झाला तरी नवरा थांबत नसे. सरळ स्कूटरला लाथ मारून चालता होई. मग तो संपूर्ण दिवस ही अतिशय उदास असे. मुलेही नवऱ्याने चढवून ठेवलेली होती. या सगळ्या रोजच्या मानसिक ताणतणावातूनही ही माझी थोडीशी लांबच असलेली सखी गुरवारी माझा उपास असतो म्हणून न चुकता मला आवडणारी कच्च्या केळीची भाजी घेऊन येत असे. हा परिपाठ मी किंवा ती रजेवर असलो तरच चुकला असेल. आजही मी जेव्हां जेव्हां ती भाजी करते त्या प्रत्येकवेळी गलबलून येते. इतक्या सातत्याने कोणा तिसऱ्यासाठी प्रेमाने व आवर्जून असे करणे सहज सोपे नसते. त्यासाठी तितकी आपुलकी मनात असावी लागते.
ऑफिसमध्ये डबे पोचवणारे काही जण होते. बहुतांशी त्यांचे बांधलेले गिऱ्हाईक असायचे. एखादे दिवशी आपण डबा आणलेला नसला तर त्यांच्याकडे हमखास आपल्यासाठी डबा मिळेलच अशी मुळीच गॅरंटी नाही. असेच एक नेहमी येणारे. आमच्या सेक्शन मध्ये एकाला रोजचा त्यांचा डबा येई. एकदा असाच माझा उपवास होता. मला सकाळी वेळच मिळाला नव्हता काहीही करायला. सुदैवाने त्यांच्याकडे चक्क त्यादिवशी खिचडीचा एक डबा उरला होता. तो त्यांनी मला दिला. पुढे मी नोकरी सोडेस्तोवर हे गृहस्थ न चुकता गुरवारी माझ्या सेक्शनमध्ये डोकावत..... दारातूनच डबा उंचावून विचारत... हवा का? माझा डबा ( जर मी आणलेला असेल ) मी दाखवला की हसून पुढे जात. सारे दोन क्षणांचे संभाषण. पण न चुकता होणारे. अनेकवेळा लागोपाठ सहा महिनेही मी त्यांच्याकडून एकदाही डबा घेतलेला नाही तरीही हे सहृदयी गृहस्थ मला विचारल्याशिवाय पुढे जात नसत. खरे तर कोण लागत होते मी त्यांची? पण मी उपाशी राहू नये म्हणून अव्याहत केलेली विचारणा.
एका मित्राची आई डोंबिवलीवरून ट्रेनच्या इतक्या मरणाच्या गर्दीतूनही बाटलीभरून टोमॅटोसार पाठवायची. मित्र ओरडायचा, म्हणायचा, " आमच्या म्हातारीवर काय जादू केली आहेस कोण जाणे. न चुकता दर महिन्याकाठी सार देते तुझ्यासाठी, वर दमही देते. माझ्या लेकीला नीट पोचव. खबरदार गर्दीचे निमित्त करून इथेच टाकून गेलास तर." आज ही प्रेमळ माय या जगात नाहीये पण तिचा माझ्या चेहऱ्यावरून फिरलेला हात आणि त्या टोमॅटोच्या साराची चव हृदयात घर करून गेलीये.
अजून एका मित्राचे वडील.... खरे तर आमचा फोनवरच संवाद जास्त. रोजचे न चुकता होणारे संभाषण. अर्थात संभाषणात सगळा वेळ मित्रच. पण त्याच्या बाबांशी एक वेगळेच बंध जुळले. प्रचंड माया करायचे माझ्यावर. दोनतीन दिवस त्यांच्याशी बोलणे नाही झाले तर चौथ्या दिवशी फोन येई. " का गो बाय विसरीलस का? अगो अजून मी जिवंत आहे. जीव लावून बसली आहेस माय. म्हाताऱ्याशी दिसाकाठी चार शब्द बोलत जा." दोन किंवा तीनच वेळा प्रत्यक्ष भेटले असेन मी त्यांना. पण पोत्याने माया केली त्यांनी माझ्यावर. नागपूरला गेले होते कॅरम टुर्नामेंटसाठी. आल्यावर फोन केला, माझा आवाज ऐकताच म्हणाले, " आलं का नागपूर? अग कधीपासून वाट पाहत होतो तुझी. आता जीव थंडावला बघ." हे ऐकले आणि भरून पावले.
दिसामाजी न मोजता येईल इतक्या लोकांशी आपण बोलतो. रोजची कामे, त्यानिमित्ते होणारे संवाद. आमचे ऑफिस म्हणजे तर लोकांचा अखंड राबता. डीलर्स, वकील, अकाँटंट नुसता सावळा गोंधळ. मला डोमिसाईल घ्यायचे होते. बांद्रा कोर्टात जावे लागणार होते. अतिशय निकडीने हवे असल्याने मी व नवरा गेलो. तिथे पोचताच चारी बाजूने हल्ला बोल केल्यासारखे अनेक काळेकोटवाले आमच्यावर तुटून पडले. आता कोणाला काम सोपवावे हा विचार मनात सुरू असतानाच अचानक हाक आली, " जोशी मॅडम, तुम्ही इथे काय काम काढलेत? " वळून पाहिले तर माझ्या सेक्शनला नेमाने येणारे एक वकील होते. " मॅडम आजवर एकदाही तुमची सेवा करू दिली नाहीत निदान आता तरी सांगा कशाला आलात इथे? गरीबाला एकदा तरी मदत करू देत. " संध्याकाळी साडेचार वाजता डोमीसाईल आमच्या हातात होते. वर माझेच आभार मानत होते.
भर पावसाळ्याचे दिवस होते. संततधार लागली होती अगदी, मरे मरत मरत धावत होती. कशीबशी ठाण्याला उतरले. सुदैव जोरावर होते. समोरच एक रिक्षावाला येऊन थांबला, " मॅडम रिक्षा? " मला तर अगदी देवच सापडल्यासारखे झालेले. निघालो. ए के जोशीला रिक्शाने राइट घेतला आणि जरा मिनिटभर अंतर गेले असेल एक जवळपास पूर्णच भिजलेले आजी-आजोबा रिक्शाला हात करताना दिसले. रिक्षा स्टेशनवरूनच भरून येत असल्याने थांबतच नव्हत्या. दोघेही हैराण झालेले. रिक्षावाल्याला थांबवून त्यांना रिक्शात घेतले. कुठे जायचे विचारता कळले की माझ्या घराजवळच राहतात. अर्धा तास झाला रिक्षा शोधत होते. त्यांना घरी सोडून मी पुढे निघाले. ही घटना मी विसरूनही गेले. एक दिवस सकाळी ऑफिसला निघाले तर आजोबा गल्लीत दिसले. मला पाहून प्रफुल्लित चेहऱ्याने पुढे आले, " सापडलीस एकदाची. अग आमची सौ रोज सकाळी मला पिटाळते. विचार कशाला ते? अग, तुला शोधायला. अंधुकसा अंदाज होता तू इथे कुठेतरी राहतेस. मग काय गेले चार दिवस सकाळी आठपासून मी रोज घुटमळतोय इथे. हे घे, खास तुझ्यासाठी आणलीत वेचून ही देवाघरची फुले. " असे म्हणून ओंजळभर प्राजक्ताची टपोरी फुले माझ्या हातावर ठेवली. त्या फुलांचा दरवळ आजही तितकाच ताजा आहे.
हल्लीच मायदेशी आलेले असताना खोपट-ठाण्याहून एस्टीने नाशिकला आईकडे निघालेले. गाडी सुटतानाच उन्हे कलली होती. इगतपुरीला इतके भयंकर धुक्याचे लोट येऊ लागले की अर्ध्या फुटावरचेही दिसेना. ' मानस ' हॉटेल तर संपूर्ण नामशेष झालेले. एस्टीत आम्ही फक्त आठ माणसे. मी एकटीच व एक मुसलमान जोडपे होते. ती दुसरी बाई बाकी सगळे सडेफटिंग. नेमकी एस्टी फेल झाली. काहीतरी मेकॅनिकल फॉल्टच झाला होता. घरचे लग्न असल्याने माझ्या पर्समध्ये दागिने व बरेच पैसेही होते. ड्रायव्हर व कंडक्टर आत्ता गाडी दुरुस्त करून घेऊन येतो म्हणून गेले ते गायबच झाले. इगतपुरीला प्रचंड धुक्यात रात्रीचे साडेनऊ वाजता आम्ही आठ माणसे घाबरून एकमेकांकडे संशयाने पाहत कसेबसे तग धरून बसलो होतो. भीतीने इतके घेरलो होतो की जरासा आवाज झाला तरी दचकत होतो. तेवढ्यात समोरून एक पोऱ्या चहाची किटली व ग्लूकोजची बिस्किटे घेऊन आला. ड्रायव्हरने आम्हा सगळ्यांसाठी गरम गरम चहा व निरोप धाडला होता. अमृततुल्य चहा होता तो. त्या चहामागच्या आपुलकीने आम्हा आठ माणसांना आपलेसे करून टाकले. भीतीची जागा गप्पांनी घेतली. नकळत धीर दिला-घेतला गेला. रात्रीचे १२ वाजता शिंगाडा तलावाशी मला बाबांच्या हाती सोपवूनच ड्रायव्हर कंडक्टर स्टँडवर गेले.
अशी अनेक माणसे आपल्या जीवनाचा हिस्सा बनून जातात. अडीअडचणीला मदतीचे हात पुढे करतात. पाहू गेले तर काही असामान्य मदत त्यांनी केलेली नसते. पण त्याक्षणी ते आपली नड भागवतात. आपुलकीचे बंध बांधले जातात. कधी ते तात्कालिक असतात. तर कधी काळ व अंतराचे बंधनही त्यांच्या प्रेमात खंड पडू देत नाही. अशा सहृदयी मनांची इतकी प्रचंड संख्या आहे की लिहिताना माझे हात थकून जातील. त्यांच्या स्मरणातही मी नसेन पण माझ्यासाठी ते सगळे मौल्यवान आहेत. या साऱ्यांनी माझ्यावर केलेल्या निःस्वार्थ प्रेमामुळेच मीही हा वसा पुढे चालवण्यास प्रवृत्त झाले व प्रयत्नपूर्वक, आवर्जून तो कसा वाढेल याचा शोध घेत राहते. तुम्हालाही असे असंख्य अनपेक्षित चांगले अनुभव आले असतील आणि मला खात्री आहे या आपुलकीच्या-निर्व्याज प्रेमाच्या साखळीच्या नवनवीन कड्या तुम्हीही गुंफत असालच.
भानस,
ReplyDeleteफ़ारच ह्रुदयस्पर्शी लिहिलय.
वाचताना किती वेळा डोळे पुसले तेच आठवत नाही.
खरच अशी माणस भेटण ही खूप मोठी श्रीमंती आहे.
माझे पण अनुभव लौकरच लिहीन.
अनिकेत वैद्य.
अनिकेत स्वागत व आभार. साधीच तरिही मनावर छाप सोडून जाणारी माणसे.:)
ReplyDeleteभाग्यश्रीताई, तुझ्या या पोस्टमुळे माझं मनं इतक्या आठवणींमध्ये जाऊन अडकलंय की लिहिलं तर त्याचीच पोस्ट होईल..म्हणून फ़क्त खूपच हृदयस्पर्शी झालंय इतकंच म्हणेन....थंडीमध्ये अशा आठवणी देऊ नकोस गं...परक्या देशात जास्त त्रास होतो त्यांचा....
ReplyDeleteअपर्णा आज सकाळपासून घरात अतिरेक शांती आहे. त्यात थंडीचा कहर.त्याचाच परिणाम आहे ग हा.:) आजही त्यांच्या मायेची उब मला सुखावते आहे.
ReplyDeleteअतिशय भावस्पर्शी झालंय पोस्ट. डबेवाले काका तर मस्तंच. मी खरं तर खुप डिप्रेस्ड होतो आज, पण पोस्ट वाचलं, आणि ्बरं वाटलं..
ReplyDeleteआजचा लेख खूप भावनिक झालाय...अन् खूप ह्रुदयस्पर्शी लिहलय!!!
ReplyDeleteशेवटी आपल्या वागनुकीचं प्रतिबिंब नेहमी आपल्याला समोरच्या व्यक्तीत दिसतं!!!
या अनुभवातून तुमचा स्वभावच प्रतिबिंबीत होतोय!!!
यावर "मी माझा" मधील एक चारोळी पुसटशी आठवते आहे. . .(चु.भु.दे.घे.)
" पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळेचं भरणार नसतील तर मरणं सुद्धा व्यर्थ आहे"
मला वाटत आपण पैसा किती कमावला यापेक्षाही माणुसकी किती कमावली हे महत्वाच!!! शेवटी तीच खरी संपत्ती!!!
लेख खूपच हृदयस्पर्शी आहे. एक प्रश्न, विदेशात असे अनुभव विरळेच असतात का ?
ReplyDeleteफारच हृद्य लिखाण, भानस.
ReplyDeleteमला तरी अशा फार आठवणी नाहीत दुर्दैवानं, पण तुझा लेख मन हेलावून गेला. आता मी ठरवलंय की निदान लोकांच्या आठवणीत तर राहू शकतो ना आपण...कसे नि कुठे उपयोगी पडू ते नाही सांगता येणार आताच पण प्रय्त्न तर नक्कीच करेन गं!
सारे अनुभव वाचणीय होते, मस्त वाटल वाचुन, असंच अजुनही अनुभव वाचालया आवडतील.
ReplyDelete-अजय
काहीतरी हेतू असल्याशिवाय कोणी दुसय्राला मदत करीत नाही हा समाजवादी युक्तिवाद नाकारल्याशिवाय सदर लेख समजणे शक्य नाही.
ReplyDeleteमहेंद्र अरे.... काय झाले? पोस्ट वाचून बरे वाटले ना... हे छान झालं.:)
ReplyDeleteमनमौजी ’मी माझा’ तल्या या दोन ओळी फार अर्थपूर्ण आहेत.खरे आहे माणुसकी,मैत्र, आपुलकी कोणीतरी आपल्यासाठी आठवण ठेवून काही करते तेही नि:स्वार्थपणे...हा अमूल्य ठेवाच आहे.पैशाने विकत घेता येत नाही तो.
ReplyDeleteआनंद प्रतिक्रियेबद्दल आभार. विदेशातही असे अनुभव येतातच.काही मलाही आलेत. लिहीन कधी त्याबद्दल. फक्त ते व्यक्त करण्याची पध्दती थोडी वेगळी असते हे नक्की.
ReplyDeleteAshwini आभार.लोकांच्या आठवणीत आपण राहू शकतो हा प्रयत्न नक्कीच करता येईल.:)शुभेच्छा!
ReplyDeleteअजय घाबरले रे जराशी.....पोस्ट मोठी होतेय की काय...मग थांबले. :)
ReplyDeleteAnonymous मग नाकारा तो युक्तिवाद. :)
ReplyDeleteपाहायला गेले तर हेतू सगळीकडेच असतोच. कोणीतरी उपाशी राहू नये म्हणून डबा हवा का हे विचारण्यात हा हेतू आहेच दडलेला. शिवाय कोणी म्हणेल की पैसेही मिळणार आहेतच. पण पैसे तर तसेही मिळणार होतेच. ओंजळभर देवाघरची फुले दिल्यानंतर माझ्या चेह~यावर उमललेले हासू आजोबांना पाहायचे असणार- हेतू आलाच की. टोमॆटोचे सार हे केवळ निमित्त- तुझी मला आठवण येतेय हे सांगण्याचे... असो.जिव्हाळा हा पैशाचा मौताज नाही.पण प्रेमाचा हेतू असावाच लागतो त्याशिवाय बंध जुळणार कसे?
खूपच सुंदर पोस्ट. खूप छान वाटल. असेच माझ्या मित्र मैत्रिणींचे प्रेमळ आई-बाबा आठवून गेले. आणि लेखाचं शीर्षक तर अगदीच समर्पक !!
ReplyDeleteहेरंब अनेक धन्यवाद.:)
ReplyDeleteताई कालच वाचलं होतं तुझ हे पोस्ट पण थांबल्र होते लिहायचे.....खरं सांगू का मी आजवर तुला भेटलेले नाही पण तुझा खुप आधार वाटतो, तुझे शब्द ऐकले की आपण एकटे नाहीयेत असे वाटायला लागते. तुला आलेले अनुभव तू लिहीलेस तेव्हा तुझ्यातला चांगुलपणा अधिक स्पष्ट होतोय!!! माझी आजी नेहेमी म्हणते जे शोधाल ते सापडेल...तसा तुला कायम चांगुलपणा, आनंद मिळतोय!!! जगात चांगली लोकं प्रमाणाने जास्त आहेत यावर पुन्हा एकदा विश्वास बसला तुझ्या पोस्ट मुळे......
ReplyDeleteखरे सौंदर्य, श्रीमंती हीच तर आहे ना गं!!
तन्वी आहेत गं, जगात चांगली लोक आहेत. फक्त हल्ली ना जरा कोणी चांगुलपणा दाखवतेय-आपुलकीने वागतेय असे पाहिले की लागलीच आपण दोन पावले मागे जातो. समोरच्याचा काही हेतू तर नाही ना यात असे शोधू लागतो. मग गाडे तिथेच फसते. अर्थात याला कारणीभूत आपले आधीचे अनुभव असतात. :( पण सगळ्यांना एकाच मापाने तोलून आपण येणारे आनंदाचे क्षण दवडतो. चार वाईट अनुभव आले तरी दहा चांगलेही येतील यावर विश्वास ठेवायला हवा. अर्थात हे माझी धारणा आहे.:)
ReplyDeleteकाय लिहु आता...सगळ्यांनी भरपुर लिहीले आहे..फ़ारच छान लिहीले आहेस..
ReplyDeleteहीच खरी कमाई हो!
ReplyDeleteएकदम टचींग लिहीलं आहे.
माऊ... धन्स गं
ReplyDeleteप्रकाश प्रतिक्रियेबद्दल आभार.
ReplyDeleteअनिकेतशी सहमत... अतिशय हृदयस्पर्शी लिहिलं आहेस.
ReplyDeleteखूप छान लिहिलं आहे. आज पहिल्यांदाच वाचतोय तुमचा ब्लॉग. हा लेख तरी आवडला. आता हळूहळू वाचतो सारे लेख.
ReplyDeleteगौरी, खूप खूप आभार. :)
ReplyDeleteसंकेत, माझ्या घरी आपले स्वागत आहे. लेख आवडल्याचे वाचून खूप छान वाटले. आवर्जून लिहीलेत, अनेक आभार. आशा आहे अजूनही लेख आवडतील. :)
ReplyDeleteमला अहो नका हो म्हणू. ‘अरे संकेत’ च चांगलं आहे. मी तसाही अहो म्हणण्याएवढा मोठा नाही.
ReplyDeleteओक्के. :)
ReplyDelete