जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, December 19, 2009

तो, ती आणि कुत्तरडे......

तो .... आजकाल कामे फारच वाढलीत. या डेडलाईन्स, विकली रिपोर्ट्स, टार्गेट्स आणि या उठसूट होणाऱ्या मीटिंगांनी डोके नुसते भंजाळून गेलेय. रोजचे आठ-साडेआठ होतातच ऑफिसमधून निघायला. घरी पोचेतो दहा. किती वेळा आईला सांगितले जेवण झाकून ठेवून देत जा. पण तीही जाम हट्टी आहे. ऐकतच नाही. तिचेही बरोबरच आहे म्हणा..... ती ताटकळत बसते म्हणून निदान काहीतरी बोलणे होते. बाबांची आणि मनूची तर भेटच होत नाही. आपण चौघे शेवटचे एकत्र कधी जेवलो होतो ते पण आठवत नाही. पूर्वी रोज रात्री आठ वाजता जेवणाच्या टेबलवर आलेच पाहिजे हा नियम होता. अगदी बाबांनाही सुटका मिळत नसे. मस्त गप्पा होत. चिडवाचिडवी होई.

मनूला पिडायला लागलो की आई लागलीच मनूच्या पार्टीत. मनू पहिल्यापासून जाम कांगावखोर. नुसती जरा वेणी ओढली तरी असा गळा काढेल की मी मारलेच आहे तिला. पुढे पुढे आई -बाबांना पण कळत असे. ते लक्षच देत नसत. मग धुसफुसत जिभा काढून वेडावून जाईल पळून. मनूशी तर गेल्या दहाबारा दिवसात सेलवरच बोलतोय. नाहीतर एसएमएस. अरे काय जिंदगी आहे ही. स्वतःच्या बहिणीशी एका घरात राहून मी सेलवर बोलतोय. हे सारे कशामुळे तर या मीटिंगांवर मीटिंगा आणि त्यातली निरर्थक बडबड. धड एकाचेही लक्ष नसते. कामाचे सोडून इतरच धंदे. पुन्हा यामुळे कामे तुंबतात ती वेगळीच. कामे करायला वेळच नाही तर प्रोजेक्ट पुरा होणारच कसा. वैताग झालाय नुसता.

काल रमाचा चार वेळा फोन आला. प्रत्येक वेळी मी मीटिंगमध्ये. तरी बिचारीने पुन्हा फोन केलाच. " पंधरा दिवस झाले रे अभी भेटून ..... आज थोडासा वेळ काढशील? " इतकी गोड बोलते ही बया की असे वाटते सगळे सोडून द्यावे आणि पळत जावे तिच्याकडे. मी फोन नाही केला तरी उगाच फालतू रुसवेफुगवे करत नाही. लग्नाचेही ठरवायला हवेय. उगाच वेळ कशाला काढायचा. पण या बकवास रूटीन मध्ये लग्न करून तिलाही कुठे आईच्या शेजारच्या खुर्चीवर बसवू... काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा लवकर. आज भेटलो की बोलायलाच हवे. चल आवर आणि सूट नाहीतर तो तिरशिंग्या काहीतरी उकरून काढेलच. पळ, पळ अभी.

==============================

ती ..... लोकांना उद्योगच भारी. ज्याला त्याला माझ्या लग्नाची काळजी पडलीये. निष्कारण आईचे डोके खात बसतात. मग ती मला भंडावून सोडते. " अग अभी काय म्हणतोय? कधी करायचे लग्न? त्याच्या घरातलेही कसे काही बोलत नाहीत कोण जाणे. इथे रोजचा मेला उच्छाद झालाय. आडून आडून सारख्या चौकश्या चालूच. मी काय म्हणते निदान साखरपुडा तरी करून घेऊयात ना. म्हणजे लोकांची तोंड तरी बंद होतील." आईचेही बरोबरच आहे म्हणा, तिला काळजी वाटते. पण अभीचा माझ्यावर किती जीव आहे हे तिला कुठे माहीत आहे.

आज भेटलो की त्याला सांगायलाच हवा आईचा निरोप. आणि कशाला आता पुढे ढकलत राहायचे? दोघेही नोकरीत सेटल झालोय. घरही आहेच. अभिचे आई-बाबा तयारच आहेत. आई तर सारख्या म्हणत असतात, " रमे एकदाचा याचा ताबा घे बाई म्हणजे जरा ताळ्यावर तरी राहील. अग घराची नुसती धर्मशाळा करून टाकलीये याने. उठतो.. आवरतो की जो जातो तो एकदम रात्री दहानंतरच उगवतो. तू आलीस ना की येईल बघ लवकर. " ह्म्म्म... तो लवकर येईल की नाही कोण जाणे पण निदान हे असे महिना-पंधरा दिवस भेट नसण्यापेक्षा बरे ना. आज अभीशी बोलायलाच हवे.

==============================

अभी ..... " अग कुठे बसली आहेस? का अजून वाटेतच? शी यार...... आधीच वेळ कमी त्यात तू ये आरामात डुलत डुलत...... मी आलो वेड्यासारखा धडपडत. "
रमा .... " अरे हो हो... अभी उगाच चिडचिडू नकोस. मला येऊन पंधरा मिनिटे झाली. कुठे पाहतो आहेस? दिसले का? अरे त्या शहाळेवाल्याच्या पुढे..... हा..... दिसले का? नशीबच माझे."
अभी ..... " रमे अग या शहाळ्याच्या राशीत तू दिसतच नव्हतीस ना..... काय आज मला सुखाने जगू द्यायचा विचार दिसत नाही तुझा. "
रमा ...... ( लाजते.... ) " हे रे काय अभी.... मी नाही जा..... ( अभी एकटक पाहतोय हे पाहून अस्वस्थ होते. अभीला घट्ट मिठी मारायची अनावर इच्छा कशी दाबावी हे न कळल्याने .... उघडपणे लटक्या रागाने....) एकतर इतके दिवस न भेटून असा छळ करायचा...... दुष्ट कुठला ..... आणि आता हे असे पाहून...... "
अभी ..... " रमे... एका महत्त्वाच्या विषयावर तुझे मत हवे आहे. जरा नीट विचार करून उत्तर दे. "
रमा ..... " आधी विषय तर कळू देत ना... आणि उगाच दमात कशाला घेतो आहेस? सांग काय म्हण...... "
( तेवढ्यात कुठुनसा एक हडकुळा, चिडका, चिघळलेल्या जखमा व त्यांच्यावर बसलेल्या माश्या, लसलस करणारी जीभ काढत एक कुत्रा एकदम रमाच्या रोखाने पळत येताना रमेला दिसतो. रमा एक नंबरची घाबरट. अगदी लहानपणापासून कुत्री-मांजरी म्हणजे रमाची जन्मजात शत्रू. आणि ही सगळीही रमेच्या मागेच नेमकी कशी लागतात हा कधीही न सुटलेला प्रश्न. त्या कुत्र्याला पाहताक्षणीच रमाल धडकी भरली. तिचे अभीवरचे लक्ष एका क्षणात उडाले आणि ती फक्त त्या कुत्र्याकडेच पाहत बसली. अभी त्याच्याच तंद्रीत होता. )
अभी ..... " रमा, आपण आता लग्न करायचे का? म्हणजे तुझे आई-बाबा व माझे आई-बाबा कधीचेच तयार बसलेत. आपण मुहूर्त पाहा हे सांगण्याचीच खोटी आहे. तेव्हां.... अग मी काय म्हणतोय? तुझे लक्ष कुठेय? रमे.... "
रमा ..... " अभी, अरे बघ ना रे... तो कुत्रा कसा गुरकावतोय माझ्यावर. त्याचे दात पाहिलेस.... आईगं.... शी आणि लूत लागलीये का रे त्याला. "
अभी ...... " ए हाड हाड.... तुझ्या आयला... हाड .... रमे अग गेला तो. तू पण ना नुसती भित्रीभागू आहेस अगदी. जरा हाड केले असतेस तर गेला असता ना तो.... तर मी काय म्हणत होतो.... "
( कुत्रे पुन्हा लसलस करत जबडा वासून रमेच्या समोर येऊन जरा जवळच उभे राहते. त्याचा तो आत्ता लचका तोडू का मग.... असा वखवखलेला चेहरा पाहून रमाची पाचावर धारणच बसते. दोन्ही पाय पोटाशी घेत अभिचा हात घट्ट धरत ती अंग चोरून घेऊ लागते. )
अभी ..... " रमा बस झाला हा तुझा मूर्खपणा. ते कुत्तरडं तुला काहीही करणार नाहीये. मी इतके महत्त्वाचे बोलतोय ते ऐकायचे सोडून.... हे काय करते आहेस? आपल्या लग्नाचा इतका महत्त्वाचा-आनंदाचा निर्णय घ्यायचाय. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, माझ्यावरचे प्रेम मला पाहायचे होते ....... आणि तू.... शी..... सारा मूडचा सत्यानाश करून टाकलास."
रमा ..... " अरे असे काय रे अभी, तुला माहिती आहे ना मला कुत्र्यामांजरांची फार भीती वाटते. मला कंट्रोलच होत नाही. मलाही आज अगदी हेच तुझ्याशी बोलायचे होते. आता पुरे झाले ना दूर राहणे. मला नाही राहवत तुला सोडून. अभी अरे बघ ना ते कुत्रं अजूनच जवळ आलंय... हाकल ना रे त्याला. आईगं.... चावलं चावलं...... " ( रमा डोळे घट्ट बंद करून थरथरत असते. अभी ताडकन उठून उभा राहतो. रमेचे बखोटे धरून तिला उभे करतो. कुत्र्याच्या पेकाटात एक लाथ घालतो आणि टॅक्सीला हात करतो. दोघेही टॅक्सीत बसतात. )
रमा ..... " अभी नको ना रे रागावूस. प्लीज. खरेच मला फार भीती वाटते रे. एक तर इतक्या दिवसांनी आपण भेटलो होतो आज. त्या कुत्र्याला तरी आत्ताच तडमडायची गरज होती का? अभी बोल की काहीतरी. असा ओठ आवळून खिडकीबाहेर बघत बसू नकोस रे. दहा मिनिटांत घर येईल. अभी..... "
( अभी जाम भडकलेला असतो. रमा रडू लागते. टॅक्सीवाला आरशातून पाहतोय या जाणीवेने धड रडताही येत नाही आणि अभीच्या जवळही जाता येत नाही.... घर येते.)
अभी ..... " हा ... बस. यही पें रोक दो. रमा घर आलंय. खाली उतर. मला उशीर होतोय. "
रमा ......" भाईसाब आप टॅक्सी चलाईये. जहाँ सें आयें हैं वही पें वापस जायेंगे. "
अभी .... " रमा, उगाच शाहणपणा करू नकोस. घरी जा मुकाट्याने. माझे टाळके सटकलेय आता. तेव्हां उगाच आणखी तमाशा नकोय. "
रमा ..... (अभीला बिलगत) "अभी आधी मला जवळ घे. कधी घरी येतोस आई-बाबांना घेऊन ते ठरव. आणि हो मी अशीच आहे.... मुलखाची भित्री. तेव्हां सवय करून घे. पुढच्या वेळी प्रथमच कुत्र्याला पळवून लाव. म्हणजे हे असे टॅक्सीचे पैसे फुकट जाणार नाहीत. ऐकतो आहेस ना..... काय म्हणतेय मी."
अभी .... ( रमाच्या आर्जवांनी-जवळ येण्याने कधीचाच विरघळलेला. आणि आपण तरी इतका संताप कशाला करून घेतला.... बिचारी खरेच घाबरते हे माहीतीये तरी पण.... )" म्हणे सवय करून घे. रमे एकतर भेटत नाही म्हणून ओरडत असतेस. आता आज पळत आलो तुला भेटायला तर तुझी ही नाटके. बरं बरं चुकलो बाई. नाटके नसतीलही गं पण झाला ना मूडचा सत्यानाश. आता लग्नाच्या अलबममध्ये पहिला फोटो हाच लावूयात. तू पोटाशी पाय घेऊन चेहऱ्यावर समोर वाघ उभा असल्यासारखी थरथरत बसली आहेस .. ‌ समोर ते कुत्तरडे शेपटी हालवत जीभ लसलसवत आणि तुम्हा दोघांकडे पाहून कपाळावर हात मारलेला मी..... काय...... वेडाबाई आहे गं अगदी. माझी वेडाबाई."

रमा अजूनच त्याला बिलगते. टॅक्सीवाला दोघांकडे पाहून हसतो. आणि यूटर्न मारून पुन्हा रमेच्या घरापाशी टॅक्सी आणून उभी करतो. रमा टॅक्सीचे दार उघडते तो समोर अजून एक कुत्तरडे तिची वाट पाहत असल्यासारखे कुठुनसे तिरासारखे पळत येते. ते पाहताच रमा जोरात किंचाळते, अभी कपाळावर हात मारतो.... टॅक्सीवाला गालातल्या गालात हसत राहतो.


12 comments:

  1. अप्रतिम, खूपच सही!

    ReplyDelete
  2. hehehhehe..sahi ekadam....mala hi jyam kutaryanchi bhiti watate...sarkhe road cross karava lagto...mag S jyam chid chid...hehehhehe..khup awadli !!

    ReplyDelete
  3. मनमौजी पाहिले ना महत्वाचे क्षण कसे एका श्वानामुळे... हीही...

    ReplyDelete
  4. माऊ अग ही कुत्री झुंडशाही ने फिरत असतात गं. माझा काका तर हल्ली काठीच ठेवतो जवळ. इथे सुध्दा कधीकधी अचानक मालकाला सोडून अशी जोरात अंगावर येतात ना की माझी तर बोबडीच वळते.

    ReplyDelete
  5. masta halki fulki katha! malapan ya kutranchi khup bhiti vatate...
    :)

    ReplyDelete
  6. मुग्धा बरेच दिवसांनी दिसलीस गं. मस्त वाटले.:)

    ReplyDelete
  7. hahaha...
    mastch zalay. pan tya bicharya kutryala tari kay mahit, ti aaplyala itaki ghabarate.

    - Amruta

    ReplyDelete
  8. छान कथा.
    एकदम ’फ्रेन्ड्स’चा एपिसोड आठवला ... रॉस रेचेलला सांगायला टेरेसवर घेऊन जातो, आणि वरून एक मांजर त्याच्या खांद्यावर उडी मारतं :)

    ReplyDelete
  9. अमृता अग हो ना...काहीवेळा कुत्री आपल्याला घाबरत असतात आणि त्याचवेळी आपणही त्यांना...
    धन्स ग.

    ReplyDelete
  10. गौरी प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !