जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, December 9, 2009

ही कीड कधीतरी मरेल का?

एखादे दिवशी अगदी उठण्यापासूनच सगळ्या गोष्टी चुकतच जातात. कारण तसे काही खास घडत असते असे मुळीच नाही. न चुकता गजर वाजतो. डोळे तटकन उघडतात. आजूबाजूला निरव शांतता असते. अजून पाचच मिनिटे झोपेची अनिवार गुंगी अनुभवावी असा मोह होतो. सहा-सात तास गाढ झोप झाली तरी या पाच मिनिटांची सर कशालाच नाही. आजही असाच मोह झाला अन आवरलाच नाही. पाच मिनिटांची ही उबदार धुंदी तब्बल अर्धा तास अंगात भिनून राहिली.

पाण्याचा आवाज येतोय का? डोळे या अचानक मिळालेल्या सुखाने जडावले होते. ते बेटे पटकन उघडेचनात. कानाने आवाजाचा माग घेत होते. हो की पाण्याचाच आवाज आहे हा. अग बाई सासरे उठले वाटते. किती वाजले. आता मात्र डोळे खाडकन उघडले. अंगावरचे पांघरूण नवऱ्याच्या व लेकाच्या अंगावर घालून बाथरुमकडे धाव घेतली. भरभर आन्हिके आवरत चहा टाकला. तोवर दूधवाला, पेपरवाला, कचरावाला सगळ्यांनी हजेरी लावून झाली. मग पुढे हाताला आणि तोंडाला उसंत मिळालीच नाही. लेकाचे आवरून देऊन त्याला सासऱ्यांबरोबर रिक्शासाठी पाठवून दिले. दोघांचे डबे-सगळ्यांचा नाश्ता व सासू-सासऱ्यांचे जेवण करून आवरून निघेतो वेळेचे गणित कोलमडलेच. नवरा एकटाच पुढे निघून गेला. शेवटी तासभर उशिरा का होईना स्टेशनकडे धाव घेतली.

आज स्कूटर गेलेली त्यामुळे रिक्षाला शरण जाणे भाग होते. रिक्षा लवकर मिळाली तरी ती पार स्टेशनात नेऊन सोडत नाही. हे वन वे, अन बस स्टँड, रिक्षा स्टँड सगळा घोळ घालून ठेवलाय नुसता. उशीर झाला ना की एरवी फारश्या डोळ्यात न खुपणाऱ्या-खटकणाऱ्या गोष्टी दिसू लागतात आणि मग नुसती चिडचिड होते. गेटमध्येच रिक्षा उभी होती त्यामुळे त्यात वेळ मोडला नाही. मध्ये अजून दोघीजणींना घेऊन पंधरा मिनिटात स्टेशन दिसले. शेअर रिक्षा असल्याने माझ्या वाटचे पैसे रिक्षावाल्याच्या हातावर टिकवून मी अक्षरशः ब्रिजकडे धूम ठोकली. दोन नंबरवर कुठलीतरी गाडी नुकतीच शिरल्याने त्या गर्दीच्या लोंढ्यात मला अडकायचे नव्हते. रँपवरून पळाल्याने नाही म्हटले तरी जरा दम लागलाच होता. इंडिकेटर कडे पाहत असतानाच तीन व चार दोन्ही वर गाड्या आल्या. म्हणजे एकूण तीन गाड्या लागोपाठ आल्याने ब्रिजवर एकच रणधुमाळी माजेल तेव्हा पटकन तीन किंवा पाचावर उतरायला हवे असे म्हणत मी पुढे सरकले.

पुढची सीएसटी फास्ट तिनावर येते आहे असे एकले आणि मोहरा तिकडेच वळवला. पायऱ्या उतरायला सुरवात करणार तोच कोणीतरी हात आडवा घातला. अनपेक्षित पणे कोणी अडवल्याने मी धडपडणारच होते. वैतागून पाहिले तर समोर टीसी उभा होता. त्याला पाहताच माझा मस्तकशूल उठला. " मॅडम तिकीट प्लीज. " तो बथ्थड चेहरा व सरकारी सूर धरून. मी एकदम सटकलेच. " मिस्टर टीसी, काय रोज रोज काय लावलेय? गेले चार दिवस ओळीने मी पास दाखवतेय. आणि तरीही आज पुन्हा? " " मॅडम मी माझी ड्युटी करतोय. आणि दिवसभरात मी हजार लोकांना तिकीट विचारतो मला कसे लक्षात राहणार काल कोणाला विचारले ते? " मुद्दा बिनतोड असला तरी मी जाणून होते की हा मुद्दाम चावटपणा करतो आहे. असे काय बच्चमजी लक्षात राहत नाही काय. " दाखवत नाही जा पास. काय करायचे ते घे करून. माझ्याकडे पास आहे हे तुला माहीत आहे. मला गाडी चुकवून चालणार नाही. तुला पाहिजे तर ये माझ्या मागोमाग गाडीत मग दाखवते पास तुला." असे म्हणून मी सरळ चालू पडले. तो माझ्या मागे मुळीच येणार नाही हे मला माहीतच होते.

तोवर गाडी स्टेशनात शिरलीही होती. तो मागे येतो का हे पाहायलाही वेळ नव्हताच. दडद्ड जिना उतरत मी जिन्यासमोरच येणारा डबा गाठला. माझ्यामागोमाग पळतच अजून दोघीजणीही शिरल्या आणि गाडी सुटली. आम्ही तिघीजणीं एकमेकींकडे पाहत दम टाकत होतो. तोच एकजण मला म्हणाली, " बरे केलेस गं. तू पास दाखवला नाहीस ते. मीही नाही दाखवला आणि यांनीही नाही. अग गेले कितीतरी दिवस हे रोजचेच चालले आहे. पण मला समजत नाही याला दिसतो कश्या नेमक्या आपण?" " अग कुठले काय. तो प्रत्येक समोर दिसेल त्या स्त्रीला विचारत असतो. अपवाद म्हाताऱ्यांचा. नशीब त्यांना तरी वगळतोय. पास दाखवला ना तर तो पासकडे पाहत सुद्धा नाही. हातात पास घेईल-देईल तेव्हा स्पर्श करेल आणि सगळा वेळ थोबाडाकडे पाहत बसेल." माझा गेल्या चार दिवसांचा संताप बाहेर पडत होता. " येतात मेले कुठून कुठून. स्वतःच्या बायकोला सोडून आमच्या मुंबईत. घुसखोरी करूनचे करून वर हा असा फालतूपणा करत राहतात." तिसरीने भर घातली. हळूहळू इतरही अनेकजणींनि टीसींच्या हलकटपणाचे अनुभव सांगायला सुरवात केली.

ते ऐकता ऐकता माझे मन दादर स्टेशनच्या ब्रिजवर जाऊन पोचले. आजही त्या आठवणीने काळजात कळ उठते. वेस्टर्न व सेंट्रलची पळापळ तर सगळ्यांनाच माहीत आहे. दादरला उतरून इकडून तिकडे धावणाऱ्यातलीच ती ही एक होती. माझी अगदी जवळची मैत्रीण नसली तरी चांगली ओळखीची. बरेचदा ती माझ्याच डब्यात असे. तिचा स्वतःचा ग्रुपही होताच. सहसा त्या तिघीचौघी एकत्रच असत. गाडी दादरला थांबण्या आधीच या सगळ्या उड्या टाकत व गर्दी ब्रिजवर चढायच्या आत वर जाऊन वेस्टर्नकडे धाव घेत. एके दिवशी माझी नेहमीची फास्ट ट्रेन चुकल्याने स्लो लोकल घेऊन मी दादरला आले व तिथून फास्ट घेण्यासाठी ब्रिज चढत होते. अचानक प्रचंड गदारोळ, धावण्याचे आवाज आले. पाठोपाठ दहा-बारा भय्ये खिदळत एकमेकाला टाळ्या देत, बहुत मजा आया आज असे म्हणत पळतच वेस्टर्नच्या दिशेने गेले. कोणालाही साधे वळून पाहण्याइतकाही वेळ नसला तरी अनेक लोकांनी त्यांचे असे चेकाळल्यासारखे खिदळणे, चमत्कारिक अंगविक्षेप करत टाळ्या देणे पाहिले होतेच.

फास्टवर उतरावे म्हणून वळले तर जिन्याशीच गर्दीचे कोंडाळे दिसले. पुढे जायला जागाच नव्हती. त्यामुळे डोकावून पाहिले तर ही माझी मैत्रीण जवळपास बेशुद्धीत व अतिशय अस्ताव्यस्त कपड्यात खाली बसलेली दिसली. तिला असे पाहून ठोकाच चुकला. तिच्या मैत्रिणी आजूबाजूला दिसतात का पाहू लागले तर कोणीच दिसेना. तेवढ्यात तिला व मलाही ओळखणारी आमची अजून एक कॊमन मैत्रीण तिथे पोचली. कश्याबश्या आम्ही दोघी तिच्याजवळ पोहोचलो. पाणी पाजले व काय झाले गं असे विचारले तर तिथेच असलेला एक मुलगा म्हणाला, " आज तर हद्दच झाली. बरेच दिवस ऐकतोय सकाळी व संध्याकाळी दहा-बारा भैय्ये कुठल्या ना कुठल्या दादरच्या ब्रिजवर विखरून उभे राहतात अन गाडी आली की एखाद्या मुलीला-बाईला एकदम घेरतात. जो तो धावण्याच्या नादात असल्याने थोडीफार धक्काबुक्की चालतेच त्याचा फायदा उठवत तिला धक्के मारतात. हे सगळे इतके फास्ट घडते की तिला कळून तिने ओरडायच्या आत जीना संपतो. की हे सगळे पांगतात. पुन्हा गाडी आली की पुन्हा तेच. पण आज तीनचार गाड्या एकदम आल्याने वरती कोंडी झाली. त्यामुळे थोडा जास्त वेळ मिळाला तर त्या सगळ्यांनी मिळून यांना ओरबाडून काढलेय. "

तिच्या भोवती प्रचंड गर्दी जमली होती. हे ऐकताच काही लोक भयंकर संतापले आणि त्या भैय्यांना शोधायला गेले. तोवर रेल्वे पोलीसही येऊन पोचले. आम्ही तिघी-चौघी तिला घेऊन रेल्वेच्या पोलीस चौकीवर गेलो. पंजाबी मागून टरकला होता. हातावर, मानेवर, गालावर ओरबाडल्याच्या-दाबल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. भयंकर शॉकमध्ये गेली होती. तिला सोडून जाणे शक्यच नव्हते. आम्ही सगळ्या तिच्यासोबत बसून तिला धीर देत होतो. तक्रार नोंदवली. पोलीस म्हणे की तेही ऐकून होते असा काहीतरी प्रकार चालतोय पण कोणी तक्रार करत नाही तोवर काय करणार. हे ऐकल्यावर अजूनच संताप आला. म्हणजे थोडक्यात जीव जाणार आहे हे माहीत आहे पण गेला नाहीये ना. थोडाथोडा रोज जातोय पण तो पूर्ण जाण्याची वाट पाहायला हवी असेच झाले हे. जर साध्या ड्रेसमधले दोनचार पोलीस ठेवले असते तिथे आधीच तर या चळलेल्या-सोकावलेल्या भैय्यांना पकडता आले असते. पण पोलिसांना इतके कष्ट घ्यायची जरूरी वाटली नाही.

तोच पुन्हा भयंकर आरडाओरडा..... मारो सालोंको..... हात पाँव तोडके ट्रॅकपे डाल दो वगैरे बोलणे ऐकू येऊ लागले. या सगळ्या गदारोळात पोलीस त्या दहाबारा भैय्यांना घेऊन आले. लोकांनी बरेच मारले होते तरीही निर्ल्लजपणे दात काढत उभे होते. वर तिच्याकडे पाहत एकमेकांत खाणाखुणा करत होते. दादर स्टेशनवरील त्या छोट्याश्या रेल्वे पोलीस चौकीतले वातावरण भयंकर तापले होते. शेवटी एकदाचे पोलीस आले व त्यांना घेऊन गेले. वेस्टर्नच्या दोघींबरोबर दोन महिला पोलिसांच्या सोबतीने मैत्रिणीला घरी पोचवण्यात आले. पुढे दोन महिने आम्ही अनेकवेळा रेल्वे पोलीसांना पुढे काय झाले? शिक्षा झाली का याची विचारणा करत होतो. केस दाखल केली आहे पण ते सगळे बेलवर सुटलेत. केस उभी राहिली की मग कळेल काय होते ते. असे सांगत राहिले. आता या भैय्याचा खरेच काही ठावठिकाणा लागू शकेल का? का बरे पोलिसांनी त्यांना असे मोकळे सोडून दिले? पुन्हा ते मोकाट फिरत असेच बळी घेत असतील ना? कोणीतरी काहीतरी करत का नाही? हे प्रश्न आजही तसेच अनुत्तरित आहेत.

आमची ही मैत्रीण जवळपास दोन महिने घराबाहेर पडली नाही. शेवटी तिला काही दिवस गावाला आजीकडे पाठविले. जरा चार माणसे अवतींभोवती जमली तरी ती थरथर कापायला लागे. इतका प्रचंड मानसिक आघात झाला होता की त्यातून सावरता सावरता वर्ष सरले. पुन्हा हे भैय्ये दादर स्टेशनमध्ये दिसल्याचे ऐकीवात तरी आले नाही. परंतु आघात तर होऊन गेला होता कायमचा. आजही हे आठवले की संताप अनावर होतो. या प्रवृत्तीला कधीतरी आळा बसेल का?

ही खरी घडलेली घटना आहे. इथे हे भैय्ये होते म्हणून हे लिहिलेले नसून या हलकट-नीच प्रवृत्तीबद्दल लिहिले आहे. रेल्वेमध्ये टीसी पदावर त्यांचीच जास्त संख्या असल्याने अनेक मैत्रिणींना-ओळखीच्या बायकांना खूप वाईट अनुभव आले आहेत. कधीकधी काही जणी तिथल्यातिथे सटकवून टाकतात. पण अश्या फार थोड्या. घाबरून, उगाच शोभा नको म्हणून मूग गिळून राहणाऱ्या व भरडल्या जाणाऱ्याच जास्त आहेत . हल्ली बायकांचे एकमेकीला साथ देणे- मदत करणे काही अंशी वाढलेय हे मानसिक आधार देणारे असले तरीही पुरेसे नाही. ठोस उपाययोजना करायला हवी. अन्यथा रोज असे बळी पडत आहेतच ते वाढतच राहतील. ही बायकांना धक्के मारण्याची, अचकट विचकट बोलण्याची कीड कधीतरी मरेल का?

21 comments:

  1. तू जो अनुभव मांडलायस ना, कितीतरी महिला यातून रोज जातात आणि अशाच जात राहतील. अगं शेवटी पुरुष आणि स्त्री या दोनच जाती उरतात आणि अजुनही बहुसंख्य पुरूष या ना त्या कारणाने स्त्रीयांचं शोषण करायच्या मागे असतात..जे काही थोडे-थोडके उदारमतवादी असतील त्यांची संख्या वाढेल याचा काय भरवसा??
    लोकलला लटकत असतात पण बाजुला दुसरी लोकल आली आणि त्यातला स्त्रीयांचा डबा आला की यांच्या नजरा आणि टोमणे बंद होतील??? मला तरी नाही वाटतं..आणि टी.सी.ना तर काय अगदी कायदेशीर अधिकार ना महिलांना हटकण्याचा..एक लेडिज फ़र्स्टक्लास मध्ये असाच एक टी.सी. "त्या" उद्देशाने यायचा आणि मग एकदा त्या डब्यातल्या सगळ्या बायकांनी त्याला चांगलं खडसावलं होतं त्याची आठवण झाली...

    ReplyDelete
  2. अपर्णा तेच ना....हे असे संधी मिळताच हात फिरवणे,घाणेरडे कमेंटस करणे अव्याहत चालूच आहे. बरं यातून काय मिळते हे एक कोडेच आहे. पोलीसही काही करत नाहीत.नुसती बघ्याची भूमिकाच घेतात.टीसी आणि पोलीस यांना कायद्याने अधिकार दिला आहेच.... मात्र काहीवेळा बायका आयुष्यातून उठतात गं.

    ReplyDelete
  3. माझ्या बायकोने एकदा गोरेगाव स्टॆशन वर अश्याच एका रोमीयोच्या चांगलच खाडकन कानाखाली वाजवली होती.

    ReplyDelete
  4. kathin aahe sagale ...........

    ReplyDelete
  5. काय लिहू कळत नाहीये गं!!! सगळ्यांनाच थोड्याफार प्रमाणात येतातच हे अनुभव....पण मनावर, संस्कारांवर आघात होतो मोठा!!!मुलींना मोठं करतानाच कल्पना द्यावी वाटतं आणि खंबीर बनवावे....अगं आम्ही कॉलेजमधे असताना जागा मिळाली नाही म्हणून बसमधे उभ्या होतो...माझ्या एका मैत्रीणीला असाच एक जण मागून धक्के मारत होता हिची चूळबुळ सुरु होती....आम्ही सगळ्या सरळ त्यांच्याकडे तोंड करून उभ्या राहिलो आणि म्हणालो आता मारा धक्के म्हणजे आम्हालाही बघू दे कोण धक्के मारतय ते आणि तुम्हालाही समजू द्या कोणाला मारताय ते...हं चला करा सुरूवात.....गप्प बसले ते!!!! पण ययचे ते अनुभव येतातच विकृतांची संख्या कमी नाही ....आपण खमके असावे हे खरे!!!!

    ReplyDelete
  6. ही विकृती नाही मरणार, अहो सहा महिन्याची मुलगीही सुटत नाही यांच्या नजरेतून. 26 जुलैला सोमय्या कॉलेजजवळ माझ्या मैत्रिणीला आणायला गेलो होतो, तेव्हा असेच काही विकृत सुसाट बाईकवरनं आले आणि कोणी पावसात चिंब भिजलेली मुलगी, बाई हातात मिळते का बघत होते, अनेकींच्या पाठीवर, पोटावर, छातीवर वखवखलेले हात फिरले. बाईक इतक्या सुसाट येऊन निघून जायची, आणि त्यात संततधार पाऊस त्यामुळे नंबर वगैरे काही दिसायचा नाही, रागही इतका अनावर झालेला असायचा की नंबर वगैरे डोक्यात यायचं नाही. सगळ्यांनी डिव्हाइडरवर चालायचं ठरवलं, म्हणजे निदान दुसरी एखादी बाईक आली तर मध्ये डिव्हाइडर असेल. पुढे गुडघाभर पाण्यातून वाट काढताना तेच, सगळे मदत करायला (मुलींचीच) एकाला तर मी ढकलला "हेल्प नही चाहिये" म्हणालो, मुलींचा डोक्यात तुटक्या स्लिपर्स, बिसलरीच्या पेचलेल्या बाटल्या टाकणार्‍यांची, आणि वर दात काढणार्‍यांची टोळीही पाहिली. तेव्हापासून राग डोक्यात होता कारण मी तेव्हा काही करू शकत नव्हतो घरीही जायचं होतं, गटारं सांभाळून पाण्यातनं वाट काढायची होती, रडवेल्या, भेदरलेल्या मैत्रिणीलाही सावरायचं होतं.
    पुढे एकदा कॉलेजबाहेर एका विकृतावर आधीच्या सगळ्या विकृतांचा राग काढला, कॉलेज म्हणजे कालिना मुंबई युनिव्हरसिटीच्या बाहेर, जाम धुतला शिव्या घातल्या, त्याने धमक्या दिल्या पुन्हा आमच्या बसमध्येही चढला, मी कंडक्टरला म्हटलं"मास्तर काय करू?" ते म्हणाले "ढकलून दे साल्याला" ढकलला मग बसमधून. खरं सांगू यांना मारलं, किंवा मारलं नाही तरी अस्वस्थ तितकच वाटतं. मारल्याचं समाधान मिळत नाही, भेदरलेले चेहरे, हसण्याचे आवाजच, सारखे डोळ्यासमोर येतात. ही विकृती नाही मरणार.

    ReplyDelete
  7. छान लिहीले आहेस श्री.हे खुप कटु सत्य आहे की स्त्री ला नेहमी ह्या सर्व यातनातुन जावेच लागते..आणि अजुन जावेच लागणार..हा प्रकार काही थांबणारा नाही..

    ReplyDelete
  8. Harekrishnaji चांगले केले तुमच्या सौने. हे धाडस प्रत्येकीला जमत नाही.

    ReplyDelete
  9. तन्वी जर दोनचार जणी बरोबर असल्यातर निदान तुम्ही केलेत तसे काहीतरी करता येते गं. अर्थात तरिही निर्लज्जपणे घाणेरडे बोलतातच. पण बाजारात, बसमध्ये,ट्रेन सुटली की प्लॆटफॊर्मवरील बायकांना...संधी तर अशांना सर्वत्र दिसतेच. लहान लहान मुली इतक्या भेदरून जातात. कठीण आहे ग सारेच.

    ReplyDelete
  10. चुरापाव तू म्हणतोस तसेच होतेय. कितीही मारले तरी त्याच्याने घाव थोडेच भरून निघणार. ही विकृती भयंकर आहे.

    ReplyDelete
  11. माऊ हो ग. फार फार कडक कायदे केले पाहीजेत आणि त्याची अंमलबजावणीही तात्काळ हवी.

    ReplyDelete
  12. सत्य आहे, खरय ही कीड मरणार कधी?

    ReplyDelete
  13. तुमचा हा लेख वाचुन मी क्षणभर जागेवरच थिजलो, काहीच सुचत नव्हतं. असे प्रकार सगळीकडे होतात असं ए॑कुन होतो. आज जे वाचायला मिळालं ते मात्र त्याची साक्ष देणारं होतं. कीड जागेवरच संपवावी लागते नाहीतर ती पसरते.

    ReplyDelete
  14. hey prakar thodya phar pramanat saglya baykanna anubhavave lagtatch...mala hi dadar station cha vait anubhav aahe, dadar central la 1 aani 2 number platform (slow) khup problem hoto jevha 2 gadya ekdum yetat...tevha asle ghanerde log fayda utvayla tayar astat...me tar shevti slow ne pravas karne sodun dele hote.......

    ReplyDelete
  15. आजकाल मला वाटतं महिला टीसी पण आहेत. बहुतेक वेळा स्त्रियांना त्याच पास वगैरे विचारतात. पण तुम्ही म्हणता तसं ही काही टिसी करतात. अर्थात कायद्याचा सपोर्ट असल्यामुळे कोणिच त्यांच्या विरुध्द तक्रार करु शकत नाही.
    पण असे जे समाज कंटक आहेत त्यांची पुर्वी असं काही करायची हिम्मत होत नव्हती, कारण इतर लोकं असं काही पाहिलं की त्या माणसाला गुरासारखं बडवुन काढतांना मी पाहिलंय. पण हल्ली इतर मराठी गुजराथी लोकं पण "मला काय करायचं ?"म्हणून दुर्लक्ष करतात.. आणि सरळ चालु लागतात. फलाटावर इतके हजारो लोकं असतांना पण ह्यांची अशी हिम्मत होते , यातंच सगळं आलं.

    ReplyDelete
  16. अनुक्षरे न संपणारी विकृती आहे ही.

    ReplyDelete
  17. अजय दोन महिने सतत पाठपुरावा करूनही त्यांचे पुढे काय झाले हे कळलेच नाही. थोडक्यात कायदा काही करेल ही आशाही ठेवणे मूर्खपणाचे आहे. आपणच हातात घेऊन त्यावेळी जे उचित वाटेल ते करावे असेच थोडक्यात कायद्याच्या रक्षकांना सुचवायचे आहे का?

    ReplyDelete
  18. adi स्वागत व आभार.
    अग हो ना....दादर चे सेंट्रलचे एक व दोन नंबर म्हणजे हॊरिबल प्रकार. शिवाय वर चढलो की इतरही गाड्या आलेल्या असल्या की ब्रिजवरही हाणामारी..... :( कुठे कुठे आणि कसे लढावे गं....

    ReplyDelete
  19. महेंद्र ह्या भैय्यांचा प्रकार बरेच महिने सुरू होता. आधी ते इतके शिरजोर नसावेत..पण हळूहळू बेमुर्वतपणा वाढला. आणि जो तो आपल्याला काय करायचे आहे असे म्हणून निघून जातो त्याचा फायदाही होताच.... एकदा असेच एका हलकटाला माणसांनी बडवले, इतके की सगळीकडून रक्त वाहत होते. शेवटी उचलला आणि ट्रॆकवर टाकून दिला. दोन्ही बाजूने प्लॆटफॊर्म पूर्ण भरलेले. जोतो पाह्त होता. गाडी आली तशी हा टुणकन उठला आणि पटकन चढून पळालाही. म्हणजे त्याला असा मार खाण्याची सवयच होती नाही का?
    आजही मैत्रिण डोळ्यासमोर आली की पोटात तुटते.

    ReplyDelete
  20. भाग्यश्री....बाईग, हा प्रकार अनादी कालापासून चाललेला असावा आणि अनंत काळापर्यंत चालूच राहणार! मी असं म्हणतेय म्हणजे हे माझे निगेटिव्ह थिकिंग नाही. ही वस्तुस्थिती आहे.खरंच यावर काsssssही उपाय नाही. किंवा उपाय अनेक आहेत, प्रत्येकाचे स्वत:चे स्वतंत्र. वेगवेगळे. आपापल्या पुरतेच. त्या त्या वेळी योजायचे. पुन्हा पुढची वेळ आली की त्या वेळी नवा शोधायचा. संशोधन चालूच! अव्याहत संशोधन!! अनादिअनंत संशोधन!!!

    आई

    ReplyDelete
  21. आई खरेच आहे तुमचे म्हणणे.शेवटी आपापली लढाई ज्यालात्यालाच लढावी लागते मग प्रसंग कुठलाही असो. मात्र बायकांनी थोडी एकजूट, प्रसंगी एकमेकींना मदत केली तर निदान काही प्रकार तरी टळतील. अर्थात मदत पुरूषही करू शकतात व करतातही.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !