जाता जाता एक नजर इथेही........

Friday, December 4, 2009

डाळ ढोकळी - वरणफळे.जिन्नस
 • एक वाटी तुरीची डाळ
 • दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
 • चार हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, कढीलिंब, मूठभर कोथिंबीर
 • पाव वाटी शेंगदाणे, आवडीनुसार काजू, दोन चमचे ओले खोबरे
 • तीन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, दोन चमचे धणेजिरे पूड, एक चमचा ओवा
 • दोन चमचे चिंचेचा कोळ, दोन मध्यम गुळाचे खडे.
 • फोडणीसाठी- अर्धा चमचा मेथी, चार सुक्या लाल मिरच्या व नेहमीचे फोडणीचे साहित्य.
 • चार चमचे तेल व दोन चमचे तूप, चवीनुसार मीठ
 • एक टोमॅटो, अर्धी वाटी मटार, तीनचार फ्लॉवरचे तुरे, दोन वांगी, थोडीशी फरसबी - भाज्या आपल्या आवडीनुसार घालाव्यात.

मार्गदर्शन

तुरीची डाळ थेंबभर तेल टाकून मऊ शिजवून घोटून घ्यावी. त्यात उभ्या चिरलेल्या ओल्या मिरच्या, आल्याचे चिरलेले तुकडे, आवडीनुसार घेतलेल्या भाज्या मध्यम आकाराच्या चिरून, शेंगदाणे, आवडेल इतके पाणी ( फार घट्ट करू नये ), लाल तिखट, हळद, धणेजिरे पूड, गरम मसाला, चिंचेचा कोळ, गूळ व चवीनुसार मीठ घालून सणसणीत उकळी आणावी. नंतर त्यात काजू, ओले खोबरे व कोथिंबीर घालून पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. तोवर एकीकडे पळीत तीन चमचे तेल तापत ठेवावे. मोहरी, हिंग, मेथी, सुक्या मिरच्या व कढीलिंब घालून फोडणी करून ती या उकळत असलेल्या आमटीला द्यावी. लागलीच झाकण ठेवावे म्हणजे स्वाद आतच मुरेल. आच बंद करावी.

परातीत कणीक व चण्याच्या डाळीचे पीठ एकत्र करावे . त्यात चवीनुसार मीठ, ओवा, लाल तिखट, हळद, हिंग व चमचाभर मोहन ( नाही घातले तरी चालते ) घालून पीठ घट्ट भिजवावे. नेहमी लाटतो तशीच पण किंचित जाडसर पोळी लाटून त्याचे शंकरपाळ्यासारखे तुकडे करून घ्यावेत. पुन्हा आमटी आचेवर ठेवावी व त्यात हे तयार केलेले तुकडे सोडावेत. सगळे तुकडे टाकून झाले की अर्धी वाटी पाणी घालून मिश्रण सारखे करून घेऊन झाकण ठेवावे. मध्यम आचेवर चांगले उकळू द्यावे. तुकडे शिजले की दोन चमचे तूप घालावे. वाढताना गरम गरम वाढावी. आवडत असल्यास वरून शेव घालावी.

टीपा

ओवा घालताना थोडा जास्तच पडू द्यावा. काजू, मटार व शेंगदाणे शक्यतो घालावेत. छान लागतात. वरणात फळे( कणकेचे तुकडे ) सोडल्यावर ती फुगतात म्हणून वाढायच्या आधी आमटी घट्ट झाली असल्यास पुन्हा अर्धी वाटी कडकडीत पाणी घालून ढवळून वाढावे.

12 comments:

 1. पुसटशी कल्पना आलीच होती .... हेहे .. की काहीतरी शिजतय .... 'डाळ ढोकळी' याला वरणफळे सुद्धा म्हणतात हे नव्हते माहीत. ह्या 'डाळ ढोकळी'ची ट्रेकमधली एक मस्त धमाल आठवण आहे... लिहेन लवकरच ... :)

  ReplyDelete
 2. रोहन,तुझ्याकडे आता आपले जेवण मिळतेय म्हटल्यावर....:) यालाच ’ चकोल्या ’ही म्हणतात. इतकी थंडी पडली आहे ना..मग तिला पळवायला काहीतरी शिजवायला हवे ना....:D

  ReplyDelete
 3. मला पण हव्यात चिकोल्या.....अपर्णाला हवी होती रेशिपी....आता कर म्हणाव!!!!

  तू दुष्ट बाई आहेस......आज चतुर्थी आहे आमच्याकडॆ!!!!

  ReplyDelete
 4. आज खास वाढदिवसासाठी हा मेनू आहे आमच्याकडे :)

  ReplyDelete
 5. तन्वी.... अग उपास सोडतानाच कर मग.:)

  गौरी अग तुझा वाढदिवस का? अनेक शुभेच्छा!( ज्याचा असेल त्याला :) )

  ReplyDelete
 6. तन्वी मी करून पाहणार आहे ही रेसिपी आणि तुम्हा दोघींना त्याचं मुख्य कारण माहित आहे का?? मला पोळी उर्फ़ चपाती करायचा मनस्वी कंटाळा आहे त्यासाठी ही रेसिपी उतारा आहे...म्हणजे नवरा पोळीच्या पाठी म्हणायचं खा आता पोळी सकट वरण.....

  ReplyDelete
 7. अपर्णा तसे एका दगडात दोन पक्षी मारले जातातच गं.त्याला असे म्हणता म्हणता तुही प्रेमात पडशील बघ. मस्तच लागते.:)

  ReplyDelete
 8. Please tell where n how can I wrie recipes here???????????????

  ReplyDelete
 9. अगं, सही दिसतेय डाळ ढोकळी..कित्ती दिवसात खाल्ली नाही...आता बनवेन लवकरच !!

  ReplyDelete
 10. वैदेही तुझी प्रतिक्रिया म्हणजे माझा दिवस मस्त जाणार. :)

  ReplyDelete
 11. Chinki तुमच्या प्रोफाईलवर गेले होते. पण दिसत नाहीये.

  ReplyDelete
 12. Aaj hi recipe shodhun punha keli aani tujhi aathwan kadhli. Typical fall weather and garam garam waranfala :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !