जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 17, 2009

पोह्याचे समोसे

जिन्नस

 • एक वाटी मैदा व एक वाटी रवा
 • एक वाटी जाडे पोहे
 • एक मध्यम बटाटा उकडून, एक मध्यम कांदा बारीक चिरून
 • एक वाटी मटार दाणे, मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
 • चार/सहा हिरव्या मिरच्या व पेरभर आल्याचा तुकडा व दोन् चमचे जिरे वाटून
 • अर्ध्या लिंबाचा रस, एक टे‌ स्पून साखर व चवीपुरते मीठ
 • चिमटीभर गरम मसाला
 • तळण्याकरीता तेल, दोन चमचे तेल मोहनाकरीता व दोन चमचे तेल भाजीकरता.

मार्गदर्शन

घाटकोपर वेस्टला स्टेशनला अगदी लागूनच ' वेलकम ' नावाचे उडप्याचे हॉटेल आहे. मायदेशात असताना वारंवार जायचोच पण आजकाल जेव्हां जेव्हां जातो त्या त्या वेळी वेलकम गाठतोच. तिथला पोह्यांचा समोसा छान असतो. पण खूप तेलकट असतो त्यामुळे आवडला तरी एखादाच खाता येतो. शिवाय इथे तो कसा मिळावा.... म्हणून मग आवरण-सारणातही थोडा बदल करून घरीच करते. त्यामुळे आकार टिपीकल समोशाचा नसून चौकोनी आहे. एकदम खुसखुशीत आवरण आणि हे थोडे तिखट-आंबट-गोड सारण व सोबत हिरवी व चिंचेची गोड चटणी, अगदी काहीच नसले तर सॉसही चालतो.

रवा व मैदा एकत्र करून त्यात चवीपुरते मीठ व दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालून कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून झाकून ठेवावे.

उकडलेला बटाटा साले काढून हाताने कुस्करून घ्यावा. ( अगदी पीठ करू नये ). एका पसरट पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून तापत ठेवावे. तेल चांगले तापले की आच मध्यम ठेवावी व बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. तीनचार मिनिटे परतल्यावर वाटलेली मिरची-आले-जिरे घालून दोन मिनिटे परतावे. त्यावर मटार दाणे, कुस्करलेला बटाटा व चिरलेली कोथिंबीर घालून चार-पाच मिनिटे परतावे. त्यावर भिजवलेले पोहे, गरम मसाला, चवीनुसार मीठ व साखर घालून सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चार-पाच मिनिटांनी आचेवरून उतरवून त्यावर लिंबू पिळावे.

एकीकडे कढईत तळण्यास पुरेसे तेल घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवावे. मळून ठेवलेला रवामैदा चार-पाच वेळा मिक्सर मधून काढून मऊ करून घ्यावा. या गोळ्याच्या छोट्या लिंबाएवढ्या लाट्या करून घ्याव्यात. एकावेळी दोन लाट्या घेऊन उभ्या दोन पट्ट्या लाटून घ्याव्यात. अधिकाच्या चिन्हात एकमेकावर या पट्ट्या ठेवून मध्यभागी दोन चमचे सारण ठेवून घड्या घालून बंद करावे. असे सगळे समोसे भरून घ्यावेत व ओलसर कपड्यात गुंडाळून ठेवावेत. तेल चांगले तापले असेलच. हलक्या हाताने सोनेरी रंगावर तळून टिपकागदावर काढावेत. गरम किंवा गार कसेही मस्तच लागतात खरेच पण थंड झालेले खायला उरतच नाहीत.

टीपा

यात कांदा ( कच्चा ) व कोथिंबीर लिंबाबरोबर एकत्र केली तरीही छानच चव येते. गरम मसाला आवडत नसेल तर घालू नये. थोडे जास्तीच तिखट हवे असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवावे.

7 comments:

 1. अरे वा.. छान बेत दिसतोय.. आज !!! :) व्हेज समोसा म्हणुन हाच प्रकार दादरला पण मिळतो तो त्रिकोणी आकारात असतो, आणि खुप खुप तेलकट.. पण टेस्ट अप्रतिम... आज जायलाच हवं तिकडे...

  ReplyDelete
 2. ह्म्म्म्म्म्म्म्म...चांगली तयारी चाललीय..शोमुची मजा आहे बुवा...

  ReplyDelete
 3. महेंद्र समोसा त्रिकोणी आकारातच असतो रे... पण हे पटकन होणारे म्हणून चौकोनी...हाहा...

  ReplyDelete
 4. अपर्णा अग शोमूचे नाव आणि दुस~याच कोणाचे... कळले ना....:)

  ReplyDelete
 5. लय भारी दिसू लागले वो बाय......

  ReplyDelete
 6. निषेध करून सुद्धा लोक समजत नाहित ... :P आता काय करावे ???

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !