जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, February 25, 2010

मोडी


काही आवडी उपजतच असतात. स्वच्छता-नीटनेटकेपणाची, बोलघेवडेपणा, संगीताची, वाचनाची, अभ्यासाची, खेळाची, चित्रकलेची...... इत्यादी. काही आवडी-कल हळूहळू लक्षात येतात. तर काही ठरवून जोपासता येतात. पाटीवर गमभन गिरवण्यापासून आईने प्रयत्नपूर्वक वळणदार व एकसारखे अक्षर काढण्यावर व स्वच्छ-शुद्ध लिहिण्यावर भर दिला व सरावही करायला लावला. रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावला की शुभंकरोती, शांताकारम ही स्तोत्रे, २ ते ३० पाढे व दहा ओळी शुद्ध नेटके लेखन हा परिपाठ होता. जोवर हे पूर्ण होत नाही तोवर ती जेवत नसे आणि आम्हालाही वाढत नसे. सुरवातीला खूप कंटाळा-राग येई. काय ही कटकट आहे असे वाटे. पण अगदी थोड्याच दिवसात आम्हाला सवय लागली. अगदी तिसरीपासून हस्ताक्षराच्या स्पर्धेत पहिला नंबर कधी चुकला नाही. त्यामुळे काही कामेही अंगावर ओढवून घेतली. बोर्डावर सुविचार लिहिणे. फलक बनविणे. स्क्रॅपबुकचे बरेचसे कामही कायम गळ्यात पडत असे. कॉलेजमध्येही ही कामे सुरू होतीच. पुढे तर ऑफिसमध्येही हे सत्र चालूच राहिले. असे असले तरी अक्षर अजून कसे चांगले होईल, कितीतरी निरनिराळ्या प्रकारे काढता येईल हे प्रयत्न करत होते.

कॉलेजमध्ये असताना एकदा अर्धमागधी, मोडी लिपी यावर बरीच चर्चा झाली. कोणालाही ना वाचता येत होती ना लिहिता. हातात कागद असून निरक्षर असल्यासारखे वाटले. लिहिलेले अतिशय वळणदार दिसत होते. एका लयीत हात न उचलता अक्षरे जणू घरंगळत आहेत असा भास होत होता. या अतिशय आकर्षक उलगडत जाणाऱ्या लडिवाळ अक्षरांना आपलेसे करायचेच हे मनाने घेतले. पण हे प्रत्यक्षात उतरायला मात्र १९९२ साल उजाडावे लागले.

जयहिंद प्रकाशनाचे मालक, श्री. ग.का.रायकर यांनी ’ मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळ " नावाची संस्था काढली व १८ जानेवारी १९९१ रोजी ठाकुरद्वार येथील कमला हायस्कूल येथे पहिला वर्ग सुरू केला. नंतर म्हणजे १९९२ मेमध्ये दादर-ठाणे येथेही वर्ग सुरू झाले. एक दिवस मॅजेस्टीकमध्ये गेले असता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दर रविवारी मोडी लिपीचे वर्ग भरतील, इच्छुकांनी नावे नोंदवावी हा फलक लिहून ठेवलेला पाहताच लगेच नाव नोंदवून टाकले.

आणि श्री. मनोहर जागुष्टे म्हणजेच आमच्या प्रिय जागुष्टेसरांचा परिचय झाला-स्नेह वाढला- सर,जणू घरातलेच झाले. अत्यंत तळमळीने मोडी लिपी रुजावी-वाढावी-टिकावी याचा सतत प्रयत्न सर करीत असत. सरांनी मोडी लिपीचा ध्यास घेतला होता. पंच्याहत्तरी झाली तरी रोज ठाण्याची वारी करत. प्रत्येक मायदेशाच्या भेटीत एकदा तरी सरांशी बोलायचेच हे ठरलेले. २००७ च्या मे मध्ये मॅजेस्टीकमध्ये गेले आणि धक्काच बसला. सरांचे निधन झालेले. अत्यंत हसमुख, शिकवण्यास सदैव तत्पर अशा आमच्या सरांच्या निधनाने एका मोडी-ध्यास पर्वाचा अंत झाला.

महाराष्ट्रात मोडी लिपी सहाशे सातशे वर्षे तरी सुरू असून यादवांच्या राजवटीपासून सरकारी दप्तर व लोकांचाही पत्रव्यवहार याच लिपीतून होत असे. इंग्रजीत जशी लघुलिपी झरझर लिहिता येते तशीच मोडी लिपी ही हात न उचलता लिहिता येत असल्यामुळे वेगाने लिहिता येते. पेशवेकालीन दस्तऐवज, पत्रे, मोहर, समर्थांची पत्रे, महाराजांचे खलिते-राज्यकारभार, इत्यादी मोडी लिपीतूनच लिहिलेले आहे. मोडी लिपी फारशी अवगत नसल्यामुळे ही बाडे नुसतीच पडून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही लिपी दुर्लक्षिलीच गेली आहे. तिचा पुन्हा प्रसार व्हावा यासाठीचा हा सारा खटाटोप होता. वर्षभरात ’ जागतिक मराठी परिषदेच्या ’ दोन्ही परीक्षा देऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झाले. त्याच दरम्यान तंजावर ची सहल आयोजित झाली. ही संधी दवडणे शक्यच नव्हते.

तंजावरातील ’ सरस्वती महाल ’ येथे गेलो. अतिशय भव्य दिव्य महाल. बाहेरून याच्या भव्यतेचा मुळीच अंदाज येत नाही. अतिशय प्रसन्न वातावरण व प्रशस्त जागेत अंतरा अंतरावर टेबले व पंडित बसलेले होते. तिथे विवेकानंद गोपाळ या अधिकाऱ्यांना भेटलो. ग्रंथालयात संस्कृत, मराठी, तमिळ, तेलगू इत्यादी भाषांचे तज्ञ काम करत होते. स्वच्छ पांढऱ्या फडक्यांत मोडी लिपीचे कागद बांधलेले होते. या फडक्यांना रूमाल असे संबोधले जाते. या सर्व प्राचीन कागदपत्रांची निगा घेणारा विभागही पाहिला. फाटलेली कागदपत्र, ताडपत्रे यांची दुरुस्ती. ’ विट्रेनेल्ला ’ नावाने ओळखले जाणारे तेल ताडपत्रावर लावून त्यांची जपणूक केली जाते. नंतर या मजकुराची चित्रफीत घेतात.

भोसलेकालीन मोडी लिपीतील १००० रुमाल येथे पूर्वी होते. १९९३ साली त्यातील ८५० सरस्वती महालात होते. आम्ही त्यातील काही रुमालातील दस्तऐवजांचे भाषांतर करण्याचे काम केले. एक अतिशय वेगळाच रोमांचकारी अनुभव होता. अहिल्याबाई होळकरांच्या हस्ताक्षरातील पत्र, मातोश्री राधाबाईंचे माधवरावांना लिहिलेले पत्र, उदाजी चव्हाणांचे चिमाजी अप्पांना पत्र, समर्थ रामदासांनी शिवाजीराजेंना लिहिलेले खलिते, समर्थांनी त्यांच्या पुतण्यांना लिहिलेली पत्रे, पाहून डोळे भरून आले. इतिहासाच्या जिवंत खुणा, हस्तलिखिते पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे अतिशय आनंद झाला.


जाता जाता मी मोडी लिपीत लिहिलेले दोन नमुने देत आहे.

काव्यपंक्ती:
श्रीहरी मथुरानगरी गेले, गोकूळ मागे तळमळते ।
प्राणिमात्र नच केवळ परि ते यमुनेचे जळही जळते ॥
कळे सकळ हे श्रीगोपाळा कळवळूनी मनि आणि दया।
धाडुनि दिधला प्रजांत उद्धव प्रियजनसांत्वन करावया ॥
सत्वर हरिचा निरोप घेऊनि उद्धव भेटे सकळांते ।
वृत्तश्रवणा क्षणांत जमले गोकूळ सारे त्या भंवते ॥
हे नंदाला, यशोदेस हे, कोणाला काही काही ।
निरोप सांगे सांत्वनपर तो; सुने कुणी उरले नाही ॥
या गोपीला, त्या गोपीला, गोड शब्द दे वाटुनियां ।
राधेला तर बहाल केली हरिने जिवाची दुनिया ॥

उतारा :

आजच्या युगात खेळांचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे. कारण यशस्वी खेळाडूंना लौकिक आणि लक्ष्मी दोन्हीही प्राप्त होताना दिसतात. पण असे यश संपादण्यासाठी भरपूर तपश्चर्या करावी लागते. खेळामुळे मेहनत आणि चिकाटी या दोन्ही गुणांची जोपासना होते. खेळाडू मोठ्या चुरशीने खेळून यशश्री खेचून आणतात. अशा या चुरशीतून खेळाडू जिद्दी बनतो. हीच जिद्द खेळाडूंना त्याच्या जीवनात अन्यत्रही उपयोगी पडते. ( उतारा बराच मोठा आहे. म्हणून नमुना देत आहे. )

45 comments:

  1. FYI, Wai ithe modiche marathi ani english madhye translate karun dila jata, mi ekada gele hoto translate karun ghenysathi

    ReplyDelete
  2. नेहमी मोडी लिपी शिक्षणवर्गाची जाहिरात यायची त्यात ते मनोहर जागुष्टे नाव नेहमी असायचं...त्या वर्गाला जावं असं वाटायचं पण हजारो ख्वाईशे सारखं...:)
    तू मोडी लिपी शिकली आहेस हे फ़ारच छान आहे..आता जुने दस्ताऐवज घेऊन बसलीस तर सगळं जग विसरशील...माझी आजी मोडीमध्ये सही करायची...

    ReplyDelete
  3. भाग्यश्री, कसली छुपी रुस्तम निघालीस गं? अगं ते हस्ताक्षर आहे की मोती? अ...प्र...ति...म....
    अगं ते मोडी लिहीलेलं कसलं भारी दिसतंय.

    माझंही अक्षर चांगलं आहे (असं सगळे म्हणतात). बऱ्याच वर्षांपासून कॅलिग्राफी शिकायची इच्छा आहे. आणि आता तुझं हे मोडी बघितल्यावर ते ही शिकायची इच्छा निर्माण झाली. केव्हा शिकणार गं हे सगळं? महाराजांचा पत्रव्यवहार कळला तर स्वर्ग अक्षरश: दोन बोटे राहिल निदान मला तरी.

    ReplyDelete
  4. shreeeee...tu mala promise keleyes..ki mala shikavshillll..me wat pahatey....post sahi lihili aahes...N ne kadhun dile watate moDee ch papers...Thnx to N...[:P]

    ReplyDelete
  5. maza ajoba na Modi lipi yayachi aani te tya lipit ch lihay che :) -aahet kahi vahya tyancha modi lipi madhalya -Ashwini

    ReplyDelete
  6. लीपी समजत नाही, पण तू लिहिलेला नमुना केवढा सुंदर दिसतोय! मोडी - बाळबोध ट्रान्स्क्रिप्शनच्या निमित्ताने जुना दस्तावेज हाताळायला मिळणं म्हणजे केवढी मोठी पर्वणी असेल ना!

    ReplyDelete
  7. अतिशय छान माहिती आहे ताई.. "मराठी मंडळी"वरील मराठी भाषा – ओळख आणि इतिहास आणि देवनागरी लिपी – ओळख आणि इतिहास या दोन लेखांमध्ये मोडी लिपीबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुझ्या ह्या पोस्टचा संदर्भ मी दिला आहे.

    विशल्या!

    ReplyDelete
  8. मोडी माझ्या आजोबांना येत होती, मला नाही येत.
    तुमचे अक्षर मात्र खुप सुरेख आहे...

    ReplyDelete
  9. मोडी लिपी बद्दल माझ्या बाबांकडुन ऐकल होत. त्यांचे बरेचशे शिक्षक सहकारी स्वाक्षरी मोडी तूनच करत असत. मस्त आहे पोस्ट!!

    ReplyDelete
  10. bhari bhari...ek number....mi pan modi shikalo ahe lihayla ani vachayla.
    modi sanvardhanasathi ekhadi sanstha asel tar jarur mala sangave, hi vinanti.
    maza email ahe

    nikhil.bellarykar@gmail.com

    ReplyDelete
  11. अगं बयो किती कला अवगत आहेत गो बये!!!
    सुंदर........... अप्रतिम..............
    आता तुझ्याकडून हे देखील शिकावे लागेल...आजपासून ऑनलाईन शाळा सुरू करते याची...मास्तरीण बाय शिकवाल का वो ????

    ReplyDelete
  12. अजय,मला हे माहितच नव्हते. धन्यवाद.

    ReplyDelete
  13. अपर्णा, जागुष्टेसरांनी अक्षरश: वाहून घेतले होते. माझी सही पाहिलीस ना...:)

    ReplyDelete
  14. megh, अगदी अगदी. आमची अवस्था अशीच झाली होती. भारलेपण. बरेच वर्षांपूर्वी कॅलिग्राफी शिकत होते आता पुन्हा प्रयत्न करायला हवा.चल दोघी मिळून करूयात.:)

    ReplyDelete
  15. माऊ, जानेमन काल सगळे बाड काढले ( काढवून घेतले ) तुझ्यासाठीच.:) नक्कीच गं.

    ReplyDelete
  16. अश्विनी,ब~याच आजी-आजोबांना मोडी लिपी कळते. त्यावेळी शाळेत होती.आभार.

    ReplyDelete
  17. गौरी, हो तर. अग हा योग नेहमी थोडाच ना यायला बसलाय. ताडपत्रावर लिहिलेले फारच आकर्षक दिसते.

    ReplyDelete
  18. विशाल, ब्लॉगवर स्वागत आहे व मराठी मंडळांच्या लेखात दिलेल्या संदर्भाकरिता अनेक आभार.

    ReplyDelete
  19. आनंद,प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

    ReplyDelete
  20. मनमौजी, हा मोह टाळणे जरा कठीणच. मी ही मोडी शिकल्यापासून स्वाक्षरी तशीच करतेय.:)

    ReplyDelete
  21. निखिल, ब्लॉगवर स्वागत आहे. मी बरीच वर्षे बाहेर असल्याने नेमकी माहिती देऊ शकणार नाही. परंतु मॅजेस्टीकमध्ये जाऊन विचारल्यास नक्कीच संवर्धनसंस्थेची माहिती मिळू शकेल. मला काही कळल्यास मी आवर्जून तुम्हाला कळवेन. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  22. तन्वी, अगं काहितरी करत राहायचे हा स्वभाव.त्यातून ही लिपी मोहवणारीच आहे. बोल कधीपासून सुरू करायचे?:)

    ReplyDelete
  23. मला खूप आवडतो हा ब्लॊग. मोडी खरच शिकाविशी वाटतेय.

    ReplyDelete
  24. वा भाग्यश्री ताई.. मोडीवर पोस्ट ?? मस्तच.. माझ्या एका मैत्रिणीच्या बाबांना मोडी अगदी चांगली लिहिता आणि वाचता येते. मोडी लिहिता वाचता येणं हे जनरली आजी/आजोबांच्या पिढीसाठी कॉमन. तुम्हाला पण ती येते आणि तुम्ही अजूनही ती आवड जोपासाताय हे ऐकून खूपच छान वाटलं. BTW, 'हेरंब' कसं लिहायचं मोडीत? :D

    ReplyDelete
  25. हेरंब, आजी-आजोबांच्या काळात मोडीचा वापर होत होता. नंतर काही दशके नामशेषच झाल्यासारखी झाली. वळणांची आवड मग ते रस्त्याचे असो की स्वभावाचे का हे असे....:D

    ReplyDelete
  26. Anonymous,स्वागत व आभार.

    ReplyDelete
  27. खुप छान वाटलं वाचतांना. माझ्या लहानपणी आजोबांची ( आई चे वडील) टिपणं नेहेमी मोडी मधेच असायची काचेच्या बाटलीमधल्या काळ्या शाईत टाक बुडवुन लिहायचे ते.. आणि भरपुर अभ्यास केलेला दिसतो तु पण.:) लेख छान वाटलं वाचतांना. आता ही मोडी लिहायची कशी यावर एक मालिका लिही. पहिला विद्यार्थी मी..

    ReplyDelete
  28. महेंद्र,मी आजोबांकडे गेले की नेहमी टाकाने लिहीत असे. त्यावेळी बरीच प्रॅक्टीस होती.आता नाही जमायचे...

    ReplyDelete
  29. मोडीला संगणकावर बसवण्याचा थोडाफार प्रयत्न मी केला, सध्या युनिकोडमधे जागा नियुक्त करण्याच्या प्रयत्नात अंशूमन पांडे आहेत. संदर्भातली‌ माझी पोस्ट http://thelife.in/?p=271 आणि पांडेचं प्रपोजल http://std.dkuug.dk/JTC1/SC2/WG2/docs/n3780.pdf

    - मी

    ReplyDelete
  30. ’मी ’ आत्ताच तुमच्या मोडीसंदर्भातील पोस्टवर जाऊन तुम्ही केलेले काम वाचले. अभिनंदन! मी तिथेही लिहीले आहेच.माझ्याकडून जी जमेल ती मदत करायला मी तयार आहेच. इतके लोक अतिशय आवडीने व उत्साहाने मोडीसाठी काम करत आहेत हे पाहून खूप खूप आनंद झाला. धन्यवाद.

    ReplyDelete
  31. नमस्कार....
    खरे तर कुठल्या कुठल्या BLOGS वर उड्या मारत मारत मी तुमच्या ब्लॉग पर्यंत पोहोचले... कित्त्ती सुंदर सजवला आहात तुम्ही तो.. खुपच आवडला मला :)...आणि वाचायालाही खूप आहे छान छान .. आणि.. खुप सारा खाऊ ही :D ... यथावकाश वाचणारच आहे मी सगळे .. पण मलाही मोडी लिपी शिकायची खूप ईछा आहे . तुमचा EMAIL ID मला इथे ब्लॉग वर मिळाला नाही म्हणून कॉमेंट टाकते आहे ..माझा id medhalad@gmail.com आहे...मला मेल कराल का please....

    ReplyDelete
  32. Medha,मन:पूर्वक स्वागत व प्रतिक्रियेबद्दल आभार. खूप आनंद वाटला तुम्हाला ब्लॉग आवडल्याचे वाचून. वेळ मिळेल तशी भेट द्या आणि काय आवडले-सुधारणा कळवा. मी तुम्हाला विरोपही धाडत आहेच. बोलूच.:)

    ReplyDelete
  33. Hello.. Tumhi mala mail kele hote ka? mala nahi ale ani niropakache amantranhi..:( mag me ethe ale tar tumhi ethe reply dilay :) Please ajun ekdach karal ka mala mail?

    ReplyDelete
  34. मेधा, पुन्हा करते हं का..... :)

    ReplyDelete
  35. साक्षात् दंडवत तुम्हाला.. मोडी म्हणजे माझ्या अव्दिचा विषय. माझ्या मनात कधी पासून त्या वर्गाला जायचे आहे पण वेळ जमत नाही. सलग १२ रविवार कुठून काढू. :( असो एका मित्राच्या मदतीने सध्या ऑनलाइन शिकतोय थोड़ी थोड़ी. आणि हो मोडी नामशेष होऊ नये म्हणुन 'यूनिकोड' तयार होतोय मोडीचा. आता ऑनलाइन मोडी लिहिता येइल मराठी प्रमाणे लवकरच... :) मी कळवीनच.

    ReplyDelete
  36. SIR, MALA MODI LIPI CHE SHIKSHAN GHYAVAYCHE AAHE, ME PUNE YETHE RAHATO, TARI MALA PUNE CITY MADHYE EKHADI MODI LIPI SHIKAWANARI SANSTHE CHE NAV KALVA.

    GANESH

    ReplyDelete
  37. wow....superb....khupach chhan.....oor bharun ala...tumche shabda vaachtaana....mala hi thodi thodi modi bhaashaa yete mazyaa ajobaanni shikavli hota naav lihaayla
    ....

    ReplyDelete
  38. रोहना, तुझे ऒनलाईन मोडी कुठवर आलेय रे? बरेचदा गडांवर मोडीत लिहीलेले आढळून येते. मोडीचा ऒनलाईन वापर सुरू होणार होता ना, त्याचे काय झाले?

    ReplyDelete
  39. गणेश, पुण्यातले मला नाही हो सांगता येणार. मात्र ठाण्यात मॆजेस्टिक तर्फे हे वर्ग अजूनही सुरू आहेत. पुण्यातही त्यांच्याकडे जाऊन विचारल्यास माहीती मिळू शकेल असे वाटते.

    प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  40. अनुराग, ब्लॊगवर स्वागत आहे. खरेच काही गोष्टीं भारून टाकतात, त्यातलीच ही एक आहे. टाकाने मोडीचे वळण अजूनच सुंदर वठते.

    आवर्जून आवडल्याचे कळवलेत, आभारी आहे.

    ReplyDelete
  41. मोडी लिपीचा युनिकोड फाँट तयार झाला आहे. युनिकोड कॉंसोर्शीयम कडूम अधिकृत मान्यता मिळायला अजून एक महिना आहे. हा फाँट युनिवर्सीटी ओफ कॅलिफोर्नीयाच्या श्री.अंशुमन पांडे यांनी तयार केला आहे. तो महिना, दोन महिन्यात सर्वांस उपलब्ध होईल आणि इंटर्नेट वर मोडी लिपी मराठी लिहीता येईल. म्हणून पटापट मोडी लिपी शिकून घ्या. मोडी लिपीच्या लेटेस्ट माहितीसाठी फेसबूक वर मोडी लिपी समूहाचे सदस्य व्हा. - https://www.facebook.com/groups/123786634305930/?ap=1

    ReplyDelete
  42. राजेश, ब्लॉगवर स्वागत आहे. इतके आवर्जून कळवलेत खूप खूप धन्यवाद. फेसबुकच्या लिंकला जॉईन होतेच आहे.

    ReplyDelete
  43. आयला तुला मोडी येते? धन्य आहेस!

    ReplyDelete
  44. गुरुदत्त कधी कधी अचानक संधी समोर येते आणि मनात घोळत असलेली इच्छा पुरी होऊन जाते, तसेच काहीसे होऊन ’ मोडी ’ शिकले. :):)

    ReplyDelete
  45. मोडी लिप्यंतरचे काम करून देतो, मोडी लिपीतील काम असल्यास संपर्क करावे. अनिल विष्णुसा पवार मो. नंबर-9326991654

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !