सतत अत्यंत प्रेमळ आईच्या, ओढग्रस्तीने गांजलेल्या, मुलांसाठी वाटेल तो अन्याय व त्याग करणाऱ्या भूमिकेत पाहिलेल्या व मनात आईच्या-आजीच्या जागी अढळ स्थान मिळवलेल्या लीला चिटणीस यांचे, ' चंदेरी दुनियेत ' हे पारदर्शी आत्मचरित्र वाचले. सिनेमात काम करणे तर फार दूरची बाब परंतु कुलीन-घरंदाज स्त्रियांना सिनेमाला जाण्याचीही मुभा नसलेल्या काळात स्वत:च्या पोरांच्या तोंडात घास पडावा-अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सिनेमात काम करण्याचा एक धारिष्ट्याचा निर्णय घेऊन, स्वत:तील अभिनय सामर्थ्याने व प्रचंड मेहनतीने सिनेमासृष्टीत मानाचे व उच्च स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्रीची ही आत्मकथा.
हे कथन अतिशय प्रामाणिक-प्रांजळ व काहीसे बेधडक तरीही भावणारे आहे. ९ सप्टेंबर, १९०९ रोजी धारवाड येथे जन्मलेल्या लीला चिटणीस मुळातच स्वत:च्या लहरीनुसार वागणाऱ्या, हेकट-हेकेखोर होत्या. मनस्वी बंडखोर व भावनेच्या भरात वाहून मनमानेल तसे करण्याच्या-वागण्याच्या स्वभावामुळे त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागलेला. चित्रपटसृष्टीतील पहिली उच्चशिक्षित नटी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या लीला चिटणीस, तिथल्या दिखावू-बेगडी चकचकाटाला भुलून व तारुण्याच्या उन्मादात-मोहाला बळी पडून हातून घडलेल्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे पुढे तहहयात झालेल्या फरपटीचे सत्यकथन करतात.
आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या चिटणिसांशी लहान वयातच लग्नाचा आततायीपणा करतात. त्यावेळी चिटणिसांची समाजातील प्रतिमा, प्रार्थना समाजाचे मोठे कार्य, सतत अवतीभोवती असणारे उच्चविचारसरणींचे-बुद्धिमान-लोक यामुळे भारून जाऊन घेतलेला हा निर्णय पुढे चिटणिसांचे घराप्रती केलेले संपूर्ण दुर्लक्ष व लागोपाठ लादलेली तीन बाळंतपणे यामुळे काहीशा हताश होतात. कोसळतात. आर्थिक ओढाताण वाढू लागल्याने केवळ आपल्या मुलांसाठी घराबाहेर पडून अर्थार्जन करण्याचा निर्णय घेतात आणि अचानक चित्रपटसृष्टीत प्रवेश करतात. या मोहमयी दुनियेत मेहनतीने, अभिनयक्षमतेच्या व जिद्दीच्या जोरावर उत्तम यश मिळवतात. भूमिकेत झोकून देऊन काम करण्याची वृत्ती व मुलांच्या भवितव्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी यामुळे काही काळ या चित्रनगरीच्या शिखरावरही पोचतात. परंतु मुळचा बेबंद व मोही स्वभाव इथेही घात करतो. स्वैर वागण्याचे परिणाम सतत भोगावे लागत असूनही त्यावर मात करता येत नाही. आपण आई आहोत आणि आपल्या मुलांसाठी अक्षरश: स्वत:च्या जीवाचे रान करणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचे हे आत्मचरित्र.
कितीही बंडखोरी-स्वैरपणा असला तरी माझी मुले हेच माझे विश्व आणि माझा प्राण फक्त त्यांच्यासाठीच आहे हेच या साऱ्या कथनातून जाणवत राहते, भिडत राहते. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणार्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. क्षणिक मोहाच्या-ऊर्मीच्या मागे जाणाऱ्या, सातत्याने मोहाला बळी पडणाऱ्या लीला चिटणीस, मुलांच्या अव्याहत काळजीने, त्यांच्या भावनिक समस्यांमुळे हवालदिल होत असत. त्याचे केलेले अतिशय अकृत्रिम वर्णन मन हेलावून टाकते. चित्रपट सृष्टीतील अनेक अनुभव, मानहानी, मोठ्या मोठ्या नावाजलेल्या लोकांचे खरे- अतिशय घाणेरडे रूप, पुरषी सत्ता, स्त्रियांची फरफट-शोषण, बळजोरी याचे सत्य कथन केले आहे. बडी बडी, आदराचे स्थान असलेली माणसे किती नीच पातळीचे वर्तन करतात हे वाचून धक्का बसतो.
चिटणिसांशी घेतलेल्या घटस्फोटानंतर बरेच चढउतार - अध:पतन होऊन शेवटी गजानन जहागिरदारांबरोबर जुळलेली मैत्री व लग्न करण्याची इच्छा व यामुळे बाबूराव पेंढारकरांच्या पुरषी अहंकाराला बसलेल्या धक्क्याने त्यांनी लीला चिटणीस यांच्याशी केलेले असभ्य वर्तन. जणू काही त्या त्यांची मालकीची-हक्काची वस्तू असल्याची जाणीव अतिशय पाशवीपणे करून देणे.....याने त्या हताश होतात. कोलमडतात. शेवटी स्त्री कुठल्याही काळातली व कुठल्याही क्षेत्रातली असू देत, हे चुकत नाहीच.
लीला चिटणीस यांचे वडील त्याकाळी गाजलेल्या नाट्यमन्वतर या मराठी नाट्यसंस्थे मध्ये होते. लीला यांनी हास्यप्रधान चित्रपट, ' उसना नवरा ' यात काम केले. नंतर काही काळ स्टंट अभिनेत्रीच्या रूपात व एक्स्ट्रॉ म्हणूनही कामे केली. लवकरच मास्टर विनायक यांच्याबरोबर, ' छाया- साल, १९३६ ' व प्रभात चे केशव नारायण काळे यांच्याबरोबर, ' वहाँ -१९३७ ' आणि सोहराब मोदी यांच्याबरोबर, ' जेलर -१९३८ ' या त्यावेळी टॉप वर असलेल्या कलाकारांबरोबर संधी मिळाली. १९३९ साली लीला चिटणीस यांना अमाप प्रसिद्धी मिळाली ती विष्णूपंत पागनीस यांच्या जोडीने पागनीसांची बायको म्हणून ' संत तुलसीदास' यातील कामामुळे. पुढे अशोक कुमारबरोबर त्यांची जोडी अतिशय गाजली. लागोपाठ आलेल्या, ' कंगन, बंधन व झुला ' या तीन सिनेमांनी हॅटट्रिक करून त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. लीला चिटणीस यांनी जवळपास शंभरएक चित्रपट केले.
अशोक कुमार यांनी त्यांच्यातील अभिनयकौशल्याची अतिशय तारीफ केलीच व अनेकांना त्यांचे नावही सुचविले. डोळ्यांनी कसे बोलायचे- एखाद्याच्या मनापर्यंत कसे पोचायचे हे कसब मी लीलाकडून शिकलो असेही अशोककुमार नेहमी म्हणत. लवकरच हे सारे वलय संपले. आणि हळूहळू लीला चिटणीस आईच्या भूमिकेत आल्या आणि तिथेच स्थिरावल्या. काला बाजार मधील त्यांची भूमिका- ' ना मैं धन चाहूं ना रतन चाहूं ' आणि साधना मधले, ' तोरा मनवा क्यों घबरायें रामजी के द्वारे ' ही भजने आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आईच्या भूमिका अजरामर आहेत- अशी आई पुन्हा होणे नाही. स्वत: तरुण असतानाच ज्यांच्याबरोबर नायिकेची भूमिका केली त्यांच्यांच आईचे काम अतिशय ताकदीने वठवले.
जीवनात यश-अपयश, मानहानी व बेंबदपणा पुरेपूर जगलेल्या या गुणी अभिनेत्रीचे १४ जुलै, २००३ रोजी डॅनबरी-कनेक्टीकट येथे नर्सिंग होममध्ये निधन झाले. आयुष्याची शेवटची वर्षे अतिशय एकटेपणा व विकल मनस्थितीत गेली. आपल्या जीवनाचे सारसंचित- टोकाचा विरोधाभास दाखवणारे लीला चिटणीस यांचे, ’ चंदेरी दुनियेत ’ हे जीवनचरित्र मनाची पकड घेणारे आहे. या मोहमयी दुनियेची वाट किती निसरडी व घातक आहे याचे यथार्थ चित्रण. कुठलाही आडपडदा न ठेवता स्वत:च्या जीवनातील अतिशय खाजगी व उन्मादाने भरकटलेल्या घटना लीला चिटणीस यांनी तितक्याच मनस्वीपणे मांडल्यात. स्वत: केलेल्या अक्षम्य चुकांचे अजिबात समर्थन त्यांनी केलेले नाही. चरित्र वाचून संपल्यावरही माझ्या मनात त्यांची, ' आईची त्यागग्रस्त छबीच ' फक्त तितक्याच भारलेपणाने उरलेली आहे ह्यातच त्यांच्यातील ’ आईची ’ ताकद दिसून येते.
> प्रभातचे नारायण काळे यांच्याबरोबर, ' वहन -१९३७ '
ReplyDelete>
चित्रपटाचं नाव : Wahan -> Wahaa.N -> वहाँ, उर्फ़ 'Beyond The Horizon'.
काळ्यांचं नाव होतं केशव नारायण काळे. पण शान्तारामबापू वणकुद्रे हे व्ही शान्ताराम, तेव्हा काळ्यांनाही तसलं काही करण्याची हुक्की आली, आणि त्यांनी 'के नारायण काळे' असा विचित्र पर्याय स्वीकारला. किंवा श्रेयनामावलीत नाम टाकणार्यानी हा चावटपणा केला असेल. पण पुढे असलंच नाव घेऊन काळे वावरले.
> या गुणी अभिनेत्रीचे १४ जुलै, २००३ रोजी डॅनबरी-कनेक्टीकट येथे नर्सिंग होममध्ये निधन झाले.
>---
लीला चिटणीसच्या मृत्युची तारीख २-३ ठिकाणी १४ जुलै, १५ जुलै, अशी वेगवेगळी दिलेली आहे. पण आत्मचरित्रात १४ जुलै आहे, तर तीच असेल. पण खात्री नाही. भीमसेनची जन्मतारीख अनेक ठिकाणी १४ फ़ेब्रुअरी १९२२ दिली आहे. मोहन नाडकर्णींच्या पुस्तकातही तीच आहे. पण इतर ठिकाणी ४ फ़ेब्रुअरी १९२२ तारीख दिसते, आणि तीच बरोबर आहे. कारण भीमसेनचा जन्म रथसप्तमीचा आणि १९२२ साली रथसप्तमी ४ फ़ेब्रुअरीला होती.
लीला चिटणीसची काळजी कोणीच घेत नाही, ती कोणालाच ओळखू शकत नाही, इत्यादि मज़कूर rediff.com वर २००१ सुमारास आला होता. (http://www.rediff.com/movies/2000/jul/11box.htm). पण तिच्या मृत्युनन्तर त्या वृद्धाश्रमातून मला मिळालेली माहिती (जी खोटी असू शकते) म्हणजे तिचा एक मुलगा तिला नियमित भेटायला ज़ात असे.
कंगन, बंधन आणि झूला आणि तिन्ही सिनेमांत ती स्वत: अनेक गाणी खूप छान गायली आहे. तशी ती गाणारी नव्हती. पण सरस्वती देवी आणि रामचन्द्र पाल या 'बॉम्बे टॉकीज़' च्या ज़ोडगोळीला कुणीही गाऊ शकेल अशी सोपी गाणी रचण्याची कला गवसलेली होती.
- डी एन
धनंजय, अनेक आभार. चित्रपटाचे नाव वहन नाही हे मला समजत होते परंतु नेमके नाव माहीत नव्हते. दुरूस्ती केली आहे. आत्मकथनात बरेच स्फोटक तपशीलही आहेतच. तसेच अंतिम काही वर्षे त्या एकट्याच होत्या यासंबंधीही बरेच ठिकाणी वाचावयास मिळाले.( त्यांचा एक मुलगा व मुलगी ही हयात नाहीत. )काय खरे आणि खोटे याचा उलगडा होणे कठीणच आहे.
ReplyDelete> चित्रपटाचे नाव वहन नाही हे मला समजत होते परंतु नेमके नाव माहीत नव्हते.
ReplyDelete>---
चित्रपटाचं नाव (Wahan) इंग्रजी पुस्तकात वाचल्यास गोंधळ होतोच; पण मराठी पुस्तकात चित्रपटाचं नाव चूक दिलं आहे, की तो शब्द इंग्रजीत लिहिला आहे?
- डी एन
झालेय काय की मी हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वी वाचलेय. आणि सध्या ते माझ्या मायदेशातील घरी आहे. त्यामुळे चरित्रात तो बरोबर लिहिलेला असू शकेल परंतु जालावर प्रत्येक ठिकाणी तो इंग्रजीतच लिहिलेला सापडल्यामुळे माझा गोंधळ. त्यात तिथे रात्र असल्याने आईलाही विचारू शकत नाही ना.... पण आता तू सांगितल्यामुळे लगेच सुधारता आले.
ReplyDeleteमी हे आत्मचरिेत्र कॉलेजमधे असताना केव्हातरी वाचलयं....तेव्हा खरच कितपत झेपलं होतं राम जाणे...आता तू आठवण केली तेव्हा पुन्हा मनात विचार येताहेत....
ReplyDeleteएक आहे त्या बंडखोरीबद्दल राग आणि कणव किंवा असचं काही पण संमिश्र भावना होत्या मनात हे नक्की.......
वाचलं नाहीये. पण खूप छान वर्णन केलं आहेत तुम्ही. स्वदेश दौ-याच्या 'book-wishlist' मध्ये add करून ठेवतो..
ReplyDeleteतन्वी,वाचताना अनेकदा खरेच त्या इतके स्वैर वागल्या असतील....,त्याचे परिणाम सतत भोगावे लागत असूनही? हा प्रश्न वारंवार मनात येतो. रागही येतो.खूप वाईटही वाटते.
ReplyDeleteहेरंब,जरूर वाच.आगळीच कहाणी आहे ही.
ReplyDeleteमिळवतो आणि वाचतो हे पुस्तक...
ReplyDeleteतुला बरंच भावलेलं दिसतंय हे पुस्तक...आजकाल मला स्त्रीचं असं शोषण इ. वाचायचं मन होत नाही...इथे आधीच मन बरंच कावलेलं असतं त्यात घरात माझी minority आहे नं....पण माझ्या आईला आवडेल हे पुस्तक असं वाटतं....
ReplyDeleteआनंद,आवर्जून वाचा.
ReplyDeleteअपर्णा, अगं हे पुस्तक स्त्रीचे शोषण सांगणारे नाहीये गं..... पण राहू दे. तुझा योग येईल तेव्हां वाचशीलच तू.:)
ReplyDeleteमी वाचल नाही. . .पण आता नक्की वाचेन. .. खूप छान लिहलयं!!!!
ReplyDeleteआपल्याला दिसतं तसं चंदेरी दुनियेचं जग चकचकीत नसतं हेच पुन्हा वेगवेगळ्या कहाण्यांमधून पुढं येत राहतं.... पुरुषांच्या अशा 'कहाण्या' कधी फार 'प्रसिध्द' होत नाहीत..... आणि त्यात लेखकाचं 'चरित्र' हे त्याच्या दृष्टीकोनानुसार ठरतं.... म्हणजे तो चारित्र्यवान, एकपत्नीव्रती की रंगेल 'मर्द गडी'..... स्त्रीच्या बाबतीत आपण जरा जास्तच कठोर होतो, नाही? जी प्रलोभने पुरुषाला ह्या दुनियेत असतात, तीच एका स्त्रीलाही असतात. पण दोघांना तोलायचे आपले मापदंड मात्र वेगळे असतात. लीला चिटणीस यांच्या आयुष्याबाबत काहीसं असंच वाटत राहतं....
ReplyDeleteसप्रेम
अरुंधती
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
अरूधंती, आजही समाजात पुरूष आणि स्त्री यांच्यातील मर्यादा वेगवेगळ्याच आहेत. स्त्रीया,मुलींनी कितीही स्वातंत्र्य वगैरे म्हटले तरी प्रत्यक्षात ते कुठवर असते हे सगळेच जाणून असतात. फारच कमी पुरूषांनी इतके निर्भिड आत्मकथन केले असेल. कदाचित बरेच असेही म्हणतील की मुळात हे लिहावेच का? पण तो वैयक्तिक मुद्दा असल्याने ज्याचे त्याचे हक्क आहेत.तू जसे म्हटलेस की लेखकाचे चारित्र्य हे त्याच्या दृष्टीकोनानुसार ठरते. अगदी तसेच काहीसे आहे. लीला यांचे चरित्र वाचून जरी काही वेळेस राग आला, विषाद वाटला तरीही तितकाच जिव्हाळा-आत्मियता वाटते.मनातील प्रतिमेला थोडा धक्का जरूर बसतो पण ती मलीन-डागाळत नाही.
ReplyDeleteमनमौजी, अवश्य वाच.
ReplyDelete