जाता जाता एक नजर इथेही........

Monday, February 8, 2010

माझे मन बोथट-बथ्थड झालेय.......

टीव्हीवर कुठलीशी ’ क्राईम ’ बातमी पाहत होते. अतिशय क्रूरपणे मुलींचे बलात्कार व खून करून जंगलात परंतु वॉकींग ट्रेलच्या आसपास सहज सापडतील अशा जागी टाकून दिलेले. बातम्या देणारे दोघे, एखादी ’ आजचे हवामान ’ सारखी रूटीन बातमी द्यावी इतक्या सहजपणे सगळा वृत्तांत देत होते. वाटले आपण सगळेच किती बदललो आहोत. पूर्वी भक्ती बर्वे, प्रदीप भिडे, स्मिता....टीवी-रेडिओवरील बातम्यांत एखाद्याचा खून झालाय-गोळी मारून ठार केले सारख्या बातम्या सांगताना निवेदकाच्या आवाजातला कंप जाणवत असे. कोणी निवर्तलेय हे म्हणताना खरोखरच आवाज जड होत असे. घशातला आवंढा जाणवे. ( आता कोणी असेही म्हणेल की ते तसे दाखवत असतील. )

सिनेमांतूनही डायरेक्ट चाकू खुपसणे-गळे कापणे-पॉंईंट ब्लँक गोळ्य़ा घालणे, हालहाल करून मारणे दाखवत नसत. सूचकपणे घटनेचा उल्लेख करून प्रसंग बदलत असत. पाहणारे आपणही, त्या सूचकतेच्या भेदकपणाने शहारत होतो. अग आई गं! अरेरे! असे उदगार आपसूक निघत असत. हळूहळू चित्रपटात हिंसा स्थिरावली, वारंवार वार करत राहणे-क्रूरपणाचा कळस, माणूस मेलाय तरी गोळ्य़ा झाडतच राहणे, बाँबस्फोट, सामुदायिक हत्या पाहून फारसा काही फरक पडेनासा झाला.

कुठलेही काम वारंवार केले किंवा पाहिले की नजर मरते, मन बोथट होते असे म्हटले जाते. त्याकडे ते ’कर्म’ या दृष्टिकोनातून पाहण्याची मनाला नकळत सवय होते. पोलिस, डॉक्टर्स, शवागारात काम करणारे, गटारात उतरून ती स्वच्छ करणारे, खाटीक या सगळ्यांचे असेच होत असेल. त्यांचे काम त्यांना भावना बाजूला ठेवून करायलाच हवे. एका चांगल्या जीवनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांचे मनही सर्वसामान्य माणसाइतकेच हळहळत असेल. संवेदनशील असले तरी काहीसे बोथट नक्कीच झाले असेल. दु:ख करत बसून चालणार नाही, पण याचा अर्थ त्यांचे मनही मेलेय का?

अगदी लहान लहान मुले टीव्हीवरील त्या ' आहट ’ वगैरे सारख्या भुताच्या-खरे तर भिती कमी आणि बुळबुळीत हिरवे-काळे द्रावण शरीरातून सांडतेय- अगदी ईईई......शिसारी आणणाऱ्या- सिरियल्स पाहताना मस्त खदखदून हसत असतात. त्यांना भिती वाटणे तर सोडाच उलट मजा येते. लहान मुले एकमेकाला एखाद्या सिनेमाची स्टोरी सांगताना ऐकावे, ’ अरे तुला माहितीये, त्या हिरोने ना व्हिलनच्या पोटात चाकू खुपसून, अस्सा फिरवून एकदम त्याचा कोथळाच बाहेर काढला रे." हावभावासहित वर्णन करत सहजी एकमेकांशी बोलताना ऐकले की वाटते, या लहान वयातही त्यांच्या नजरा आणि मने संपूर्णपणे या हिंसेला सरावलीत. मने नुसती बोथटच नाही झालीत तर मनाची-संवेदनाशीलतेची व्याख्याच बदलून गेलीये. जन्मापासून सतत ते हेच पाहत आलेत आणि ऐकत-वाचत आलेत आणि फार लवकर प्रॅक्टिकलही झालेत.

एकदा ठाण्यात टीएमटीखाली सायकलवर जाणारा छोटा मुलगा चिरडला गेला होता. त्यावेळी असेच एका मीडिया वाल्याने त्याच्या आई-बापाला विचारले होते. अत्यंत शोकाकुल असलेली ती आई तिरिमिरीत उठली आणि रिपोर्टरला अक्षरशः तिने बदडून काढले होते. बॉम्बस्फोटात मरण पावलेल्याच्या लहान मुलाला, एखादा खून प्रत्यक्ष होताना पाहिलेल्या लहान मुलाला मिडियावाले सर्रास विचारत असतात, " तुम्हारे पिताजी की मौत सें तुम्हे कैसे महसूस हो रहा हैं? तुमने देखा ना उसे मारते हुए, तो बताओ जरा खुलासेसे. पहले क्या हुवा? कैसे उसने मारा? अरे हे काय प्रश्न झाले? तुझ्या बापाच्या चिंधड्या झाल्यात तर तुला कसे वाटेल असे त्यानेच उलट विचारायला हवे. कमीतकमी त्या लहानग्याच्या वयाचा तरी विचार करा रे असले प्रश्न विचारताना.

खरेच का आपली मने मुर्दाड झाली आहेत की आपण हे थांबवू शकत नाही म्हणून केविलवाणी झालीत? नाकर्तेपण का षंढ आकांत……? मला तर आताशा काहीच समजत नाही. ताज हल्ल्यातील शहीदांची नावे आठवू पाहतेय पण जेमतेम दहा-बाराच नावे आठवत आहेत. लाज वाटते स्वत:चीच. खरंच का जीव सगळ्यात स्वस्त झालाय? गेलेल्यांची किंमत शून्य व असलेल्यांची त्याहूनही कमी. आघात सोसून मन बथ्थड झाले आहे. या सगळ्या शहीदांच्या घरच्यांना या श्रद्धांजल्या म्हणजे निव्वळ फार्स वाटत असतील. १९९३ चे सारे बॉम्बस्फोट - त्यातले दोन तर आमच्या समोरच झालेले, ११जुलै, २००६ चे ट्रेनब्लास्टस व २५ जुलैचा पाऊस यात जवळचे लोक गमावलेत. मदतीचा ओघ-आश्वासने सारी तेवढ्यापुरतीच असतात. प्रत्यक्षात फारसे कोणीही फिरकत नाहीच. म्हणजेच या साऱ्या दुर्घटनांचा उपयोग फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी-मी - माझ्या पक्षाने अमुक तमुक करायचे ठरवलेय हे सांगण्यासाठी - हेडलाईनमध्ये राहण्यासाठीच केला जातो हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे. कुठले मन आणि कसली संवेदनशीलता.

मटामध्ये वाचले होते की ताजहल्ल्यातील जखमींना-बळींच्या नातेवाईकांना दिलेले चेक्स बॉउन्स झाले आहेत. अजूनपर्यंत मदत का दिली गेली नाही यासाठी राष्टीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला कारणे दाखवा नोटीसही दिली आहे. पण पुढे काय? कसाबवर मात्र इतका प्रचंड खर्च होतोच आहे. उद्या या शहीदांच्या घरातील एखाद्या लहान मुलाने संतापून एखाद्या नेत्याला मारले तर किती मोठ्ठा बवाळ खडा होईल. अगदी त्या शहीदाला गुंड ठरविण्यापासून वाटेल ते आरोप केले जातील आणि त्या मुलाला मात्र लगेच कडक शिक्षा होईल. वर आजकालची एवढीएवढी मुले किती बेमुर्वत-क्रूर झालीत, संवेदनाशीलताच नाही राहिली असे ताशेरेही ओढले जातील. पण या कृत्यासाठी त्याला प्रवृत्त कोणी केले?

सिग्नलवर, स्टेशनवर सुपात टाकलेली अर्भके पाहिली की जीव कळवळतो पण मी त्यातल्या एकालाही कधीही उचलून घेतलेले नाही. जवळपास मेल्यासारखेच पडलेले ते लेकरू पाहून पाऊल पुढे टाकवत नाही आणि काहीही करताही येत नाही. असे कितीक प्रसंग सारखेच सामोरे येतात परंतु संवेदनशील मनाने कितीही आक्रोश केला तरी डोळ्यावर कातडे ओढून घ्यावे लागते, बथ्थड व्हावे लागते. हे सारे बघवत नाही आणि यावर काही उपाय नाही. स्वत:चेच मन खात राहणारी नुसती पोकळ सहानुभूती.

10 comments:

  1. ताई,
    आपल मन खरच खूपच बोथट झालय. ’ह्या वर्षातल्या विद्यार्थांच्या आत्महत्या’ वर नुसती चर्चा झाली पण आकडेवारीनुसार केवळ जानेवारी महिन्यात ६६ ते ७० आत्महत्या झाल्या आहेत.
    कदाचीत हे बोथट झालेल मन ह्या वाढत्या आत्महत्येला कारणीभूत असू शकेल.

    आपला,
    (खिन्न) अनिकेत वैद्य.

    ReplyDelete
  2. खरय गं तुझं, ’आपलं मन बोथट झालय!!!!’....अगं कालचं विचार करत होते 3 Idiots मधे चमत्काराऐवजीचा ’बलात्कार’ शब्द मुलं किती सहज बोलतात पण जेव्हा खरचं गांभिर्याने विचार केला की किती दाहक वाटतो तो शब्द.............
    बाकि चेक बाउंस होणं....काय बोलावे गं षंढ राज्यकर्ते आणि कसलाही फरक न पडणारी जनता.............मग काय बोलावे!!!

    ReplyDelete
  3. अगदी खरंय़ गं ताजच्या हल्ल्याच्या वेळी मी माझ्या मावसबहीणीबरोबर गाडीत होते. ती दोघं डॉक्टर. चटकन तिचा नवरा म्हणाला आपल्या देशात जीव खूप स्वस्त झालाय.खरंच आहे ते. त्यामुळे मिडियावाले काय किंवा सर्वसामान्य फ़क्त पाहातात. त्यात मीही आलेच...तेच मी माझ्या त्या सार्‍या सव्विसमध्ये मांडायचा प्रयत्न केलाय पण प्रत्यक्षात आपण काही करू शकतो का मला खरंच माहित नाही...

    ReplyDelete
  4. ह्यावर काय बोलावे कळत नाही... मानसिक संवेदना बोथट झाल्यात हे मात्र नक्की..

    ReplyDelete
  5. केवळ जानेवारी महिन्यात ७० आत्महत्या....बापरे!काय चाललेय तरी काय?

    ReplyDelete
  6. तन्वी, काही समजनासेच झालेय. यावर काहीच उपाय नसेल का?

    ReplyDelete
  7. अपर्णा, अग या मिडियावाल्यांना तर उत आलाय अक्षरश:. कधी-कुठे काय बोलावे याचा ताळतंत्रच राहिला नाही.

    ReplyDelete
  8. आनंद, माझीही तीच स्थिती आहे.

    ReplyDelete
  9. विंदांची माझ्या मना बन दगड आठवली ...

    http://ek-kavita.blogspot.com/2007/04/blog-post_23.html

    खरंच जगताच नाही येणार का आपल्याला दगड झाल्याशिवाय?

    ReplyDelete
  10. गौरी, विंदांची ही कविता अप्रतिमच आहे.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !