जाता जाता एक नजर इथेही........

Monday, August 17, 2009

तुझ्याशिवाय.......

धुवाधार बरसणाऱ्या पावसात, माझ्या ओढणीच्या आडोशाला न जुमानता.....
ओलेचिंब भिजलो अनेकदा आपण......
तरीही कसे कोण जाणे, आपल्या मनांना कोरडेच ठेवलेस तू.
म्हणायला असायचास रे माझ्याजवळ......
अगदी चिकटून.... एका पांघरुणात पण त्या कुशीवर...... तुझ्या मनाला आजकाल स्पर्शात उतरवणे बंद करून टाकले आहेस तू.
माझे अविरत पाझरणारे अश्रूही दिसत नाहीत तुला.... का?
तूच म्हणायचास ना, उपेक्षा ही दाहक असते..... जाळत राहते, मग
मग, मला अशी तरसत ठेवून इतका शांत, निवांत झोपी कसा जातोस तू?
उन्हातलं चांदणं मनमुराद वेचणारे आपण, आजकाल चांदण्यातही असे पोळतोय.....
मी अस्वस्थ आहे पाहून जवळ घेतलं होतंस मला..... आठवतंय ना,
का तेही आता विस्मरणात गेलंय?
माझ्या एकटेपणावर तुझ्यामुळे मात करायला शिकले होते रे.......आज,
आज पुन्हा फिरून त्याच वाटेवर... तूच आणून सोडावंस.....
किती तरी अनोळखी आपलेसे झाले पण तुझ्या कुशीत असूनही अनेकदा मी परकीच राहिले.......आणि,
आणि, मला जे हवं होतं ते तुला कळूनही तुझ्या मनातच राहिलं.... का?
मी आहे तुझे सत्य, माहीत आहे तुला..... एकवारच देऊन जा ते तुझ्या ओठातले शब्द.......
स्वतःला उगा असे फसवू नकोस.... त्या अलवार भावनेला तू असे लपवू नकोस....
तुझा जीव आहे माझ्यावर हे जाणून आहे मी....... पण तेवढं पुरेसं असतं का जगायला?
एक अधुरं तडफडणारं मन आहे त्याचं काय...... एवढही समजत नाही तुला? तरीही.....
तुझ्यामाझ्यातले हे अदृश्य पटल..... त्यात धूसर होत चाललेला तू.....
किमान माझ्या मनातला संभ्रम तरी दूर करून जाशील?
किनाऱ्यावर झेपावणाऱ्या भरतीच्या लाटेसारखे सुखात निथळून टाकले होतेस.....
तेव्हा हेही सांगायचेस ना, जाणीवपूर्वक चिंब भिजून सुख भिनवून घे अंगभर.....
माझा मलाच भरवसा नाही तिथे मी तुझा-तुझ्यापाशी असणार नाही.......
वरचेवर म्हणालास, कधीतरी तरी काहीतरी माग गं....... किमान,
किमान, मी तुला काही दिले होते या आठवणीसाठी तरी माग.....
मी न मागताही तू इतकं दिलंस की आता मागण्यासारखं काही उरलंच नाही....... तुझ्याशिवाय.

13 comments:

 1. मालतिनंदनAugust 17, 2009 at 9:14 PM

  मस्त!!
  माझी प्रतिक्रिया-

  मन हे असंच
  कधी कधी कुंद होतं
  हव्या हव्याशा
  वेदनांनी धुंद होतं
  त्या तरंगावर डोलत
  जणू मृद्‍गंध होतं

  ReplyDelete
 2. मी न मागताही तू इतकं दिलंस की आता मागण्यासारखं काही उरलंच नाही....... तुझ्याशिवाय.
  hi ol aavadali!!

  ReplyDelete
 3. सुंदर !!!

  "आभास चांदण्यांचा" या गीताच्या सुरुवातीच्या स्वगताची आठवण झाली...

  ReplyDelete
 4. अरुणदादा, तुझी प्रतिक्रिया अप्रतिम आहे. अनेक आभार.

  मुग्धा, सतीश, अनिकेत धन्यवाद.

  ReplyDelete
 5. भानस,
  कित्ती सुंदर....आणि हुरहूर लावणारं....कसं सुचत तुला?
  सगळं असूनही काहीच नसल्यासारखं हे रितेपण किती नेमकेपणाने व्यक्त केलंयस तू!

  ReplyDelete
 6. धन्यवाद सई.

  nimisha, आहेस कुठे तू? तुझी प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटलं.:)आभार.

  ReplyDelete
 7. Wa mastach gadya kee kawita he na samajoonhee hrudya. Surekh.

  ReplyDelete
 8. महेंद्र, आशाताई प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 9. खूप सुंदर लिहिलय. आवडल.

  'मी न मागताही तू इतकं दिलंस की आता मागण्यासारखं काही उरलंच नाही....... तुझ्याशिवाय.'

  या ओळी खूप आवडल्या.

  ReplyDelete
 10. धन्यवाद अपर्णा.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !