आज सकाळी आवरून नेहमीप्रमाणे नवरा ऑफिसला निघाला तोच शेजाऱ्याने हटकले. नवऱ्याने हाय केले, कसा आहेस? असे विचारताच तो म्हणाला, " माझी गाडी काल रात्रीतून चोराने उघडली आहे. तुमची गाडी माझ्या गाडीशेजारीच लावलेली आहे तेव्हा पाहा जरा सगळे काही नीट आहे ना? " मी दारात उभे राहून हे संभाषण ऐकत होते. क्षणभर ठोकाच चुकला. " अरे देवा! हे काय घडतेय? " तोच नवऱ्याने हाक मारून गाडीची किल्ली दे गं म्हटले. मी किल्ली दिली. मनात विचार भरभर धावत होतेच, काय काय होते गाडीत? सध्या लेक व त्याचा मित्र आल्यामुळे ही गाडी तो चालवतोय. लेटेस्ट जीपीएस सिस्टिम होती. कदाचित त्याचा आयफोनही गाडीत असू शकेल. ( पोरं कुठेही काहीही ठेवतात... ) गाडी मध्ये शक्यतो काहीही ठेवायचे नाही ही शिस्त आम्ही दोघांनी पहिल्यापासून पाळली आहे. दररोज जीपीएस घरात आणतोच. नेमके लेक आल्याने तो कुठे चुकू नये म्हणून त्याला दिलेले, अन त्याने नक्की घरात आणलेले नव्हते. तोवर नवऱ्याने गाडी उघडली, पाहिले तर समोर जीपीएस दिसेना. दोन्ही पोरे झोपलेली. तोच नवरा म्हणाला, " आहे गं, ड्रॉवरमध्ये ठेवला होता त्याने. नशीब तेवढे तरी केले होते. नाहीतर नक्की गेलेच असते. आता तरी ठेव घरात. " असे म्हणत, माझ्या हातात ठेवले व शेजाऱ्याकडे वळला. बरे झाले तू सांगितलेस असे म्हणून त्याचे आभार मानून त्याला धीर देऊन नवरा ऑफिसला गेला.
शेजाऱ्याला हेलो करत विचारले की तुझे काही मौल्यवान सामान तर नव्हते ना गाडीत? दुर्दैव, त्याचे बरेच नुकसान झाले होते. एकतर त्याने गाडीत रोख रक्कम ठेवली होती. गाडीत कशाला बरे ठेवायची? घरात ठेवली असती तर... पण कदाचित तो विसरला असेल किंवा गाडीत जास्त सुरक्षित आहे असे वाटले असेल.... शिवाय काही घरातले सामान होते - हल्लीच तो इथे राहायला आलाय-अजून घर लावतोय . पोलिसांना फोन केलास का? असे विचारले तर त्याने नुसतेच खांदे उडवले. मी जास्त काही प्रश्न न विचारता ( आधीच तो त्रासलेला ) त्याला धीर देऊन घरात वळले. मनात मात्र धस्स झाले आहे.
इथे आलो ( दहा वर्षांपूर्वी ) तेव्हापासून सुदैवाने चोरी प्रकार फारसा ऐकीवात आला नव्हता. जुन्या गावात तर अनेकदा मी स्वतःही मागच्या दाराने ( लॉक न लावता - निव्वळ मूर्खपणा, कितीही सुरक्षित असले तरीही असे वागू नये. काळजी घ्यायलाच हवी नाहीतर मोठा फटका बसू शकतो. ) जवळच असलेल्या बागेमध्ये चालण्यासाठी जात असे. जितके वेळा मायदेशात आलो - किंवा इथेच फिरायला गेलो तितके वेळा घराच्या आवारात अनेक गोष्टी तश्याच ठेवून आलो. डेकवर पॅटिओ सेट, बारबेक्यू ग्रिल, सायकल, कुंड्या, घराच्या दर्शनी भागात - पोर्च मध्ये छानसे टेबल-खुर्च्या, बेंच, आवारात बागकामाचे साहित्य, अनेकविध गोष्टी पण कधीही काहीही जागचे हाललेही नाही. सगळेच दिवसभर ऑफिसात - मुले शाळेत, अनेकदा लोक मुख्य दरवाजा नुसताच ओढून घेऊन जात. एकदा तर आमच्या ओळखीची फॅमिली फिरायला म्हणून शिकागोला गेले. नेहमीप्रमाणे आवरून निघेतो उशीर झालेलाच, घाईघाईत दार लावायचेच विसरले. त्यांच्या आजूबाजूलाच आम्ही पाचसहा भारतीय राहत होतो. आमची मुले खेळत होती, त्यांच्या मुलांना बोलवायला गेली तर काय घरात कोणीच नाही. आली सांगत घर उघडे आहे व घरात कोणीच नाहीये म्हणून. हे कळेतो पाच-सहा तास गेले होते परंतु सारे काही सुरक्षित होते. अगदी क्वचित कधीतरी भुरट्या चोऱ्या त्याही विशेषतः मुलांच्या सायकली चोरीला गेल्याचे ऐकू येई, बास.
सध्या आम्ही राहतो तो भाग शांत व सुरक्षित समजला जातो. गेल्या वर्षी असेच समर मध्येच मुलांच्या सायकली चोरील्या गेल्याचे एकले होते पण मग पोलिसांनी कम्युनिटीची एक सभा घेतली, थोडी गस्त वाढवली - बरेचदा आमच्या ह्या भल्या मोठ्या कॉंप्लेक्स मध्ये पोलिस फिरताना दिसत. त्यानंतर पुन्हा अनुचित प्रकार घडल्याचे ऐकायला मिळाले नव्हते. तोच आज पुन्हा ही घटना घडली. ह्या जागतिक मंदीने फार भयावह दिवस आणलेत. आधीच मिशिगन ची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. एकेकाळी प्रसिद्ध असलेले हे मोटॉउन अगदी बरबाद झालेय. तीनही मोठ्या मोटार कंपन्यांनी जाहीर केलेली दिवाळखोरी, प्रचंड नोकर कपात याने वाढती बेकारी. चोरीमारी-गुन्हेगारीकरीता पूर्वीपासूनच बऱ्यापैकी बदनाम असलेले हे राज्य आता आणिक किती दुर्दैव झेलणार आहे कोण जाणे. आज नकळत मनात भीतीने शिरकाव केला आहे.
eka bajula economy sudharatey ase mhanatahet..eka bajula job cuts, chorya vadhatat..
ReplyDeleteChakali
लवकर अर्थव्यवस्था सुधारेल, लोकांना रोजगार मिळेल - कोणालाही चोरीमारी करायची(२/३% लोक चोरी हाच पेशा बनवून तसे वागत असतील ) हौस असत नाहीच ना.
ReplyDeleteआभार गं वैदेही.
ya
ReplyDeleteHarekrishnaji, :)
ReplyDeleteमाझा अनुभव
ReplyDeleteकांही वर्षंपूर्वी मी आखातात दोहा-कतार या देशी होतो.एकदा तेथील स्थानिक सिनेमागृहात रात्री सिनेमा पहायला गेलो. तिथे माझे पैशाचे पाकीट मागच्या खिशातून निसटून कधी पडले ते समजलेच नाही. घरी आल्यावर लक्षांत आले.पाकिटात महिन्याच्या खर्चाचे पैसे, पत्नी-मुलांचे फोटो आणि इतर चिल्लर चिठोर्या इतका ऐवज. मन हळ्हळले. दुसरे दिवशी कामावर गेल्यावर सहकार्यांना सांगितले.सगळ्यांनी सांगितले,झाले ते झाले, गप्प बैस, फार वाच्यता करू नकोस, गोत्यात येशील.
दुपारी कंपनीच्या कार्यालयावर पोलिसांची गाडी आली.माझ्या नांवाची चौक्शी करून दोन पोलिस (शुर्ता)माझ्यापाशी आले. मी रात्री कुठे गेलो होतो म्हणून दरडावून विचारू लागले. मी गर्भगळित. माझी अवस्था पाहून ते दोघेही हसूं लागले. एकाने बाहेर जाऊन गाडीतून एक सीलबंद मोठा लखोटा आणला. त्यात माझे हरवलेले पाकीट होते. त्यातील ऐवजाची मी खातरजमा केल्या नंतर माझी सही घेऊन त्यांनी ते मला परत केले.हे कसें झाले? तर रात्री सिनेमागृहाच्या कर्मचार्यांनी ते जवळच्या पोलिस ठाण्यात जमा केले, पाकिटतील माझ्या पे-स्लीप वरून पोलिसांनी माझा मार्ग काढला आणि माझी अमानत मला सुपूर्त केली.
है के नै मज्जा :)
अरुणदादा, किती हायसे वाटले असेल ना तुला त्यावेळी. ह्म्म, असे अनुभव मीही घेतलेत, हल्ली मात्र भिती वाटू लागलीये.
ReplyDelete