जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, August 5, 2009

कायदेमे रहेंगे तो फायदेमे रहेंगेहा फलक वाचलात? अश्या प्रकारचे फलक आपण कितीक कॉलनीज/सोसायट्यांमध्ये पाहतोच आहोत. फलक मग तो कुठलाही असो त्यावरचे लिहिलेले धोरण हे फक्त सरकारी फिती प्रमाणे अक्षरांमध्येच सामावलेले असते. प्रत्यक्षात दिया तले अंधार म्हणतात ना तेच चालू. मी जेव्हा हे इतके नियम वाचले तेव्हा वाटले, " अरे वा! एकदम सही. सगळ्यांचा विचार करून जर प्रत्येक रहिवाशाने वागले तर ’ कायदेमे रहेंगे तो फायदेमे रहेंगे ’ शेवटचे वाक्य खरे होईलच. " मनोमन हा फलक लिहिणाऱ्याला शाबासकीही दिली.

या सोसायटीत नातेवाईक राहत असल्याने चार दिवस राहण्याचा योग आला. फलकाचा किती परिणाम आहे ते पाहण्याची जिज्ञासा जागली. म्हणतात ना नको ते उद्योग तशातला प्रकार. गॅलरीत उभे राहून दररोज निरीक्षण करत होते..... ह्म्म, पटले अगदी तंतोतंत पटले. कुठलाही नियम हा मोडण्यासाठीच असतो. किंबहुना नियम केलाय म्हणूनच तो मोडण्याची खुमखुमी येते.

दोन बिल्डिंग्जची मिळून बनलेली ही सोसायटी. सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत फेरीवाले, भंगारवाले, भाजीवाले, विक्रेते( सेल्समन्स-गर्ल्स) यांचा मनसोक्त राबता सुरू असे. कुठल्याही वेळेला बेल वाजे, पाहावे तर कोणी उदबत्ती विकायला आलेय तर कोणी सर्व्हे करायला. दुपार नाही पाहत का सकाळची धांदलीची वेळ. बरं दार न उघडावे तर पठ्ठे बेल वरचा हातही काढत नाहीत. एकाला विचारले ," काय रे, तो फलक दिसला नाही का तुला? पहिलेच वाक्य आहे ना....मग? तरीही तू कसा आलास?" त्याच्या चेहऱ्यावर काय वेड्य़ासारखे विचारतेय असा भाव, " ताई, कशाला रागावताय? अहो, सोसायटीतलेच तर हाकारून बोलावतात म्हणून येतो ना आम्ही. आणि तुमचा वॉचमन सोडतो ना आत- तो बोर्ड त्याला तर चोवीस तास दिसतो समोर. " माझी बोलती बंद.

कुत्र्यांनी तर उच्छाद मांडलाय. झूंडशाही प्रकार त्यांनी इतका अवलंबलाय की खरेच भिती वाटते बाहेर पडायची. सगळीकडे शांतता नांदत असते, आपण बाहेर पडावे अन जेमतेम दहा पावले चालावे तर दोन-चार श्वान कुठुनसे लसलस करत येतात. सारेच रोगीष्ट शिवाय एकमेकांशी हाणामाऱ्या करून झालेल्या मोठ्या जखमां त्यावर माशा अन काही बारीक किडे..... त्यांचे विचकलेले लचका तोडू पाहणारे मोठाले दात.... वाटते त्या क्षणाला हृदय बंदच पडेल. या फलकावरचा एकमेव खरा सल्ला. सावधान सावधान दिवस अन रात्र दोन्हीही कुत्र्यांचे आहेत तेव्हा हे सभासदांनो सजग राहा.

सभासदांनाच वाहने पार्क करायला जागा नाही ( घरटी एक तरी गाडी आहेच हो, शिवाय दुचाक्यांचा पाऊस पडलाय) अशी अवस्था असूनही पाहावे तेव्हा सुमो, ट्वेरा, कॉलीस यांचा अव्याहत राबता होता. रात्रीबेरात्रीही जोरात आवाज करत वाहने येत-जात. दोन-तीन दिवस हे पाहून विचारले तेव्हा कळले की ज्याने फलक लावलाय त्याचा वाहने विकायचा व भाड्याने द्यायचा धंदा आहे आणि त्याला असे करू नको म्हणायची कोणात ताकद नाही. परिणाम खुद्द सोसायटीतले अनेक जण रस्त्यावर गाड्या पार्क करत होते. मध्यरात्रीही गेट उघडण्यासाठी जोरजोरात हॉर्न वाजे मग वॉचमन गाढ झोपेतून उठून गेट उघडेस्तोवर संपूर्ण रहिवाश्यांच्या झोपेचे खोबरे होउन जाई. थोडक्यात फलकातले चार नियम तिथेच कोलमडले.

वर काय तर नियम भंग करण्यावर .......... त्याचेही बरोबरच आहे म्हणा लिहिलेले नियम हे इतरांसाठी होते ना. जणू शेवटच्या नियमाने तो हेच सांगत होता-- माझ्या कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. सॉलीड धोरणी.

1 comment:

  1. Kaydemai Rahenge to faydemai Rahenge.....:D Sahi aahe. Baki niyam modnyasathich astaat nahi ka?

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !