प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनांचा उल्लेख कालच्या पोस्टमध्ये आला आणि अनेक घटना डोळ्यासमोर आल्या. कुठल्याही संबंधांच्या अबाधित राहण्याच्या मुळाशी जर ' प्रेम ' असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीतही ते रुजते, वाढते, टिकते.... खंबीरपणे स्वतःचे विश्व तयार करते. प्रेम विवाह हा आज आपल्या समाजात बराचसा रुळतो आहे. काळानुरूप विरोधाची धार सर्वसाधारणपणे किंचितशी कमी झालीये. किमान केवळ विरोधासाठी विरोध ही प्रवृत्ती मावळत चालली आहे. मान-अपमान, उच्चनीच, जातपात भेदाभेदही कमी होऊ लागलेत. दोन्ही बाजूने तडकाफडकी एक घाव दोन तुकडे असे न घडता मुलाची/मुलीची बाजू निदान ऐकून घेतली जाते. त्यावर विचार केला जातो. कधी आनंदाने तर कधी एवीतेवी पण ते लग्न करणारच आहेत त्यापेक्षा आपण पुढे होऊन करून देऊयात हा दृष्टिकोनही घेतला जातो. तर कधी, त्यांनी परस्पर जमवलेय ना मग जे काही पुढे घडेल त्याला तेच जबाबदार. असे म्हणून स्पष्ट जाणीव करून देऊन लग्न लागले जाते. पण ही झाली मुलामुलीच्या घरच्यांची मानसिक बाजू.
प्रत्यक्षात मुलगा व मुलगी यांनी किती सखोल विचार केला आहे यावर प्रेमविवाहाचे संपूर्ण यश - आयुष्य अवलंबून असते. प्रेम होणे हे सहज आहे. अगदी पाचवीपासून आमचे प्रेम होते असे म्हणणारेही मित्र-मैत्रिणी पाहिलेत. पुढे मात्र ते वेगळ्या प्रेमात गुंतलेले सापडलेत. मग त्या आधीच्या प्रेमात खरेपणा नसतो का? असतो ना-तेवढ्यापुरता. पण मग शेंबूड धड पुसता येत नाही की मेली चड्डीची नाडीही अजून नीट बांधता येत नाही. पाहावे तेव्हां गाठ बसतेय. ती गाठ आधी सोडवायला शिका. प्रेमं करता आहेत. हे ऐकत खाल्लेले धपाटे. मग सोडलेला तात्पुरता नाद. की पुढच्या वर्गात गेले की पुन्हा नव्याने झालेला प्रेमाचा साक्षात्कार. असे करता करता ते एका मुलीपुरते/मुलापुरते न राहता वारंवार होत राहते व वारंवार तुटत राहते. पुढे हे अंगवळणी पडते. अनेकदा शाळा-कॉलेजमध्ये इतर मित्र-मैत्रिणी उगाचच दोन जणांची नांवे एकत्र जोडून टाकतात. त्या बिचाऱ्या दोघांच्या मनात कधीही हा विचार आलेला नसतो. येता जाता सारखी केलेली चेष्टा, विचारणा इतकी अती होते की त्या दोघांनाही वाटू लागते की आपण प्रेमात पडलोयं- खरे तर पाडलो गेलोयं. पण हा आभास फार काळ टिकत नाही. आणि नाही तेच बरे आहे. मात्र कधी कधी या लादलेल्या प्रेमाची परिणिती फार दुःखदायक होते. मित्र मैत्रिणी नामानिराळे होतात अन भोगावे लागते यातील कमकुवत जीवाला.
लहानपण चाळीत गेल्यामुळे अठरापगड जातींचे लोक एकत्र नांदताना पाहत होतो. त्यात प्रेम जमणे व नंतर ते मोडणे/मोडले जाणे/मारले जाणे या म च्या बाराखडीतील सगळे हातखंडे त्यातली भीषण दाहकता व दर्शनी सौम्य-प्रेमळ दिसणाऱ्या माणसांच्या मनातील जळजळ अतिशय जवळून अनुभवली. माझा व्यक्तिशः काडीचाही संबंध नसला तरीही प्रत्येक घटनेत माझाच बळी जातोय इतके खोलवर आघात झाले. एके दिवशी पहाटे आमची सगळी चाळ खडबडून जागी झाली ती एका घरातील माउलीच्या हंबरडा फोडण्याने. त्यांची सतरा वर्षांची तरणीताठी लेक एकाएकी गेली होती. काय झाले हो अचानक? काल तर चांगली होती. असे आजूबाजूचे लोक बोलत होते तोच पोलीस आले. मग कळले की तिचे ओठ, अंग काळेनिळे झाले होते. मग चर्चा-तर्कवितर्कांना उत आला. घरी कळले हो तिचे प्रकरण. मग काय बाप व भावाने पाजले काहीतरी. कसे हो उलट्या काळजाचे लोक हे. शेवटपर्यंत कोणालाही सत्य कळले नाही आणि पोलिसांनी कोणालाही पकडून नेल्याचे पाहिले नाही. तो जो कोण मुलगा होता तो ही कधीही आला नाही. हसतीखेळती एक मुलगी अचानक गायब झाली. कोणाचे काय गेले हो तिच्याव्यतिरिक्त?
एक घर असे होते की जिथे मेरा भारत महान- हम सब एक हैं ही संकल्पना त्यांनी अगदी मनापासून राबविली होती. दक्षिणी, मुसलमान, पंजाबी, सिंधी व गुजराती असे सगळे एकमेकांबरोबर नांदत होते. मग ओघाने जोरदार हाणामाऱ्या येणारच. बरे हे सगळे चाळीतलेच. म्हणजे एकाच घरात इतक्या विविध प्रांतीय सुना-जावई आलेले. जेव्हां हा येण्याचा प्रोसेस चालू असे तेव्हां अगदी पळून जाण्यापासून ते जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत सगळे प्रकार घडत. एकदा तर मुलीकडच्यांनी मुलालाच पळवून नेले व आठवडाभर डांबून ठेवले. पोलिस आणि घरचे शोधून शोधून थकले पण पत्ता लागला नाही. गंमत म्हणजे मुलगी घरातच असून तिलाही कळले नाही की आपल्याच लोकांनी त्याला पळवलेय.
हा तिढा सुटला तीही गंमतच झाली. ती मुलगी खरेच शूर होती. एक दिवस मध्यरात्री ती सरळ पहिल्या मजल्यावरील स्वतःच्या घरातून उठली आणि तिसऱ्या मजल्यावरील मुलाच्या घरी आली व म्हणाली आता मी इथेच राहणार. सगळे गडबडले. अरे जिथे मुलाचा पत्ताच नाही, अजून लग्नही झालेले नाही आणि ही म्हणते मी काही घरी परत जाणार नाही. मग त्यादिवशी दिवसभर पहिला मजला ते तिसरा मजला पकडापकडी सुरू होती. पण ही बया हटली नाही. मला जबरीने नेलेत तर चौकात उडी मारून टाकेन असे म्हणत चक्क मोरीवर चढलीही. मग मात्र कसे कोण जाणे पण तिच्या वडिलांनी तू आजपासून आम्हाला मेलीस असे म्हणून माघार घेतली व थोड्यावेळाने मुलगा परत आला. दोन दिवसात लग्नही लागले. या घराचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा लग्न झाले की पुन्हा हाणामाऱ्या होत नसत. काही काळाने सगळ्या सुनांच्या माहेरचे लोकही येजा करू लागत. एकदा का लेकुरवाळ्या झाल्या की मग तर प्रेमाला पूर येत असे. पण लग्नाआधीचा विरोध मात्र भयंकर होता.
प्रेम विवाहात मुलगा व मुलगी दोघांनीही तितकेच खंबीर असणे व एकमेकांसाठी संपूर्ण जगाशी टक्कर घेण्याची मानसिक तयारी ठेवणे या दोन्ही बाबींना अनन्य साधारण महत्त्व आहे. अन्यथा प्रेम करूच नये. जे निभावण्याची ताकद नाही ते केवळ मजा किंवा नाईलाज आहे माझा या सदराखाली संपणार असेल ते करण्याचा षंढपणा ( दोघांनीही ) बिलकुल करू नये. परंतु अनेकदा हे घडताना आपण पाहतोच.
कॉलेजमध्ये एक मैत्रीण होती, तिचे आडनाव लेले होते. एकारान्ती कोकणस्थ. गिरगावात राहायची. घरचे वातावरण खूप कडक शिस्तीचे होते. कसे कोण जाणे पण ती त्यांच्याच बिल्डिंगमधल्या एकांच्या घरी येणाऱ्या मुसलमान मित्राच्या प्रेमात पडली. तो कुर्ल्याला राहत होता. मुलगा चांगला होता. तेव्हां तो सीए करत होता. आजही मला आठवतेय या प्रकरणामुळे आम्हीच घाबरून गेलो होतो. एकदम मुसलमान म्हणजे फारच धाडस होते. शिवाय त्याच्या घरी जाऊन तिच्या नशिबी काय वाढून ठेवलेले असेल हा प्रश्न आमची सगळ्यांची झोप उडवीत होता. आम्हाला तरी काय कळत होते फारसे पण इतके टोकाचे लग्न करू नये असेच मन म्हणत होते. शेवटी एकदा तिच्या घरी कळलेच. मग मोठे महाभारत झाले. मारले काय, कोंडून घातले. मामाकडे गावाला पाठवून दिले. मुलाच्या घरातूनही प्रचंड विरोध होता. म्हणजे जर लग्नानंतर त्याने घरच्यांच्या दबावाला बळी पडून हिची साथ सोडली अथवा ’ तलाक तलाक तलाक ’ म्हणून हिला सोडूनच दिले वा अजून दोन लग्ने केली तर हिचे काय होणार? अम्मीजान व अब्बूजान बहोत अच्छे हैं असे तो नेहमी म्हणे पण ते तर हिला घरात घ्यायलाही तयार नव्हते. इतके मोठे रामायण होऊनही हे दोघे डगमगले नाहीत. एक दिवस दोघेही आपापल्या घरातून पळून गेले आणि रजिस्टर लग्न करून मोकळे झाले. दोघेही पुन्हा कधीच आपल्या घरी गेले नाहीत व त्यांच्या घरच्यांनीही कधीही संपर्क साधला नाही. होता होता माझा संपर्क कमी झाला व कालांतराने तुटलाच. आशा आहे हे दोघे आजही बरोबर असतील.
ऑफिसमध्ये नुकतेच लागले होते. शेजारीच बसणारा स्नेही जागेवर नसताना त्याच्या बायकोचा फोन आला. मी निरोप घेतला व नंतर तो आल्यावर त्याला सांगितले. तो पटकन म्हणाला की तिचे दीक्षित आडनाव ऐकून तू गोंधळली असशील ना. मी नुसतेच स्मित केले. त्याचे आडनाव पगारे, शेड्यूल कास्ट आणि ती ब्राम्हण. मग त्याने सगळी हकीकत सांगितली. या लग्नाला दोन्ही बाजूने अतिरेक विरोध झाला होता. स्वतः हा माझा स्नेहीही थोडा साशंक झालेला. आपले आई-वडील, घरातील माणसे, चालीरीती, समाज यात कसे निभणार हिचे. माझ्यामुळे तिला फार भोगावे लागेल. तिला माझ्या घरी यायचे आहे म्हणजे रोजच्या घटनांना तिलाच तोंड द्यावे लागणार. तिच्या घरी मी कधीच जाणार नसल्याने मला काहीही सोसावे लागणार नाही. या जाणीवेने मी मागेच सरकत होतो. ज्या प्रेमामुळे माझ्या प्रेमालाच त्रास होणार आहे ते प्रेम म्हणायचे की ते करणे हा स्वार्थ आहे ही भावना वाढू लागली होती. पण शालिनीने कधीही माघार घेतली नाही. तिला खूप त्रास झाला पण तिने सोसला. आणि मी तिची साथ कधीही सोडली नाही. आज अतिशय सुखाने आम्ही संसार करतो आहोत आणि याचे पाऊण श्रेय तिलाच जाते.
अशीच अजून एक सखी होती. ती मराठा. प्रेम जमले ब्राम्हण मुलाबरोबर. दोघेही आमच्याच ऑफिसमधले. नोकरी करणारे असल्याने खरे तर त्यांना तशी पैशाची अडचण नव्हती. पण त्या दोघांना घरच्यांना मनवूनच लग्न करायचे होते. दोन्ही बाजूने भयंकर विरोध . सगळेजण सांगत होते की तुम्ही लग्न करून टाका. मग कालांतराने घरचे निवळतील. हे दोघेही हट्टाला पेटलेले. दोन वर्षे दोघेही झगडत होते घरच्यांशी. घरच्यांनी सहा महिने तुम्ही एकमेकांशी बोलायचे नाही, भेटायचे नाही अशी अगदी सिनेमा स्टाइल अट घातली होती त्यालाही पुरे पडले. शेवटी जिंकले. दोन्ही बाजूंनी मोठा गोतावळा येऊन समारंभ करूनच लग्न केले. हे सगळे ते दोघे ठाम होते म्हणूनच साधले. नाहीतर.....
हे पाहिले आणि वाटले खरेच हिंमत हवी व तितकाच विश्वास हवा. जात पात, कूळ, उच्चनीच वगैरे मी कधीच मानत नव्हते आजही मानत नाही. परंतु अशी लग्ने करताना जे मुद्दे विचारात घ्यायला हवेत तेच मुद्दे नेमके दुर्लक्षिले जातात. अरे जिथे देशस्थ कोकणस्थ यातही राहणीमान-खाणेपिणे-वागणे, विचारसरणीत तफावत दिसते व त्याचा प्रसंगी त्रासही होतो तिथे एकदम मुसलमान, पंजाबी व आपल्यातच एकदम दोन टोकाची लग्ने करणे व ती निभावणे फार कठीण आहे. एकदा लग्न केले की झाले असे नसते ना. ती तर सुरवात आहे. तासभर बरोबर राहणे, एकमेकाला आवडेल तेच बोलणे, वागणे आणि कायमचे बरोबर राहणे तेही सगळ्या विरोधाला तोंड देत सोपे नाही. आजच्या शहरातील जीवनमानावर किंवा आधुनिकीकरणामुळे झालेल्या बदलांवर जाऊ नका. हे बदल फार मोजक्या मूठभर लोकांत झालेत. त्यांच्यातही अंतर्गत घोळ असतातच. वरकरणी तरी आनंदाने स्वीकारलेले दिसून आले तरी येताजाता उद्धार होत असतात. पण एकंदर समाजात अजूनही फारशी मानसिकता बदललेली नाही. गावाकडे तर फार धार दिसून येते. काही गावांमध्ये प्रेमविवाहाला मान्यताच नाही. कोणी केल्यास चक्क मुडदे पाडले जातात. घरेच्या घरे संपविली जातात. गाव असो शहर असो आजही मुलींना मारहाण करणारे व प्रसंगी जीवे मारणारे लोक आहेतच.
कोणाच्याही प्रेमात पडण्यापूर्वी स्वतःला तपासा. आपली क्षमता पारखा. प्रेमात पडणे सोपे पण निभावणे कठीण हे अनेकदा ऐकलेले असते. त्यात काय मोठेसे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष होता नये. मुलगा असो वा मुलगी कोणीही एकमेकाला त्या त्या वेळेपुरते/गरजेपुरते वापरू नये. टाईमपास म्हणून प्रेम करू नये. हा खेळ अंगाशीही येऊ शकतो. एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. मानसिक पंगुत्व येऊ शकते. देवदास म्हटले किंवा मजनू म्हटले की आपण सगळे हसतो. काय वेडा आहे म्हणतो परंतु ह्यामागे किती दारुण पराभव दडलेला आहे तो दिसला की मन विषण्ण होते. एखादे उमदे जीवन अकाली संपू शकते. असे दुसऱ्याचे जीवन बरबाद करण्याचा हक्क कोणालाच नाही. म्हणून मुळातच स्वतःला विचारायला हवे मी खरेच का प्रेमात पडलोय? आणि उत्तर हो आले तर वाटेल ते घडले तरी मी ते निभावणारच. प्रसंगी घरच्यांची साथ सोडावी लागली तरी. पण माझ्या प्रियकराला/ प्रेमिकेला दगा देणार नाही. लग्नानंतरही पाठीशी ठाम उभा राहीनच. मग कोणीही तुमचे भावविश्व रौंदू शकणार नाही.
खरंय आजकाल तर तसा प्रेमाला इतका टोकाचा विरोध करणारे आई-बाप पण नाहीयेत मला वाटतं...(काही अपवाद वगळता) पण असं एकंदरीत पाहाणं आहे की प्रेमाचा बहर लग्नानंतर ओसरतो आणि मग गोष्टी एकदम दुसर्या टोकाला जातात...तसं होऊन आयुष्याचं नुकसान होऊ नये म्हणून तरी प्रेम तपासणं आवश्यक झालंय...
ReplyDeleteअपर्णा असे मलाही वाटते परंतु आपण आपल्या आजूबाजूस घडणारे/माहीतीतल्या घरात घडलेल्या घटना पाहतो. त्या फारशा प्रखर टोकाच्या नसतात गं. मात्र परिस्थिती सगळीकडे इतकी सहज नाहीये.मी सगळ्या पॊझिटीव्ह घटनाच नमूद केल्यात एक वगळता. पण प्रत्यक्षात खूप दुखद परिणाम पाहिलेत. काही वेळा विरोधाचे चांगले फळही बघायला मिळालेय. म्हणूनच प्रेम समजणे व स्वत:शीच त्याची सत्यता पडताळणे फार फार आवश्यक आहे असे वाटतेय.
ReplyDeleteसगळेच्या सगळे मुद्दे कव्हर केलेस...काय लिहू? मी आणि अमित देशस्थ यजूर्वेदी ब्राम्हण..दोघे शिकलेले, नौकरी करणारे....तरिही विरोध होता आता बोल!!!
ReplyDeleteतन्वी, तेच तर ना...आता याला केवळ विरोध करायचाच असे ठरवून केलेला विरोधच म्हणावा लागेल ना. आणि अशात जर लग्नानंतर नवरा-बायकोत बेबनाव होऊ लागला तर मग भयावहच ना गं.
ReplyDeleteप्रेम विवाह म्हणजे काहीतरी भयंकर अस कुठतरी लोकांना वाटत असाव. म्हणुनच लोक अगदी एका जातीतले दोघे असले तरी विरोध करतात. हे बाकी मान्य की आतरजातीय प्रेम विवाह असला तर दोघे ही खंबीर हवेत. विरोध हा समाजाला घाबरुन होत असतो.
ReplyDelete-अजय
अजय अनेकदा समाजापेक्षाही आमच्या घरात हे चालायचे नाही या धोरणामुळे कडवा विरोधही केलेला पाहावयास मिळतो.:( आणि तू म्हटलेस तसे प्रेमविवाह सफल होत नाहीत ही भीती म्हणा अढी म्हणा अनेकदा मनात असते.
ReplyDeleteअगदी खरय...प्रेम आधि स्वत:च पडताळुन बघायला हवे. दोघांचाही एकेमेकांवर आणि त्यांच्यातल्या प्रेमावर डोळस विश्वास असला आणि पुरेपुर आत्मविश्वास असला की कुणाही एकाला केलेल्या प्रेमाचे वाईट परीणाम भोगावे लागत नाहित. माझ्या शाळेत माझ्याच वर्गात 5 वी ते 10 वी एक मुलगा आणि एक मुलगी आमचे एकमेकांवर प्रेम आहे म्हणायचे. मुलगी मरठी आणि मुलगा उत्तर भारतीय. शाळेत शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी खुप समजवले. आधि शालेय शिक्षण होऊ द्या पुढे काय करीअर करायचे ते ठरवा आणि मग हे प्रेम वगैरे सुरु राहु देत. सद्ध्या अभ्यासावर लक्ष द्या. पण त्या दोघांनीही ऐकले नाही. त्यांना शाळेतुन काढुन टाकण्याची धमकी दिली. हे सर्व प्रकरण दोघांच्याही घरी पोचले. झाल्या प्रकारात मुलगी होरपळल्या गेली. पुढे त्या मुलाने तिला सोडुन दिले. आज तो मजेत आहे आणि ती मुलगी अजुनही कुमारी. झुरतेय. फारच वाईट झाले. थांबवते नाहितर कमेंटची पोस्ट व्हायची. मस्त झाला आहे लेख.
ReplyDeleteमाझ्या बघण्यात एकच दुखद प्रेमकथा आहे. माझ्या भावाचा मित्र होता तो आणि ती त्याचीच क्लासमेट. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण तो रांगारी तर ती मारवाडी. मुलीच्या घरून प्रचंड विरोध झाला. मुलाकडे मात्र आई-वडिलांनी स्वियकारले होते. शेवटी शिक्षण संपल्यावर मुलीचे जातीतच लग्न करण्यात आले. परिणाम काय? मुलाने तिच्या लग्नानंतर आत्महत्या केली. तो गेला! ही बातमी त्या मुलीपर्यंत गेली की नाही माहीत नाही. पण मुलाच्या आई-वडिलांचे काय? त्यांनी कसली शिक्षा भोगली राम जाणे!
ReplyDeleteखूप बदलायला हवंय अजून.
ReplyDeleteघरच्यांनी, आजुबाजूच्यांनी, आणि प्रेमात पडणाऱ्यांनीसुद्धा.
साधं एक उदाहरण - पुढे लग्न ठरलं, झालं तर ज्याला लोक ‘प्रेम’ म्हणतात, तेच जर अयशस्वी झालं तर ‘लफडं’ ठरतं.
आपली आवड म्हणजे आयुष्यभराला पुरेल असं प्रेम आहे, का दोन आठवड्यात मागे सरणारं आकर्षण याचा तरी पुरेसा विचार होतो का?
वीस - पंचवीस वर्षांच्या मुलामुलींना तरी स्वतःचे निर्णय घेता येतात का?
आपला मुलगा / मुलगी मोठी झाली, आपल्या आयुष्याचा विचार करायला समर्थ आहे असं आईवडिलांना वाटतं का?
अरे वाह.. क्या बात है.. अगदी आठवणींच्या काळात नेउन सोडलं आहेस तु..
ReplyDeleteआम्ही पण हे सगळं अनुभवलंय.. मजा असायची त्या काळात.. :)
एका ब्राह्मण मैत्रीणीने आंतरजातिय विवाह केला होता. जेंव्हा घरात कोंबडीकापतांना पाहिली आणि पिसं घरात उडलेली पाहिली आणि तिला कळलं आपण काय करुन बसलो ते..
एकाच जातीचे असतिल तर पुढे जमवुन घेतातंच.... !! :)
प्रेमाच्या लग्नाच्या गोष्टीत एव्हढेच सांगू शकेन, प्रेमाची मोजदाद भाग्य्लीखीत असते तेव्हढीच मिळते, आपल्या हाती फक्त प्रेमाची गुणवत्ता टिकवणे हे नक्कीच असते. मी मात्र शंकर महाराजांच्या प्रेमाने व वैविध्य पूर्ण पोस्ट करता सर्व आनंदाने वाचते.
ReplyDeleteरोहिणी अशा न कळत्या वयात केलेले प्रेम-आकर्षण या दोघोतले नक्की काही खरे तर नसतेच. उगाच सिनेमामध्ये पाहून आजुबाजूचे काही प्रेमात पडलेत असे सारखे म्हणतात ते ऐकून आपणही प्रेमात पडले पाहिजे असे वाटून अनेकदा हे घडते. परिणाम हा असा भयावह.संपूर्ण घरच यात होरपळले जाते गं.
ReplyDeleteमाधुरी किती दुर्देव गं.आमच्याही एका मित्राचा असाच जीव गेलाय. डॊक्टर मुलगा अतिशय हुशार-गोल्ड मेडलिस्ट....सगळे घरच कोलमडले.या प्रकरणात मुलीचा दोष होता. ती सोडून गेली होती, कारण कधीही कळले नाही. अशा घटना घडल्या की वाटते आजही लोक दुस~याच्या जीवाशी खेळ करू शकतात. आणि हे असे जीवच देऊन टाकणारेही फक्त स्वत:चा का विचार करतात? तू म्हणतेस तसे त्याच्या आईबाबांचे काय गं? त्या मुलांनी त्यांचा विचार का नाही केला?
ReplyDeleteगौरी अगदी पर्फेक्ट शब्द वापरलेस...लग्न झाले आणि निभले तर ते प्रेम-खरे प्रेम म्हटले जाते नाहीतर लफडी. प्रेम करून नंतर लग्न होऊन फक्त सहा महिन्यात मोडलेली घरेही पाहिलीत. कधीकधी इतकी फसवणूक असते की लग्न मोडणेच आवश्यक असते. परंतु कधीकधी आपण दोन भिन्न प्रकृतिच्या, दोन वेगळ्या प्रवृत्तिच्या व वातावरणातून आलेले आहोत तेव्हां जोडीदार आपल्याला हवे तसाच वागेल ही समजूत करून घेऊन ती अपेक्षा करत राहतात. मग थोड्याच दिवसात प्रेम संपून त्याची जागा फक्त कटकटी/कलह घेते.
ReplyDeleteआजकाल मुले मुली बराच विचार करतात-प्रॆक्टिकल विचार-सर्वांगिण विचार म्हणू आपण. शिवाय त्यांची आई-बाबा काय सांगू पाहत आहेत हे ऐकायची-त्यावर विचार करण्याची तयारी असते.हा बदल मला महत्वाचा वाटतो. आई-बाबांना आपले मूल इतका मोठा निर्णय घेण्याइतके समर्थ आहे असे वाटेल का? ९०% उत्तर नाही असेच येईल. पण एकदम विरोध करण्यापेक्षा धोके-खाचखळगे दाखवले-चर्चा केली तर मुले इरेला पेटून वेडा प्रकार टाळतील.
महेंद्र, हा..हा.... अरे बापरे!खरेयं रे. फार कठिण असते हे असे जमवून घेणे. ज्याने त्याने आपला पिंड ओळखून, आपल्याला काय झेपेल हे समजणे फार आवश्यक आहे. नेमके ते सोडून सगळ्याचा विचार होतो.
ReplyDeleteआम्हीं पण हे सारे अनुभवलेय.दोघांच्याही घरून विरोध नव्हताच त्यामुळे मजा होती. परंतु अनेक मित्र-मैत्रिणींना होरपळतानाही पाहिलेय.आजही आठवले की तितकाच दाह होतो.
अनुक्षरे प्रतिक्रियेबद्दल आभार.मुळात काळजात प्रेम असले पाहिजे.म्हणजे प्रेम जडलेय असे वाटल्यावर ते पुढे जाऊन-कितीही काळ लोटला तरीही आजही प्रेम आहे हे वाटणे सगळ्यात मोठा भाग आहे. ते जर वाटले तर गुणवत्ता आपोआपच टिकते.खरे ना?
ReplyDeletebaapare...kiti najuk tar tevhdaach gambhir lekh aahe....sarv premikanna antarmukh karnaara aahe. sahich
ReplyDeleteअभि,अचानक काही दु:खदायक पुन्हा उचल खाते...
ReplyDeleteआभार.:)