धुवाधार बरसणाऱ्या पावसात, माझ्या ओढणीच्या आडोशाला न जुमानता.....
ओलेचिंब भिजलो अनेकदा आपण......
तरीही कसे कोण जाणे, आपल्या मनांना कोरडेच ठेवलेस तू.
म्हणायला असायचास रे माझ्याजवळ......
अगदी चिकटून.... एका पांघरुणात पण त्या कुशीवर...... तुझ्या मनाला आजकाल स्पर्शात उतरवणे बंद करून टाकले आहेस तू.
माझे अविरत पाझरणारे अश्रूही दिसत नाहीत तुला.... का?
तूच म्हणायचास ना, उपेक्षा ही दाहक असते..... जाळत राहते, मग
मग, मला अशी तरसत ठेवून इतका शांत, निवांत झोपी कसा जातोस तू?
उन्हातलं चांदणं मनमुराद वेचणारे आपण, आजकाल चांदण्यातही असे पोळतोय.....
मी अस्वस्थ आहे पाहून जवळ घेतलं होतंस मला..... आठवतंय ना,
का तेही आता विस्मरणात गेलंय?
माझ्या एकटेपणावर तुझ्यामुळे मात करायला शिकले होते रे.......आज,
आज पुन्हा फिरून त्याच वाटेवर... तूच आणून सोडावंस.....
किती तरी अनोळखी आपलेसे झाले पण तुझ्या कुशीत असूनही अनेकदा मी परकीच राहिले.......आणि,
आणि, मला जे हवं होतं ते तुला कळूनही तुझ्या मनातच राहिलं.... का?
मी आहे तुझे सत्य, माहीत आहे तुला..... एकवारच देऊन जा ते तुझ्या ओठातले शब्द.......
स्वतःला उगा असे फसवू नकोस.... त्या अलवार भावनेला तू असे लपवू नकोस....
तुझा जीव आहे माझ्यावर हे जाणून आहे मी....... पण तेवढं पुरेसं असतं का जगायला?
एक अधुरं तडफडणारं मन आहे त्याचं काय...... एवढही समजत नाही तुला? तरीही.....
तुझ्यामाझ्यातले हे अदृश्य पटल..... त्यात धूसर होत चाललेला तू.....
किमान माझ्या मनातला संभ्रम तरी दूर करून जाशील?
किनाऱ्यावर झेपावणाऱ्या भरतीच्या लाटेसारखे सुखात निथळून टाकले होतेस.....
तेव्हा हेही सांगायचेस ना, जाणीवपूर्वक चिंब भिजून सुख भिनवून घे अंगभर.....
माझा मलाच भरवसा नाही तिथे मी तुझा-तुझ्यापाशी असणार नाही.......
वरचेवर म्हणालास, कधीतरी तरी काहीतरी माग गं....... किमान,
किमान, मी तुला काही दिले होते या आठवणीसाठी तरी माग.....
मी न मागताही तू इतकं दिलंस की आता मागण्यासारखं काही उरलंच नाही....... तुझ्याशिवाय.