जाता जाता एक नजर इथेही........

Friday, August 21, 2009

अजीब दास्तां हैं ये...... (३)

भाग पहिला येथे वाचा

भाग दुसरा येथे वाचा

आज काय झालेय समीरला? मनकवडा झाल्यासारखे का करतोय. ममा म्हणते अगदी तसेच करण्याचा मोह होतोय. सांगावे का मनातले. फार तर काय, म्हणेल वेडी आहेस का दिशा तू. अग अनुजाशी लग्न ठरतेय माझे. किंवा लग्न आणि तुझ्याशी? ना गं, मी तर नेहमीच तुला जवळची मैत्रीण समजत आलोय. पण कदाचित म्हणाला तर... दिशा, तेवढ्यासाठीच तर परत आलोय मी. खरेच असे म्हणेल का समीर? " अग अग दिशा, काय करते आहेस? आत्ता त्या सायकलवाल्याला मारले असतेस तू. लक्ष कुठेय तुझे? " निमा ओरडत होती. मागून रेश्मा व दिल्यानेही हटकले. " अरे बापरे! दिशा सांभाळ गं बाई, उगाच कोणा बिचाऱ्यावर गाडी घालू नकोस बरं का. कसला एवढा गहन विचार करते आहेस? " " बरं बरं कळले, तुम्ही पुढे बघा." असे म्हणत दिशाने सावरून घेतले खरे पण हा गुंता कसा सुटावा?

सगळे रजतच्या घरी पोचले. श्री आणि रजतने पुढे जाऊन थोडी तयारी करून ठेवलेली होती. चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, पण सगळ्यांना कडकडून भूक लागलेली. हे असले स्नॅक्स प्रकार कोणालाच नको होते. " रजत अरे मी इतका लांब प्रवास करून आलोय ते काय हे चिप्स खायला होय, मुलींनो जरा आपापली पाककला दाखवा ना. मस्त पोहे करा गं. तरसलो आहे मी गेले सहा महिने. " समीर पटकन म्हणाला. आता इतक्या जणांसाठी पोहे म्हणजे किलोभर तर करावे लागतील, सकाळी सकाळी पोरींनाही सुटीचा मूड असल्याने बिलकूल इच्छा नव्हती... मग ढकलाढकली सुरू झाली. तू कर गं, ए मी नाही हं... माझे मुळीच चांगले होत नाहीत, मग कोणी खाणार नाही. शेवटी दिशाने वैतागून म्हटले, " पुरे झाले गं तुमचे, मी करते. खायला मात्र याल पहिल्या. जारे किमान कोणीतरी पोहे घेऊन तरी या तोवर मी तयारी करते. असे म्हणत स्वयंपाकघरात घुसलीही.

"अरे कोणीतरी तिला मदत तरी करा रे. " दिल्या ओरडत होता. त्यावर अनुजाचा आवाज आला, " सम्या पोहे कोणाला हवेत? तुला ना, मग ऊठ चल, जा जा कांदा कापून दे जरा. " टोपलीतून कांदे काढत हे आवाज दिशा ऐकत होती. तेवढ्यात हालचाल जाणवली म्हणून पटकन मागे वळली तो समीर अगदी जवळ उभा होता. संपूर्ण साडेसहा महिन्याने इतक्या जवळून दिशा समीरला पाहत होती. त्याच्या ओठांवरचा कट - लवकट म्हणत असे ती त्याला. त्याच्या परफ्यूम, डिओचा मिक्स सुगंध, कुडत्यामधून दिसणारी भरदार छाती... वाटले झोकून द्यावे स्वतःला. " दे गं ते कांदे इकडे, पोहे हवेत तर मदतही करायला हवी ना तुला. " असे म्हणत तिच्या भारलेल्या अवस्थेकडे साफ दुर्लक्ष करीत समीरने कांदे चिरायला सुरवात केली. पोहे होईतो सगळा वेळ तो दिशाच्या आसपास अगदी जवळ वावरत राहिला. मध्येच अनुजा दोन वेळा डोकावून उगाचच समीरशी गोड गोड बोलून गेली. समीरही अगदी साथ देत होता. असा राग आला होता पण करणार काय, हसून साजरे करणे भागच होते.

पोहे तयार झाले, घरभर वास दरवळत होता. बाहेर सगळे भूक भूक ओरडत होते, आणारे लवकर. दिशाने प्लेट्स भरायला घेतल्या तसे समीरने तिला थांबवत पातेलेच उचलले आणि बाहेर नेऊन मधोमध ठेवले. लिंबे, कोथिंबीर, खोबरे व शेव घेऊन मागोमाग दिशाही आलीच. प्लेट्स, चमचे व दही कोणीतरी जाऊन पटकन आणले आणि हल्ला बोल करत सगळे तुटून पडले. पोहे सुंदरच झाले होते. हातातोंडाची लढाई सुरू झाली. जरा पोटोबा शांत झाल्यावर चहाची फर्माइश आली. दिशाला कल्पना होतीच त्यामुळे तिने बाहेर येताना चहा ठेवलाच होता. " दिशा, समीर चहाचे पाहा रे. आता नाश्ता काम पूर्ण करावेच लागेल. काय रे बरोबर आहे ना मी म्हणतो ते. " सगळ्यांनी हो हो म्हणत श्रीला साथ दिली. पुन्हा दोघांची वरात किचन मध्ये आली.

दिशा कपबश्या शोधत होती तोच तिच्या खांद्याला धरून समीरने तिला स्वत:कडे वळवले, " दिशा, कशी आहेस गं? मिस केलेस मला? " आत्तापर्यंत अनेकवेळा समीरने दिशाला स्पर्श केला होता, पण आजचा स्पर्श वेगळाच होता. निदान दिशाला तरी जाणवत होता. मनाने फितुरी कधीचीच केली होती. आता या स्पर्शाने तर दिशा थरथरू लागली. घाईघाईने कप ओट्यावर ठेवण्याच्या निमित्ताने दिशाने स्वत:ला सावरले. मोकळे हसून समीरचे केस जरासे विस्कटत ती म्हणाली, " मी एकदम चकाचक आहे. आणि तुला मी कशाला मिस करेन रे. ते काम अनुजा करतेच आहे ना? आणि कारे शहाण्या तू तरी कुठे माझी आठवण काढीत होतास? " बोलता बोलता दिशा ओट्याला चिकटली तसे तिच्या दोन्ही बाजूने ओट्यावर हात रोवून, कोंडलेल्या आवाजात समीरने विचारले " दिशा, मी जर तुला सांगितले की मी तुला वेड्यासारखे मिस केले, आत्ताही मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच परत आलोय तर विश्वास ठेवशील माझ्यावर? "

तोच अनुजा आत आली. दिशा अन समीरला इतके जवळ उभे पाहून गोंधळली, " काय रे समीर, नाही म्हणजे सगळे ठीक आहे ना? चुकीच्या वेळी आले का मी आत? तुम्ही काय बोलत होतात? आणि दिशा का अशी थरथरतेय? दिशा अग मी तुला विचारतेय ना? बोल की काहीतरी. तुम्ही तुम्ही दोघे......समीर, तू.....ओह्ह्ह्ह्ह." अनुजा रडायलाच लागली. दोघांकडे पाहत रडत रडत बाहेर गेली. दिशाला समजेचना हे काय चाललेय. तिने समीरकडे पाहिले तर तो अजूनही तसाच भारलेला होता, डोळ्यात प्रश्नचिह्न घेऊन. बाहेर आवाज वाढू लागले . रेश्मा, निमा, रजतच्या हाका येऊ लागल्या, " सम्या, दिशा बाहेर या ताबडतोब. ही अनुजा कशाला हमसून हमसून रडतेय? सम्या ए सम्या....." तशी दिशाकडे पाहत हात झटकून समीर बाहेर गेला.

दिशा, मूर्ख मुली चांगला समीर स्वत:हून विचारत होता. आता तरी सांगायचेस त्याला. नाहीतरी घोळ घातलाच ना, ती अनुजाही इतके कशाला रडतेय कोण जाणे, असे काय घडलेय इथे? आता उगाच मी बदनाम होणार, तेही काही न करता. तोच बाहेरून अनुजाची हाक आली, " दिशा, आता कुठला मुहूर्त शोधते आहेस? बाहेर ये ताबडतोब. " नाइलाजाने दिशा बाहेर आली. नजर जमिनीवर खिळलेली, कोण कोण काय बोलतंय ते ऐकायची तयारी करत होती....पण एकदम शांतता का पसरली आहे. कोणीच काही बोलत नाहीये. डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहायचा प्रयत्न करीत होती. सगळे माझ्यावर भडकलेत आणि अनुजा तर ...समीर या सगळ्यांच्या तोंडी मला देउन तू कुठे......

समीर दिसला, दिशाचा विदीर्ण चेहरा पाहून तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. तिचे हात हातात धरून गुडघ्यावर बसत म्हणाला, " दिशा, मला हवीस तू. लग्न करशील माझ्याशी? अग मी सदैव तुझ्यावरच प्रेम करत होतो. मला जाणवायचे तुलाही मी आवडतो पण तू नेहमीच तुझ्या परिघात राहिलीस. अनुजा व माझ्या घरच्यांची फार इच्छा होती आमचे लग्न व्हावे पण अनुजा दोन वर्षांपासूनच मनिषच्या प्रेमात बुडलेली आहे. तो पायलट आहे एअर फोर्स मध्ये. दोन महिन्यांनी सुटीवर आला की अनुजाला मागणी घालेल तोवर तिच्या घरच्यांना कळू द्यायचे नव्हते म्हणून मग आम्ही नाटक करत होतो. शिवाय यामुळे तरी तू काहीतरी बोलशील असे वाटत होते. पण तू शांतच राहिलीस. चुकून कधीतरी तुझे डोळे तुला दगा देत आणि मग तुझी होणारी तगमग, अपराधीपण तुझ्या चेहऱ्यावर दिसत राही. मला सहन होईना गं ते. म्हणून कंपनीने विचारले सहा महिन्यांनसाठी जातोस का तर मी हो म्हणून टाकले. वाटले मी लांब गेल्यामुळे तरी प्रेम व्यक्त करशील, निदान तुझे हे अपराधीपण दूर होईल. मी गेलो तुझ्यासाठी पण झाले उलटेच. या सहा महिन्यांत मी तुला अतिशय मिस केले. जिकडे तिकडे फक्त तूच दिसायचीस. अगदी साध्या साध्या गोष्टीही मला आठवत. आत्ता दिशा असे म्हणाली असती, अशी बसली असती. अगदी भिकार सिनेमा पाहतानाही धो धो रडली असती. आणि जाणवले तू जगू शकशीलही माझ्याशिवाय पण मी नाही जगू शकत. पहाटे चारला फोन लावला, पण तू घेतला नाहीस. तेव्हाच सांगणार होतो तुला, दिशू, आय लव्ह यू, चल पटकन लग्न करून घेऊयात. ए अनुजा दे ना गं. दिशू नाही म्हणू नकोस गं या चमेलीच्या कळ्यांची शपथ तुला आहे. "

सगळे श्वास रोखून ऐकत दिशाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. दिशा भांबावली....... गोंधळली ....... मग रागावली ...... शेवटी मोहरली. डोळ्यांतून आसवे ओघळत होती त्यांना पुसत अनुजाला एक फटका मारून समीरच्या मिठीत तिने स्वत:ला झोकून दिले. त्याच्या कंठावर नाक घासत, " दुष्ट कुठला, किती तरसवलेस मला. वचपा काढेन बघ सगळ्याचा. दामदुपटीने वसूल करून घेईन हा सारा त्रास." असे म्हणत त्याला घट्ट बिलगली.टाळ्या, शिट्यांचा एकच गदारोळ झाला. दिशाला मिठी मारत अनुजा सारखी सॊरी म्हणत होती. पुढे सगळ्या गोष्टी झपाट्याने घडल्या. दिशाच्या ममाला तर कोण आनंद झाला. बाबाही समीरला ओळखत होतेच. समीरच्या घरी अनुजाचे लग्न दुसऱ्याच कोणाशी होतेय हे ऐकून थोडा गोंधळ झाला खरा. पण समीरने सगळे नीट मॅनेज केले. तीन महिन्यातच अनुजा-मनिष व दिशा-समीरचे शुभमंगल पार पडले. पाव्हणे मंडळी पांगली तसे दिशा-समीर मनालीला आले.

लग्न होऊन सहा दिवस झाले तरी निवांत वेळ मिळालाच नव्हता. मनालीला आल्यावर पहिला दिवस कसा गेला ते दोघांना कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी थोडे भटकून आल्यावर तृप्त दिशा फ्रेश होऊन आली तेव्हां समीर व्हरांड्यात तिची वाट पाहत उभा होता. तिला घट्ट जवळ ओढून घेत समीरने विचारले, " दिशू, सांग ना गं एकदा...मी आवडतो ना तुला?" आता राहवणे शक्यच नव्हते. दिशाने त्याच्या लव-कटला कुरवाळत हळूच हुंकार भरला. तसे तिला घुसमटवत समीर आरती प्रभूंचे गीत बेभान होऊन गाऊ लागला......माझी वस्त्रे तुझी झाली पंख सारे मिटले गं
चोचीतले उष्टे थेंब पानोपानी पडले गं
माझी वस्त्रे तुझी झाली तुझी वस्त्रे वारा गं

वाजले गं मी ऐकले गं वाजले गं मी ऐकले गं
माझी वस्त्रे तुझी झाली रंग मात्र फसले गं
डोळे चारी मिटले आणि ओठ ओठा डसले गं

या अवसेच्या रात्री कुठे निघालीस परडी घेऊन
तृप्त फुले झाली गं फुलली तेव्हा सरली गं
आता कुठे उरली गं गंध फुटे गाली गं

परडीभर तरी मिळेल का डोही कुठे चांदणे
कुठे कुठल्या झाडाखाली उभी नको राहूस गं
अजून त्यांची सळसळ नाही जिरली गं

माझी वस्त्रे तुझी झाली तुझी वस्त्रे वारा झाली
गात्रांच्या गारा झाल्या माझी वस्त्रे भिजली गं
दूर तिथे देवळापुढे दीपमाळ विझली गं

तुझी वस्त्रे कुठे गेली माझी वस्त्रे तुझी झाली
परडीभर चांदण्यांनी देहपूजा सजली गं
परडीभर चांदण्यांनी देहपूजा सजली गं........13 comments:

 1. masta katha...pavsalyat itaki chhan romantic katha vachun ekdum chhan watle..thank you.i was missing this kind of story

  ReplyDelete
 2. मुग्धा, अनेक आभार.

  ReplyDelete
 3. Khupach chaan ga. Happy endings make me happy. :-P Tujhi lihinyachi style pan changli aahe.
  Btw, tujha ek blog hota eka topic var. Ki kase purvi ghari kuni aale tari 'Ya jevayla' mhanun lagech aai karun hi dyaychi.:-) Tenvhapasun to mala khupach lakshat rahila aahe. I have been trying to keep my 'doors open' as much as possible since then. Your blogs do affect us in a good way. :-P
  -Vidya.

  ReplyDelete
 4. mastacga g shree..mi pan agadi aturatene wat pahat hoti kathechi..khuppch chhan !!

  ReplyDelete
 5. विद्या, खूप बरे वाटले तुला गोष्ट आवडली. अभिप्रायाबद्दल धन्यवाद गं. ओह्ह्ह..., आईला सांगते म्हणजे तिलाही आनंद वाटेल.
  बाप्पा मोरया!!

  ReplyDelete
 6. Very Nice !

  Tuzi shabdafek afalaatun aahe !

  Highly impressed !!!!

  ReplyDelete
 7. ekdam zakkas jamli aahe katha...

  ReplyDelete
 8. दिपू,सागर प्रतिक्रियेबद्दल आभार.:)

  ReplyDelete
 9. मस्त... एकदम आवडली गोष्ट... मागचे काही दिवस अतिशय व्यस्त आहे त्यामुळे सारखे वाचायला जमत नाही. पण ही गोष्ट वाचुन काहीतरी छान आणि हलकंफुलकं वाचल्याचं समाधान झालं. कीप अप द गुड वर्क. :-)

  ReplyDelete
 10. रोहिणी आवर्जून वाचून प्रतिक्रियाही दिलीस, खूप आभार.:)

  ReplyDelete
 11. मस्त.....पहिले दोन्ही भाग वाचायचे मुद्दाम टाळले होते...नाहीतर हुरहुर लागते उगाच...आज मात्र पुर्ण वाचले...मस्त जमलीये भट्टी....

  ReplyDelete
 12. धन्यवाद तन्वी.:)

  ReplyDelete
 13. माऊ तुला कथा आवडली मला खूप आनंद वाटला.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !