आमची आई अगदी न चुकता दर वर्षी होळीला पुरणाची पोळी करत असे. तिने केलेल्या पोळ्या अगदी एक सारख्या, तब्येतीत पुरण भरलेल्या अजिबात कुठूनही न उकललेल्या. आईच्या हातच्या मऊसूत पुरणाच्या पोळ्या म्हणजे पर्वणीच. जेव्हां जेव्हां ती त्या करत असे त्या प्रत्येक वेळी मी निदान एक तरी पुरणाची पोळी करून पाही. पण जिकडून तिकडून पुरण बाहेर येऊन चिकटल्याशिवाय ती पोळी काही होत नसे. मी केलेली पोळी कशीही असली तरी मी ती आनंदाने खात असे पण मन मात्र खट्टू होई. आईच्या कश्या इतक्या सुंदर होतात, मलाच का जमत नाही याचे दुःख पुढे दोन चार दिवस त्रास देई की पुन्हा आई नव्याने त्या करायला घेईतो मी विसरून जाई.
लग्न झाल्यावर एकदा सासू-सासरे चार दिवस पुण्याला गेले असता मी मुद्दामहून अर्धा दिवसाची रजा टाकून आज पुरणाची पोळी करून नचिकेतला चकित करायचे असे ठरवून घरी गेले. आई करताना पाहिलेले आठवून आठवून सुरवात केली. डाळ शिजवून घेतली पण पाणी पूर्ण काढले गेले नाही. गूळ नेमका कमी भरला....., तर त्यात काय कमी तर कमी. अर्धा गूळ व अर्धी साखर घालून करू, पण आज मागे हटायचे नाही. पक्का निर्धार केलेला. एक डोळा घड्याळाकडे ठेवून भरभर कामाला लागले होते. मुळात डाळीत थोडे पाणी शिल्लक राहिलेले त्यात साखर व गूळ वितळून मिश्रणाला चक्क कटाच्या आमटीचे स्वरूप आले आणि माझा धीर खचला. तरी नेटाने पंधरा मिनिटे ते आटते का याचा प्रयत्न केला पण फारसा काही फरक पडला नाही. उलट आच वाढविल्याने तळशी करपू लागले. या मिश्रणाचे आता नक्की कशात रुपांतर होतेय तेच समजेना, जीव खालीवर होऊ लागला. चव मात्र खरेच बरी लागत होती.
हे काय वाटीत घालून का देऊ खायला. म्हणजे तो नक्की हसेल आणि सगळ्यांना माझी फजिती सांगेल. या नुसत्या कल्पनेनेच वैतागून मी तो सगळा राडा उचलला, पिशवीत भरला. सोबत चार साध्या पोळ्याही घेतल्या आणि चक्क घराशेजारच्या बागेपाशी बसणाऱ्या आजीला देऊन आले. मनात सारखे वाटत होते ती आजीपण म्हणत असेल, काय ही पोर आहे. साधी पुरणपोळीही जमेना होय.
पुरणपोळी जमलीच नाही ती नाहीच वर अर्धा दिवसाची सुटीही फुकट गेली.
माझ्या फजितीचा नचिकेतला मी मुळीच पत्ता लागू दिला नाही. संध्याकाळी बाहेर जाऊन मस्त हादडून आलो. पण कुठेतरी मनात सल राहिलाच. पुढे बरीच वर्षे मी या पुरणपोळीच्या वाटेला गेलेच नाही. वेळ कुठे आहे इतका या सबबीखाली टाळत आले. होळीला बिल्डिंगमधलीच एक मैत्रीण बनवून देत असे तेव्हा तिच्याकडूनच आणत असल्याने तसे अडलेही नाही. पण २००० साली अमेरिकेत आलो आणि आता आपण जर पुरणपोळी केली नाही तर खायला मिळणारच नाही हे जाणवले. मनाचा हिय्या करून पुन्हा एकदा होळी नसताना पुरणपोळीचा घाट घातला आणि वल्ला!
जमल्या. शोमूने अगदी आडवा हात मारला ते पाहून इतक्या वर्षांचे खट्टू मन आनंदून गेले. लागलीच फोन करून आईच्या कानाशी लागले. तिला ही बातमी देऊन थोडी कॉलर ताठ करून घेतली.
आता वर्षातून दोन-तीनदा तरी होतातच म्हणजे करतेच. हो ना, नाहीतर पुन्हा काहीतरी चुकायचे. उद्याच होळी तेव्हा आज केल्यात. लगे हाथ कृतीही टाकतेय.
लग्न झाल्यावर एकदा सासू-सासरे चार दिवस पुण्याला गेले असता मी मुद्दामहून अर्धा दिवसाची रजा टाकून आज पुरणाची पोळी करून नचिकेतला चकित करायचे असे ठरवून घरी गेले. आई करताना पाहिलेले आठवून आठवून सुरवात केली. डाळ शिजवून घेतली पण पाणी पूर्ण काढले गेले नाही. गूळ नेमका कमी भरला....., तर त्यात काय कमी तर कमी. अर्धा गूळ व अर्धी साखर घालून करू, पण आज मागे हटायचे नाही. पक्का निर्धार केलेला. एक डोळा घड्याळाकडे ठेवून भरभर कामाला लागले होते. मुळात डाळीत थोडे पाणी शिल्लक राहिलेले त्यात साखर व गूळ वितळून मिश्रणाला चक्क कटाच्या आमटीचे स्वरूप आले आणि माझा धीर खचला. तरी नेटाने पंधरा मिनिटे ते आटते का याचा प्रयत्न केला पण फारसा काही फरक पडला नाही. उलट आच वाढविल्याने तळशी करपू लागले. या मिश्रणाचे आता नक्की कशात रुपांतर होतेय तेच समजेना, जीव खालीवर होऊ लागला. चव मात्र खरेच बरी लागत होती.

पुरणपोळी जमलीच नाही ती नाहीच वर अर्धा दिवसाची सुटीही फुकट गेली.

आता वर्षातून दोन-तीनदा तरी होतातच म्हणजे करतेच. हो ना, नाहीतर पुन्हा काहीतरी चुकायचे. उद्याच होळी तेव्हा आज केल्यात. लगे हाथ कृतीही टाकतेय.
सगळ्यांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

जिन्नस
- चार वाट्या चण्याची डाळ
- चार वाट्या चिरलेला/किसलेला गूळ ( शक्यतो पिवळा गूळ घ्यावा )
- कणीक दोन वाट्या, तांदळाची पिठी दोन वाट्या
- दोन चमचे वेलदोडा पूड, एक चमचा जायफळ पूड ( आवडत असल्यास ) थोडे केशर (वासापुरते)
- अर्धी वाटी तेल व दोन चिमूट मीठ व तीन-चार चमचे तूप
मार्गदर्शन
चण्याची डाळ स्वच्छ धुऊन एका मध्यम भांड्यात जरा जास्तच पाणी घेऊन त्यात डाळ व चार थेंब तेलाचे घालून प्रेशरकुकरमध्ये ठेवावे. मध्यम आचेवर तीन शिट्ट्या करून घ्याव्यात. प्रेशर गेले की लागलीच काढून चाळणीवर डाळ ओतावी. डाळीतले सगळे पाणी निथळून घेऊन एका भांड्यात ठेवावे. या पाण्याचीच कटाची आमटी करता येते. या गरम डाळीतच गूळ व केशराच्या काड्या घालून मध्यम आचेवर पुरण शिजवून घ्यावे. साधारण दहा मिनिटात शिजते.शिजत आले की चमचाभर तूप त्यात टाकून मिनिटभर शिजवून आच बंद करावी. आचेवरून काढून पुरण जरा निवले की वेलदोड्याची व जायफळाची पूड घालून पुरण मिक्सरमधून/ पुरणयंत्रातून/ पाट्यावर वाटून एकसंध गोळा करावा.
गव्हाची कणीक प्रथम पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावी. थोड्या पाण्यात अगदी घट्ट भिजवून साधारण तास-दिडतास झाकून ठेवावी. नंतर पाणी व मीठ लावून खूप वेळ मळून मऊ परंतु ताणता येईल अशी करून घेऊन एका भांड्यात अर्धी वाटी तेल घेऊन त्यात बुडवून ठेवावी. थोडी कणीक घेऊन त्याचा मोठ्या लिंबाएवढा गोळा करावा. कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेऊन कणकेच्या गोळ्यात घालून त्याचा उंडा करावा. तांदुळाच्या पिठीवर अतिशय हलक्या हाताने परंतु पुरण अगदी पोळीच्या कडेपर्यंत नीट पसरेल असे लाटावे. शक्यतो न चिकटणाऱ्या तव्यावर टाकून नाजूकपणे भाजावी. उलटताना ती फुटणार नाही याची काळजी घ्यावी. बदामी रंगावर भाजून घ्यावी व तूप घालून खायला द्यावी. आवडत असल्यास सोबत दूधही द्यावे.
टीपा
ताजी पुरणाची पोळी तूप-दुधाबरोबर सुंदर लागतेच परंतु शिळी पुरणाची पोळी ( दुसऱ्या दिवशी ) जरा जास्तच छान लागते. तेव्हा करताना हमखास पाचसहा तरी पोळ्या दुसऱ्या दिवशीसाठी राहतील या हिशोबाने कराव्यात. मी पुरण शिजत आले की त्यात एक चमचा तूप टाकते. त्यामुळे पुरणाची खुमारी हमखास वाढते. पुरण मऊ झाले पाहिजे. गूळ किंवा डाळ राहू देऊ नये अन्यथा लाटताना पोळी फुटत राहण्याची शक्यता असते. अशी पोळी फुटली की भाजताना त्रास होतो.