जाता जाता एक नजर इथेही........

Monday, December 21, 2009

आमचे लाडके कांबळेसर......


काल संध्याकाळी लोकसत्ता( ऑनलाईन ) वाचायला घेतला. आणि धक्काच बसला. अविश्वासाने मी पुन्हा पुन्हा बातमी वाचली. भरभर मटा व सकाळ मध्येही वाचली. दुर्दैवाने बातमी खरीच होती. माझे आवडते कांबळेसर हैदराबादमधील हुसेन सागर तलावात बुडून निवर्तले होते. दिनांक १४ तारखेपासून बेपत्ता असलेल्या कांबळेसरांचे असे जाणे मनाला अतिशय चटका लावून गेले.

आज सगळ्याच पेपरात म्हटले आहे की त्यांनी आत्महत्या केली असावी. मानसिक स्थिती बरेच दिवसांपासून बिघडली होतीच. तशात त्यांनी औषधोपचार ही दोन दिवस घेतले नव्हते. हे सगळे वाचून जीवाला फार लागले. अतिशय हुशार व समतोल विचार असणाऱ्या आमच्या सरांना इतका प्रचंड त्रास होत असावा की दुसरा पर्यायच उरला नाही. का अजून काही वेगळेच कारण असेल? ते जे काही असेल ते असो तरीही सारखे वाटते आहे सरांनी असे कसे केले? आम्हाला माहीत असलेले सर तर एकदम तडफदार, हसतमुख, गप्पा विनोद करणारे, सगळ्या पोरांवर( आम्ही स्टुडंट म्हणजे त्यांची पोरेच होतो )प्रेम करणारे होते.

अकरावी व बारावीला मी हायर लेवल मराठी घेतले होते. कांबळेसर तेव्हां २८/३० चे असतील. पहिल्याप्रथम सरांना पाहिले तेव्हां काही खास प्रभाव पडला नाही. मात्र त्यांनी बोलायला सुरवात केली आणि सगळा वर्ग मंत्रमुग्ध झाल्यासारखा ऐकत राहिला. अत्यंत शुद्ध, स्वच्छ व थोडीशी आलंकारिक भाषा. भाषेवरचे प्रभुत्व जबरी होते. संतवाग्डमयाबद्दलचा त्यांचा सखोल अभ्यास होता. मुख्य म्हणजे सगळ्या पोरांना आपलेसे करण्याची व शिकवण्याची एक विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. ' माझ्या जल्माची चित्तरकथा ' लिहिणारी आई व ' मी कृष्ण ' लिहिणारे बाबा त्यांना लाभलेले होते. शिकवत असताना आमच्यात ते सहजी मिसळून जात. विशेष म्हणजे शिकवताना कधीच ते फक्त पुस्तकी शिकवत नसत. निरनिराळी उदाहरणे, सामाजिक दाखले, प्रसंग, आणि मुख्य म्हणजे जे सांगतील ते सप्रमाण सांगायचे. कविता शिकवताना त्यातले भाव अलवारपणे उलगडून दाखवत.

सरांची दलित चळवळ-संघर्ष, त्यांनी यासगळ्यासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहेच. मंडल आयोग लागू करण्याच्या प्रक्रियेत ते अतिशय सक्रिय होते हे मला नीट आठवतेय. पण हे सगळे पुढे जाऊन केले्ले. आम्हाला माहीत असलेले आमचे सर म्हणजे अतिशय अभ्यासू, लेखक, तरल संवेदनशील कविता लिहिणारे व तडफदार भाषण करणारे. सरांच्या पत्नीही आमच्या चांगल्या ओळखीच्या होत्या. बारावीनंतर सर शिकवायला नसले तरी नेहमीच भेट होई. अमुक पुस्तक वाच गं नक्की असे ते आवर्जून सांगत. अनेकदा पुस्तके आणूनही देत. कविता करायला प्रोत्साहन देत. वृत्त, छंद यांचा प्रभावी उपयोग कसा करावा, निबंध लिहिताना अतिशय मुद्देसूद व सप्रमाण माहिती देऊन लिहावेत. उगाच फाफटपसारा लिहीत बसू नये. एक ना दोन अनेक गोष्टी समजावून सांगत.

कॉलेज संपले आणि सरांशी असलेला संपर्क जवळ जवळ तुटलाच. मधल्या काळात सरही रुतब्याने-मानाने-कर्तुत्वाने खूप मोठे झाले होते. व्यस्तही झाले होते. नेहमी सरांच्या चळवळीच्या बातम्या, भाषणे वाचत ऐकत होतो. " रामायणातील संस्कृती संघर्ष " हे त्यांचे लिखाण म्हणजे रामायणाची केलेली एक वेगळीच समीक्षा आहे. समाज परिवर्तनाकरिता त्यांनी भरीव योगदान दिले आहे. माझ्यासाठी मात्र प्रा. अरुण कांबळे हे आमचे अतिशय लाडके सर होते व सदैव माझ्या मनात ते जिवंत राहतील. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

8 comments:

  1. अरुण कांबळे सरांना मी पण मुंबई विद्यापिठात भेटलो होतो.. सौ. ला सोडायला गेलो होतो तेंव्हा. जास्त इंटरऍक्शन झालेली नव्हती माझी त्यांच्याी. पण इश्वर मृतात्म्यास शांती देओ..

    ReplyDelete
  2. महेंद्र कालचा दिवस फार फार दु:खात गेला. अजूनही मला ही घटना घडली आहे हे पटवून घेता येत नाहीये. देव सरांना सुखी ठेवो.

    ReplyDelete
  3. ताई तुझं दुःख कळतंय..ईश्वर मृतात्म्यास शांती देवो...
    फ़क्त केवळ तुझा मुड बदलावा म्हणून तुला माझ्या ब्लॉगवर टॅगलय..बघ जाऊन

    ReplyDelete
  4. फार वाईट बातमी होती ती. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ.

    ReplyDelete
  5. अपर्णा थॆंक्स ग....
    अग सहीच झालाय धागा...चला आता त्याची पुढची कडी गुंफायला हवी ना...:)

    ReplyDelete
  6. देव सरांना सुखी ठेवो.

    ReplyDelete
  7. अग भाग्यश्री कालच हैदराबाद हून परत आले. आम्ही तिकडे बरेच फिरलो सुद्धा !तेव्हा मदनने पुण्याहून फोन केला तेव्हा हुसैन सागर घटने विषयी सांगितले पण आम्हाला ५-६ दिवस तिथे राहून काहीच माहिती नव्हते .आज नेमकी तुझी पोस्ट वाचली आणि वाईट वाटले.देव त्यांना शांती देओ !

    ReplyDelete
  8. मधुमती अग आणि कालच्या पेपरमध्ये सरांच्या भगिनींनी म्हटले आहे की ही आत्महत्या नाही. म्हणजे आता आणखीनच गुढ वाढलेय. फार फार वाईट घटना घडली गं.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !